GBS मुळे मुंबईत एकाचा मृत्यू; जाणून घ्या पुण्यासह राज्यात कुठे किती रुग्ण?

गीयन बारे सिंड्रोममुळे मुंबईतील 53 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णावर बाई यमुनाबाई लक्ष्‍मण नायर रूग्‍णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.

श्वसनास त्रास होत असल्‍याने या पुरुष रूग्‍णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच त्याला गीयन बारे सिंड्रोमची (GBS) ची बाधा झाल्याचं निदान झालं.

त्‍यानुसार, रूग्‍णावर योग्य ते उपचार सुरु होते. मात्र, उपचार सुरू असतानाच सोमवारी (10 फेब्रुवारी) या रूग्‍णाचं निधन झालं आहे.

बाई यमुनाबाई लक्ष्‍मण नायर रूग्‍णालयात दाखल होण्याच्या 16 दिवसांपूर्वी हा रूग्‍ण पुण्यात जाऊन परतला होता, असं निष्‍पन्‍न झालं आहे.

काय आहे सध्याची आकडेवारी?

अद्ययावत अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात दुर्मिळ गीयन बारे सिंड्रोमचे आतापर्यंत 203 संशयित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 176 जणांना या रोगाची बाधा झालेली असल्याचं निष्पन्न झालं आहे.

आतापर्यंत सापडलेल्या 203 संशयित रुग्णांपैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या 8 पैकी चार जणांचा GBS मुळेच मृत्यू झाला असल्याचं निदान झालं आहे, तर उर्वरित चार जणांच्या संशयित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यापैकी 41 रुग्ण पुणे मनपा, तर 94 रुग्ण हे नव्याने पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट केलेल्या गावामधील आहेत, 29 रुग्ण पिपंरी चिंचवड मनपा व 31 रुग्ण पुणे ग्रामीण व 8 इतर जिल्ह्यातील आहेत.

यापैकी 109 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आलं असून 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर अजूनही 52 रुग्ण आयसीयूमध्ये आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दुर्मिळ गीयन बारे सिंड्रोमचे आतापर्यंत 203 संशयित रुग्ण आढळले आहेत. एकट्या पुण्यात तब्बल 195 संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

याआधी जीबीएसचा उद्रेक पाण्यातून झाला असण्याची शक्यता पुणे महापालिकेने वर्तवली होती. एनआयव्हीच्या अहवालात campylobacter jejuni आढळल्याचा महापालिकेने माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेकडून कारवाईला सुरुवात झाली होती.

26 आर ओ प्लांट आणि 16 खासगी विहिरींवर कारवाई केली गेली आहे, अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली होती.

सध्या सर्व संशयित रुग्णांवर पुण्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आजाराचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

भीतीचं वातावरण कमी होईल अशी आशा - अजित पवार

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात म्हटलं आहे की, "डॉक्टर, सिव्हिल सर्जन, कलेक्टर आणि बाकी लोकांसोबत गीयन बारे सिंड्रोमचा आढावा आम्ही घेतलेला आहे. हा संसर्गजन्य रोग नाही. त्यासंदर्भात काळजी घेणं महत्त्वाचं आहे. पाणी उकळून पिल्याने फक्त याच नाही तर अनेक आजारांपासून संरक्षण मिळतं.

या आजाराबद्दल अनेक गैरसमज, अफवा पसरवल्या जात आहेत. त्याबद्दलची एक सरकारी प्रेस नोट काढायला सांगितलं आहे. ती इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला दिली जाईल. त्याने जनतेमधील भीतीचं वातावरण कमी होईल अशी आशा आहे," असंही ते म्हणाले.

याआधी फक्त पुणे जिल्ह्यात या दुर्मिळ आजाराचे 24 संशयित रुग्ण आढळून आले होते.

या रुग्णांपैकी 5 रुग्ण हे पुणे शहरातील तर इतर रुग्ण हे पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील इतर भागातील होते.

दरम्यान, 8 संशयित रुग्णांचे नमुने आयसीएमआर-एनआयव्ही (ICMR-NIV) कडे तपासणीसाठीही पाठवण्यात आले होते.

शहरात पसरलेल्या या दुर्मिळ आजाराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्था (PATH) यांच्या सहभागाने शीघ्रकृती दलाची स्थापना करण्यात आली आहे.

गीयन बारे सिंड्रोम (Guillain-Barre Syndrome) हा एक दुर्मिळ आजार आहे.

या आजाराची प्राथमिक पहिले लक्षण म्हणजे अशक्तपणा आणि हातपायांना मुंग्या येणे, बोलण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास होणे, धाप लागणे/श्वास घेण्यास त्रास होणे ही आहेत.

रुग्णांबाबत माहिती देताना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी वैशाली जाधव म्हणाल्या, "पुणे शहर तसेच जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये हे रुग्ण आढळले आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे विविध रुग्णालयात आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत. रुग्ण एकाच ठिकाणचे नसल्याने नेमक्या कारणांची निश्चिती करता येत नाही. यासाठी तज्ज्ञांच्या समितीची स्थापना करुन अभ्यास केला जात आहे."

तर, पालिका आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे म्हणाल्या, "रुग्णांचे सॅम्पल्स एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहे. आजार एका कोणत्यातरी वेगळ्या आजारासोबत लागून येतो आणि आजाराला सेकंडरी आजार म्हटलं जातं.

हा आजार होण्याचे विविध कारण आहेत, जसे की बॅक्टेरिअर इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे आदि. गोष्टी याला कारणीभूत ठरण्याची शक्यता असते.

12 ते 30 वयोगटातील व्यक्तींना हा आजार होतो. या आजारासंदर्भात तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. याबाबत सर्व एक्सपर्टची कमिटी तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, "या सर्व संशयित रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन त्यावर उपाययोजना काढणार आहोत. सध्या या आजारासंदर्भात घाबरून जाण्याचं कारण नाही. हा संसर्गजन्य आजार नाही. वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागत नाही."

नेहमीची जी ट्रीटमेंट असते, ती ट्रीटमेंट दिली जाते. लवकरात लवकर बरं होणारा हा आजार आहेत. लहान मुलांना दिलेल्या लसीमुळे देखील हा आजार होऊ शकतो. रोग प्रतिकार शक्ती कमी असेल तरीही हा आजार होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी या आजारामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही, असंही डॉ. नीना बोराडे यांनी सांगितलं आहे.

गीयन बारे सिंड्रोम आजार काय आहे?

गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजेच जीबीएस सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा एक प्रकार आहे. यामुळे स्नायु कमकुवत होतात, स्नायूंची संवेदना कमी होतात.

याची सुरुवात सामान्य लक्षणांनी होते. जसे की, हातांना मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवणे आदि.

बहुतांश लोक या आजारातून बरे होतात, परंतु बरे होण्याचा कालावधी रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते.

'घाबरून जाण्याचे कारण नाही'

या आजारामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही असे अतिदक्षतातज्ज्ञ डॉ. अजित तांबोळकर यांनी बीबीसी मराठीला सांगितले.

"आमच्याकडे जे पेशंट आले त्यांना 5 दिवसांपूर्वीच जुलाब उलट्या होत होत्या असं दिसलं. हात-पाय गळून केल्याची तक्रार त्यांनी केली. तसेच अशक्तपणामुळे उठता बसता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं. या आजारात अशक्तपणाची तीव्रता वाढत जाते. 30 टक्के लोकांमध्ये आजाराची तीव्रता जास्त जाणवते. मात्र ते बरे होतात," असे डॉ. तांबोळकर यांनी सांगितले.

"हा आजार अमेरिकेत आला होता तेव्हा दूषित पाणी हे त्याचं कारण समोर आलं होतं. सहसा अस्वच्छता, पाणी दूषित असणे हे या आजाराला कारणीभूत ठरू शकतं. वेळीच उपचार केल्यास त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते. काहीही लक्षणं दिसल्यास लवकर डॅाक्टरांकडे जावे. तसेच घाबरून जाण्याचे कारण नाही," असे डॉ. तांबोळकर यांनी सांगितले.

GBS या आजारावर मात केलेल्या निलेश अभंगचा अनुभव

गीयन बारे सिंड्रोम म्हणजेच GBS या आजारावर मात करणाऱ्या निलेश अभंग यांनी बीबीसी मराठीला त्यांच्या अनुभव सांगितला.

निलेश अभंग म्हणाले की, "मला 19 जानेवारी 2019 रोजी गीयन बारे सिंड्रोम म्हणजे GBS ह्या आजाराची लागण झाली होती. मी 19 जानेवारीच्या पहाटे व्हेंटिलेटरवर गेलो, ते 30 मे 2019 रोजी व्हेंटिलेटरवरून निघालो. तब्बल साडेचार महिने आयसीयूमध्ये काढले. मानेपासून पायाच्या तळव्यापर्यंत संपूर्ण शरीर पॅरलाईज झाले होते. शिवाय फुफ्फुसे पूर्णतः कमकुवत झाली होती, म्हणून व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज निर्माण झाली होती. मात्र, आज मी पूर्णतः दुरुस्त झालो असून शरीरात एकही दोष राहिलेला नाही. माझे संपूर्ण शरीर जे पॅरलाईज होते, ते फिजिओथेरपी घेतल्यामुळे पूर्ववत झाले आहे.

"या काळात स्वतः रुग्ण आणि त्याचे नातेवाईक प्रचंड मानसिक तणावातून जात असतात. अचानक उद्भवलेल्या ह्या संकटामुळे रुग्ण आणि नातेवाईक खूप धास्तावलेले असतात, मात्र, सुयोग्य उपचार मिळाले, रुग्णाने मानसिक स्थिती खंबीर ठेवली, तर तो किंवा ती आजारातून संपुर्णतः दुरुस्त होऊ शकतात, हे मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगू शकतो. शिवाय, मी GBS मधून बरं झाल्यानंतर अनेक GBS चे रुग्ण आणि नातेवाईक यांचे समुपदेशन केले आहे, आणि ज्यांचे समुपदेशन केले आहे ते रुग्ण उत्तम ठणठणीत होत निरोगी जीवन जगत असल्याचे पाहिले आहे.

"तर सध्याच्या पुणे येथे 22 पेक्षा अधिक GBS ह्या आजाराचे रुग्ण सापडले आहेत, त्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी घाबरुन जाऊ नये, असे सुचवेल, रुग्ण व्हेंटिलेटरवर असतो तोवर मानेवर धोक्याची टांगती तलवार असते, हे नाकारता येणार नाही, मात्र मी गेल्या पाच वर्षांत GBS आजारामुळे अनेक व्हेंटीलेटरवर गेलेले रुग्ण सुरक्षितपणे त्यातून बाहेर आलेले पाहिले आहेत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)