HMPV विषाणू : तुमच्या मनातील 7 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

चीनमध्ये गेल्या काही दिवसांत वेगानं पसरणाऱ्या एचएमपीव्ही (ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस) व्हायरसची प्रकरणं झपाट्यानं वाढताना दिसत आहेत.

हा व्हायरस भारतातह दाखल झाला असून कर्नाटक राज्यात या विषाणूचे दोन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच या विषाणूपासून खबरदारीसाठी सरकारनं काही दिशानिर्देश जारी केले असून नागरिकांना घाबरण्याची कुठलीही गरज नाही असं, आवाहनही करण्यात आलं आहे.

मात्र हा विषाणू नेमका काय आहे? तो कसा पसरतो? त्याची लक्षणं काय? यासंबंधी काय घबरदारी घ्यावी, असे विविध प्रश्न तुमच्या मनात असतील, अशाच काही प्रश्नांची उत्तरं आपण या बातमीतून जाणून घेऊयात.

1. एचएमपीव्ही विषाणू नेमका काय आहे?

एचएमपीव्ही हा शब्द सध्या आपल्याला सर्वत्र ऐकायला, वाचायला मिळतोय. मात्र, ही नेमकी काय भानगड आहे? तर एचएमपीव्ही म्हणजे ह्युमन मेटा न्युमो व्हायरस.

सायन्स डायरेक्टच्या माहितीनुसार, या विषाणूची उत्पत्ती 200 ते 400 वर्षांपूर्वी चिमणीद्वारे झाली होती. पण तेव्हापासून या विषाणूने स्वतःमध्ये अनेक बदल केले आहेत. आता या विषाणूमुळं चिमण्यांना संसर्ग होत नाही.

अमेरिका सरकारच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) नुसार मानवाला 2001 मध्ये याबाबत माहिती मिळाली होती. म्हणजे याचा संसर्ग मानवाला होऊ शकतो, याची माहिती मिळाली होती.

2. हा विषाणू किती घातक आहे?

हा एक हंगामी रोग असल्याचं प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट डॉ. व्ही. रवी यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं.

या विषाणूचा इन्क्यूबेशन पीरियड साधारणपणे तीन ते सहा महिने असतो. पण आजारपणाचा काळ कमी जास्त असू शकतो. संसर्ग किती गंभीर आहे, यावर ते अवलंबून असतं.

सध्या भारतासह जगातील अनेक देशांत याचा संसर्ग असलेले रुग्ण आढळत असल्याचं समोर येत आहे.

3. चीनमध्ये कुठे आढळले रुग्ण, तिथे काय स्थिती आहे?

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चीनच्या रुग्णालयांत गर्दी होत असल्याचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये रुग्णांना फ्लूसारखी लक्षणं दिसत असल्याचं समोर आलं. यातून नव्या विषाणूचा धोका निर्माण होण्याच्या चर्चांना पेव फुटंल आणि चिंता व्यक्त केली जाऊ लागली.

चीनचे सरकारी संकेतस्थळ ग्लोबल टाइम्सनुसार, उत्तर चीनच्या काही भागांबरोबरच बीजिंग, दक्षिण पश्चिम भागातील चोंगकिंग शहर, दक्षिणी चीनचा गुआंगदोंग प्रांत या ठिकाणीही एचएमपीव्हीची प्रकरणं समोर आली आहेत.

27 डिसेंबर 2024 ला रॉयटर्स वृत्तसंस्थेमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार चीनच्या आरोग्य संस्थांनी सांगितलं होतं की, हिवाळ्यात श्वसनासंबंधीच्या आजारात होणारी वाढ पाहता त्यांनी निगराणी सुरू केली आहे.

या निगराणीबाबत चीनच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण संस्थेचे प्रमुख ली जेंगलॉन्ग यांनी अज्ञात कारणामुळं होणाऱ्या न्यूमोनियामुळं वाढणाऱ्या प्रकरणांवर निगराणी ठेवणार असल्याचं म्हटलं होतं.

रॉयटर्सनं एका वृत्तात चीनच्या सरकारच्या हवाल्यानं जारी करण्यात आलेल्या निवेदनाच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात श्वसनाशी संबंधित आजाराच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

या रिपोर्टनुसार समोर आलेल्या रुग्णांत रायनोव्हायरस आणि ह्युमन मेटान्यूमो व्हाइरस (एचएमपीव्ही) च्या संसर्गाची अधिक प्रकरणं आहेत. संसर्गाची सर्वाधिक प्रकरणं उत्तर भागातील असून संसर्ग होणाऱ्यांमध्ये 14 वर्षाखालील मुलांची संख्या सर्वाधिक आहे.

या विषाणूचा उगम नेमका कुठून झाला याबाबत मात्र अद्याप माहिती मिळाली नसल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

4. या विषाणूचा प्रसार कसा होतो?

खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या तुषारांतील कणांद्वारे या विषाणूचा प्रसार होतो आणि यातूनच इतरांनाही संसर्ग होतो.

हाथ मिळवणे, गळा भेट घेणे किंवा एकमेकांना स्पर्श केल्यानेही हा विषाणू पसरू शकतो.

खोकला किंवा शिंकल्याने एखाद्या भागावर तुषार पडले असतील आणि त्याठिकाणी स्पर्श केलेला हात आपण चेहरा, नाक, डोळे किंवा तोंडाला स्पर्श केला तरीही संसर्ग होऊ शकतो.

5. संसर्गाची लक्षणं काय आहेत?

या विषाणूचा संसर्ग सर्वच वयोगटातील लोकांना होऊ शकतो. यामुळं रुग्णाला ताप येणं, खोकला, नाक बंद होणं, घशात खवखव, श्वास घेण्यास अडथळा येणं अशा स्थितींचा सामना करावा लागू शकतो.

तर संसर्ग वाढल्यास ब्राँकायटिस किंवा न्युमोनियाचा धोकादेखील होऊ शकतो.

6. काय खबरदारी घ्यावी?

हा विषाणू बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं पसरतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सहसा गर्दीची ठिकाणं टाळावी किंवा व्यवस्थित अंतर राखून उभं राहावं यासह -

खोकला किंवा शिंका येत असतील तर तोंड किंवा नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाकून ठेवा.

साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने वारंवार आपले हात धुवा.

ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.

भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा

संसर्ग कमी करण्यासाठी बाहेरील हवेसह हवा पुरेशी खेळती राहिल अशा वातावरणाची शिफारस केली आहे.

काय करू नये :

हस्तांदोलन, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर टाळा

आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा

डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणे टाळा

7. भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, भारतातील डॉक्टर काय म्हणाले?

महाराष्ट्रात दोन संशयित रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. खबरदारीसाठी सरकारनं काही दिशानिर्देश जारी केले आहेत.

ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (HPMV) हा श्वसनाच्या तीव्र संसर्गाचं प्रमुख कारण आहे. नेदरलँड्समधील शस्त्रज्ञांनी 2001 मध्ये याची ओळख पटवली होती. हा हंगामी रोग असून त्यामुळं श्वसन संसर्ग आणि सर्दीसारखा त्रास होतो, असं DGHS आणि Director, NCDC, MoH&FW, GOI यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील बाल रुग्ण विभागाचे डॉक्टर सुरेश गुप्ता यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हा काही नवा विषाणू नसल्याचं सांगितलं.

ते म्हणाले की, "याबाबत वीस वर्षांपासून माहिती उपलब्ध आहे. हिवाळ्याच्या काळात याच्या संसर्गाची प्रकरणं समोर येतात. हा फ्लूसारखा विषाणू आहे."

डॉक्टर सुरेश गुप्ता यांच्या मते, यासाठीही सामान्य सर्दीला दिली जाणारी औषधंच दिली जातात. तसंच आजारी व्यक्तीला आरामाचा सल्ला दिला जातो. बहुतांश प्रकरणांत रुग्णालयात दाखल करण्याचा सल्लाही दिला जात नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

याच रुग्णालयातील चेस्ट मेडिसिन विभागाचे वरिष्ठ डॉक्टर बॉबी भालोत्रा म्हणाले की, "आतापर्यंत या विषाणूच्या संसर्गाची जी प्रकरणं समोर आली आहेत, त्यात अगदी किरकोळ लक्षणं दिसली."

"पण दम्यामुळं आधीच त्रास असलेले रुग्ण आणि क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव्ह पल्मनरी डिसिज (सीओपीडी, ज्यात श्वास घ्यायला त्रास होतो) च्या रुग्णांना यामुळं जास्त त्रास होऊ शकतो. त्यांना श्वास घ्यायला त्रास, थकवा आणि ताप अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो."

"सध्या भारतात या विषाणूचा जो प्रकार आहे त्यामुळं फार गंभीर संसर्ग होत नाही. ज्याप्रकारे कोविडचा विषाणू गंभीर रूप धारण करत होता, त्यामुळं रेस्पिरेटरी फेल्युर व्हायचं. तसं यात अजून पाहायला मिळालं नाही. चीनमधील या विषाणूचा स्ट्रेन किती घातक आहे तेही काही दिवसांत समजेल."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.