कोरियन सौंदर्यप्रसाधनं वापरल्यामुळे भारतीयांची त्वचा खरंच उजळेल का?

    • Author, महालक्ष्मी. आर.
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

सोशल मीडियावर अनेक ट्रेंड तयार होत असतात. खाद्यपदार्थ, मीम्स, गाणी, नाच यामुळे लोक वेगाने एकमेकांशी जोडले जात आहेत. आता कोरियन ट्रेंडने तरुणांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे. BTS, कोरियन गाणी, कपडे, के-ड्रामा मध्ये काम करणारी लोक तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत.

कोरियन लोकांसारखी त्वचा होण्यासाठी त्यांचे सौंदर्यप्रसाधनं वापरण्याचा एक नवा ट्रेंड उदयाला आला आहे.

कोरियन लोकांची त्वचा का उजळली आहे या विषयावर सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असतात. त्यांनी वापरलेल्या क्रीममुळे भारतीयांची त्वचा उजळू शकते का?

भारतीय वातावरणाला ते साजेसे आहेत का? त्वचारोगतज्ज्ञांचं याबद्दल काय मत आहे?

कोरियन लोकांची त्वचा का उजळते?

कोरियन लोकांची त्वचा स्वच्छ आणि उजळ असते. त्वचेची काळजी, पर्यावरण, आहार, अनुवांशिकता या सर्व गोष्टी यासाठी जबाबदार आहेत.

कोरियन लोकांची त्वचा लवचिक असते. थंड, कोरड्या वातावरणाशी ती लगेच जुळवून घेते. त्यामुळे सर्व सौंदर्यप्रसाधनं कोरियन लोकांच्या गरजेनुसार तयार केली जातात.

कोरियन लोक त्यांच्या त्वचेची खूप काळजी घेतात. टोनिंग, क्लिनिंग, क्लिनझिंग, स्प्रे, स्लीपिंग मास्क अशी अनेक प्रकारची काळजी ते लोक घेत असतात.

याशिवाय काही नैसर्गिक पद्धती ते पाळतात. कलिंगडात असलेला पांढरा भाग उत्तम त्वचेसाठी त्यांच्या चेहऱ्यावर लावतात. स्त्रियांप्रमाणे पुरुषसुद्धा त्यांच्या त्वचेची काळजी घेतात.

कोरियन सौंदर्यप्रसाधनात असतं तरी काय?

बहुतांश कोरियन सौंदर्यप्रसाधनांमध्ये नैसर्गिक पदार्थ असतात. त्वचेला झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी ते महत्त्वाचे असतात. या सौंदर्यप्रसाधनांमुळे रक्तप्रवाह वाढतो, मृतप्राय झालेली त्वचा उजळते आणि त्वचेचे इतर आजार कमी होतात.

सौंदर्यप्रसाधनात वापरण्यात येणाऱ्या काही पदार्थांवर एक नजर टाकू या

गोगलगायीचं द्रव

हल्ली अनेक सौदर्यप्रसाधनांच्या कंपन्या त्यांची उत्पादनं गोगलगायीच्या द्रवापासून तयार करतात. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल.

गोगलगायी एक द्रव पदार्थ स्रवतात. त्यामुळे त्वचा उजळम्यास मदत होते. त्यामुळे म्हातारं दिसत नाही. हा द्रव पदार्थ सर्व वयाचे लोक वापरतात.

मधमाशी डिंक

मधमाशी पासून मिळालेल्या रेझिनला इंग्रजीत प्रोपोलिस असं म्हणतात. पोलन हा अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी पदार्थ आहे. त्वचेवर मुरुमं जास्त असतील तर त्याचा वापर होतो. या द्रव्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाही. त्वचेचं नुकसान टळलं.

मोती

मोती हा कोरियन सौंदर्यप्रसाधनांमधला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे.

मुरुमं म्हणजे पिंपल्स हटवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्वचेवर आलेले खड्डे बुजवण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

माशीचं विष

माशीचं विष हे असिडिक असतं. जेव्हा त्यांना धोक्याचा अंदाज येतो तेव्हा ते द्रव स्रवतात. सौंदर्यप्रसाधनं तयार करणाऱ्या अनेक कंपनी हे पदार्थ सिरम आणि मॉईश्चरायझरमध्ये मोत्याचा वापर करतात.

या पदार्थामुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं. सुरकुत्या कमी होतात. तसंच बाबू, युसा नावाचं फळ असे अनेक पदार्थ कोरियन सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरली जातात.

ही सौंदर्यप्रसाधनं वापरणाऱ्या स्त्रियांचा काय अनुभव आहे?

“मी गेल्या दोन वर्षापासून कोरियन सौंदर्यप्रसाधनं वापरत आहे. मी ते ऑनलाईन ऑर्डर करते. बंगळुरूमध्ये त्याची दुकानं आहेत. मी तिथे जाऊन ही खरेदी करणार आहे. आतापर्यंत मला कोणतीही अडचण आलेली नाही. तसंच त्वचेत फार मोठा बदल झालेला नाही.” असं कोईमतूर येथील मेल आणि ब्युटी ब्लॉगर सौंदर्या म्हणतात.

कृष्णा प्रिया या कॉलेजमध्ये विद्यार्थिनी आहेत. त्यांच्या मते त्यांना हवा तसा बदल दिसलेला नाही.

“मी गेल्या अनेक वर्षांपासून कोरियन सीरिज पाहत आहे. तेव्हापासून त्वचेचा दर्जा वाढलेला नाही. मला सोशल मीडियावर ही उत्पादनं दिसली. मी लगेच ती घेतली. मात्र त्याचा हवा तसा फायदा झाला नाही.” असं कृष्णा प्रिया म्हणतात.

हर्षिनी नावाची आणखी एक विद्यार्थिनी म्हणते, “मी एक कोरियन फेस वॉष 1500 रुपयाला घेतला. मात्र मला हवं तसे परिणाम दिसले नाहीत. म्हणून मी ते पुन्हा घेतले नाही

त्वचारोगतज्ज्ञ काय म्हणतात?

“कोरियन लोक त्यांच्या त्वचेवर अतिशय जास्त लक्ष देतात. मात्र त्या देशाच्या तुलनेत भारतीय लोकांची त्वचा आणि वातावरण वेगळं आहे.” असं त्वचारोगतज्ज्ञ कार्तिका म्हणतात.

“तरुण पिढीतले लोक कोरियन सीरिज पाहतात. त्यामुळे या मालिकेतील पात्रांसारखी त्यांची त्वचा व्हावी असं त्यांना वाटतं. मात्र प्रत्येक देशातलं वातावरण वेगळं असतं.”

कोरियाचं वातावरण कोरडं असतं. त्यामुळे त्यांच्या त्वचेत आर्द्रता कमी असते. भारताचं वातावरण सतत बदलत असतं त्यामुळे त्वचेचा पोतही बदलतो. आपण कोव्हिड आला तेव्हा मास्क वापरायला सुरुवात केली. मात्र धूळ आणि प्रदुषणापासून बचाव करण्यासाठी ते आधीपासूनच मास्क वापरतात. तसंच त्वचेसाठी ते 10 -20 उत्पादनं वापरतात. भारतीयांना ती सवय नाही.” ते म्हणाले.

त्यांच्या मते ऑनलाईन रिव्ह्यू वाचण्यापेक्षा आपल्या शरीरासाठी काय महत्त्वाचं आहे हे माहिती असणं जास्त महत्त्वाचं आहे असंही त्या म्हणतात.

“कोणतंही नवीन सौंदर्यप्रसाधन घेण्याच्या आधी त्वचारोगज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. कारण त्यामुळे ते पदार्थ आपल्या त्वचेला लाभदायी आहे की नाही हे कळतं.” असं कार्तिका सांगतात.

आरोग्यदायी त्वचेसाठी आरोग्यदायी आहार ही पहिली पायरी आहे. योग्य प्रमाणात पाणी पिणं आणि फळं खाल्ले तर त्वचा चांगली होते असं त्या पुढे म्हणतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)