You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘या’ देशाने कायदा आणून सर्व नागरिकांना केलं एका वर्षाने तरुण
आपण कायम चिरतरुण राहावं, आपलं वय वाढूच नये, असं कुणाला नाही वाटत? पण तसं नैसर्गिकरीत्या तरी शक्य नाही, असंच तूर्तास दिसतंय. पण दक्षिण कोरियात असा एक बदल घडलाय, ज्यामुळे तिथल्या लोकांचं वय चक्क कमी झालं आहे. सगळ्यांचं वय.
हो दक्षिण कोरियात एक कायदा संमत करण्यात आला आहे, ज्यानुसार तिथल्या लोकांचं वय एक-दोन वर्षांनी अधिकृतरीत्या कमी झालं आहे. पण कसं?
तर दक्षिण कोरियात वय मोजण्याच्या पारंपरिक पद्धतीनुसार कुठलंही बाळ जन्मताच एक वर्षाचं असायचं, कारण त्याला गर्भातला काळही त्यात मोजला जायचा. या पद्धतीनुसार प्रत्येकाचं वय त्या-त्या व्यक्तीच्या वाढदिवसाला नव्हे तर एक जानेवारीलाच बदलायचं.
ही पद्धत बदलायला हवी, अशी मागणी राष्ट्राध्यक्ष यून सुक-योल हे गेल्या वर्षीपासून करत होते, जेव्हा त्यांनी निवडणुका लढवल्या होत्या. या पद्धतीमुळे “नाहक सामाजिक आणि आर्थिक खर्च” व्हायचा, अशी त्यांची तक्रार होती. त्यामुळे अखेर हा बदल कायदा आणून करण्यात आला, जो बुधवार म्हणजे 28 जूनपासून लागू होईल.
आता “सामाजिक आणि आर्थिक खर्च” म्हणजे नेमकं काय? तर अनेकदा विमा आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवताना वयावरून बराच गोंधळ व्हायचा.
याशिवाय आंतरराष्ट्रीय पद्धतीशीही हे सुसंगत नव्हतंच. कोरियामध्ये सर्वांत शतकानुशतकं वापरली जाणारी पद्धत म्हणजे “कोरियन एज”. यानुसार, जर एखाद्या बाळाचा जन्म 31 डिसेंबरला झाला असेल तर दुसऱ्या दिवशी त्याचं वय 2 वर्षं असेल.
याशिवाय आणखी एक “काउंटिंग एज” पारंपरिक पद्धत प्रचलित आहे, ज्यानुसार एका बाळाचं जन्मावेळी वय शून्य असेल, पण 1 जानेवारीला त्याचं वय एक वर्षं होईल, मग त्याचा जन्म कधीही झालेला असो.
म्हणजे कुणी जर 29 जून 2003 ला जन्माला आलेल्या व्यक्तीचं वय 28 जून 2023 रोजी आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार 19 असेल, “काउंटिंग एज” पद्धतीनुसार 20 आणि “कोरियन एज” सिस्टिमनुसार 21.
जानेवारी 2022मध्ये ‘हॅनकूक रिसर्च’ या स्थानिक सर्वेक्षण संस्थेने केलेल्या एका सर्व्हेनुसार, या अशा गोंधळामुळे दर चारपैकी तीन दक्षिण कोरियन लोकांना ही पद्धत बदलावी, असं वाटत होतं. अखेर गेल्या डिसेंबरमध्ये दक्षिण कोरियन संसदेत याविरोधातला ठराव संमत करण्यात आला.
पण हा बदल सर्वच गोष्टींना लागू होईल, असं नाही. काही गोष्टींसाठी “काउंटिंग एज” पद्धतीचा वापर कायम असेल, असं सांगण्यात आलं आहे. जसं की कोरियात सिगारेट विकत घ्यायला किमान वय 19 वर्षं असावं लागतं, पण त्या व्यक्तीसाठी हे वय त्याच्या वाढदिवशी नाही तर त्या वर्षाच्या 1 जानेवारीला लागू होईल, जेव्हा ती व्यक्ती 19व्या वर्षं पूर्ण करेल.
वय मोजण्याच्या अशाच पारंपरिक पद्धती अनेक पूर्व आफ्रिकन देशांमध्येही होत्या, पण त्या आता वापरल्या जात नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त पद्धती जपानमध्ये 1950मध्ये लागू करण्यात आली होती, तर उत्तर कोरियाने ही पद्धत 1980च्या दशकात अमलात आणली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)