श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू, 'असे' कपडे असतील तर मिळणार नाही प्रवेश

फोटो स्रोत, ANI
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
मुंबईतील सुप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात प्रवेशासाठी आता ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे.
यापुढे मंदिरात दर्शनासाठी 'अपेक्षित' कपडे परिधान केले तरच प्रवेश मिळेल असा निर्णय सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवस्थापन समितीने घेतला आहे.
भाविकांना मंदिरांत तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे.
दक्षिण मध्य मुंबईत प्रभादेवीमध्ये असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी जगभरातून कोट्यवधी भाविक दर्शनासाठी येत असतात.
हॉलीवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सन यांनीही अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यासह नुकतीच सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली होती.
28 जानेवारी रोजी सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन प्रवेशासाठीच्या ड्रेस कोडबाबत माहिती दिली.
परंतु यावरून सध्या चर्चा सुरू असून मुंबईसारख्या मेट्रोपोलीटन शहरात अशाप्रकारच्या निर्णयावर आक्षेपही घेतला जात आहे. नेमका
हा निर्णय काय आहे? आणि कोणत्या मुद्यांवर आक्षेप घेतला जातोय? पाहूयात.


'फाटक्या जीन्स, शॉर्ट स्कर्ट आणि बर्मुडा घालण्यावर बंदी'
मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नव्हे तर मोठ्या संख्येने पर्यटक दररोज मुंबईत दाखल होत असतात. इथं पर्यटक गेट वे ऑफ इंडिया, मुंबईतील समुद्र किनारे, जिजामाता उद्यान, नेहरू सायन्स सेंटर यासह मुंबईतील लोकप्रिय सिद्धिविनायक मंदिरालाही भेट देतात.
केवळ बाहेरून आलेले पर्यटकच नव्हे तर मुंबईतील स्थानिक आणि आसपासच्या जिल्ह्यात राहणारे भावीकही आवर्जून या मंदिरात जातात. परंतु आता सिद्धिविनायक मंदिरात जात असताना भाविकांना ड्रेस कोडचे पालन करावे लागणार आहे.

याविषयी बोलताना सिद्धिविनायक मंदिराच्या कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी, "मंदिरात शालीनता जपणारे कपडे अपेक्षित आहेत," असं सांगितलं.
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या की, "मंदिरात शालीनता जपणारे अपेक्षित आहे. गुडघ्याच्यावरती असणारे किंवा आखूड कपडे अपेक्षित नाहीत. बर्मुडा, शॉर्ट स्कर्ट अपेक्षित नाही. असे कपडे न घालण्याचं आवाहन आम्ही करत आहोत.
"लांब स्कर्ट किंवा साडी किंवा चुडीदार चालतील. काही भाविकांनी आम्हाला भेटून सांगितलं होतं की, खूपच शॉर्ट कपडे परिधान केले जातात. महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम आहेत."
"विशिष्ट कपडेच परिधान करा, असा नियम नाही. तर काय घालू नये यासाठी आवाहन करत आहोत. अनेकदा फाटलेली जीन्स घालून काही जण येतात. पूर्ण जीन्स-टी-शर्टलाही बंदी नाही. पण अंगप्रदर्शन करणारे कपडे नकोत.
आम्ही नुकताच हा निर्णय घेतलेला आहे. आम्ही सध्यातरी आवाहन करत आहोत. लोकांपर्यंत नियम पोहचतील याची काळजी घेत आहे. आम्ही बॅनरही लावत आहोत. लोकांनाही पाळावं लागेल." असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भक्तांनी तक्रारी केल्याचा दावा
यासंदर्भात बोलताना ट्रस्टचे सदस्य राहुल लोंढे यांनी सांगितलं की, आमच्या निदर्शनास आलेलं आहे तसंच भक्तांच्याही काही तक्रारी आल्या होत्या.
काही भाविक मग ते कोणत्या जातीचे,धर्माचे, महिला किंवा पुरुष असतील यांचे काही पेहराव समोरच्याला संकोच वाटतील असे होते.
यामुळे भक्तांच्या तक्रारीनुसार आम्ही निर्णय घेतलेला आहे की, पुढच्या आठवड्यापासून सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भक्ताचा पेहराव पावित्र्य राखणारा असावा, अस ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
बाप्पाचं दर्शन घेताना पावित्र्य नष्ट होणार नाही असा पेहराव असावा. विशिष्ट कपडे परिधान करावेत याबाबत निर्बंध नाहीत. परंतु पेहराव कराल तो इतर भक्तांना संकोच वाटणारा नसावा या प्रामाणिक हेतूने निर्णय घेतलेला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
घरामध्ये पूजा, लग्न असताना जसा पेहराव करतो, तसाच पेहराव अपेक्षित आहे. तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. याची नोंद सर्वांनी घ्यावी, असं लोंढे म्हणाले.
'असा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का?'
सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टला असे निर्बंध घालण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार सचिन अहिर यांनी उपस्थित केला आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "परिपत्रक काढणाऱ्यांना असे नियम लागू करण्याचा अधिकार आहे का? वर्षानुवर्ष सिद्धीविनायकाचं दर्शन लोक भावनेनं घेतात. लोक सकाळपासून चालत येतात. कोणी ट्रॅक पँट घालून येतं.
"हे नवीन संशोधन करणारे कोण आहेत. हेच नियम ट्रस्टींना लागू होणार आहेत का, भक्त देवाकडे नतमस्तक होताना त्यांनाही कसं यायचं याच्या भावना असतात", असं अहिर म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार आणि सांस्कृतिक इतिहासाचे अभ्यासक सचिन परब यांनी बीबीसी मराठीशी बोलताना यावर परखड मत व्यक्त केलं.
"कालच सिद्धिविनायकाच्या देवळात एका ट्रस्टीने तोकड्या कपड्यांचा फतवा काढलाय. इथे आमच्या गिरणगावाचा लोकदेव असणाऱ्या सिद्धिविनायकाला सोवळ्या ओवळ्यात अडकवून ठेवलंय. आमचा बाप्पा आमच्यासोबत नाचतो, गातो. त्याच्या भक्तांना कपड्यांच्या वर्गवारीत अडकवून ठेवू नका," असं ते म्हणाले.
परब यांच्या मते, भारतीय संस्कृतीतील कपडे कुठले आणि इतिहास काढायचा असेल तर कमी कपड्यांचीच संस्कृती आहे. पुरुषांना एक न्याय आणि महिलांना दुसरा न्याय असं का? मंदिरात भटजी उघडे असतात. ती मात्र संस्कृती आहे आणि शॉर्ट कपडे मात्र विकृती?
आमच्या कोकणातल्या गावांमध्ये सणासुदीलाही हाफ पँट घातल्या जात होत्या. त्याला काय करणार आहे. यामुळे कपड्यांवरून संस्कृती कळत नाही. नव्या पिढीचे कपडे बदलले आहेत ते स्वीकारायला हवेत, असं मत त्यांनी मांडलं.
आमच्या कोळी, आग्री महिलेने स्थापन केलेला हा देव आहे. त्यांचे कपडे काय होते वर्षानुवर्षं. कपड्याचा आणि श्रद्धेचा संबंध कपड्यांवरून तुम्ही कसा जोडणार आहात? यामुळे भक्ताचा पेहराव काय यावरून त्याची अध्यात्मिक उंची ओळखू शकत नाही. राजकीय आशीर्वादाने नेमले गेलेले ट्रस्टी याचा निर्णय देऊ शकत नाहीत. हे ट्रस्टी म्हणजे भक्तांमध्ये भेदभाव करणारे नवे बडवे आहेत का? असा प्रश्न पडत असल्याचंही परब म्हणाले.
नियम फक्त भक्तांसाठी का?
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या की, "आपल्या संविधानाने व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. कोणी कसं रहावं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे.
"जो कोणी मंदिरात येतो तो श्रद्धेने येत असतो. त्याच्या कपड्यांकडे कोणाचं लक्ष जात नसतं. मंदिराने हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा.
"सिद्धिविनायक मंदिराचं लाईव्ह दर्शन घेताना मी पाहिलं की, आतले पूजारी ते अर्धनग्न कपडे घातलेले आहेत. हा नियम भक्तांसाठीच आहे का? नियम करायचे आहेत तर सगळ्यांवर करा. भक्तांवर असे नियम घालू शकत नाहीत," असं देसाई म्हणाल्या.

फोटो स्रोत, facebook/SiddhivinayakOnline
"वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक येतात. त्यांच्या वेशभूषेत ते दर्शनला येत असतात. मंदिरात दर्शनाला कसं यावं हे भक्तांना चांगलं कळतं," देसाई म्हणतात.
खरं तर देशभरात गेल्या काही काळात अनेक मंदिरांमध्ये प्रवेशासाठी कपड्यांबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. परंतु मुंबईसारख्या शहरात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना केवळ कपड्यांमुळे प्रवेश बंदी करणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











