तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला भगव्या टोप्यांच्या गर्दीत अजान का दिली जाते?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

फोटो स्रोत, Dnyaneshwar Rakshak

फोटो कॅप्शन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
    • Author, श्रीरंग गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी

राष्ट्रीय ऐक्य आणि सामाजिक बंधुभावाचा संतांचा विचार आधुनिक काळात खऱ्या अर्थानं जागवला, तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी.

त्यांनी अध्यात्म आणि समाजप्रबोधन यांची सांगड घातली. आपल्या खंजिरी भजनांतून मानवतेचा राष्ट्रधर्म जागवला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म 30 एप्रिल 1909 चा आहे तर त्यांचे निधन 11 ऑक्टोबर 1968 ला झाले. ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अमरावती जिल्ह्यात विविध कार्यक्रम होत असतात.

आज (21 ऑक्टोबर ) रोजी अमरावतीमध्ये सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे.

त्या निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याची ओळख या लेखातून करुन देण्यात आली आहे.

भगव्या टोप्या घातलेल्या हजारो लोकांच्या गर्दीत एक वृद्ध मौलवी कानावर हात ठेवून ‘अल्ला हो अकबर’ अशी ‘अजान’ देतो आहे. त्यानंही डोक्याला भगवा रुमाल गुंडाळला आहे. उपस्थित जनसागरामध्ये अथांग शांतता आहे.

सध्या सोशल मीडियावरून फिरणाऱ्या या व्हिडिओचा उलगडा बहुतेकांना होत नाहीये. व्हीडिओत दिसणारं ते ठिकाण आहे, अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील गुरुकुंज आश्रम. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेल्या या आश्रमातील ही सर्वधर्मीय प्रार्थना आहे.

दरवर्षी राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथीच्या दिवशी या ठिकाणी भव्य सर्वधर्मीय प्रार्थनेचं आयोजन केलं जातं. त्यात सर्व धर्मांचे धर्मगुरू, साधक सहभागी होतात. विश्वाच्या शांततेसाठी प्रार्थना करतात. यावेळी इथं प्रत्येक धर्मातील प्रार्थना होते.

विशेष म्हणजे, महाराजांच्या पुण्यतिथी दिनानंतरही जवळपास 6 महिने गावागावांत ही प्रार्थना सुरू असते. त्यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे 30 एप्रिल रोजी आश्रमात सुरू होणारी प्रार्थना अशाच पद्धतीने खेडोपाड्यांत 6 महिने चालते.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

या सर्वधर्मीय प्रार्थनेचाही एक इतिहास आहे

शेवटच्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कॅन्सर झाल्याचं निदान झालं. आषाढी वारीत त्यांनी पंढरपुरात शेवटचं भजन केलं आणि पांडुरंगाच्या चरणी आपली खंजिरी ठेवली. ‘आता इथून पुढं माझ्याकडून तुझी सेवा होऊ शकणार नाही,’ म्हणत माफी मागितली.

त्यानंतर ते उपचारासाठी मुंबईत दाखल झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच 1967च्या वर्षाच्या अखेरीला नागपुरात हिंदु-मुस्लीम दंगल उसळल्याची बातमी आली. महाराज त्या बातमीनं फार अस्वस्थ झाले. उपचारानंतर त्यांना मुंबईहून मोझरीला गुरुकुंजमध्ये आणलं गेलं. लोक भेटायला येऊ लागले. त्यावेळीही दंगलीचे पडसाद सुरूच होते.

नागपुरातील एक समाजसेवक रतनचंदजी डागा आणि पंडीत शिवचरण शर्मा छांगाणी भेटायला आले, तेव्हा तुकडोजी महाराज कॅन्सरच्या जीवघेण्या वेदना सहन करत होते. त्यांना बोलता देखील येत नव्हतं.

तुकडोजी महाराजांच्या कीर्तनामध्ये खंजिरी वादन हे मुख्य आकर्षण असायचं.

फोटो स्रोत, Dnyaneshwar Rakshak

फोटो कॅप्शन, तुकडोजी महाराजांच्या कीर्तनामध्ये खंजिरी वादन हे मुख्य आकर्षण असायचं.

त्याही परिस्थितीत महाराज त्यांना म्हणाले, "भय्या, मेरी दवा..?" डागाजी कोणी डॉक्टर नव्हते. छांगाणी आयुर्वेदाचे तज्ज्ञ होते. दोघांनाही महाराजांच्या बोलण्याचं तात्पर्य समजलं नाही. ते बाहेर आले आणि आश्रमाच्या प्रार्थना मंदिरासमोर उभे राहून विचार करायला लागले.

महाराजांना आपल्याकडून कोणतं औषध अपेक्षित आहे? अचानक डागाजींच्या लक्षात आलं, की महाराज आयुष्यभर शांती, बंधुभाव, मानवतेचा संदेश देत आले. त्यासाठीच त्यांनी आपलं जीवन वेचलं.

चर्चेमध्ये राष्ट्रसंत नेहमी म्हणायचे, "डागाजी, या देशातला विविध धर्म, पंथ, संप्रदायातला माणूस देहानं जरी वेगळा असला, तरी तत्त्वानं एक आहे." त्यांना तुकडोजी महाराजांचं एक भजन आठवलं.

मानवताही पंथ मेरा। इन्सानियत है पक्ष मेरा।।

सबकी भलाई धर्म मेरा। दुविधा को हटाना वर्म मेरा।।

एक जात बनाना कर्म मेरा। सब साथ चलाना मर्म मेरा।।

नीच-उँच हटाना गर्व मेरा। गिरते को उठाना स्वर्ग मेरा।।

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

फोटो स्रोत, Dnyaneshwar Rakshak

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

...आणि डागाजींना तुकडोजी महाराजांचं औषध सापडलं. जे त्यांच्या मनाला शांती देईल, असं. सर्वधर्मीय लोकांना एकत्र करून शांती-प्रेमासाठी प्रार्थना करणं, हेच महाराजांच्या अस्वस्थतेवरील औषध होतं.

डागाजींनी नागपूरवरून सर्व धर्माच्या धर्मगुरूंना गुरुकुंज आश्रमात आमंत्रित केलं. तिथल्या ध्यान योग मंदिरासमोरच्या हिरवळीवर सर्व धर्मीय प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं.

प्रकृती अस्वास्थ्यामुळं डॉक्टरांनी तुकडोजी महाराजांना प्रार्थनेत सहभागी न होण्याचा सल्ला दिला. शेवटी महाराजांची तीव्र इच्छा आणि डागाजी यांच्या प्रयत्नामुळं राष्ट्रसंत व्हील चेअरवर बसून प्रार्थनासभेत सहभागी झाले. त्यांना जोरजोरात उचक्या येत होत्या.

सर्व धर्मगुरूंनी आपापल्या धर्माच्या प्रार्थना म्हटल्या. महाराजांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणूनही प्रार्थना केली गेली.

त्यावेळी गुरुकुंजच्या शाळेत चौथीत शिकणारे तुकडोजी महाराजांच्या विचारधारेचे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक सांगतात, ‘‘महाराजांनी डागाजींना इशारा केला आणि डागाजींनी त्यांच्यासमोर माईक धरला. इतक्या वेळ सुरू असणाऱ्या उचक्या थांबल्या आणि तब्बल 20 मिनिटं राष्ट्रसंतांनी न अडखळता अस्खलित हिंदीतून खऱ्या धर्माचा अर्थ काय? यावर भाष्य केलं."

धर्म, संप्रदायांपेक्षा देश मोठा

राष्ट्रसंत म्हणाले, "सर्व धर्मोपदेशकांनी आपली जबाबदारी खऱ्या अर्थानं पार पाडली, तर या देशात धार्मिक दंगे कधीच होणार नाहीत. माणसं माणसाजवळ माणुसकीनं येतील आणि जगाच्या पाठीवर हा देश सर्वधर्म समभावाचं प्रतीक बनेल.

"वाघ आणि शेळी यांच्यात प्रेम निर्माण केल्यानंतर जर ते एकाच घाटावर पाणी पिऊ शकतात; मग आम्ही तर माणसं आहोत. शेवटी धर्म, संप्रदायांपेक्षा देश मोठा आहे. त्याचं रक्षण करण्याची आमची सर्वांत मोठी जबाबदारी आहे."

ज्ञानेश्वर रक्षक सांगतात, ‘‘भाषणादरम्यान आश्चर्यकारक रीतीनं थांबलेली महाराजांची उचकी प्रार्थना संपल्यावर पुन्हा सुरू झाली. प्रार्थनेची शक्ती मी स्वतः अनुभवली. मी त्या वेळी लहान होतो. पण आज मला ते लक्षात येतंय.

"संत, महात्मे, विचारवंत हे कधीच कोणत्या एका जातीचे, धर्माचे, पंथाचे नसतात. या सर्व भिंती मानवानं आपल्या स्वार्थासाठी निर्माण केल्या, याचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी चिंतन केलं. सर्व भेद विसरून सगळे एका व्यासपीठावर कसे बसवता येतील, याचा विचार केला.’’

याच विचारानं मोझरीत 1943 मध्ये गुरुकुंज आश्रम स्थापन केल्यानंतर लगोलग 'श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिरा'ची स्थापना केली. सर्व धर्मांतील बांधवांना या ठिकाणी येऊन विश्वशांती, मानवता, विश्वबंधुतेची प्रार्थना करता यावी, हा त्यामागचा उद्देश होता.

है प्रार्थना गुरुदेव से, यह स्वर्गसम संसार हो।

हम भिन्न हो इस देहसे, पर तत्वसे सब एक हो।

हो ज्ञान सबसे एकही, जिससे मनुज निःशंक हो।।

मंदिराच्या स्थापनेनंतर महाराजांनी त्यात म्हणण्यासाठी ही सामुदायिक प्रार्थना रचली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

फोटो स्रोत, Dnyaneshwar Rakshak

ज्याच्या समोर प्रार्थना करावी अशा कुठल्याही देव, देवतेची मूर्ती किंवा फोटो प्रार्थना मंदिरात ठेवलेला नाही. तिथं एक रिकामी पांढरी शुभ्र गादी आणि गोल तकिया आहे.

त्या खादीच्या आसनावर आपापल्या श्रद्धेचं दैवत विराजमान आहे, असं समजून सर्वांनी त्याची प्रार्थना करावी, अशी महाराजांची कल्पना आहे. या मंदिरावर तुकडोजी महाराजांनी एक भजनही लिहिलेलं आहे :

सबके लिए खुला हैं, मन्दिर यह हमारा।

मतभेद को भुला हैं, मन्दिर यह हमारा।।

आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी।

देशी-विदेशीयों को, मन्दिर यह हमारा।।

मानव का धर्म क्या हैं, मिलती हैं राह जिसमें।

चाहता भला सभी का, मन्दिर यह हमारा।।

आओ सभी मिलेंगे, समुदाय प्रार्थना में।

तुकड्या कहे अमर हैं, मन्दिर यह हमारा।।

ज्ञानेश्वर रक्षक सांगतात, ‘‘या मंदिरात होणाऱ्या सामुदायिक प्रार्थनेत कुठल्याच देवी-देवतांची स्तुती नाही, तर माणसातला माणूस जागा करण्याचा प्रयत्न राष्ट्रसंतांनी केला.

"व्यक्तिगत प्रार्थना स्वतःच्या भल्यासाठी किंवा फार तर आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी असते. त्यात स्वार्थ असतो. पण, जेव्हा संपूर्ण मानव जातीसाठी आपण प्रार्थना करतो, तेव्हा आपल्यात एकोपा, प्रेम, बंधुभावाची भावना निर्माण होते.

"आपला धर्म आपल्या घरात पाळायचा. घराबाहेर पडलो, की आपण राष्ट्रधर्म पाळायला हवा, असं महाराज म्हणत. त्यांनी पहिल्यांदा ‘राष्ट्रधर्म’ नावाची संकल्पना मांडली. त्यामुळं राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना ‘राष्ट्रसंत’ अशी उपाधी दिली," रक्षक सांगतात.

डागाजींनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या सामुदायिक प्रार्थनेनंतर काही दिवसांतच म्हणजे म्हणजे 11 ऑक्टोबर 1968 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अनंतात विलीन झाले. आपला अंत्यसंस्कारही साध्या पद्धतीने व्हावा, त्यात कर्मकांड असू नये, अशी इच्छा त्यांनी मृत्यूपत्रात लिहून ठेवली होती.

लाल रेष

या बातम्याही वाचा :

लाल रेष

विश्व मानव मंदिरांची उभारणी

अखेरच्या काळात तुकडोजी महाराजांनी आश्रमाजवळील दास टेकडीवर ‘विश्व मानव मंदिर’ उभारलं.

मुळात हे मानवतेचं मंदिर व्हावं, कोणत्याही धर्म, पंथाच्या माणसांना हे ठिकाण आपलं वाटावं, परस्परांच्या धर्मातील चांगल्या विचारांची या ठिकाणी देवाण-घेवाण इथं व्हावी, असा महाराजांचा मंदिर उभारण्यामागं उद्देश होता. म्हणून त्याला त्यांनी विश्व मानव मंदिर असं नाव दिलं.

त्याबाबत एका पत्रकार परिषदेत तुकडोजी महाराज म्हणाले होते, "विश्व को नया मानव याती देना हमारा लक्ष्य है। मैं तो सब पंथ, संप्रदाय, गुट आदि के रहते हुए भी उनमें मनुष्यत्व और एकात्मता लाना चाहता हूँ। मानवता मंदिर इसी का प्रतीक है।"

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

फोटो स्रोत, Dnyaneshwar Rakshak

या विश्व मानव मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, गुरुनानक, रवींद्रनाथ टागोर, चक्रधर स्वामी, विवेकानंद, महात्मा बसवेश्वर, महात्मा गांधी, स्वामी दयानंद भगवान गौतम बुद्ध, डॉ. अल्बर्ट श्वार्टटार, डॉ. मार्टिंन लुथर किंग, डॉ. अ‍ॅनी बेझंट, डी. व्हॅलेरा, एम. डग्लस, कार्ल मार्क्स आदी महामानवांच्या मूर्ती बसविण्याची महाराजांची इच्छा होती.

त्यातील काही मूर्ती तिथं बसविण्यातही आल्या आहेत. याच ठिकाणी जागतिक ग्रंथालय उभारण्याचा त्यांचा मानस होता.

अमरावती जिल्ह्यातील यावली या लहानशा गावात 30 एप्रिल 1909 रोजी जन्मलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पुढं आयुष्यात प्रचंड मोठं सामाजिक कार्य उभारलं. मूळ नाव माणिक असलेल्या महाराजांचं तुकडोजी हे नाव त्यांचे गुरू अडकोजी यांनी ठेवलं होतं.

राष्ट्रसेवा आणि समाजसेवा

केवळ अध्यात्मिक ज्ञान देणारे संत म्हणूनच नव्हे, तर एक थोर समाजसुधारक म्हणून देश त्यांना ओळखू लागला. समाज, लोकजीवनापासून दूर जाऊ नये, जनकल्याणासाठी आयुष्य वेचावं, या संतांच्या वचनाला तुकडोजी महाराज शब्दश: जागले.

त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग घेतला. स्फूर्तीदायी भजनांनी जनजागृती केली. त्यामुळं त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. त्यानंतर हैदराबाद आणि कोल्हापूरचं संस्थान स्वतंत्र भारतात विलीन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

फोटो स्रोत, Dnyaneshwar Rakshak

पंतप्रधान पंडीत नेहरू आणि संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विनंतीला मान देऊन चीन आणि पाकिस्तानसोबतच्या युद्धाच्या वेळी तुकडोजी महाराजांनी सीमेवर जाऊन सैनिकांचं मनोबल वाढवलं.

महाराष्ट्रीय व्यापारी संमेलन, राष्ट्रभाषा प्रचार संमेलन, समाजसेवी संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, नशाबंदी संमेलन, हरिजन संमेलन, भारत सेवक समाज संमेलन, जमियते उल्माय हिंद परिषद, जैन संमेलन, शिख संमेलन, संत संमेलन, वारकरी परिषद, महिला शिक्षण वर्ग, मुद्रण परिषद, महागाई परिषद, गोंदियाची तमाशा परिषद सुद्धा आयुर्वेद संमेलन, संस्कृत साहित्य संमेलन, जीवदया संमेलन, अशी शेकडो संमेलनं महाराजांच्या प्रभावी वाणीनं गाजली.

आदिवासी युवक प्रशिक्षण, ग्रामसहाय्यक प्रशिक्षण, कुष्ठरोग निवारण, दाई वर्ग, आयुर्वेद महासंमेलन या योजनांना त्यांनी गती दिली. तुकडोजी महाराजांच्या कार्याची ही सविस्तर माहिती गुरुकुंज आश्रमाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.

तुकजोडी महाराजांनी स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग घेतला होता.

फोटो स्रोत, Dnyaneshwar Rakshak

फोटो कॅप्शन, तुकजोडी महाराजांनी स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग घेतला होता.

विनोबांच्या भूदान चळवळीसाठी महाराजांनी यवतमाळमधून 11 हजार एकर जमीन मिळवून दिली. त्याबद्दल पंडीत नेहरूंनी त्यांचे जाहीर आभार मानले. गुरुकुंज आश्रमात 30 जानेवारी 1949 रोजी प्रथम गांधी स्मृतिदिन आयोजित करण्यात आला.

त्याला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी महाराजांचा 'राष्ट्रसंत' या उपाधीनं गौरव केला.

यासोबतच सर्वधर्म समभावाचा विचार रुजविण्यासाठी ते कार्यरत राहिले. शीख संमेलन, वीरशैव संमेलन, पारशी समाजाचा महोत्सव, राज्यपाल डॉ. चेरियन यांचा ख्रिस्ती धर्माचा उत्सव, भंडाऱ्याच्या अवलिया बाबांचा मुस्लिम उत्सव अशा सगळ्यांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतला.

तथागत बुद्धांच्या अडीच हजाराव्या जयंती निमित्त एक कोटी तासांचा समयदान यज्ञ आयोजित केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर दलितांना खुलं करण्यासाठी सानेगुरुजींनी उभारलेल्या लढ्याला तुकडोजी महाराजांनी पाठिंबा दिला. त्यामुळं सानेगुरुजींसाठी हा लढा सोपा झाला.

देश-विदेशात प्रबोधन आणि अभंग साहित्य

तुकडोजी महाराज केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादीत राहिले नव्हते. तर, पंजाबातील वेदांत परिषद, दिल्लीतील युनेस्को परिषद, अणुव्रत परिषद आदि परिषदा त्यांनी गाजविल्या. सरकारच्या समाज शिक्षण, परिवार नियोजन, नशाबंदी आदि योजनांचा प्रचार केला.

गुलझारीलाल नंदा यांचा 'भारत सेवक समाज' आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या 'राष्ट्रीय एकात्मता समिती'त त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. 1955मध्ये जपानमध्ये भरलेल्या विश्वशांती आणि विश्वधर्म परिषदेत त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. तिथं 18 देशांच्या प्रतिनिधींनी विश्वशांती परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली.

तुकडोजी महाराज आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण

फोटो स्रोत, Dnyaneshwar Rakshak

फोटो कॅप्शन, तुकडोजी महाराज आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण

खेड्यांचा आणि मानवाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी तुकडोजी महाराजांनी 'ग्रामगीता' या बहुमोल ग्रंथाचं लेखन केलं. 25 डिसेंबर 1955 रोजी तुमसर इथं आयोजित 18 व्या विदर्भ साहित्य संमेलनात 'ग्रामगीते'चं प्रकाशन झालं.

त्याच दिवशी, त्याच वेळी एक हजार गावांमध्येही विधायक कार्यक्रमांद्वारे ग्रामगीतेचं प्रकाशन झालं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार लिहण्याचं, संपादन करण्याचं काम त्यांचे सहकारी सुदामदादा सावरकर करत असत. त्यांनी महाराजांची 32 पुस्तकं संपादित केली. ते महाराजांनी सुरू केलेल्या श्री गुरुदेव मासिकाचे संपादकही होते. राष्ट्रसंतांनी व्यस्ततेत, प्रवासातच सुमारे 105हून अधिक पुस्तकं लिहिली.

सुदामदादा सावरकरांचे चिरंजीव आणि तुकडोजी महाराजांवर विपुल साहित्य लिहिणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुभाष सावरकर बीबीसीशी बोलताना म्हणाले, ‘‘महाराज बोलत गेले आणि माझे वडील लिहित गेले. त्यामुळं तर तुकडोजी महाराजांचं साहित्य पुढच्या पिढ्यांना उपलब्ध झालं. वडिलांनी महाराजांच्या ‘ग्रामगीते’चं हिंदीतही भाषांतर केलं.

"ग्रामगीता आता इंग्रजीतही गेली आहे. वडिलांपासून प्रेरणा घेऊन मी विद्यापीठीय अभ्यासक्रमामध्ये तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न केले. त्यातूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात महाराजांच्या नावानं अध्यासन सुरू झालं. विद्यापीठात बी. ए.च्या अभ्यासक्रमात महाराजांच्या साहित्याचा समावेश आहे. तसंच त्यांच्या साहित्यावर दोन वर्षांची पदव्युत्तर पदवीही करता येते," डॉ. सावरकर सांगतात.

तुकडोजी महाराज

फोटो स्रोत, Dnyaneshwar Rakshak

‘‘संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातही इंग्रजीतून राष्ट्रसंतांचे ‘थॉटस्’ शिकविले जातात. महाराजांच्या साहित्यावर किमान 15 विद्यार्थ्यांनी पीएच. डी. केली आहे. ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जनजागृती चळवळी’वर नुकताच मोठा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे.

तुकडोजी महाराजांनी मराठीसोबतच हिंदी, उर्दू आणि फार्सीतही लिहिलं. मात्र दुर्दैवानं अद्याप देशातील इतर विद्यापीठांत, अभ्यासक्रमांमध्ये त्यांच्या साहित्याचा समावेश झालेला नाही,’’ अशी खंतही डॉ. सुभाष सावरकर व्यक्त करतात.

1938 पूर्वीपासूनच संत तुकडोजी महाराजांनी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रशिक्षण वर्गांचं आयोजन करून शेकडो वैद्य निर्माण केले. गावा-गावांत रुग्णसेवेचं कार्य केलं. गुरुकुंज आश्रमात धमार्थ रुग्णालयाची स्थापना केली. औषधं निर्मितीसाठी रसशाळेची निर्मिती केली. श्रीगुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. आयुष्याच्या शेवटी महाराजांना कॅन्सरनं गाठलं.

कॅन्सरच्या वेदना अनुभवतानाच गोरगरीब कॅन्सर रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून त्यांनी नागपूरमध्ये कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचे निर्देश दिले. त्यांच्या नावानं उभ्या राहिलेल्या या हॉस्पिटलमध्ये सध्या हजारो कॅन्सरग्रस्तांवर उपचार होत आहेत.

तुकडोजी महाराजांच्या या रुग्णसेवेचा वसा पुढं अनेकजण चालवत आहेत. डॉ. रघुनाथ वाडेकर त्यापैकीच एक. महाराजांनी सुरू केलेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळ या संस्थेच्या कार्यकारिणीचे ते माजी सदस्य आहेत. मोझरी गावातच रुग्णसेवेसाठी संस्था स्थापन करून त्या माध्यमातून डॉ. वाडेकर एचआयव्हीग्रस्तांवर उपचार करत आहेत.

त्याबाबत ते म्हणाले, ‘‘ना औषधी मिळती कुणा, तैसिची कंठिती जीवना। या दीन लोकांची दया घे, राव रंका सज्जना।। असं तुकडोजी महाराजांनी रुग्णसेवेविषयी म्हटलं आहे. त्यातूनच प्रेरणा घेऊनच मी रुग्णसेवा सुरू केली.

"आपल्या हयातीत तुकडोजी महाराज 25 हजार गावांमध्ये गेले होते. त्या प्रत्येक गावात गुरूदेव सेवामंडळं सुरू झाली. युवकांनी त्या माध्यमातून लोकांची सेवा सुरू केली. हे कार्य अजूनही जोमात सुरू आहे. महाराजांपासून प्रेरित झालेले आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी महाराष्ट्रभर तरुणांची शिबिरं घेतात. त्यातून महाराजांच्या विचारांचे हजारो तरुण तयार झाले आहेत," वाडेकर सांगतात.

प्रबोधन करणारी खंजिरी भजनं

बहुतेक छायाचित्रांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हातात खंजिरी घेतलेले दिसतात. संगीताच्या माध्यमातून मनुष्याच्या हृदयाला हात घालता येऊ शकतो, हे लक्षात घेऊन महाराजांनी खंजिरी भजनांतून प्रबोधन सुरू केलं. त्यांच्या यावली गावातील हनवतीबुवांकडून ते खंजिरी वाजवायला शिकले.

चांदुरबाजारच्या विमलानंद भारतींकडून छंद गायन, तर सातळीकोतळीकर महाराजांकडून एकतारी आणि चिपळी वाजवायला शिकले. खंजिरी भजनाच्या माध्यमातूनच निरक्षर लोकांमध्येही त्यांनी अत्यंत प्रभावीपणानं प्रबोधनाचे विचार पोहोचवले. पंजाब, बिहार आणि उत्तर प्रदेश ते म्हैसूर असा उभा देश महाराजांनी खंजिरी भजनांनी गाजवला. ही खंजिरी भजनं परदेशांतही लोकप्रिय झाली.

30 मार्च 1936 रोजी नागपुरातील गणपतराव टिकेकर यांच्या निवासस्थानी संत तुकडोजी महाराजांची महात्मा गांधीशी पहिल्यांदाच भेट झाली. त्यावेळी 'उँचा मकान तेरा कैसी मजल चढूँ मैं।' आणि 'किस्मतसे राम मिला जिनको उसने यह तिन जगह पायी' ही महाराजांची दोन भजनं ऐकताना तल्लीन झालेल्या गांधीजींना आपल्या मौनाचंही भान राहिलं नाही. त्यांनी महाराजांना सेवाग्राम आश्रमात त्यांच्याजवळ महिनाभर ठेवून घेतलं.

नंतरच्या काळात महाराजांनी गांधीजींच्या कार्याची ओळख करून देणारी ‘गांधी गीतांजली’ लिहिली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जपानी लोकांसमवेत

फोटो स्रोत, Dnyaneshwar Rakshak

फोटो कॅप्शन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जपानी लोकांसमवेत

राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती भवनात त्यांच्या खंजिरी भजनांचा कार्यक्रम आयोजित केला. त्यांच्या भजनांनी प्रभावित होऊन राजेंद्रबाबू म्हणाले, 'आप तो संत नही, राष्ट्रसंत है।'

अमरावतीचे खंजिरी भजनगायक पंडित रघुनाथ कर्डीकर तुकडोजी महाराजांचा खंजिरी भजनाचा वारसा अत्यंत समर्थपणानं पुढं नेतायत. त्यांचा आवाज आणि खंजिरीवादन ऐकून तुकडोजी महाराजींचीच आठवण येते.

बीबीसीशी बोलताना कर्डीकर म्हणाले, ‘‘खंजिरी भजनांतून तुकडोजी महाराजांनी केवळ देवदेव किंवा अध्यात्मच सांगितलं नाही, तर जनप्रबोधन करत राष्ट्रोध्दाराचं काम केलं. भजनांमधून मिळणारा निधी महाराज समाजकार्यासाठी वापरत.

महाराजांचे अभंग, गवळणी, पोवाडे, गजला, सुगम भजन गायन एवढं लोकप्रिय झालं, की सिनेमांच्या गाण्यांऐवजी लोक ही भजनंच गुणगुणू लागले. आज विदर्भात प्रत्येक गावात दोन-तीन तरी भजनी मंडळं आहेत. गावोगावी महाराजांच्या खंजिरी भजनांच्या स्पर्धा भरतात.

माझे वडील मारोतराव कर्डीकर वयाच्या 14व्या वर्षापासून महाराजांसोबत होते. मी वडिलांकडूनच भजन शिकलो. दुसऱ्या इयत्तेपासून खंजिरी वाजवून भजन म्हणू लागलो. महाराजांच्या भजनातून लोकप्रबोधन करण्याचं पुण्य मला मिळतं आहे. ही गुरूदेवांचीच कृपा आहे.’’

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे!

तुकडोजी महाराज आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी

फोटो स्रोत, Dnyaneshwar Rakshak

फोटो कॅप्शन, तुकडोजी महाराज आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी

पंडित रघुनाथ कर्डीकर म्हणाले, ‘‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची एक सुंदर रचना आहे. ती त्यांनी 15 ऑगस्ट 1947 या स्वातंत्र्यदिनी लिहून जतसंस्थानमध्ये ध्वजारोहण केलं.

हे भजन म्हणजे राष्ट्रसंतांच्या विचारांचं सार आहे. त्याचं प्रत्येकानं सतत स्मरण, आचरण करावं, असंच आहे…’’

या भारतात बंधु-भाव नित्य वसू दे। दे वरचि असा दे।।

हे सर्व पंथ, संप्रदाय एक दिसू दे। मतभेद नसू दे।।

नांदोत सुखे गरिब-अमिर एकमतानी।

मग हिंदू असो, ख्रिश्चन वा हो इस्लामी।।

स्वातंत्र्य सुखा या सकलांमाजि वसू दे। दे वरचि असा दे।।

हा जातिभाव विसरुनिया एक हो आम्ही।

अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातूनी।।

खळ-निंदका-मनीही, सत्य न्याय वसू दे। दे वरचि असा दे।।

तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसूदे। दे वरचि असा दे।।

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)