'गुरू ग्रंथ साहिब'मध्ये काय लिहिलेलं आहे? त्याचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे?

गुरु ग्रंथ साहिब- शीख धर्मियांचे अंतिम गुरू

फोटो स्रोत, IndiaPictures/gettyImages

फोटो कॅप्शन, गुरु ग्रंथ साहिब- शीख धर्मियांचे अंतिम गुरू
    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

गुरू ग्रंथ साहिब हा हा शीख धर्मियांचा धर्मग्रंथ आहे. हा केवळ धर्मग्रंथ नसून त्यास शीख धर्माचे अंतिम आणि जिवंत गुरू मानले जाते. गुरू ग्रंथ साहिब ग्रंथाचा आणि शीख धर्माचा महाराष्ट्राशी अत्यंत जवळचा संबंध असून दोहोंमध्ये अत्यंत भावनिक नातं आहे.

शीखधर्मियांचे दहावे गुरू, गुरू गोविंद सिंह यांनी 1708 मध्ये याबद्दल घोषणा केली होती. आपल्यानंतर कोणी एक व्यक्ती गुरू होणार नाही तर गुरू ग्रंथ साहिब हेच अंतिम गुरू असतील.

गुरू ग्रंथ साहिबचे महत्त्व

गुरू ग्रंथ साहिबमध्ये वचनं, दोहे आणि लेखांचा संग्रह आहे. यामध्ये शीख गुरूंनी केलेल्या रचना आहेतच, त्याप्रमाणे हिंदू-मुसलमान विद्वानांनी लिहिलेल्या ओळींचाही समावेश केला आहे.

यामध्ये समाविष्ट असलेल्या शीख धर्मगुरूंच्या वचनांना गुरबानी म्हणजे गुरूंची वाणी असं म्हटलं जातं.

या ईश्वराने सांगितलेल्या गोष्टी असून त्यात काहीही चूक नाही अशी मान्यता आहे.

हा ग्रंथ पंजाबीची लिपी गुरुमुखीमध्ये लिहिलेला आहे. गुरुमुखी लिपी ईश्वराच्या मुखातून निघाली असं मानलं जातं. त्यामुळे एखाद्या मानवी गुरूचा आदर केला जातो त्याचप्रमाणे गुरू ग्रंथ साहिबचा आदर केला जातो.

गुरू मुखी लिपी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गुरूमुखी लिपी किंवा पंजाबी लिपी

हा ग्रंथ गुरुद्वारांच्या प्रार्थना कक्षामध्ये ठेवला जातो. ज्या इमारतीत गुरू ग्रंथ साहिबची प्रत ठेवलेली असेल तिला गुरूद्वारा म्हटलं जातं.

गुरू ग्रंथ साहिबमध्ये काय काय आहे?

गुरू ग्रंथ साहिबमध्ये शीख धर्माचे प्रवर्तक आणि पहिले गुरू, गुरू नानक यांची वचनं आणि प्रार्थना आहेत. त्यांचं संकलन दुसरे गुरू, गुरू अंगद आणि पाचवे गुरू, गुरू अर्जनदेव यानी केलं होतं.

नांदेड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नांदेड

गुरू ग्रंथ साहिबमध्ये 1,430 पानं आहेत. त्याची प्रत्येक प्रत आणि तिचं प्रत्येक पान एकसारखं असतं. गुरू ग्रंथ साहिबमध्ये 5,894 शब्द आहेत. त्यातील 974 शब्द गुरू नानक यांचे आहेत. दुसऱ्या गुरूंचे 62, तिसऱ्या गुरूंचे 907, चौथ्या गुरूंचे 679, नवव्या गुरूंचे 115 शब्द आहेत.

याशिवाय ईश्वर एक आहे असं मानणाऱ्या काही हिंदू-मुस्लीम रचनाकारांच्या दोह्यांचाही यामध्ये समावेश केलेला आहे. त्यात कबीर, रविदास, बाबा फरीद यांच्या काही रचनांचा समावेश आहे. त्यात सर्वाधीक 541 दोहे कबीरांचे आहेत.

गुरु ग्रंथ साहिब- शीख धर्मियांचे अंतिम गुरू

फोटो स्रोत, Getty Images

या ग्रंथाचं संकलन 1604मध्ये पूर्ण झालं. व ही प्रत अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात ठेवली गेली. या ग्रंथाची मूळप्रत अनेक भाषांमध्ये लिहिली गेली आहे. त्यातून तिचे लेखन अनेक लेखकांनी केलं आहे असं लक्षात येतं. गुरू ग्रंथ साहिबची प्रत्येक प्रत एकसारखी आहे. तिला सरूप म्हटलं जातं.

गुरू ग्रंथ साहिबच्या पहिल्या शब्दाला मूलमंत्र म्हणतात. हे शीख धर्माच्या मूळ आस्थेचं निदर्शक आहे. एकाच ईश्वरामध्ये आस्था राखण्याचं ते स्वीकार करतं.

गुरु ग्रंथ साहिब- शीख धर्मियांचे अंतिम गुरू

फोटो स्रोत, Getty Images

गुरू ग्रंथ साहिबच्या पहिल्या ओळीचे शब्द आहेत- 'इक ओंकार'. याचा अर्थ ईश्वर एक आहे.

गुरूंचा सन्मान आणि निय

गुरू ग्रंथ साहिबला शीखांचा अंतिम गुरू मानलं जातं. त्यामुळे त्यांच्याआधीच्या गुरूंना जो सन्मान मिळत होता, तसाच सन्मान या ग्रंथाला दिला जातो.

गुरू ग्रंथ साहिबच्या सन्मानासाठी काही नियम आहेत. त्यांचे काटेकोरपणे पालन होते.

  • गुरूद्वारामध्ये प्रवेश करण्याआधी प्रत्येक व्यक्ती आपल्या चपला-बूट काढतो आणि हात धुतो.
  • गुरुद्वाराच्या आत गुरू ग्रंथ साहिबच्या समोर प्रत्येकानं डोकं कापडाने झाकलेलं असतं.
  • गुरू ग्रंथ साहिब एका तख्तावर ठेवलं जातं. गुरू ग्रंथ साहिबच्या बिछान्याला 'मंजी साहिब' म्हटलं जातं.
  • त्यावर घुमटाकार पालखी असते. तिथं गुरू ग्रंथ साहिब ठेवला जातो. त्याला 'पालकी साहिब' म्हणतात.
  • त्याला वरती मांडवासारखे उत्तम कापडाने झाकले जाते. त्याखाली गुरू ग्रंथ साहिबास सजवलेल्या कापडाने झाकले जाते. त्यास 'रुमाल्ला साहिब' म्हणतात.
  • गुरुद्वारातील प्रार्थनागृहाला 'दरबार साहिब' म्हटलं जातं.
  • तिथं प्रार्थनेसाठी आलेल्या भक्तांना 'संगत' म्हणतात. संगतमध्ये बसलेल्या लोकांचं डोकं गुरू ग्रंथ साहिबच्या वर नसेल याची खात्री केलेली असते.
  • प्रार्थनागृहात आलेले श्रद्धाळू गुरू ग्रंथ साहिबना आपल्या परिने काही अर्पण करतात.
  • गुरू ग्रंथ साहिबला कधीही पाठ दाखवली जात नाही.
  • गुरू ग्रंथ साहिब वाचणाऱ्या व्यक्तीला ग्रंथी म्हटलं जातं.
  • गुरू ग्रंथ साहिबला चवऱ्या ढाळून वारा घातला जातो.
  • गुरू ग्रंथ साहिब रात्री दुसऱ्या कक्षामध्ये ठेवला जातो.

महाराष्ट्राशी संबंध

शीख धर्माचा आणि गुरू ग्रंथ साहिबचा महाराष्ट्राचा अत्यंत निकटचा संबंध आहे.

"परमात्म्याच्या इच्छेनुसार मी या पंथाची स्थापना केली आहे. माझ्या सगळ्या शीख बांधवांना या ग्रंथाचं पालन करण्याचा आदेश मी देतो. या पवित्र ग्रंथावर तुमच्या गुरूसारखीच आस्था ठेवा आणि याला परमात्म्याचं एक रूपच समजा. ज्याचं मन पवित्र आहे तो या ग्रंथाच्या पवित्र शब्दांनुसार आपलं आचरण करेल."

गुरू ग्रंथ साहिब

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गुरू ग्रंथ साहिब

...हे शब्द आहेत गुरू गोविंद सिंह यांचे. नांदेडमधल्या तख्त सचखंड हजूर साहिब गुरूद्वारानुसार, नांदेड इथं 7 ऑक्टोबर 1708 ला परलोकगमनाला (स्वर्गारोहण) जाण्याआधी त्यांनी हा संदेश दिला होता.

त्याआधी त्यांनी देहधारी गुरूंची परंपरा समाप्त करत गुरू ग्रंथ साहिबला (गुरू-ता-गद्दी) गुरूपदी विराजमान केलं.

नांदेडचे महत्त्व

नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य आणि इतिहास अभ्यासक डॉ. दिलीप गोगटे यांनी याबाबत बीबीसी मराठीला माहिती दिली होती.

ते म्हणाले होते, "नांदेड वास्तव्यादरम्यानच गुरू गोविंद सिंह यांनी देहधारी गुरूंची परंपरा संपवण्याचा निर्णय घेतला होता. स्वतःनंतर गुरू ग्रंथ साहिबला प्रस्थापित करण्याचाही निर्णय त्यांनी इथंच घेतला."

तख्त सचखंड हजूर साहिब गुरूद्वारा, नांदेड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तख्त सचखंड हजूर साहिब गुरूद्वारा, नांदेड

डॉ. गोगटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "नांदेड इथंच त्यांनी खालसा पंथाला आदेश दिला की यानंतर कायमचं गुरूपद हे गुरू ग्रंथ साहिबला असेल. तसंच ते असेही म्हणाले, जन्माला आलेल्या प्रत्येक शीखानं त्याच्या आयुष्यात एकदा तरी नांदेडला यावं. श्री गुरू प्रत्येक शीखाच्या वयाच्या साठाव्या वर्षांपर्यंत नांदेड इथं त्यांची वाट पाहातील."

गुरू गोविंद सिंह महाराष्ट्रात कसे आले?

गुरू गोविंद सिंह महाराष्ट्रात कसे आले आणि नांदेडलाच त्यांनी का निवडलं? याविषयी डॉ. गोगटे म्हणतात, "गुरू गोविंद सिंह यांचं औरंगजेबाशी युद्ध झालं. त्यानंतर ते मध्य प्रदेशमार्गे नांदेडला आले. या काळाबद्दल विविध मतं आहेत."

"नांदेडचा गोदावरी नदीलगतचा नगीना घाट परिसर त्यांना फारच आवडला. आता इथंच वास्तव्य करावं असं त्यांनी ठरवलं."

संग्रहीत छायाचित्र

फोटो स्रोत, PAL PILLAI/GETTY IMAGES

"चमकोरची लढाई आणि सातत्यानं सुरू असलेल्या धावपळीमुळे त्यांना विश्रांती हवी होती. त्यांच्या पत्नी आणि गुरू मातासाहेब सुद्धा इथंच राहत असतं. सैनिकांना आणि सेवकांना त्या हातानं जेवण करून वाढत," अशी माहिती त्यांनी दिली.

नांदेडच्या तख्त सचखंड हजूर साहिब गुरूद्वाराचे कथाकार बाबा विजेंदरसिंग यांच्या मते, ही त्यांच्या पूर्वजन्मीची तपोभूमी होती म्हणूनच ते इथं आले.

"श्री गुरू गोविंद सिंग यांनी जिथं अंतिम श्वास घेतला तिथंच महाराजा रणजितसिंग यांनी गुरूद्वारा बांधली. शीख धर्मातल्या पाच तख्तांपैकी हे एक तख्त आहे," विजेंदरसिंग यांनी सांगितलं.

नांदेडलाच गुरू गोविंद सिंह यांनी सप्टेंबर 1708 च्या पहिल्या आठवड्यात वैरागी साधू माधोव दास यांना शीख धर्माची दीक्षा दिली आणि बंदासिंह बहादूर असं त्यांच नामकरण केलं.

बंदा सिंह बहादूर

फोटो स्रोत, Manoohar Publishers

फोटो कॅप्शन, बंदासिंह बहादूर

पुढच्या सात वर्षांत (1709-1715) त्यांनी शीखांच्या इतिहासाला एक वेगळं वळण देत 1764-65 मधल्या पंजाबच्या मुक्तीचा मार्ग मोकळा केला.

त्यांचे अजून एक शिष्य भाई संतोख सिंह यांनी नांदेड इथंच राहून 'गुरू का लंगर' सुरू करण्याचा सल्ला त्यांना दिला. याच ठिकाणी गुरू गोविंद सिंह यांच्या पंच प्याऱ्यांपैकी दोन भाई दयासिंग आणि धरमसिंग यांनी शेवटचा श्वास घेतला.

संत नामदेवांची पदं

गुरू ग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांच्या पदाचांही समावेश करण्यात आला आहे. त्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी बीबीसी मराठीशी बोलताना माहिती दिली होती.

ते म्हणाले होते, "गुरू ग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांची तब्बल 61 पदं आहेत. गुरू नानक साहिब यांच्या अगोदर ज्यांची-ज्यांची पदं समाविष्ट करण्यात आली, त्यात सर्वाधिक संत नामदेवांची आहेत."

संग्रहीत छायाचित्र

फोटो स्रोत, Hazursahib.com

"गुरू गोविंद सिंह यांना महाराष्ट्रात यावसं वाटलं असेल यामागे कदाचित हेच ऋणानुबंध असावेत, अस मला वाटतं.

संत नामदेव हे दोन दशकांहून अधिक काळ पंजाबमध्ये राहिले आहेत. संत नामदेवांचं मूळ गाव नरसी नामदेव हे नांदेडपासून जवळच आहे. आजही शीख धर्मिय लोकं नांदेडला आल्यावर नरसी नामदेवला आवर्जून जातात," असंही सचिन परब सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी'हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)