You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिग बॉसमध्ये सलमान खानसमोर अश्नीर ग्रोव्हर, नेमकी का होतीये चर्चा?
बिग बॉसच्या 18 व्या सीझनमधील एका व्हीडिओची सोशल मीडियावर सध्या चर्चा होत आहे.
सोनी टीव्हीवरील शार्क टँक या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला उद्योगपती अश्नीर ग्रोव्हर आणि बिग बॉसचा होस्ट सलमान खान यांच्या व्हीडिओची ही चर्चा आहे.
सलमान खान हा भारत पे चा ब्रँड अँबेसिडर होता आणि भारत पे कंपनीचा सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर आहे. सलमान खानला ब्रँड अँबेसिडर म्हणून निवडताना काय घडलं होतं याबद्दल अश्नीर ग्रोव्हरने एका कार्यक्रमात काही दावे केले होते. त्या दाव्यांची आठवण सलमान खानने अश्नीर ग्रोव्हरला करुन दिली.
झालं असं की बिग बॉसमध्ये अश्नीरला पाहुणा म्हणून बोलवण्यात आलं. तिथे सलमान खान आणि अश्नीरची भेट झाली. त्यावेळी सलमानने अश्नीरला काही प्रश्न विचारले. त्या व्हीडिओचीच ही चर्चा आहे.
रविवारी प्रसारित झालेल्या (17 नोव्हेंबर) एपिसोडमध्ये अश्नीर ग्रोव्हर बिग बॉसमध्ये पाहुणा म्हणून आला होता. त्यावेळी सलमान खानने अश्नीरचे दावे खोटे असल्याचं सांगितलं.
त्यावेळी अश्नीर ग्रोव्हरने म्हटले की बोलण्याच्या ओघात तसं झालं असण्याची शक्यता आहे.
तेव्हा सलमान त्याच्या शैलीत म्हणाला, ज्या आदराने तुम्ही आता बोलत आहात तसं तिथं नव्हता बोलत. यावर अश्नीरने म्हटलं की, 'तुम्हाला राग आला असेल तर मी माफी मागतो'.
या भेटीनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. त्यानंतर अश्नीरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर स्पष्टीकरण दिलं.
याच पोस्टमध्ये अश्नीरने सलमान खानची स्तुतीसुद्धा केली आहे. तो म्हणतो सलमान खान एक उत्तम अभिनेते आणि होस्ट आहे. बिग बॉसवर काय चालतं याची त्याला उत्तम जाण आहे.
वादाची सुरुवात कुठून झाली?
अश्नीर ग्रोव्हर रविवारी टेलिकास्ट झालेल्या बिग बॉसच्या 18 व्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून आले होते.
अश्नीर ग्रोवरची ओळख करून देताना सलमान खान म्हणाला, “आज आपल्या शोमध्ये असे एक उद्योगपती येताहेत जे कटू बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांचा एक शब्द दोगलापन अतिशय लोकप्रिय झाला आहे.”
सलमान खान म्हणाला, “बिग बॉस आणि अश्नीर ग्रोव्हरमध्ये बरंच साम्य आहे. बिग बॉसमध्ये जसा लोकांचा दुटप्पीपणा दिसतो, त्याच पद्धतीने अश्नीर ग्रोवर लोकांच्या दुटप्पीपणाबद्दल बोलत असतात.”
जेव्हा सलमान आणि अश्नीरची भेट झाले तेव्हा सलमान म्हणाला, “मी तुम्हाला माझ्याबद्दल आणि माझ्या टीमबद्दल बरंच काही बोलताना ऐकलं आहे. पण आपली कधी भेटच झाली नव्हती. माझ्या टीमने तुम्हाला म्हटलं की तुम्ही काय इथे भेंडी विकत घ्यायला आला आहात का? असं म्हटल्याचा दावा तुम्ही करता. माझी टीम तर असं कधीच बोलत नाही. तुम्ही असं का म्हणाले?”
या प्रश्नाच्या उत्तरादाखल अश्नीर ग्रोव्हर म्हणाले, “मध्ये एक एजन्सीसुद्धा सामील होती.”
सलमान खानला जेव्हा भारत पे चं ब्रँड अँबेसिडर केलं होतं तेव्हा घडलेल्या प्रसंगाबद्दल सलमान खान बोलत होता.
सलमान खान त्यावर म्हणाला, “कोणतीच एजन्सी सामील नव्हती. माझेच लोक सामील होते. विक्रम सामील होता, गौरव सामील होता. हे लोक असं बोलत नाहीत. मग तुम्ही म्हणालात की आम्ही अमूक रकमेवर सही केली, तमूक रमकेवर सही केली. पण प्रत्यक्षात तर असं काही झालं नाही, हा दुटप्पीपणा (दोगलापण) काय आहे?
सलमान म्हणतो, “मीटिंग खूप लोकांबरोबर झाली होती. तुमच्या टीमबरोबर झाली होती. तुम्ही पण असाल कदाचित. तुम्ही म्हणताय अशी काहीच चर्चा तिथे झाली नाही. हे मी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. तुम्ही सही करून आमची फसवणूक केली असं दाखवलं गेलं. हे चुकीचं आहे. ती चर्चाही योग्य नव्हती. जी आकडेवारी सांगितली होती, तीसुद्धा चुकीची नव्हती.”
त्यावर अश्नीर ग्रोव्हर म्हणाला, “तुम्हाला ब्रँड अम्बेसेडर करणं हा माझी सर्वांत स्मार्ट मूव्ह होता. तुमच्याबरोबर शूटिंग करण्याचा अनुभवही चांगला होता.”
सलमान खान त्याच्या उत्तरादाखल म्हणतो, “आता तुमही जसं तुम्ही बोलताय तसा ॲटिट्यूड त्या व्हीडिओमध्ये दिसला नाही, जो मी पाहिला होता.”
अश्नीर ग्रोव्हर म्हणतात, “तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफ करा.”
अश्नीर ग्रोव्हर यांचं आता काय म्हणणं आहे?
हा एपिसोड प्रसारित झाल्यानंतर अश्नीर ग्रोव्हर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहितात, “बिग बॉसचा एपिसोड पाहून चांगलं वाटलं असेल अशी आशा करतो. मात्र मी जे लिहितो आहे ते खरं आहे.”
“सलमान खान चांगला होस्ट आणि अभिनेता आहे. बिग बॉसमध्ये काय चालतं हे त्याला माहिती आहे. मी कायम सलमान खानची स्तुती केली आहे. मी त्याच्याबद्दल कधीही चुकीचं बोललो नाही. कराराबद्दल बोलायचं झालं तर माझी आकडेवारी एकदम खरी आहे.
"मे 2019 मध्ये सलमान खानबरोबर जेडब्ल्यू मेरिअटमध्ये एक बैठक झाली होती. मी त्याला आठवत नाही हे खरंच असेल कारण त्यावेळी मी काही फारसा प्रसिद्ध चेहरा नव्हतो आणि तो अनेक लोकांना भेटत असतो," असं अश्नीरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
सोशल मीडिया युजर्सच्या काय आल्या प्रतिक्रिया?
वितद्वेश नावाचा एक युजर लिहितो, “अश्नीर ग्रोवरला सलमान खानकडून अशा टीकेचा सामना करावा लागला जसे तो स्वतः शार्क टँकमध्ये इतरांवर करतो.”
अश्नीर ग्रोवरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अभिषेक आनंद नावाच्या एक युजरने लिहिले, “आता बास करा, तुमचा दुटप्पीपणा कमी होतच नाही. तुमचं पितळ उघडं पडलं आहे. आता डॅमेज कंट्रोल करून काहीही फायदा नाही.”
रवि शर्मा नावाचा युजर मात्र अश्नीरच्या बचावासाठी समोर आला. तो म्हणतो, “तिथे काही का झालं असेना, मात्र अश्नीर तिथे गेला हे मानावं लागेल. जर त्याला सलमान खान समोर उभी राहायची भीती वाटत असती तर तो नसता गेला.”
जुन्या व्हीडिओमध्ये अश्नीर ग्रोव्हर यांनी काय दावा केला होता?
सलमान खान भारत पे या ॲपचा ब्रँड अँबेसिडर होता. या कार्यक्रमात अश्नीर ग्रोव्हरने सलमान खानला ब्रँड अँबेसिडर म्हणून निवडण्यावरुन काही दावे केले होते.
या व्हीडिओचा उल्लेख सलमान खानने बिग बॉसमध्ये केला. त्यात अश्नीर ग्रोव्हर म्हणतात, “कोणताही नवीन उद्योग उभा करण्यासाठी विश्वास प्राप्त करणं महत्त्वाचं असतं. माझी कंपनी छोटी होती.
मला वाटलं मी सलमान खानला ब्रँड अँबेसिडर म्हणून घेतो. सलमानच्या टीमने त्यांना सांगितलं की 7.5 कोटी रुपये लागतील. एक ते दोन कोटी जाहिरात तयार करण्यात लागतील. मला वाटलं 20 कोटी रुपये खर्च होतील.”
अश्नीर ग्रोव्हर म्हणतात, “मी तो धोका पत्करला आणि मी पैसे कमी करण्याची गळ घातली. तो 4.5 कोटी मध्ये तयार झाला. एक वेळ तर अशी आली की, त्याचा मॅनेजर मला म्हणाला की किती कमी जास्त करत राहणार आहे. भेंडी घ्यायला आला आहेस काय?”
अश्नीर ग्रोव्हर कोण आहे?
अश्नीर ग्रोव्हरने आयआयटी दिल्लीतून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. त्यानंतर आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केलं आहे.
अश्नीर ग्रोव्हर यूपीआय ॲप असलेल्या भारत पे चा सहसंस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत.
कंपनीबरोबर असलेल्या वादामुळे फेब्रुवारी 2022 मध्ये अश्नीरला व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
30 सप्टेंबर 2024 ला भारत पे ने एक निवेदन जारी करून सांगितलं की ग्रोव्हरयाबरोबर झालेल्या एका करारानंतर कंपनीशी त्यांचा काहीही संबंध नाही.
अश्नीर ग्रोव्हर शार्क टँकच्या पहिल्या सीझनचा जज होता.
ग्रोव्हर आणि त्यांच्या पत्नीविरोधात फसवणुकीच्या एका प्रकरणात एफआयआर दाखल झाली होती त्यानंतर त्या दोघांविरोधात लूक आऊट नोटिस जारी करण्यात आली होती.
मात्र दिल्ली हायकोर्टाने गेल्या आठवड्यात अश्नीर ग्रोव्हरविरोधातील एफआयआर रद्द केली आणि लूकआऊट नोटिसही रद्द केली.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.