‘शोले’पासून ‘बर्फी’पर्यंत; बॉलिवूड चित्रपटांवर नक्कल केल्याचा आरोप का होतो?

    • Author, मिर्झा ए. बी. बेग
    • Role, बीबीसी उर्दू, नवी दिल्ली

“हे दोन लोक असे आहेत, ज्यांच्यापुढे सगळं जग नतमस्तक होतं. पण त्यांनी आपल्या आयुष्यात नकलेशिवाय काहीही केलेलं नाही. सलीम जावेद 'कॉपी रायटर' आहेत, खरे लेखक नाहीत."

हे शब्द आहेत अमित आर्यन यांचे. बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध पटकथालेखक सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्याबद्दल ते बोलत होते.

सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘शोले’, ‘त्रिशूल’, ‘डॉन’, ‘क्रांती’, ‘शक्ती ‘आणि ‘मिस्टर इंडिया’ यांसारखे अनेक चित्रपट दिले आहेत.

हे आरोप लावणाऱ्या अमित आर्यन यांनी ‘एफआयआर’, ‘एबीसीडी’, ‘यह उन दिनों की बात है’, ‘लापतागंज’, ‘डू नॉट डिस्टर्ब’ यांसारख्या चित्रपटांचं लेखन केलं आहे.

अमित आर्यन यांनी दावा केला आहे की, सलीम जावेद यांनी लिहिलेला ‘शोले’ चित्रपट राज खोसलांच्या ‘मेरा गाव मेरा देश’ या चित्रपटाची नक्कल आहे.

शोले हा चित्रपट ‘वन्स अपॉन अ टाइम इन द वेस्ट’ या चित्रपटाची नक्कल असल्याचे आरोप याआधीही झाले आहेत.

बॉलिवूडशी निगडीत अनेक लोकांनी 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट चित्रपट ‘शोले’मध्ये जय म्हणजे अमिताभ बच्चन आणि मौसी (लीला मिश्रा) यांच्यातला संवाद प्रसिद्ध उर्दू कादंबरीकार इब्ने सफी यांच्या ‘खौफनाक इमारत’ या कादंबरीतला डायलॉग आहे असं सांगतात.

याच चित्रपटातलं ‘महबूबा महबूबा’ हे गाणं कोणत्यातरी अरब चित्रपटातलं गाण्याची नक्कल असल्याचं सांगितलं आहे तर काही लोकांच्या मते हे गाणं इंग्रजी चित्रपट ‘से यू लव्ह मी’ या गाण्याची नक्कल आहे.

आरोपांवर काय बोलले जावेद अख्तर?

या आरोपांवर बीबीसीने जावेद अख्तर यांच्याशी संपर्क केला होता, पण त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

मात्र, याआधी गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी नसरीन मुन्नी यांच्याबरोबर झालेल्या संवादावर आधारित ‘टॉकिंग लाइफ’ या पुस्तकात हे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगितलं होतं. मात्र, सर्जीव लियोनचा प्रभाव असल्याचं कबूल केलं होतं.

एका प्रकाशन संस्थेशी बोलताना जावेद अख्तर म्हणाले होतो की, ते इब्ने सफी यांच्या कादंबऱ्या अतिशय आवडीने वाचायचे.

काही लोकांनी त्यांचा ‘जंजीर’ चित्रपट ‘डर्टी हॅरी’ चित्रपटाची नक्कल आहे, असं म्हटलं होतं, पण ही सगळी 'बकवास' असल्याचं त्यांचं मत आहे.

‘जंजीर’ ही सलीम खान यांची संकल्पना होती आणि आम्ही दोघांनी त्यावर एकत्र काम केलं होतं असं ते म्हणाले.

त्यांच्यामते ‘डर्टी हॅरी’ चित्रपटावर ‘खून खून’ नावाचा चित्रपट तयार झाला होता, मात्र, ते दुसऱ्या कोणाचंतरी काम होतं.

हे सगळे आरोप गलिच्छ आहेत, असं म्हणत त्यांनी खंडन केलं. त्यांनी लिहिलेले चित्रपट कोणत्याही चित्रपटाची नक्कल किंवा कॉपी नाही असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, भारतीय चित्रपट विशेषत: बॉलिवूड किंवा हिंदी चित्रपटांवर नक्कल केल्याचे आरोप नवीन नाहीत. अनेक लोकप्रिय चित्रपटांची पटकथा, संवाद, संगीत, गाणी यावर अनेकदा असे आरोप झाले आहेत.

तज्ज्ञांचं काय मत आहे?

बॉलिवूडमध्ये नक्कल कोणत्या स्तरापर्यंत गेली आहे, असा प्रश्न बीबीसीने पुण्यतील डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधील स्कूल ऑफ मीडिया अँड जर्नलिझमचे प्राध्यापक अरविंद दास यांना विचारला.

त्याच्या उत्तरादाखल एक शेर उद्धृत केला, “बकौल गालिब, आगे आती थी हाल-ए-दिल पे हंसी, अब किसी बात पर नहीं आती.” (स्वैर अनुवाद- अरे गालिब आधी अशा परिस्थितीवर मला आधी हसू यायचं आता मात्र मला असं काही वाटत नाही.) याचाच अर्थ असा की आधी या नकलांचं वगैरे मला खूप वाईट वाटायचं, आता मला कशाचंच काही वाटेनासं झालं आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीत या प्रकाराने निर्लज्जपणाच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर कोणतीच कारवाई होत नाही. अशा गोष्टी इन्स्पायर्ड म्हणजे प्रेरित आहेत असं सांगून स्वीकारलं जातं.

प्रा.दास म्हणाले की, जर तुम्ही पाश्चिमात्य देशांकडे पाहिलं तर तिथे अशी नक्कल केल्यामुळे प्रतिमा खराब झाली आहे, नोकऱ्या गेल्या आहेत आणि त्यांना माफी मागावी लागली आहे.

ते म्हणतात, “याबाबतीत फरिद झकारिया यांच उदाहरण घेऊ शकता, त्यांना न्यूजवीकच्या संपादकीय मंडळातून बाजूला व्हावं लागलं.”

प्रा.दास दावा करतात की ‘शोले’ चित्रपटात जो नाणं फेकण्याचा प्रसिद्ध सीन हे तो सुद्धा ‘गार्डनर ऑफ एव्हिल’ची नक्कल होती.

त्यांच्या मते, ही खूप मोठी समस्या आहे पण त्यावर कोणाचं लक्ष जात नाही.

त्यांच्या मते, शाहरुख खानचा ‘बाजीगर’ किंवा ‘अग्निसाक्षी’ यांसारखे चित्रपट ‘स्लिपिंग विथ द एनिमी’ची नक्कल असल्याचा आरोप झाला आहे. त्याचप्रमाणे ‘बरेली की बर्फी’ हा चित्रपट ‘फ्रेंच किस’ या चित्रपटाची नक्कल आहे.

ते म्हणाले, “आता तर इंटरनेटचा काळ आहे. तुम्ही तर एखाद्या चित्रपटाची नक्कल करून तयार केलेला चित्रपट आणि मूळ चित्रपट यांची लिंक सहज मिळेल. त्यातून भारतीय चित्रपटांमध्ये ही चोरी किती पातळीपर्यंत गेली आहे याचा अंदाज तुम्ही स्वत:च बांधू शकता."

दिल्लीमधील ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’ (सीएसडीएस) मध्ये इंडियन लँग्वेज प्रोग्रामचे सहयोगी प्राध्यापक रविकांत म्हणाले, “नक्कल हा मानवी स्वभाव आहे. कोणत्याही गोष्टीत प्रगतीसाठी आणि त्याला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.”

“पॉप्युलर कल्चरला प्रोत्साहन देण्यासाठी नक्कल करणं गरजेचं आहे,” ते म्हणाले.

जे लोक सलीम-जावेद यांच्यावर नक्कल केल्याचा आरोप करतात ते सलीम-जावेद यांच्यासारखं काही सादर करू शकतात किंवा लिहू शकतात का असा प्रश्न ते विचारतात.

मात्र, एखादी सर्जनशील गोष्ट कोणी आपल्या नावावर करत असेल किंवा आपल्या नावाने विकत असेल तर त्याला चोरी म्हणतात आणि ते जगभरात खूप पूर्वीपासून सुरू आहे.

नक्कल कशाला म्हणणार?

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या शब्दसंग्रहात ‘प्लेजरिझम’ म्हणजे नक्कल किंवा वाड्मयचौर्य या शब्दाचा अर्थ आहे. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव किंवा विचार आपल्या नावावर सादर करणं याला नक्कल करणं असं म्हणतात.

त्याला मूळ लेखकाने परवानगी दिली असली किंवा नसली तरी ती नक्कलच असते.

नक्कल करणं हा खरंतर अपराध नाही. मात्र, फसवणुकीसारखं कॉपीराइट किंवा नैतिक अधिकारांचं उल्लंघन म्हणून कोर्टात शिक्षा होऊ शकते.

शैक्षणिक क्षेत्रात आणि उद्योगक्षेत्रात हा एक गंभीर गुन्हा मानला जातो.

दिल्लीमधील आंबेडकर विद्यापीठातील कायदा आणि कॉपीराइट या विषयाचे तज्ज्ञ आणि प्राध्यापक लॉरेन्स लियांग म्हणतात, “चित्रपटाचा एक मोठा इतिहास आहे. त्यात व्यक्तिगत काम होतं आणि सामूहिक स्तरावरही काम होतं.”

ते म्हणतात, “कॉपीराइट कायद्याचा याच्याशी फारसा संबंध येत नाही आणि चित्रपटांमध्ये सगळं अगदी अस्सल असावं अशी काही गरजही नाही.”

ते पुढे म्हणतात, “एखाद्या चित्रपटाची पटकथा छापली आहे आणि मग तो चित्रपट तयार झाला असं फार कमी होतं. मला वाटतं. ‘लगान’ पहिलाच असा चित्रपट होता ज्याची पटकथा छापली होती.”

ते म्हणतात, “नाहीतर बहुतांश वेळेला असं होतं. एक मूळ विचार असतो. त्यावर चित्रीकरण करताना बरेच प्रयोग होतात. त्यातून एक नवीनच काहीतरी समोर येतं. असे अनेक चित्रपट आहेत ज्याच्या अनेक आवृत्त्या आहेत. सगळ्यांचा दर्जा वेगळा आहे.”

उदाहरणादाखल ते सांगतात, “अकीरा कुरोसावा यांचा 1954 मध्ये आलेला सेव्हन समुराय या चित्रपटाने प्रभावित होऊन भारतात ‘सात हिंदुस्तानी’ हा चित्रपट आला होता. ख्वाजा अहमद अब्बास यांनी तो लिहिला होता. त्यावरच हॉलिवूडमध्ये ‘द मॅग्निफिशियंट सेव्हन’ हा चित्रपट आला होता. तर हॉलिवूडमध्ये आलेला ‘बीटल बियाँड स्टार्स’च्या निर्मात्यांनी म्हटलं आहे की, त्यांनी काल्पनिक वैज्ञानिक कथा असलेल्या या चित्रपटाची प्रेरणा सेव्हन समुराय आहे.”

प्रा. लॉरेन्स लियांग यांच्या मते, “जेव्हा चित्रपटांची सीडी आणि डीव्हीडी तयार केली जायची आणि त्यांची बेकायदेशीर पद्धतीने विक्री व्हायची तेव्हा चित्रपटांच्या नकलेचं प्रकरण समोर आलं. आजही यात सूट आहे कारण एखादा चित्रपट तुम्ही थिएटर मध्ये पाहू शकला नाहीत, तर तुम्ही पैसे देऊन ऑनलाइन पाहू शकता. म्हणजे चित्रपट पाहण्याचे बरेच मार्ग उपलब्ध आहेत.”

“तुम्ही एखादा विचार कुठून उचलता हे महत्त्वाचं नाही, पण तो विचार कुठे पोहोचवता हे जास्त महत्त्वाचं आहे,” ते पुढे म्हणतात.

एकाच गोष्टीवर तयार झाले तीन वेगवेगळे चित्रपट

प्रा. लियांग म्हणाले की 1936 मध्ये आलेल्या इट हॅपन्ड वन नाईट बद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला माहिती असेलच की राज कपूरने यावर ‘चोरी चोरी’ हा चित्रपट केला होता. त्यानंतर महेश भट्ट यांनी याच कथेवर ‘दिल है कि मानता नही’ हा चित्रपट केला आणि हे सगळे चित्रपट तसे एकमेकांपासून वेगळे होते.

सीएसडीएसचे प्राध्यापक रविकांत यांचं म्हणणं आहे की, भारतात गोष्टी सांगण्याची प्रत्येकाची एक पद्धत आहे. ‘रामायण’, ‘महाभारतात’ही हे दिसतं.

ते म्हणाले, “रामायणाच्या जितक्या आवृत्त्या आहेत तितक्याच महाभारताच्याही आहेत. त्यामुळे त्याला तुम्ही चोरी किंवा नक्कल असं म्हणू शकत नाही.”

प्रा. लियांग म्हणतात सलीम-जावेद आणि अनुराग कश्यप यांच्यासारखे ‘ए’ लिस्टर लोक सोडले तर इतर पटकथा लेखकांचं शोषण होतं.

इतर पटकथालेखकांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. या राजकीय अर्थव्यवस्थेतलं शोषण दुसरं तिसरं काही नसून कॉपीराइटचं उल्लंघन आहे.

त्यांच्या मते, "चित्रपटांच्या पटकथेपेक्षा चित्रपटांचं संगीत आणि गाणी यांची नक्कल तर अगदी नेहमीचीच आहे. संगीतकार बप्पी लाहिरी आणि अनू मालिक त्यासाठी कुप्रसिद्ध आहेत."

“हे तर नेहमीचंच आहे, रिमिक्स तर त्याहून जास्त,” ते पुढे म्हणतात.

प्रा. लियांग म्हणतात, “मधुमती चित्रपटातलं ‘दिल तडप तडप कर कह रहा है’ हे पोलंडच्या एका लोकगीतावरून घेतलं आहे आणि ते एक प्रकारचं सांस्कृतिक भाषांतर आहे. आता इंटरनेटमुळे सगळं जग तुमच्यासमोर आहे. त्यामुळे सलील चौधरी आणि आर.डी.बर्मन पर्यंत अनेक संगीतकारांवर चालींची नक्कल करण्याचा आरोप होत असतो.”

नक्कल प्रकारावर लिहिला होता लेख

पत्रकार मोनोजित लाहिरी यांनी बॉलिवूडमध्ये नक्कल या विषयावर एक लेख लिहिला आहे. ‘चोरी मेरा काम’ असं त्याचं शीर्षक होतं. त्यात ‘चोरी चोरी’ या चित्रपटापासून फरेब चित्रपटाचा उल्लेख केला आहे. हा चित्रपट ‘ॲन अनलॉफुल एन्ट्री’ चित्रपटाची नक्कल आहे.

आयएमडीबी या चित्रपटाच्या साईटवर गेलं तर हॉलिवूडची नक्कल केलेल्या किंवा रीमेक केलेल्या अनेक हिंदी चित्रपटांचा उल्लेख आहे.

प्रा. रविकांत म्हणतात की, जी गोष्ट यशस्वी होते त्याचीच नक्कल होते किंवा जी गोष्ट यशस्वी होते त्यावर नक्कल केल्याच आरोप लावला जातो.

त्यांनी एका चित्रपटाच्या चर्चेत त्यात फिराक गोरखपुरी यांनी एका शेरचा वापर केला. त्यात फिराक गोरखपुरी म्हणाले होते की, त्यांना त्याचं मानधन मिळायला हवं.

त्यावर चित्रपट मासिक ‘शमा’ मध्ये लोकांनी त्यांना म्हटलं की, तुमचा शेर लोकप्रिय आहे हे यामुळे सिद्ध झालं आहे. मात्र तुमच्या शेर मुळे त्यांचा चित्रपट हिट झाला हे कळत नाही. त्यामुळे पैसे मागणं ही जरा अवास्तव मागणी झाली.

रविकांत यांच्या मते, मोहम्मद रफी यांच्या गाण्याची नक्कल करून कितीतरी लोक पैसे कमावत आहेत.

अशा प्रकारे प्रा. लियांग यांनी कुमार सानूंची एक गोष्ट सांगितली, "जेव्हा कोणीतरी त्यांना विचारलं की ते किशोर कुमार यांचीच गाणी का गातात, तर ते म्हणाले की, संगीताला आपला धर्म आणि किशोर कुमारांना दैवत मानायचे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)