मलियाना नरसंहारात जेव्हा 72 जणांची एकाच दिवशी हत्या झाली होती...

मलियाना

फोटो स्रोत, Mohd Ismail

फोटो कॅप्शन, मलियाना मध्ये मोहम्मद इस्माईलच्या 11 कुटुंबियांना जीव गमवावा लागला होता
    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील मेरठ जवळच्या मलियाना गावात 36 वर्षांपूर्वी झालेल्या हिंसाचारातील 41 आरोपींना सत्र न्यायालयाने दोषमुक्त केलं आहे.

मुसलमानांविरुद्ध झालेल्या या हिंसाचाराच्या प्रकरणात कोर्टाने पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना निराशेच्या गर्तेत ढकललं आहे. .

मेरठ शहराजवळ असलेल्या मलियाना गावात 23 मे 1987 ला 72 मुसलमांनांची हत्या करण्यात आली होती.

राज्याच्या सशस्त्र पोलिसांनी आणि स्थानिक हिंदू लोकांनी ही हत्या केल्याचा आरोप होता. या घटनेला भारतीय लोकशाहीवर कलंक मानलं गेलं होतं.

गेल्या आठवड्यात सत्र न्यायालयाने आरोपींना सोडल्यावर टीकाकारांनी हा न्यायाची थट्टा असल्याचं सांगितलं आहे.

उत्तर प्रदेशचे माजी महासंचालक विभूती नारायण राय यांनी प्रकरणी बीबीसीशी चर्चा केली. ते म्हणाले, “हे राज्य पूर्णपणे अयशस्वी झाल्याचं हे प्रकरण आहे. या प्रकरणात पोलीस, राजकीय नेतृत्व, पक्षपाती प्रसारमाध्यमं आणि न्यायपालिका यापैकी कोणीही न्याय दिला नाही.”

विभूती नारायण राय आणि दंगलींचं सविस्तर वार्तांकन करणारे पत्रकार कुर्बान अली यांच्यासह काही पीडितांनी 2021 मध्ये अलाहाबाद मध्ये या प्रकरणी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी अत्यंत धीम्या गतीने चालू असल्याचा आरोप पीडितांनी केला होता.

विभूती नारायण म्हणाले, “चौकशीत सुरुवातीपासूनच गडबड होती. हा खटला साडेतीन दशकं सुरू होता. त्यामुळे आम्ही या प्रकरणाची नव्याने चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही केली होती. आम्ही योग्य सुनावणी व्हावी आणि दंगलीच्या पीडितांना नुकसानभरपाई देण्याची विनंती केली होती.”

सुनावणीदरम्यान 23 आरोपींचा मृत्यू, 31 लोक बेपत्ता

मलियाना

फोटो स्रोत, Rashid Khan

फोटो कॅप्शन, निर्णय ऐकल्यानंतर मलियानाचे लोक
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कुर्बान अली म्हणाले की त्यांच्या मागणीत पोलिसांच्या भूमिकेचीही पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.

हिंसाचारातील पीडित लोकांच्या मते प्रोव्हेन्शियल आर्म्ड कॉन्स्टेबलरीने हिंसाचार सुरू केला होता. उपद्रव आणि जातीपातींमधला संघर्ष मिटवण्यासाठी या पोलीस दलांची स्थापना करण्यात आली होती.

अमेन्स्टी इंटरनॅशनल सकट इतर मानवी हक्क संघटनांनी मलियाना दंगलीत पोलिसांचा सहभाग असल्याचे कागदोपत्री पुरावे दिले होते.

कुर्बान अलींच्या मते कोर्टात जे शवविच्छेदनाचे अहवाल सादर केले होते त्यात कमीत कमी 36 लोकांच्या शरीरावर गोळ्या लागल्याच्या खुणा होत्या. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मलियाना गावात राहणाऱ्या एकाकडेही बंदूक नव्हती.

बीबीसीने मलियाना कांडात पीएसीच्या कथित भूमिकेवर बोलण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी संपर्क साधला. मात्र एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला की त्यांना या प्रकरणात बोलण्याचा अधिकार नाही. पीएसीच्या प्रमुखांनाही बीबीसीने इमेल केला मात्र त्यावर काहीही प्रतिसाद आलेला नाही.

या हत्याकांडानंतर पोलिसांनी जी तक्रार दाखल केली त्यात 93 स्थानिक हिंदूंचं नाव आरोपी म्हणून दाखल केलं होतं. या सुनावणीदरम्यान 23 आरोपींचा मृत्यू झाला आणि 31 लोकांचा काहीही पत्ता लागला नाही.

या प्रकरणातील बचाव पक्षाचे छोटे लाल बन्सल यांनी बीबीसीशी बातचीत केली. त्यांच्या मते ही केस यासाठी पडली कारण या प्रकरणाच्या मुख्य साक्षीदाराने सांगितलं की पोलिसांच्या दबावाखाली आरोपींचं नाव घेतलं आहे.

बन्सल यांच्या मते, “पोलिसांनी या प्रकरणात चार अशा लोकांचं नाव घेतलं जे घटनेच्या सात आठ वर्षांआधीच मारले गेले होते. एक व्यक्ती तर गंभीर आजारी होती आणि रुग्णालयात होती.”

बन्सल म्हणाले, “मुस्लिमांबरोबर जे झालं ते अतिशय वेदनादायी आहे. ते अतिशय निंदनीय आहे. पण माझे अशीलसुद्धा पीडित आहेत. 36 वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात माझ्या अशिलांनाही धमकीचे फोन सतत येत असतात. बचाव पक्ष आणि याचिकाकर्ते पोलिसांवर आणि पीएसीवर हत्येचा आरोप लावतात. मात्र त्यांची नावं अद्याप या लोकांनी सांगितलेली नाही.”

हिंसाचाराच्या हृदयद्रावक कहाण्या

मलियान

फोटो स्रोत, Rashid Khan

फोटो कॅप्शन, हेच मलियाना गाव जिथे 23 मे 1987 ला 72 मुस्लिमांना मारलं गेलं होतं.

मलियाना हिंसाचार प्रकरणातील 26 पानी निर्णयात हिंसाचाराच्या हृदयद्रावक कहाण्या आहेत. एका युवकाचा गळ्याला गोळी लागून मृत्यू झाला. एका पित्याचे तलवारीने तुकडे करण्यात आले होते. पाच वर्षांच्या एका मुलाला आगीत ढकलून देण्यात आलं होतं.

अशा हिंसाचाराच्या घटना घडलेल्या असुनसुद्धा कोर्टाने आरोपींना दोषमुक्त केल्यामुळे पीडितांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे,

वकील अहमद सिद्दीकी यांच्या शरीरावर गोळी लागल्याच्या दोन खुणा आहेत. ते म्हणतात, “या निर्णयाने त्यांच्या समाजात निराशा पसरली आहे.”

ते मला म्हणाले, “जे लोक मारले गेले आणि ज्यांनी मारलं, त्या सगळ्यांना मी ओळखतो.”

सिद्दिकी म्हणतात जेव्हा जेव्हा 23 मे 1987 च्या घटनेचा उल्लेख येतो तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.

ते सांगतात की त्यांच्या गावात गेल्या काही दिवसांपासून मुस्लिमांविरुद्ध अफवा पसरवल्या जात आहेत. दोन समाजात हा दुही निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.

ते म्हणतात, “मेरठमध्ये वर्षानुवर्षं वातावरण तणावपूर्ण आहे. शहरात अनेक दंगली झाल्या आहेत. आमच्या गावात हिंसाचार होईल असा आम्ही कधीही विचार केला नाही. त्या दिवशी पीएसीचे जवान तीन गाड्यात आले आणि त्यांनी मुस्लिमबहुल भागाला घरलं. आमच्या परिसराकडे येणारे सगळे रस्ते बंद केले.”

“पीएसीचे काही जवान हिंदूच्या घरात गेले आणि त्यांनी घराच्या छतावर पोझिशन घेतली. सगळीकडून गोळ्यांचा वर्षाव होत होता असं ते म्हणाले.

सिद्दिकी या प्रकरणातले प्रत्यक्षदर्शी होते. त्यांना साक्ष देण्यासाठी बोलावलं होतं.

ते म्हणतात, “मी एक वर्षं साक्ष दिली. जेव्हा मी पीएसीच्या भूमिकेबद्दल सांगितलं, लोकांना ओळखलं, जे हत्यारं घेऊन आले होते ती हत्यारं ओळखली होती. मला असं वाटतं की दोषींना शिक्षा देण्यासाठी बरेच पुरावे उपलब्ध होते. आमच्याकडून काय चुका झाल्या हे आम्हाला पहायचं होतं. जेव्हा मलियाना झालं तेव्हा त्याचा धूर संपूर्ण जगाने पाहिला होता मग कोर्टाला तो का दिसला नाही? ”

85 वर्षांच्या म्हाताऱ्यापासून रांगणाऱ्या बालकाची हत्या

मलियम

फोटो स्रोत, Rashid Khan

फोटो कॅप्शन, मलियान हिंसाचारातील मुख्य याचिकाकर्ता याकूब

मलियाना नरसंहारात मोहम्मद इस्माईल यांनी त्यांच्या घरातील 11 सदस्यांना गमावलं. त्यांचे आजी आजोबा, आई- वडील, छोटे सात बहीण भाऊ आणि आणखी एका भावाची या दिवशी हत्या झाली. त्याच्या आजोबांचं वय 85 वर्षं होतं. सगळ्यात छोटी त्याची बहीण होती. तेव्हा ती रांगत होती. ते बाहेर यात्रेला गेले होते म्हणून वाचले.

इस्माईलपर्यंत ही बातमी एक दिवशी कळली. मेरठ गाव सील केलं होतं त्यामुळे ते बऱ्याच दिवसांनी आपल्या गावात गेले तेव्हा तिथे कर्फ्यू लागला होता. आल्यावर त्यांनी जे दृष्य पाहिलं ते पाहून आजही त्यांच्या अंगावर काटा येतो.

ते म्हणतात, “आमचं घर वाईट पद्धतीने जाळलं होतं. भिंतीवर रक्ताचे डाग होते. आमचे जे मुस्लीम शेजारी बचावले होते, ते एका मदरशात थांबले होते.”

मोहम्मद इस्माईल सांगतात की दंगलीत जेव्हा दुसऱ्या भागात हिंसाचार सुरू होता तेव्हा त्यांना कल्पना नव्हती की त्यांच्या भागातही हिंसाचार होईल. “

“आमचं कोणाशीच शत्रुत्व नव्हतं. त्यामुळे आम्हाला काही काळजी नव्हती.” ते पुढे म्हणाले.

कुर्बान अली यांनी मला सांगितलं की या नरसंहारांनंतर दोन दिवसानंतर मलियाना गावाचा दौरा केला तेव्हा त्यांनी पाहिलं की संपूर्ण गाव उद्धवस्त झालं आहे. भुताटकी असलेल्या गावात गेल्यासारखं त्यांना वाटलं.

ते म्हणाले, “गावातले बहुतांश मुस्लीम एक तर ठार झाले होते किंवा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या शरीरावर गोळ्या लागल्याच्या खुणा होत्या.”

त्या वर्षी मलियाना गावात जे झालं ती हिंसाचाराची एकमेव घटना नव्हती. 14 एप्रिलला एक धार्मिक मिरवणूक निघाल्यानंतर मेरठमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाला होता.

जातीय हिंसाचारात हिंदु आणि मुस्लिम समाजाचे अनेक लोक मारले गेले होते. तणाव होताच आणि पुढच्या काही आठवड्यापर्यंत दंगली होतच होत्या.

या दंगलीत मृतांचा अधिकृत आकडा 174 होता. मात्र अनधिकृतरित्या हा आकडा 350 पेक्षा जास्त होता. त्याचबरोबर अब्जावधी रुपयांच्या संपत्तीचं नुकसान झालं होतं.

विभूती नारायण सांगतात, “सुरुवातीला दोन्ही बाजूंचे लोक मारले गेले. मात्र त्यानंतर पोलीस आणि पीएसीच्या लोकांनी मुस्लिमांविरुद्ध संगठित हिंसाचार केला.

हशिमपुरा नरसंहार आणि पीएसी

मलियम

फोटो स्रोत, Rashid Khan

22 मे ला म्हणजे मलियाना नरसंहाराच्या एक दिवस आधी पीएसीचे लोक हशिमपुरामध्ये घुसले होते. हशिमपुरा एक मुस्लीमबहुल भाग आहे. मलियाना त्यापासून फक्त सहा किलोमीटर दूर आहे.

पीएसीच्या जवानांनी येथून 48 पुरुषांना बाहेर काढलं, त्यातल्या 42 लोकांना गोळ्या घातल्या. त्यानंतर त्यांचं प्रेत नदी आणि नाल्यात फेकून दिलं. सहा लोक बचावले होते, त्या दिवशीचा घटनाक्रम या लोकांनी सांगितला.

फोटो जर्नलिस्ट प्रवीण जैन जेव्हा ही घटना कव्हर करायला गेले तेव्हा त्यांना मारहाण झाली. पोलिसांनी त्यांना तिथून जायला सांगितलं. जैन यांनी झाडा झुडपात लपून फोटो घेतले. त्यांच्या फोटोत मुस्लीमांना मारहाण होत असल्याचं दिसलं. त्यांना शिव्या देत देत नेलं जात होतं.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, “जेव्हा मी निघत होतो तेव्हा मला हा अंदाज आला नाही की लोकांना मारण्यासाठी शिव्या देत नेत आहेत.”

2018 मध्ये दिल्ली हायकोर्टाने हाशिमपुरा मध्ये मुस्लिमांच्या हत्येच्या आरोपात पीएसीच्या 26 माजी जवानाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

लखनौमध्ये राहणारे ज्येष्ठ पत्रकार शरत प्रधान सांगतात की जेव्हा पीएसी जातीवादी आणि मुस्लीमविरोधी म्हटलं तेव्हा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

ते म्हणाले, “पीएसीचे बहुतांश लोक हिंदू समाजाचे होते. मात्र लष्करासारखं त्यांना धर्मनिरपेक्षतेचं प्रशिक्षण दिलं नव्हतं.”

शरत प्रधान सांगतात, “हे खरं आहे की हाशिमपुरा नरसंहार प्रकरणात न्याय झाला. त्याच्या मागे विभूती नारायण यांचे प्रयत्न होते. ते 1987 मध्ये गाजियाबादमध्ये पोलीस अधीक्षक होते. हाशिमपुरामध्ये मारलेले लोकांचं प्रेत आणि एक जिवंत माणूस तिथे पोहोचला होता.”

कुर्बान अली म्हणतात की मलियाना खटल्यात कधी ना कधी न्याय होईल.

कुर्बान अलींचं म्हणणं आहे, “आम्ही हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देऊ. आम्ही हार मानणार नाही. हे प्रकरण असं आहे की ज्यात न्याय मिळण्यात उशीर तर झाला आहेच पण न्याय मिळू नये अशीच व्यवस्था करण्यात आली आहे.”

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)