IIT हॉस्टेलचे मेस सेक्रेटरी ते दिल्लीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू, केजरीवाल यांच्या आयुष्यातील चढउतार

    • Author, रजनीश कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाला. इतके वर्ष सत्तेत असणाऱ्या दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांचा मतदारसंघ राखता आला नाही. त्यांचा सुद्धा या निवडणुकीत पराभव झाला.

दिल्लीवर इतके दिवस सत्ता गाजवणारे अरविंद केजरीवाल कोण आहेत? त्यांच्या आयआयटी जीवनातले काही किस्से आणि त्यांचं राजकारण, राजकीय विचारधारा याबद्दल पाहुयात.

अरविंद केजरीवाल यांच्या आतापर्यंत आयुष्यावर नजर टाकली तर एक गोष्ट सातत्यानं जाणवते ती म्हणजे कुठलीही गोष्ट सोडण्याची सवय.

कोणीही नेहमीसाठी सोबत नसतं असं अरविंद केजरीवाल एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. त्यांना त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते बोलत होते.

कधी काळी आपल्यासोबत असलेल्या लोकांना पुढे सोबत घेऊन जाण्यात केजरीवाल यांनी कधी रस दाखवला नाही असं त्यांच्या जवळचे लोक सांगतात.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयआयटीमध्येच प्रवेश घ्यायचा अशी अरविंद केजरीवाल यांची जिद्द होती. त्यानुसार त्यांनी आयआयटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं.

त्यानंतर त्यांना टाटा स्टीलमध्ये नोकरी मिळाली. पण, तिथंही त्यांचं मन रमलं नाही. त्यांनी तीन वर्षानंतर नोकरी सोडली आणि प्रशासकीय सेवेची तयारी सुरू केली. त्यांना भारतीय महसूल सेवेत नोकरी मिळाली. पण, त्यांना इथली व्यवस्था आवडली नाही आणि त्यांनी पुन्हा एकदा चांगली नोकरी सोडली.

यानंतर परिवर्तन, इंडिया अगेंस्ट करप्शन, अण्णा हजारेंचं आंदोलनात सहभागी झाले. त्यानंतर आम आदमी पार्टीची स्थापना करून दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. पण, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्चीही सोडली आणि आतिशी यांना मुख्यमंत्री बनवलं.

आयआयटीमधले अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल 1985 मध्ये आयआयटी खडगपूरमध्ये शिकायला गेले. यावेळी त्यांनी वसतिगृहातील मेस सेक्रेटरीची निवडणूक लढवली होती. यावेळी कुठलाही प्रचार न करता त्यांनी निवडणूक जिंकली.

यानंतर त्यांनी 2013 मध्ये नवी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवली आणि 15 वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांचा पराभव केला. याच विजयामुळे अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले.

केजरीवालांनी त्यांच्या 56 वर्षांच्या आयुष्यात खूप कमी वेळा अपयश पाहिलं. गेल्या आठवड्यात त्यांना सगळ्यात मोठं अपयश मिळालं. कारण, त्यांचा विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या मतदारसंघात पराभव झाला.

अरविंद केजरीवाल यांचा जन्म 1968 मध्ये हरियाणामधल्या हिसारमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव गोविंद राम केजरीवाल होतं. ते इलेक्ट्रीकल इंजिनिअर होतं. अरविंद यांचं शिक्षण सोनीपतच्या ईसाई मिशनरी शाळेत झालं.

केजरीवालांचे आयआयटी खडगपूरमधले मित्र प्राण कुरूप यांनी "अरविंद केजरीवाल अँड द आम आदमी पार्टी, अन इनसाइड लूक" या पुस्तकात अरविंद केजरीवाल यांच्या विद्यार्थी जीवनाबद्दल लिहिलं आहे.

प्राण कुरूप यांनी लिहिलंय की, "आयआयटी खडगपूरमध्ये अरविंद जितका सरळमार्गी, संकोचित वृत्तीचा आणि नशेपासून दूर असणारा विद्यार्थी होता तसाच तो आताही आहे. त्याला आताही पाहिलं तर त्याच्यात कुठलाही बदल झाला असं दिसत नाही."

IIT च्या त्या वातावरणात सर्व मित्र शिव्या देणारे होते परंतु अरविंद केजरीवाल यांनी कधी शिव्या दिल्या नाहीत. याचा एक किस्सा आहे. यावरुन आपल्याला अंदाज येऊ शकतो की त्यावेळचं तिथलं वातावरण कसं होतं.

कुरूप सांगतात, "एकदा आमचा एक मित्र सकाळी सकाळी गाढ झोपेत होता. काही मित्रांनी त्याचा दरवाजा जोरात ठोठावला. कारण, त्याला कोणीतरी भेटायला आलं होतं. त्यानं शिव्या घालत दरवाजा उघडला तर समोर त्याचे वडील उभे होते."

"त्यानं स्वतःला कसंतरी सावरलं आणि म्हणाला बाबा तुम्ही? त्यावेळी शिव्या दिल्या म्हणजे हा आपला जवळचा व्यक्ती असं समजलं जात होतं. कोणालाही राग यायचा नाही. कोणी फार क्रिएटिव्ह शिव्या देत असेल तर त्याचं कौतुक केलं जायचं. पण, अशा वातावरणात देखील अरविंद केजरीवाल एकमेव असे होते की त्यांनी कधीच कोणाला शिवी दिली नाही."

अरविंद केजरीवाल जिद्दी होते

याच पुस्तकात कुरूप आणखी एक किस्सा सांगतात. ते म्हणतात, "अरविंदला एका कार्यकर्त्यानं स्टींग कॉल केला होता. मी माझ्या IITच्या सिनियर्ससोबत तो कॉल ऐकत होतो. यात काही सिनियर्स बोलत होते की आता केजरीवालची पुन्हा रॅगिंग करायला लागेल."

"त्यानं IITच्या चार वर्षांत काय शिकलं. त्यांना अजिबात शिव्या देता येत नाहीत. शिव्या द्यायला तर शिकायला हवं होतं. हा आयआयटीच्या नावावर कलंक आहे. त्यानं नेहरू हॉलची (केजरीवाल राहत असलेलं हॉस्टेल) इज्जत घालवली."

अरविंद केजरीवाल यांचे वडील गोविंदराम यांनी द कॅरवां मॅगजीनला 2011 मध्ये दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, "माझ्या मुलाचं पूर्ण बालपण पुस्तकानं भरलेलं होतं. आमच्या वन बेडरूम अपार्टमेंटमध्ये कोणी पाहुणे आले तर अरविंद त्यांच्यासोबत जास्त बोलायचा पण नाही. तो बाथरूममध्ये जाऊन वाचन करायचा."

"1985 मध्ये त्याचं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयआयटीमध्ये प्रवेश घ्यायचा ठरवलं. पण, आयआयटीमध्ये निवड नाही झाली तर दुसरा पर्याय बघण्याचा सल्ला मी त्याला दिला होता. त्यामुळे त्यानं राज्यातील इंजिनिअरींग कॉलेजलाही अर्ज दाखल केला होता. पण, त्यानं त्याची प्रवेश प्रक्रिया दिलीच नाही."

"यावेळी मी त्याला विचारलं परीक्षा का दिली नाही? तर त्याचं म्हणणं होतं की मला फक्त आयआयटीमध्ये जायचं आहे."

केजरीवाल यांना आयआयटीत प्रवेश मिळाला. 1989 मध्ये त्यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगची पदवी पूर्ण केली आणि जमशेदपूर टाटा स्टीलमध्ये असिस्टंट इंजिनिअर म्हणून रुजू झाले.

गोविंद राम म्हणतात, "अरविंदला नोकरी आवडत होती. त्याच्या सहकाऱ्यांनी सुद्धा त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं होतं. पण, तीन वर्षानंतर नोकरी सोडली आणि दिल्लीत परतला."

"त्यानं प्रशासकीय सेवेची तयारी सुरू केली. त्याला पोलीस व्हायचं होतं. पण, त्याचं कारण मला माहिती नव्हतं. त्याच्या आयुष्यात मी कधीच हस्तक्षेप केला नाही."

केजरीवाल प्रशासकीय सेवेत आयएएससाठी पात्र ठरले नाहीत. पण, त्यांना इंडियन रेव्हेन्यू सर्विस मिळाली. आयआरएसच्या ट्रेनिंगसाठी ते मसुरीला गेले आणि तिथेच त्यांची ओळख सुनिता यांच्यासोबत झाली.

ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर अरविंद आणि सुनिता दोघेही दिल्ली आयकर विभागात सहाय्यक आयुक्त पदी नियुक्त झाले. पुढे अरविंद यांनी सुनिता यांच्यासोबत लग्नही केलं.

प्रशासकीय सेवेतही निराश झालेले केजरीवाल

केजरीवालांच्या वडिलांनी म्हटलं होतं की "एक अधिकारी म्हणून माझा मुलगा कधी रमलाच नाही. तो इतरांपेक्षा खूप वेगळा होता. तो शिपायाकडून कुठलीही कामे करून घेत नव्हता. स्वतःचा डेस्क स्वतः स्वच्छ करायचा आणि डस्टबीन सुद्धा स्वतः रिकामे करायचा."

"कधी ऑफिसच्या पार्ट्यांमध्ये गेला नाही. तसेच इतर कार्यक्रमांपासून देखील दूर राहायचा. ऑफिसजवळच्या चहाच्या दुकानात बसायला त्याला जास्त आवडायचं. इतकंच नाहीतर त्यानं स्वतःचा आणि आपल्या दोन्ही अपत्यांचा वाढदिवस कधीच साजरा केला नाही."

'द कॅरवां' सोबत बोलताना दिल्ली आयटी ऑफिसचे अतिरिक्त आयुक्त असलेले जावेद अहदम यांनी म्हटलं होतं "अरविंद अतिशय शांत स्वभावाचे अधिकारी होते. अधिक वेळ ते आपल्या कॅबिनमध्येच घालवत होते. असे अनेक अधिकारी होते ज्यांना केजरीवाल आवडायचे नाही."

"इथं लाच घेतल्याशिवाय कुठलेही काम होत नाही याचा अंदाज केजरीवालांना आला होता. काही वर्षानंतर ते अत्यंत निराश झाले होते. त्यांनी 2000 साली छुप्या पद्धतीनं परिवर्तन स्वयंसेवी संस्था सुरू केली. लाचखोरीमुळे त्रास होत असल्यास परिवर्तनशी संपर्क साधा, असे पोस्टर लावण्यास सुरुवात केली. "

प्राण कुरूप आपल्या पुस्तकात लिहितात, "2000 च्या दशकालं सुरुवातीचं वर्ष असेल. मला नेमकी तारीख आठवत नाही. पण, अरविंद युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्नियामध्ये एका कॉन्फरन्समध्ये सहभागी व्हायला आला होता. त्यावेळी आम्ही कॉफीसाठी भेटलो."

"आम्ही 1989 पासून एकमेकांना बघितलं नव्हतं. अरविंदजवळ अनेक क्षेत्राचा अनुभव होता. टाटा स्टील, आयआरएस याशिवाय मदर टेरेसा आश्रममध्येही त्यानं काम केलं होतं. मी अरविंदला विचारलं की तू प्रत्येक गोष्ट कसा सोडू शकतोस, तुझ्यामध्ये इतकी हिम्मत कशी काय येते? तुझ्या निर्णयामुळे घरातल्या लोकांना त्रास होत नाही का?"

यावर केजरीवालांनी उत्तर दिलं, "माझे आई-बाबा माझ्या निर्णयामुळे आनंदी नसतात. पण, सुनिता माझ्यामागे नेहमी खंबीरपणे उभी असते. कुठल्याही गोष्टीसाठी तिचा होकार असतो. त्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजतो."

केजरीवाल यांचं यश

प्राण कुरूप यांनी केजरीवाल यांच्यासोबत साधलेल्या संवादाचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात केलाय. "आयआरएस सेवेत असताना चहूबाजूंनी पैसा जमावता येतो. तुलाही असा पैसा जमवायचा आहे का? या प्रश्नावर अरविंद हसायला लागला आणि म्हटणाला कधीही नाही."

"मी असं केलं तर रात्रभर झोपू शकणार नाही. हेच करायचं असतं तर मी परिवर्तन कधीच सुरू केलं नसतं. पण, आयआरएसमध्ये लोक खूप पैसा जमवतात हे खरंय."

पण याच केजरीवालांना गेल्या वर्षी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झाली. ते पाच महिने तुरुंगात होते. दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेप्रकरणी ईडीनं गेल्या वर्षी मार्च महिन्यात केजीरवालांना अटक केली होती.

सर्वोच्च न्यायालयानं त्यांना सप्टेंबरमध्ये जामीन मंजूर केला होता. पण, केजरीवाल यांच्यावर आतापर्यंत एकही आरोप सिद्ध झालेला नाही.

आम आदमी पार्टीसोबतच एनटी रामा राव यांची तेलगू देसम पार्टी आणि प्रफुल्लकुमार महंता यांची असम गण परिषद या पक्षांनी पहिल्याच प्रयत्नात सत्ता मिळवली.

तेलगू देसम पार्टी आणि असम गण परिषद एका राज्यापुरते मर्यादित पक्ष राहिले. पण, आम आदमी पार्टीनं दिल्लीसोबत इतर राज्यातही सत्ता मिळवली.

आम आदमी पार्टी 2012 मध्ये तयार झाली आणि डिसेंबर 2013 मध्ये सत्तेत आली. 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं.

आपला 28, भाजपला 31 आणि काँग्रेसला आठ जागा मिळाल्या होत्या. केजरीवाल काँग्रेसच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झाले होते. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचे फक्त 49 दिवस मिळाले. पण, या दिवसांत ते मुख्यमंत्र्यांपेक्षा कार्यकर्ता अधिक वाटत होते.

मुकेश अंबानी यांच्याविरोधात एफआयआर करण्याचा आदेश

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या चार दिवसांपूर्वी 14 फेब्रुवारी 2014 ला केजरीवालांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी, तत्कालीन पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोइली आणि पूर्व पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते.

या तिघांनी मिळून केजी बेसिनमधून निघणाऱ्या नैसर्गिक गॅसची किंमत जाणीवपूर्वक वाढवली होती असा केजरीवालांचा आरोप होता. त्यांनी दिल्ली अँट करप्शन ब्युरोला हा आदेश दिला होता.

आपल्याला भ्रष्टाचारविरोधात कारवाई करायला विरोध केला जातोय असं केजरीवाल राजीनामा देण्यापूर्वी म्हणाले होते. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी दिल्लीत निवडणूक घेण्याची मागणी केली होती.

2013 ला केजरीवाल काँग्रेसच्या पाठिंब्यानं सत्तेत आले तेव्हा फक्त एक तडजोड म्हणून याकडे पाहलिं गेलं. स्वतः केजरीवाल म्हणाले होते, "मी आपल्या मुलांची शपथ घेऊन सांगतो की मी ना भाजपसोबत जाणारा ना काँग्रेससोबत. कारण, दिल्लीची जनता या दोघांविरोधात आम आदमी पार्टीला मतदान करणार आहे."

"भाजप आणि काँग्रेस युती करून सरकार बनवू शकतात. कारण, दोन्ही पक्ष पडद्यामागे एकच आहेत. मला सत्तेची भूख नाही. मी युती करून सत्ता स्थापन करणार नाही. कारण, भाजप, काँग्रेससोबत सत्तेत राहून भ्रष्ट्राचाविरोधात लढू शकत नाही. युती करून सत्ता मिळवण्यापेक्षा मी विरोधी पक्षात बसेल."

यावेळी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित नवी दिल्ली विधानसभा क्षेत्रातून केजरीवाल यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार होते. केजरीवाल राजकारणात नव्हते तेव्हा त्यांची संदीप दीक्षित यांच्यासोबत मैत्री होती असं सांगितलं जातं.

पण, संदीप दीक्षित म्हणतात, केजरीवालांसोबत माझी मैत्री कधीच नव्हती. दोन ते तीन वेळा भेट झाली. पण, फक्त नमस्कार करण्याच्या पलीकडे बोललो नाही.

दिल्लीतील मुस्लीम समाजात केजरीवालांची प्रतिमा

काँग्रेसनं 2013 मध्ये अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा का दिला होता? याबद्दल संदीप दीक्षित सांगतात, "मला वाटतं काँग्रेसनं अरविंद केजरीवालांचा मुद्दा नीट हाताळला नाही. त्यामुळे आम्हाला खूप मोठं नुकसान झालं. 2013 मध्ये केजरीवालांना पाठिंबा देणं काँग्रेसची चूक होती. हा शीला दीक्षितचा निर्णय नव्हता. त्यावेळी पक्षात शीला दीक्षित यांच्याकडे निर्णयक्षमता नव्हता. हा केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय होता. आम आदमी पक्ष भाजप सोडून काँग्रेससाठी अधिक धोकादायक ठरत आहे."

दिल्लीतल्या मुस्लीम समाजात अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस यांच्याबद्दल काही संभ्रम आहे का? याबद्दल संदीप दीक्षित म्हणतात, "दिल्लीत मुस्लिमांना वाटतं केजरीवाल भाजपचा पराभव करू शकतात. पण, मुस्लीम ज्यांना मत देतील तेच भाजपचा पराभव करू शकतात हे गरजेचं नाही."

"केजरीवाल धर्मनिरपेक्ष नेता नाही. मुस्लीम समाजाला धर्मनिरपेक्षतेचं राजकारण हवं असेल तर केजरीवाल यांना मत देऊन होणार नाही. "

आम आदमी पक्षाला स्थापन होऊन 12 वर्ष झाली. पण, या 12 वर्षात त्यांना अपयशापेक्षा यश जास्त मिळालं.

2022 मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीत आपला दणदणीत विजय मिळाला. सप्टेंबर 2023 मध्ये निवडणूक आयोगानं आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला.

दिल्ली, पंजाब, गोवा, गुजरातमध्ये मिळालेल्या व्होट शेअरच्या आधारावर हा दर्जा मिळाला होता. भविष्यात इंडिया आघाडीमधले पक्ष आणखी एकत्र आले तर आम आदमी पक्षाची भूमिका निर्णायक असेल.

या 12 वर्षांत अरविंद केजरीवाल यांच्या राजकारणावर अनेक प्रश्नही उपस्थित झाले. आम आदमी पार्टी डावी, उजवी की मध्यममार्गी? असं विचारण्यात आलं.

पण, असाही आरोप होतो की इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या चळवळीला उजव्या विचारसरणीच्या राजकारणाचा पाठिंबा होता. कारण, या आंदोलनाचा सर्वाधिका फायदा भाजप आणि अरविंद केजरीवाल यांना झाला.

अरविंद केजरीवाल सेक्युलर आहेत का?

आम आदमी पक्षासाठी दिल्ली विधानसभा निवडणुकीत डेटा गोळा करणारे रिजवान अहसन म्हणतात, "भारतात 20 टक्के सेक्युलर आहेत जिथं आधीच गर्दी झाली आहे. अशात अरविंद केजरीवाल का जातील? त्यांनी 80 टक्क्यांमध्ये आपली जागा निर्माण करायचा असेल तर प्रॉब्लेम काय आहे?"

"धर्मनिरपेक्षतेच्या नावावर 80 टक्के जागा फक्त भाजपसाठी सोडणं योग्य नाही. केजरीवालांना भाजपला हरवायचं आहे आणि भाजपची ताकद हीच 80 टक्के स्पेस आहे. अशात आप 20 टक्क्यांमध्ये का जाईल? मला वाटत नाही की दिल्लीतल्या सरकारनं मुस्लीम समाजासोबत कुठलाही भेदभाव केला आहे."

रिजवान पुढे म्हणतात, "काँग्रेसनं या 80 टक्के स्पेसला पूर्णपणे भाजपसाठी सोडलेलं आहे. मुस्लीम समाजात केजरीवालांबद्दल संभ्रम होता हे खरंय. पण, दिल्ली सरकारच्या योजनांचा थेट फायदा मुस्लीम समाजाला झाला हेही तितकंच खरं आहे. भाजपला आप हरवू शकते हे मुस्लिमांना माहिती होतं. अशात मला वाटत नाही की आपने 20 टक्क्यांना खूश करण्यासाठी 80 टक्क्यांना नाराज करण्याची गरज आहे."

2019 मध्ये आपने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या बाजूनं मतदान केलं होतं. पण, चार वर्षानंतर केजरीवालांना दिल्ली सर्व्हिस बिलाविरोधात संघर्ष करावा लागला. शेवटी दिल्लीतल्या अधिकाऱ्यांचं नियंत्रण उपराज्यपालांना देण्यात आलं.

पण, अरविंद केजरीवाल यांनी आश्वासन दिल्यानुसार त्यांचं राजकारण सुरू आहे का?

आपचं राजकारण जवळून बघणारे राजकीय विश्लेषक अभय कुमार दुबे म्हणतात, "अरविंद केजरीवाल आणि आपला जर आंदोलनाच्या नजरेतून पाहिलं तर त्यांनी दावा केल्यानुसार त्यांचं राजकारण नाही असं म्हणता येईल. पण, आंदोलन करणं आणि सरकार चालवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत."

"आंदोलन करताना कोणीही प्रतिस्पर्धी नसोत. पण, निवडणुकीच्या मैदानात अनेक प्रतिस्पर्धी असतात. सरकार चालवताना अनेक आव्हानं असतात. यात आपले आदर्श बाजूला ठेवून काम करावं लागतं."

मोदी आणि केजरीवाल यांच्या राजकारणात काय साम्य आहे?

अभय कुमार दुबे सांगतात, "अरविंद यांना दिल्लीत राजकारणाच करायचं होतं. त्यांनी गरीबांवर लक्ष केंद्रीत केलं. कारण, इथल्या राजकारणाला जातीय अस्मिता नव्हती. 2013 च्या निवडणुकीत केजरीवाल भाजपला पराभूत करू शकतील असे दिल्लीतल्या मुस्लामांना वाटलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला मतदान केलं होतं."

"त्यामुळे काँग्रेसला आठ जागा मिळाल्या होत्या. पण, त्यानंतर आप भाजपला हरवू शकते असा विश्वास मुस्लीमांना वाटलं आणि त्यांनी काँग्रेसला मत देणं बंद केलं. काँग्रेसनं दिल्लीत गांभीर्यपूर्वक निवडणूक लढवली नाही."

"केजरीवालांनी दिल्लीत 37 सभा घेतल्या. भाजपनं मुस्लीम समाजाबद्दल जे वातावरण तयार केलं त्यात केजरीवालांना अधिक स्पेस नाही. पण, केजरीवाल म्हणाले की फक्त बोलणारा हवाय, की भाजपला हरवणारा हवाय याचा विचार मुस्लीमांनी करावा."

मोदी आणि केजरीवाल यांच्या राजकारणात काय साम्य आहे? याबद्दल अभय कुमार दुबे म्हणतात, "मोदी आणि केजरीवाल यांच्या भाषण देण्याच्या शैलीत खूप फरक आहे. पण, हे गोष्ट खरी आहे की अण्णा हजारेंच्या आंदोलनानं सर्वाधिक फायदा हा अरविंद केजरीवाल आणि मोदींना झाला आहे."

केजरीवालांची राजकीय विचारधारा

काँग्रेसचा राजकीय वारसा म्हणजे स्वातंत्र्यलढा होय. गांधी आणि वल्लभभाई पटेल हा काँग्रेसचा वारसा आहे. तर रामजन्मभूमी आंदोलन आणि आणीबाणीविरोधात आंदोलन हा भाजपचा राजकीय वारसा आहे. तसा आम आदमी पक्षाचा राजकीय वारसा काय आहे?

कोलकाता विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक हिमाद्री चॅटर्जी म्हणतात, "आम आदमी पक्षाचा वारसा चार गोष्टींमध्ये विभागायला हवा. पहिलं म्हणजे अण्णा हजारे यांच्यासोबत भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन हा त्यांचं सगळ्यात मोठा राजकीय वारसा आहे. दुसरं म्हणजे अरविंद केजरीवाल यांची कार्यकर्तासारखी असलेली प्रतिमा आणि तिसरं म्हणजे काँग्रेस-भाजपला एकाचवेळी आव्हान देणं.

"दिल्लीत शीला दीक्षित यांचा पराभव करणं कठीण होतं. पण, केजरीवालांनी ते करून दाखवलं. त्यांची चौथी मोठी विरासत म्हणजे पाणी, वीज, रस्ते, शिक्षण यांना प्राथमिक मुद्दे बनवून सत्तेच्या केंद्रस्थानी आणणं," चॅटर्जी म्हणतात.

त्या पुढे म्हणतात, आपने हा सगळा वारसा आंदोलन लढताना तयार केला आहे. पण, त्यांची कारभार चालवण्याची पद्दधती त्यांच्या मोठी अडचण ठरत आहे. त्यांनी आपल्या या राजकीय वारशाला समोर जाऊ दिलं नाहीतर त्यांच्या अडचणी आणखी वाढतील. आपने दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी खूप घाई केली. त्यामुळे आपच्या विरोधात टीकाकार वाढले. पण, आप निवडणूक जिंकू शकते हे सिद्ध झालंय.

आप कोणत्या विचारधारेनुसार राजकारण करतेय याचं उत्तर पक्षाच्या वेबसाईटवर देण्यात आलंय. पक्ष कुठल्याही विचारधारेवर नाहीतर कुठल्याही गोष्टीवर तोडगा काढण्यावर जोर देत असल्याचं त्यात म्हटलंय.

आता अरविंद केजरीवाल यांना आपल्याच पक्षाचा पराभव का झाला यावर विचार करायचा आहे. कारण, दिल्लीत त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. पण, केजरीवालांना स्वतःची जागा सुद्धा वाचवता आली नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)