You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी रेखा गुप्ता, राज्याच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री
दिल्लीत भाजपनं तब्बल 27 वर्षांचा सत्तेचा वनवास संपवला आहे. जवळपास तीन दशकांनंतर भाजप दिल्लीत सत्तेत आलीय आणि तेही स्पष्ट बहुमतानं. भाजपानं अखेर दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी रेखा गुप्ता यांचं नाव जाहीर केलं आहे.
सुषमा स्वराज, शीला दीक्षित, आतिशी यांच्यानंतर त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत.
दिल्लीचे भाजपा पर्यवेक्षक म्हणून काम पाहाणारे रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकारांसमोर रेखा गुप्ता यांचं नाव जाहीर केलं. रेखा गुप्ता यांच्या नावाचा प्रस्ताव प्रवेश वर्मा, विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय यांनी दिला आणि नऊ जणांनी त्याला अनुमोदन दिलं असं त्यांनी स्पष्ट केलं.
रेखा गुप्ता शालीमार बाग या मतदारसंघातून 30 हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा पराभव केला.
2020 मध्ये रेखा गुप्ता यांचा शालीमार बाग मतदारसंघात पराभव झाला होता.
रेखा गुप्ता दिल्ली महानगरपालिकेच्या नगरसेविका तसेच दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाही होत्या.
रेखा गुप्ता यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात दिल्ली विद्यापीठात अभाविपमधून केली होती. त्यानंतर त्या दिल्ली छात्र संघाच्या अध्यक्षा झाल्या. 2007 मध्ये त्या पितमपुरामधून नगरसेविका झाल्या.
यापूर्वी 1993 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं 70 जागांपैकी 49 जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती. त्या कार्यकाळानंतर भाजप दिल्लीत सत्तेत आलं नव्हतं.
यंदा मात्र भाजपा 70 पैकी 48 जागा जिंकत सत्तेत आलेली आहे.
दुसरीकडे, गेल्या 11 वर्षांपासून सत्तेत असलेल्या अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षानं केवळ 22 जागा जिंकल्या आहेत.
भाजपचच्या विजयानंतर दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? यावरून अनेक नावांची चर्चा सुरू होती
भाजप नेते प्रवेश वर्मा यांच्या नावाची सध्या बरीच चर्चा सुरु होती.
वर्मा यांनी 'आप'चे प्रमुख नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला असून त्यांच्याकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात होतं.
प्रवेश वर्मा हे दिल्लीतील पंजाबी आणि जाट समुदायाचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जातात. ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते साहिब सिंग वर्मा यांचे सुपुत्र आहेत.
वर्मा यांचे काका आझाद सिंहदेखील राजकारणात सक्रिय होते. ते उत्तर दिल्ली महानगरपालिकेचे महापौर राहिले आहेत. त्यांनी भाजपच्या तिकिटावर मुंडका मतदारसंघातून 2013 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र भाजपानं आज रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत रेखा गुप्ता यांच्या रुपानं एक महिला चेहरादेखील चर्चेत होते. भाजपतर्फे मुख्यमंत्रीपदासाठी असलेल्या यादीत महिला उमेदवार म्हणून रेखा गुप्ता यांचं नाव सर्वात पुढे होतं
रेखा गुप्ता या दिल्ली नगरपालिकेच्या नगरसेवक आणि दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षदेखील राहिल्या आहेत.
याबाबत प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ पत्रकार शरद गुप्ता म्हणतात, "रेखा गुप्ता यांच्या माध्यमातून महिला आणि वैश्य समुदाय दोघांपर्यंतही पोहोचता येते."
परंतु, भाजप मागील काही राज्यातील निवडणुकीनंतरची स्थिती पाहता, भाजप वेळेवर आश्चर्याचा धक्का देऊ शकते. ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान असो वा मध्यप्रदेश भाजपनं येथे चर्चेत नसलेल्या नावांना पसंती देऊन जनतेला आश्चर्यात टाकलं होतं. त्यामुळे, दिल्लीतील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? भाजप कोणाला संधी देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)