सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील प्रारंभिक आकडेवारीत पिछाडीवर गेलेल्या आम आदमी पक्षाला त्यांचीच नीती जबाबदार असल्याचं म्हटलंय.
दिल्लीचा कथित दारु घोटाळाही या पराभवातील प्रमुख कारणांपैकी एक कारण असल्याचं हजारे म्हणाले.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, “मी आधीपासूनच सांगत आलोय की, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे आचार-विचार शुद्ध असणे, जीवन निष्कलंक असणे तसेच अपमान सहन करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. जर उमेदवारांत हे गुण असतील, तर मतदारांचा त्याच्यावर विश्वास बसतो की हा माणूस जनतेसाठी काहीतरी करेल.”
"मी वारंवार हे सांगत होतो, पण त्यांनी दुर्लक्ष केलं आणि शेवटी हीच बाब पुढे आली. दारु घोटाळ्याची चर्चा का झाली? कारण ते पैशाच्या मोहात वाहुन गेले आणि बदनाम झाले. त्यामुळे लोकांनाही हे बोलण्याची संधी मिळाली की, हा एकीकडे चारित्र्यावर भाष्य करतो आणि दुसरीकडे मद्यधोरणावर चर्चा करतो."
अण्णा हजारे पुढे बोलताना म्हणाले की, याच कारणामुळे आज आम आदमी पक्षाला निवडणुकीत पराभव पत्करावा लागत आहे.
मद्य धोरणातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे का?
या प्रश्नावर बोलताना अण्णा हजारे म्हणाले, “राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात. पण आरोप झाले, तर ते चूक-बरोबर जे काही आहे ते जनतेसमोर स्पष्ट करणं गरजेचं आणि महत्वाचं असतं. जर ते सिद्ध करता आलं, तर कुणीही काही बिघडवू शकत नाही.”