You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एक अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या कॉस्मेटिक ब्रँडची मालकीणच या उद्योगाला 'सेक्सिस्ट' का म्हणते?
- Author, एमीलिया बटरली
- Role, बीबीसी 100 वीमेन
हुडा कटान या जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जातात तेव्हा त्यांचे चाहते त्यांचं अशा प्रकारे स्वागत करतात की जसं एखाद्या मोठा संगीतकार किंवा हॉलीवूडचा चित्रपट स्टारचं केलं जात तसं.
त्यांच्या कॉस्मेटिक ब्रँड 'हुडा ब्युटी'चा 10 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी त्यांनी पॅरिसमधील आयफेल टॉवरजवळ एक इमारत अधिग्रहित केली आहे आणि त्याच्या आतील सर्व वस्तू 'हॉट' गुलाबी रंग देऊन बदलून टाकल्या आहे.
तिथलं त्यांचं मेक-अप स्टेशन त्यांच्या उत्पादनांनी भरलेलं आहे. सर्वत्र सुंदर चमकणारे नियॉन साइन आहेत आणि इथं सर्वत्र सुंदर लोक दिसतात.
त्या इथं पोहोचल्यावर रस्त्यावर उभे असलेले त्यांचे चाहते घोषणा देउ लागतात. आत, त्या जेव्हा पायऱ्या चढत असताना, आमंत्रित इन्फ्लुएन्सर आणि मेकअप प्रोफेशनल त्यांच्या नावाच्या घोषणा देताना दिसतात - "हु-डा, हु-डा, हु-डा."
लोक त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी रांगा लावत आहेत, काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले जेव्हा त्या त्यांना आलिंगन देतात. आणि त्यावेळी काटन यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य आवरत नाही.
महिलांना वस्तू मानणे
यावर्षी बीबीसी 100 विमेन यादीत कटान यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये जगभरातील 100 प्रेरणादायी आणि प्रभावशाली महिलांची नावं समाविष्ट आहेत.
हुडा कटान यांचा एक अब्ज डॉलरचा कॉस्मेटिक व्यवसाय आहे आणि 5 कोटी फॉलोअर्ससह इन्स्टाग्रामवरील सर्वात मोठा मेकअप ब्रँड आहे.
पण सौंदर्यप्रसाधनं उद्योग आणि सोशल मीडिया या दोन्हींवर त्या तीव्र टीका करतात.
त्या म्हणतात, "मला वाटतं सौंदर्यप्रसाधने उद्योग 'सेक्सिस्ट' आहे. तो महिलांना अनेकदा वस्तू म्हणून सादर करतो. खरंतर, तो स्त्रियांना केवळ त्यांच्या रंग-रुपापर्यंत मर्यादित करु पाहतो."
त्या म्हणतात की, ग्लॅमर पसंत करणारी एक महिला म्हणून हे तिला माहीत आहे की केवळ तिच्या लूकच्या आधारे तिच्या बाबत समज तयार करणं किती निराशाजनक आहे.
परंतु त्या कबूल करतात की लोकांबद्दल खूप लवकर समज तयार करणं हे सामूहिक अपयश आहे आणि त्यांना त्यावर काम करण्याची आवश्यकता आहे.
जेव्हा त्या पहिल्यांदा बिझनेसवुमन बनल्या तेव्हा त्यांना असं आढळलं की इंडस्ट्रीतील काही लोक त्यांना गांभीर्यानं घेत नाहीत.
त्या सांगतात की, " मला खूप संघर्ष करावा लागला. अनेकदा जेव्हा आम्ही मीटिंगमध्ये असतो तेव्हा लोक माझ्याशी थेट बोलण्याऐवजी माझ्या पतीशी बोलायचे आणि माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे."
त्यावेळी हुडा यांचे पती म्हणायचे, "माझ्याशी नाही तर तिच्याशी बोला".
त्या सांगतात की, लोक तरीही त्यांच्याशीच संभाषण सुरु ठेवायचे.
'मानसिकता कासवाच्या गतीने बदलत आहे'
सौंदर्यप्रसाधने उद्योगातील समावेशकता आणि प्रतिनिधित्व याबाबत संथ प्रगतीमुळे काटन या नाखूष आहेत.
इराकमधील निर्वासित परिवारातून आलेली मुलगी म्हणून टेनेसीमध्ये येऊन मोठ्या झाल्या. त्या म्हणतात की, तिला नेहमीच सांगितलं जायचं की ती आकर्षक नाही.
कटान सांगतात की, हे सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्या उत्पादनांना गडद रंगात सादर करावं आणि अशा फाउंडेशनची विक्री करावी जे त्वचेच्या वेगवेगळ्या रंगाशी जुळून येतील.
परंतु त्या कबूल करतात की संपूर्ण उद्योग कदाचित काही प्रमाणात योग्य दिशेनं वाटचाल करत आहे, पण त्याच वेळी त्या म्हणतात की, ही 'कासवाची गती' आहे.
"मी उत्पादन तयार करणाऱ्यांसोबत लॅब मध्ये गेले आणि मी त्यांना सांगितलं की, मला डार्क स्किनसाठी प्रॉडक्ट हवं आहे. आणि माझ्या लक्षात आलं की, त्यांनी त्यात तंतोतंत समान काळं रंगद्रव्य टाकलं, परंतु लोकांची त्वचा अनेक वेगवेगळ्या रंगांनी बनलेली असते."
"मला वाटतं अजूनही समजूतदारपणाचा अभाव आहे आणि ते खरोखरच उत्पादकांवर आणि काही ब्रँडवर देखील अवलंबून आहे."
'डोपामाइन हॅकिंग'
कटान यांच्या यशाचं एक मोठं कारण म्हणजे सोशल मीडियावरील त्यांची उपस्थिती, जिथे त्या मेक-अप ट्यूटोरियल आणि रिव्ह्यू शेअर करतात. याशिवाय दुबईतील त्यांच्या घरी कुटुंब आणि मित्रांसोबत घालवलेले क्षणही त्या शेअर करतात.
त्यांची व्यवस्थित जीवनशैली, ब्यूटी ब्लॉगर म्हणून त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांत झालेल्या स्वाभाविक प्रगतीचा परिणाम आहे.
सुरुवातीला त्यांना सोशल मीडियाची खूप आवड होती. त्या सांगातात की, "मला वाटलं की, ही सर्वोत्कृष्ट गोष्ट आहे. ती आपल्या विचारांना लोकशाहीवादी बनवतं. यामुळे प्रत्येकाला आवाज उठवण्याची संधी मिळते. हे असं स्थान मानलं जातं जिथे लोक एकमेकांशी जोडलेले राहतात."
त्या म्हणतात की, त्याऐवजी आता ते, "डोपामाइन हॅकिंग अल्गोरिदम बनलं आहे, जेणेकरून लोक त्यांचे डोळे सतत स्क्रीनवर चिकटवून ठेवतील."
आता त्या सोशल मीडियाबाबत खूप निराश झाल्या आहेत, "मी आता सोशल मीडियाशी सहमत आहे का? हे भविष्यासाठी चांगलं आहे का? नाही, मी असं मानत नाही. मला आता तसं वाटत नाही."
त्यांच्या मते, यातील सर्वात मोठी समस्या ही आहे की महिलांवर परिपूर्ण होण्यासाठी दबाव निर्माण केला जातो .
कटान सांगतात की, "मला वाटतं, की समाज नेहमीच महिलांबाबत कठोर होता, पण आता सोशल मीडियाच्या जमान्यात अपेक्षा खूप जास्त आहेत. जेव्हा मी सोशल मीडियावर जाते तेव्हा कधीकधी मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की मी कधीही पाहिजे तितकी सुंदर होऊ शकत नाही. मी कधीही लक्षणीय यश मिळवू शकत नाही."
त्या '100 टक्के' कबूल करतात की, त्या अर्थाने या समस्येचा एक भाग आहे. परंतु त्या म्हणतात की, त्या देखील याच्या बळी ठरल्या आहे.
"आपल्या लूकसाठी ओळखली जाणारी एखादी व्यक्ती ही आपल्या प्रतिमेमध्ये पूर्णपणे कैद होऊन जाते."
तुमची नखे नीटनेटकी असावीत, केसांचा आणि त्वचेचा रंग परफेक्ट असावा अशी लोकांची अपेक्षा असते, मात्र, खरं काही वेगळचं असतं, असं त्या सांगतात.
"मला बर्याच दिवसांपासून वाटलं की मी माझ्या इंस्टाग्राम हँडलचा कैदी आहे. मला जाणवलं की आता मी यातून बाहेर पडावं, मी हुडा ब्युटी आहे. कधीकधी मी स्वत:लाच हुडा अग्ली(करुप) वाटू लागते."
राजकीय विचार
सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियतेच्या कारणाने कटान जे काही सांगतात,त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात.
"माझा आवाज जसजसा पोहोचू लागला आणि तो प्लॅटफॉर्मपेक्षाही मोठा झाला, तसतसं मला गोष्टी सांगण्याची गरज वाटू लागली," असं त्या सांगतात.
"महिलांवर परिणाम करणाऱ्या गोष्टींनी मी प्रभावित झाले होते आणि तसंच आपल्या समुदायावर परिणाम करणाऱ्या गोष्टींनीही."
ही मुलाखत झाली तेव्हा 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर हल्ला केला आणि त्यानंतर गाझावर हल्ले सुरू होणार होते.
इस्रायलवरील हल्ल्यात 1200 लोक मारले गेले आणि 200 हून अधिक लोकांना ओलीस बनवलं गेलं.
हमास संचालित आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, तेव्हापासून गाझामध्ये 4,500 मुलांसह 14,000 हून अधिक लोक मारले गेले.
संघर्ष तीव्र होत असताना, काटन यांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर केला. त्यावर काही सकारात्मक टिप्पण्या आल्या, तर काहींनी टीकाही केली.
हुडा कटान यांनी जुलैमध्ये बीबीसी 100 विमेनला सांगितलं होतं की, "मी काही राजकीय गोष्टींबद्दल स्पष्टपणे बोलते, मी स्वतःला राजकीय तज्ज्ञ मानत नाही.
पण जेव्हा मी काहीतरी पाहतो आणि त्याबद्दल काहीतरी जाणून घेते तेव्हा मला ते पोस्ट करावंसं वाटतं."
इस्रायल-गाझामधील सध्याच्या परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीपासून, कटान या पश्चिम आशियातील समस्यांबद्दल जागरुकता वाढवत आहेत. कारण त्यांचा विश्वास आहे की या प्रदेशातील राजकीय समस्यांवर खूप चर्चा होत नाही.
त्या सांगतात की, "कधीकधी घडलेल्या या गोष्टी पाहिल्यावर मी खूप अस्वस्थ होते. कधीकधी मला वाटतं - माझ्याकडे योग्य माहिती आहे का? मी हे पोस्ट करू शकते का? पण मला नेहमी शक्य तितके पोस्ट करायचे असतात."
सोशल मीडिया: एक असुरक्षित जागा
जेव्हा लोक मॅसेज पाठवतात आणि त्यांना विचारतात - "तुमचं जीवन इतकं 'परफेक्ट' कसं आहे?" त्या प्रामाणिकपणे उत्तर देतात की तसं नाही आहे.
काटन म्हणतात की, "सोशल मीडिया अधिक सुरक्षित करणं आवश्यक आहे. जरी इंस्टाग्रामवर सुरक्षित वातावरण असलं तरी, आम्हाला ते सुरक्षित करावं लागेल."
त्या सांगतात की त्या अनेकदा सोशल मीडिया बंद करतात, त्या आपला स्क्रीन टाईम मर्यादित करतात आणि त्यांच्या 12 वर्षांच्या मुलीला त्यापासून दूर ठेवतात.
" कधी कधी ती न कळत सोशल मीडियावर जाते, पण ती कधी ऑनलाइन होती आणि कधी नाही हे मला तिची बैचनी पाहून लक्षात येतं." असं त्या सांगतात
त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग सोशल मीडियावर सार्वजनिकरित्या व्यतीत करूनही, त्या आपल्या काही गोष्टी खाजगी ठेवतात, जसं की त्यांच्या मुस्लिम धर्माबाबत
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)