'हे' ज्यू इस्रायलच्याच विरोधात का आहेत?

    • Author, आर्ची अतंद्रिला
    • Role, बीबीसी न्यूज बांगला

ज्यूंच स्वतःचं वेगळं राष्ट्र असावं या संकल्पनेतून इस्रायलचा जन्म झालेला.

ज्यूंचं अस्तित्व आणि अधिकारांच्या पार्श्‍वभूमीवर इस्त्रायलचा जन्म झाला असूनही, इस्रायलला पाठिंबा न देणारे अनेक ज्यू आहेत.

यामागे अनेक कारणं आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ज्यूंविरोधी प्रतिक्रिया म्हणून आणि पॅलेस्टिनी प्रदेशात ज्यू राज्य स्थापन करण्याच्या उद्देशाने ज्यूंचे राष्ट्रीय चळवळ 'झायोनिझम' चा उदय झाला.

‘ज्यूवाद आणि 'झायोनिझम' एकसारखे नाहीत. हिब्रू बायबलमध्ये ‘झियून’ हा शब्द ‘जेरुसलेम’ला सूचित करतो आणि 'झायोनिझम' हा प्रामुख्याने इस्रायलचा पुरस्कार करतो.

'झायोनिझम' विरुद्ध 'झायोनिझम विरोधी'

आजघडीला जो कुणी ज्यू राष्ट्र म्हणून इस्रायलची सुरक्षा, विकास आणि विस्तार करण्यावर विश्वास ठेवतो त्यांना 'झायोनिस्ट' किंवा ‘झायोनिस्टवादी’ असंही म्हणतात. इतर धर्मातील कोणत्याही व्यक्तीचा या विचारांवर विश्वास असेल तर त्यांनाही 'झायोनिस्ट' म्हटलं जातं.

दुसरीकडे, इस्रायली राज्याला विरोध करणाऱ्यांना 'झायोनिस्ट विरोधी' म्हटलं जातं. ही लोकं इस्रायलच्या हस्तक्षेपाला विरोध करतात आणि तिथल्या सरकारच्या धोरणांवर टीका करतात.

'झायोनिस्ट विरोधी' यांच्याकडे काहीवेळा ज्यू विरोधी म्हणूनही पाहिलं जातं. विशेषत: इस्रायलच्या राष्ट्रवादाचे आणि त्या देशाचे समर्थन करणा-यांना ते अशाच प्रकारे दाखवायचं असतं.

ज्यूविरोधी द्वेष पसरवण्याच्या प्रकरणांना ज्यूविरोधी भावना म्हणून ओळखलं जातं. ‘ज्यू विरोध’ हा थेट ज्यूंचा विरोध आहे आणि 'झायोनिस्ट विरोधी’ हा थेट इस्रायल राज्याचा विरोध आहे. ज्यू विरोधाच्या पार्श्वभूमीवर 'झायोनिझम' चळवळ सुरू झाली.

ज्यूंचा एक वर्ग इस्रायलच्या विरोधात का आहे?

अनेक लोकांना असं वाटतं की, इस्रायली सरकार आपल्या टीकाकारांना 'ज्यूविरोधी' किंवा ‘झायोनिस्ट विरोधी' म्हणून दाखवू इच्छितं. असं असलं तरी, राष्ट्राच्या कल्पनेला विरोध आणि ज्यू धर्माचा तिरस्कार या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

'झायोनिझम' या ज्यू राष्ट्राच्या संकल्पनेवर विश्वास ठेवणारे असेही ज्यू आहेत ज्यांना सरकारच्या हस्तक्षेपाचं धोरण आवडत नाही.

ज्यूंमध्ये इस्रायलला विरोध करणारीही अनेक लोकं आहेत. यामध्ये डाव्यांशिवाय कट्टर ज्यू विचारसरणीवर विश्वास ठेवणारी लोकंही आहेत.

उदाहरणार्थ, इस्रायल आणि गाझा यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर, 18 ऑक्टोबर रोजी हजारो ज्यूंनी पॅलेस्टिनींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ अमेरिकेतील कॅपिटल हिलसमोर निदर्शनं केली.

हातात पॅलेस्टिनी झेंडे घेऊन आलेल्या काही लोकांनी गाझामध्ये इस्रायल सामूहिक हत्या करत असल्याचा आरोप केला. अमेरिकन पोलिसांनी त्या दिवशी तिथल्या जवळपास तीनशे लोकांना अटक केलेली. त्या आंदोलनाचे नेतृत्व 'ज्यूईश व्हॉईस फॉर पीस' या 'झायोनिस्ट' संघटनेने केलेलं.

'झायोनिझम'ने ज्या प्रकारे पॅलेस्टाईनच्या लोकांचं नुकसान केलंय, ते त्याच्या विरोधात आहेत. संस्थेच्या संकेतस्थळावर असं नमूद करण्यात आलंय की, 'झायोनिझम' प्रत्यक्षात ज्यूंमध्ये द्वेष आणि वैमनस्य निर्माण करतो.

'झायोनिझम'चे विरोधक हिंसा, द्वेष आणि आक्रमकतेच्या विरोधात आहेत. इस्त्रायली सरकारने पॅलेस्टाईनच्या प्रदेशाचा घेतलेला ताबाही त्यांना मान्य नाही.

'झायोनिझम' या संकल्पनेमुळे अशी परिस्थिती निर्माण होते की, जे इस्रायलवर टीका करतात ते ‘ज्यू विरोधी' आहेत, असं मानलं जातं. मात्र, ज्यूंमध्ये इस्रायलला पाठिंबाच अधिक आहे.

डाव्यांखेरीज कट्टर ज्यू देखील इस्रायल राज्याच्या संकल्पनेशी सहमत नाहीत. विशेषत: ज्यू धर्मातील प्रथा-परंपरांचे काटेकोरपणे पालन करणार्‍या 'हरेदी गटाचा’ही यामध्ये समावेश होतो.

पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ निदर्शनं

कट्टर ज्यूंच्या एका वर्गाने काही प्रमाणात सामाजिक आधुनिकतेचा स्वीकार केला असला तरी, कट्टर ज्यू अजूनही त्यांच्या प्राचीन धर्माचं पालन करतात.

नेतुरेई कार्टा ही अशीच एक अति-कट्टरतावादी आणि झायोनिस्ट विरोधी संघटना आहे. 1938 साली स्थापन झालेली ही संघटना अमेरिकेत अतिशय मजबूत आहे. जर्मनी, ब्रिटन आणि इस्रायलमध्येही ते सक्रिय आहेत.

या संघटनेचे फेसबुक पेज पाहिल्यास ते दररोज इस्रायलच्या हल्ल्याविरोधात आणि पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ निषेध नोंदवत असल्याचं दिसून येतं.

त्यांच्या हातात पॅलेस्टाईनचे ध्वज आहेत आणि इस्त्रायलचे ध्वज असलेल्या फलकावर लाल शाईने फुली मारलेली आहे.

न्यूयॉर्कमधून 10 नोव्हेंबर रोजी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, त्यांचे एक रब्बी (ज्यू धर्मातील आध्यात्मिक नेता किंवा धार्मिक शिक्षक) भाषण देताना पाहायला मिळतात.

राजकीय स्वार्थ

डेव्हिड वाईज नावाचे इस्रायली रब्बी म्हणतात की, पॅलेस्टाईनमध्ये ज्यू आणि मुस्लिम शांततेत राहतात. मात्र ‘झायोनिझम’ यामध्ये एक अडथळा ठरू पाहतोय.

‘झाओनिस्ट’ आपल्या राजकीय स्वार्थासाठी ज्यूंच्या धर्माचा गैरवापर करत असून द्वेष पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

‘बीबीसी’सोबतच्या संभाषणात त्यांनी ज्यू धर्म किंवा ज्यूवादावर सखोल चर्चा केली.

ते म्हणाले, "आम्हाला दोन हजार वर्षांपूर्वी निर्वासित करण्यात आलं होतं. आमच्या निर्मात्याने राजा शलमोनच्या भविष्यवाणीद्वारे स्पष्ट सूचना दिल्या आहेत की ज्यूंचे राज्य किंवा सार्वभौमत्व पुनर्रस्थापित करणं आमच्यासाठी निषिद्ध आहे."

“त्या पवित्र भूमीवर (जेरुसलेम) आम्हाला मोठ्या संख्येने परत येण्यास मनाई आहे आणि आम्ही ज्या देशात राहतो त्या देशाचे निष्ठावान नागरिक म्हणूनच राहिलं पाहिजे."

निर्वासित ज्यू

रब्बी वाईज त्यांचा धर्मग्रंथ ‘तोराह’ (मुसलमानांमध्ये त्याला तौरात म्हणून ओळखलं जातं.) चा संदर्भ देत म्हणतात की ज्यूंना निर्वासित प्रदेशातून परत येण्यास मनाई आहे.

ज्यूंच्या ‘मसिहा’सोबतच त्यांचा देश आणि राजसत्ता परत येईल. हाच मसिहा त्यांची जमीन अतिक्रमणापासून मुक्त करेल आणि ईश्वरच्या त्याच्या निवासस्थानाची स्थापना करेल.

केंब्रिज शब्दकोशानुसार ‘मसिहा’ म्हणजे देवाने पाठवलेला ज्यू राजा.

दुसरीकडे, येशू ख्रिस्त हे ख्रिश्चनांसाठी ‘मसिहा’ आहेत, तर मुस्लिमांमध्ये ते पैगंबर नबी ईशा (आ) आहेत.

झायोनिस्ट विरोधी कट्टर ज्यूंचा असा युक्तिवाद आहे की मसिहाच्या आगमनापूर्वी त्यांना राष्ट्र स्थापन करण्याची गरज नाही. ज्यू धर्म कुणालाही इजा करणं किंवा रक्तपाताचं समर्थन करत नाही.

वाईजच्या यांच्यासोबतच्या चर्चेत सहअस्तित्वाचा उल्लेख वारंवार येतो.

केवळ 150 वर्षांपूर्वी आलेल्या झायोनिझममुळे लोकशाही प्रस्थापित झाल्याचं ते म्हणतात. ही एक राजकीय परिस्थिती असून त्याचा धर्माशी काहीएक संबंध नाही.

तरिही, बहुतेक ज्यू या तत्त्वाकडे अनुकूलपणे पाहत नाहीत. ज्यू सुद्धा झायोनिस्ट विरोधी असू शकतात याची अनेक लोकं कल्पनाही करू शकत नाहीत.

स्कॉटिश ज्यू समुदायाच्या प्रतिनिधी आणि गार्नेट होली सिनेगॉगच्या अध्यक्षा सुसान सेहगल यांनी ‘बीबीसी’ला सांगितलं की त्यांनी अद्याप झायोनिस्ट विरोधी ज्यू पाहिलेला नाही आणि साधारणपणे ज्यू इस्रायलवर विश्वास ठेवतात.

परंतु वाईज यांना असं वाटतं की अति-धार्मिक ज्यू सुधारित किंवा बदललेलं झायोनिझम आणि त्याचबरोबर विद्यमान ज्यू राज्याच्या संकल्पनेचं समर्थन करू शकत नाहीत.

हिब्रू भाषेचं आधुनिकीकरण

असे कट्टर ज्यू मुख्य प्रवाहापासून अलिप्त राहतात आणि बहुतांशवेळा फक्त धर्माचं पालन करण्यावर लक्ष केंद्रित करतात.

इस्रायलमधील अशा समाजाचे लोक तेथील संपूर्ण समाजव्यवस्थेपासून अलिप्त आहेत.

ते त्यांच्या धर्म-आधारित शिक्षण पद्धतीचं पालन करतात आणि आधुनिक जीवनातील कर्मकांड टाळतात.

रब्बी वाईज म्हणाले की, ती लोकं यहुदी धर्मातील सध्याचा बदल स्वीकारू शकत नाहीत.

यावेळी, ज्यूंच्या शिक्षण पद्धतीत आणि पेहरावात धर्माचा कोणताही मागमूस दिसत नाही आणि त्यांच्या हिब्रू भाषेचंही आधुनिकीकरण झालंय.

पॅलेस्टिनींबद्दल सहानुभूती व्यक्त करताना ते म्हणतात की इस्रायलमध्ये 1400 लोक मरण पावले हे देखील आक्रमकतेचे परिणाम आहेत.

युद्ध थांबवणं हाच शांतता प्रस्थापित करण्याचा एकमेव मार्ग आहे.

त्यांच्या भूमिकेला इतर लोकं झेनोफोबिक किंवा झायोनिस्ट विरोधी म्हणतात.

याउलट, वॉईज यांना असं वाटत की झायोनिझम आणि ज्यू धर्म परस्परविरोधी आहेत आणि खरंतर झायोनिझम हाच ज्यूंविरोधी आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)