इस्रायलच्या मोसादनं 'मिग-21' हे सोव्हिएतचं फायटर विमान कसं पळवलं?

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

25 मार्च 1963 मध्ये मेर आमेत इस्रायली गुप्तचर संस्था मोसादचे प्रमुख बनले. त्यानंतर त्यांनी अनेक इस्रायली संरक्षण अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना विचारलं की, इस्रायलच्या संरक्षणासाठी मोसादचं सर्वात मोठं योगदान काय असू शकेल?

यावर सगळ्यांचं म्हणणं होतं की, जर आपल्याला सोव्हिएत मिग -21 इस्रायलमध्ये आणता आलं तर बरं होईल. पण खरी गोष्ट तेव्हा सुरू झाली जेव्हा एझर वाइझमन इस्रायली हवाई दलाचे प्रमुख बनले.

ते दर दोन-तीन आठवड्यांनी मेर आमेत यांच्यासोबत नाश्ता करायचे. अशाच एका भेटीदरम्यान मेर यांनी त्यांना विचारलं की, मी तुमच्यासाठी काय करू शकतो, यावर एकही सेकंद वाया न घालवता वाइझमन म्हणाले, "मला मिग-21 हवं आहे."

मेर आमेत त्यांच्या 'हेड टू हेड' या पुस्तकात लिहितात, "मी वाइझमनला म्हणालो, तुम्हाला वेड लागलंय का? संपूर्ण पाश्चात्य जगात एकही मिग विमान नाही, पण वाइझमन आपल्या शब्दावर ठाम राहिले. ते म्हणाले की, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मिग-21 आवश्यक आहे. ते मिळवण्यासाठी तुम्ही तुमची सर्व शक्ती पणाला लावली पाहिजे."

आमेत लिहितात, "मी याची जबाबदारी राहविया वर्डी यांना दिली, त्यांनी त्यापूर्वी इजिप्त आणि सीरियातून हे विमान आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता."

"आम्ही या योजनेवर बरेच महिने काम करत होतो. ही योजना कशी पार पाडायची ही आमची सर्वात मोठी समस्या होती."

मिग-21 च्या सुरक्षेची जबाबदारी

सोव्हिएत युनियनने 1961 मध्ये अरब देशांना मिग-21 चा पुरवठा सुरू केला होता.

डोरोन गेलर त्यांच्या 'स्टीलिंग अ सोव्हिएत मिग ऑपरेशन डायमंड' या लेखात लिहितात, "1963 पर्यंत मिग-21 विमानं इजिप्त, सीरिया आणि इराकच्या हवाई दलाचा महत्त्वाचा भाग बनले होते. रशियन या विमानासाठी सर्वोच्च पातळीची गुप्तता पाळत होते."

"अरब देशांना विमानं देताना त्यांनी सर्वात मोठी अट घातली होती ती म्हणजे ही विमानं त्यांच्याच भूमीवर राहतील. मात्र विमानांच्या सुरक्षा, प्रशिक्षण आणि देखभालीची जबाबदारी सोव्हिएत अधिकाऱ्यांवर असेल."

मिग-21 च्या क्षमतेची पश्चिमेकडील देशांमध्ये कोणालाही कल्पना नव्हती.

गेलर लिहितात, "वर्डी यांनी अरब देशांमध्ये धागेदोरे शोधायला सुरुवात केली. काही आठवड्यांनंतर, त्यांना इराणमधील इस्रायली लष्करी अताशे याकोव्ह निमरादी यांच्याकडून एक अहवाल मिळाला. त्यांनी सांगितलं की ते योसेफ शिमिश या इराकी ज्यूला ओळखतात. हा एका इराकी पायलटला ओळखत असून तो मिग-21 विमान इस्रायलला आणू शकतो."

शिमिश अविवाहित होता आणि त्याला आनंदी जीवन जगण्याची सवय होती. त्याच्याकडे लोकांशी मैत्री करण्याची आणि त्यांचा विश्वास जिंकण्याची अद्भुत क्षमता होती.

शिमिशची बगदादमध्ये एक ख्रिश्चन मैत्रीण होती, तिची बहीण कमिलाने कॅप्टन मुनीर रेदफा या ख्रिश्चन इराकी हवाई दलाच्या वैमानिकाशी लग्न केलं होतं.

शिमिशला माहित होतं की, मुनीर असमाधानी आहे, कारण एक उत्कृष्ट वैमानिक असूनही त्याला बढती मिळत नव्हती. त्याला त्याच्याच देशातील कुर्द गावांवर बॉम्बस्फोट करण्यास सांगण्यात आलं होतं.

जेव्हा त्याने आपल्या अधिकार्‍यांकडे याबद्दल तक्रार केली तेव्हा त्याला सांगण्यात आलं की तो ख्रिश्चन असल्यामुळे त्याला बढती मिळू शकत नाही आणि तो कधीही स्क्वाड्रन लीडर बनू शकत नाही.

रेदफा खूप महत्वाकांक्षी होता. आता इराकमध्ये राहण्यात काही अर्थ नाही असं त्याला वाटू लागलं होतं. तरुण वैमानिक रेदफाशी बोलल्यानंतर सुमारे एक वर्षाने तो अथेन्सला जाण्यासाठी राजी झाला.

शिमिशने इराकी अधिकाऱ्यांना सांगितलं की, रेदफाच्या पत्नीला गंभीर आजार आहे आणि तिला पाश्चात्य डॉक्टरांकडे नेऊनच वाचवता येईल. त्यांना तातडीने ग्रीसला न्यायला हवं.

तिच्या पतीलाही तिच्यासोबत तिथे जाण्याची परवानगी द्यावी, कारण कुटुंबातील तो एकमेव व्यक्ती आहे जो इंग्रजी बोलू शकतो.

इराकी अधिकाऱ्यांनी त्याची विनंती मान्य केली आणि मुनीर रेदफाला त्याच्या पत्नीसह अथेन्सला जाण्याची परवानगी देण्यात आली.

दहा लाख डॉलर्सची ऑफर

मोसादने अथेन्समध्ये इस्रायली हवाई दलाचा दुसरा वैमानिक कर्नल झीव लिरॉनला रेदफाला भेटायला पाठवले.

मोसादने रेदफाला एक सांकेतिक नाव दिलं होतं, 'याहोलोम' म्हणजे हिरा. या संपूर्ण मोहिमेला 'ऑपरेशन डायमंड' असं नाव देण्यात आलं.

एके दिवशी लिरॉनने रेदफाला विचारलं, "तुम्ही तुमच्या विमानाने इराकमधून उड्डाण केल्यास जास्तीत जास्त काय होईल?"

रेदफाचं उत्तर होतं, "ते मला मारतील. कोणताही देश मला आश्रय द्यायला तयार होणार नाही."

यावर लिरॉन म्हणाला, "एक देश आहे जो तुमचे स्वागत खुल्या मनाने करेल. त्याचं नाव इस्रायल आहे."

एक दिवस विचार केल्यानंतर, रेदफाने मिग-21 विमानासह इराकमधून बाहेर पडण्याचं मान्य केलं.

नंतर लिरॉनने एका मुलाखतीत रेदफाशी झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला.

अरबी गाणं बनलं कोडवर्ड

ग्रीसहून दोघेही रोमला गेले. शिमिश आणि त्याची मैत्रीणही तिथे पोहोचली. काही दिवसांनी इस्रायली हवाई दलाच्या गुप्तचर विभागाचे अधिकारी येहुदा पोरटही तेथे पोहोचले.

इस्त्रायली इंटेलिजन्स आणि रेदफा यांच्यात संवाद कसा प्रस्थापित करायचा हे रोममध्येच ठरलं होतं.

मायकेल बार जोहर आणि निसिम मिसहल त्यांच्या 'द ग्रेटेस्ट मिशन ऑफ द इस्त्रायली सिक्रेट सर्व्हिस मोसाद' या पुस्तकात लिहितात, "असं ठरलं की, जेव्हा इस्रायलच्या रेडिओ स्टेशन कोलवरून प्रसिद्ध अरबी गाणं 'मरहबतें मरहबतें' लावलं जाईल तेव्हा रेदफाने इराक सोडावं. पण रोममधील मोसादचे प्रमुख मेर आमेत स्वतः त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत याची त्यांना कल्पना नव्हती."

रेदफाला ब्रीफिंगसाठी इस्रायलला बोलावण्यात आलं. इथे तो फक्त 24 तास राहिला. यावेळी त्याला संपूर्ण योजना सविस्तर समजावून सांगण्यात आली. मोसादने त्याला एक गुप्त कोड दिला.

इस्रायली हेर त्यांना तेल अवीवच्या मुख्य रस्त्यावर एलनबी स्ट्रीटवर घेऊन गेले. संध्याकाळी त्यांना तफा येथील एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवण देण्यात आलं.

तेथून रेदफा अथेन्सला गेला आणि नंतर जहाज बदलून बगदादला गेला आणि योजनेच्या अंतिम टप्प्याची तयारी सुरू केली.

आता पुढची अडचण अशी होती वैमानिकाच्या कुटुंबाला इराकमधून इंग्लंडला आणि नंतर अमेरिकेत कसं पाठवायचं ही.

रेदफाच्या अनेक बहिणी आणि त्यांचे नवरे इरा मध्येच होते. रेदफाने उड्डाण करण्यापूर्वी त्यांना इराकमधून बाहेर काढणं आवश्यक होतं. केवळ रेदफा कुटुंबालाच इस्रायलला नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

मायकेल बार जोहर आणि निसिम मिसहल लिहितात, "रेदफाची पत्नी कमिलाला या योजनेची कल्पना नव्हती आणि रेदफा तिला सत्य सांगण्यास घाबरत होता."

तो लिहितो, "रेदफाने तिला इतकंच सांगितलं होतं की तो बऱ्याच काळासाठी युरोपला जात आहे. त्यामुळे ती आपल्या दोन मुलांसह अॅमस्टरडॅमला गेली."

"तिथे असणारे मोसादचे लोक तिला पॅरिसला घेऊन गेले. पुढे तिची भेट झीव लिरॉनशी घालून देण्यात आली. रेदफाच्या पत्नीला अजूनही हे लोक कोण आहेत याची कल्पना नव्हती."

रेदफाच्या बायकोने रडायला सुरुवात केली

लिरॉन सांगतात, "या लोकांची राहण्याची सोय एका लहानशा अपार्टमेंटमध्ये केली होती. तिथे फक्त एक डबल बेड होता. आम्ही त्या बेडवर बसलो."

"इस्रायलला जाण्याच्या आदल्या रात्री मी कमिलाला सांगितलं की मी एक इस्रायली अधिकारी आहे आणि तिचा नवराही दुसऱ्या दिवशी तिथे येणार आहे."

"यावर तिची प्रतिक्रिया खूप नाट्यमय होती. ती रात्रभर रडत होती. ती म्हणाली की तिचा नवरा देशद्रोही आहे. त्याने काय केलंय हे जेव्हा त्याच्या भावांना समजेल तेव्हा ते त्याला ठार मारतील."

लिरॉन लिहितात, "तिला आता समजलं होतं की त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाहीते. सुजलेल्या डोळ्यांनी आणि आजारी मुलासह आम्ही विमानात बसून इस्रायलला आलो."

17 जुलै 1966 रोजी युरोपमधील मोसाद स्टेशनला मुनीरचे कोडेड पत्र मिळाले ज्यात असं म्हटलं होतं की त्याने इराकमधून उड्डाण करण्याची पूर्ण तयारी केली आहे.

14 ऑगस्ट रोजी मुनीर रेदफाने मिग-21 विमानासह उड्डाण केलं. पण विमानाच्या इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे त्याला विमान परत घेऊन रशीद एअर बेसवर उतरावं लागलं.

नंतर विमानातील बिघाड गंभीर नसल्याचं मुनीरला समजलं. वास्तविक, जळालेल्या फ्यूजमुळे त्याचा कॉकपिट धुराने भरला होता, पण मुनीरला कोणताही धोका पत्करायचा नव्हता म्हणून त्याने रशीद एअरबेसवर विमान उतरवलं होतं.

दोन दिवसांनी मुनीरने त्याच मिग-21 मध्ये पुन्हा उड्डाण केलं. आधीच ठरलेल्या मार्गावरून त्याने उड्डाण सुरू ठेवलं.

मायकेल बार जोहर आणि निसिम मिशाल लिहितात, "प्रथम मुनीर बगदादकडे निघाला आणि नंतर त्याने विमान इस्रायलच्या दिशेने वळवले. इराकी नियंत्रण कक्षाने याची दखल घेतली आणि मुनीरला परत येण्यासाठीचे संदेश पाठवले."

"जेव्हा याचा मुनीरवर काहीही परिणाम झाला नाही, तेव्हा त्यांनी त्याचे विमान खाली पाडण्याची धमकी दिली. त्यानंतर मुनीरने त्याचा रेडिओ बंद केला."

इराकी पायलट ने इस्रायलच्या सीमेत प्रवेश करताच त्याला इस्रायली हवाई तळावर नेण्याचं काम दोन इस्रायली पायलटना देण्यात आलं होतं.

हे विमान इस्रायलनं ताब्यात घेतलं

इस्रायलच्या सर्वोत्तम पायलटपैकी एक मानल्या जाणाऱ्या रॅन पॅकर यांना रेदफा याला सुरक्षित उतरवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

रॅन यानं एअर फोर्स कंट्रोलला संदेश पाठवला, "आपल्या पाहुण्यानं वेग कमी केला आहे आणि तो अंगठा वर करत मला संकेत देतोय की तो खाली उतरू इच्छित आहे. त्यानं त्याचे विंग्सदेखील हलवले आहेत, जो एक आंतरराष्ट्रीय कोड आहे की त्याचा हेतू चांगला आहे."

बगदादहून टेक ऑफ केल्यानंतर 65 मिनिटांनी रेदफा यांचं विमान 8 वाजता इस्रायलच्या हॅझोर एअरबेसवर उतरलं.

'ऑपरेशन डायमंड' सुरू झाल्याच्या एका वर्षाच्या आत आणि 1967 चं सहा दिवसांचं युद्ध सुरु होण्याच्या सहा महिने आधीच इस्रायली हवाई दलाकडे त्या काळातील जगातील सर्वात आधुनिक विमान मिग-21 होतं.

मोसाद च्या टीमने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली होती. लँडिंगनंतर, अस्वस्थ आणि स्तब्ध झालेल्या मुनीरला हॅजोर बेस कमांडरच्या घरी नेण्यात आलं.

त्यावेळी तो कोणत्या परिस्थितीतून जात होता ते न लक्षात घेताच तिथं अनेक वरिष्ठ इस्रायली अधिकार्‍यांनी त्याला पार्टी दिली, पण त्या पार्टीमध्ये मुनीर एका कोपऱ्यात बसून राहिला आणि एक शब्दही बोलला नाही.

मुनीर रेदफा यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं

थोडी विश्रांती आणि निश्चित्त झाल्यावर पत्नी आणि मुलं विमानात बसून इस्रायलला निघाले.

मुनीर रेदफा यांना पत्रकार परिषदेत संबोधित करण्यासाठी नेण्यात आलं. तिथं त्यांनी इराकमध्ये ख्रिश्चनांवर कसा अत्याचार केला जातो आणि त्यांचेच लोक कुर्दांवर बॉम्ब कसे टाकत आहेत हे सांगितलं.

पत्रकार परिषदेनंतर मुनीरला तेल अवीवच्या उत्तरेकडील समुद्रकिनारी असलेल्या हर्झिलिया येथे त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी नेण्यात आलं.

मेर आमेत यांनी नंतर लिहिलं की मी त्याला शांत करण्याचा, त्याला प्रोत्साहन देण्याचा आणि त्यानं केलेल्या कृत्याबद्दल त्याची प्रशंसा करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला.

मी त्याला आश्वासन दिलं की त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी जे काही शक्य आहे ते आम्ही करू, पण मुनीरचे कुटुंब विशेषत: त्याची पत्नी सहकार्य करण्यास तयार नव्हती.

मुनीर मिग-21 घेऊन उतरल्यानंतर काही दिवसांनी त्याच्या पत्नीचा भाऊ, जो इराकी हवाई दलात अधिकारी होता, इस्रायलला पोहोचला.

त्याच्यासोबत शेमेश आणि त्याची मैत्रीण केमिली ही आली होती. त्याला सांगण्यात आलं की त्यांना युरोपला नेलं जात आहे जिथं त्याची बहीण खूप आजारी होती.

पण जेव्हा त्याला इस्रायलमध्ये त्याचा मेव्हणा मुनीर याला भेटायला लावलं तेव्हा त्याचा संयम सुटला.

त्याला देशद्रोही म्हणत त्याच्यावर धावत जात जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या कटात आपल्या बहिणीचा हात असल्याचा आरोपही त्यानं केला.

आपल्या बहिणीलाही याची जाणीव नव्हती यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याच्या बहिणीनं खूप खुलासा केला पण त्याचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही.

काही दिवसांनी तो परत इराकला गेला.

इस्रायली पायलटने मिग-21 उडवलं

ते मिग-21 ला सर्वप्रथम इस्रायलचे प्रसिद्ध हवाई दल पायलट डॅनी शपीरा यांनी उडवलं होतं.

विमान उतरवल्यावर हवाई दलाच्या प्रमुखांनी त्यांना फोन केला आणि मिग-21 उडवणारा तो पहिला पाश्चात्य पायलट असेल असं सांगितलं. तुम्हाला या विमानाचा बारकाईनं अभ्यास करावा लागेल आणि त्याचे फायदे आणि तोटे शोधावे लागतील.

डॅनी शपीरा यांनी त्याची नंतर आठवण सांगितली, "आम्ही हतझोरमध्ये भेटलो जेथे मिग-21 विमान उभं होतं. रेदफा यांनी मला सर्व बटणांची माहिती दिली. आम्ही विमानाविषयीच्या सर्व सूचना वाचल्या, ज्या अरबी आणि रशियन भाषेत लिहिलेल्या होत्या."

शपीरा पुढे सांगतात की "एक तासानंतर मी त्यांना सांगितलं की मी विमान उडवणार आहे. ते आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, तुम्ही फ्लाइंग कोर्स पूर्ण केला नाही.

मी त्यांना सांगितलं की मी एक टेस्ट पायलट आहे. ते म्हणाला,मी तुमच्या सोबत राहिन. मी म्हटलं ठीक आहे."

मिग-21 हे मिराज-3 पेक्षा एक टन हलकं होतं

मायकलबार झोहर आणि निसिम मिसहाल लिहितात, "इस्रायली हवाई दलाचे सर्व वरिष्ठ अधिकारी मिग-21 चे पहिलं उड्डाण पाहण्यासाठी हतझोर इथं पोहोचलं."

"माजी वायुसेनेचे प्रमुख एझेर वायझमन हेही तिथं उपस्थित होते. त्यांनी शपीराला खांद्यावर थाप देत म्हटलं कोणतीही स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करु नका आणि विमान सुरक्षितपणे उतरवा असं सांगितलं. रेदफा ही तिथं उपस्थित होता."

उड्डाणानंतर शपीराने लँड करताच मुनीर रेदफा त्यांच्याकडे धावत आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते.

तुमच्यासारख्या पायलटच्या बळावर अरब तुम्हाला कधीही पराभूत करू शकणार नाही, असं ते म्हणाले. काही दिवसांच्या उड्डाणानंतर, हवाई दलाच्या तज्ज्ञांना समजलं की मिग-21 विमानाला पश्चिमेत इतक्या आदरानं का पाहिलं जातं.

हे उंचावर खूप वेगानं उड्डाण करू शकतं आणि मिराज-3 युद्ध विमानापेक्षा एक टन कमी वजनाचं आहे.

युद्धात इस्रायलला फायदा

अमेरिकन लोकांनी विमानाचा अभ्यास आणि उड्डाण करण्यासाठी तज्ज्ञांची एक टीम इस्रायलला पाठवली, पण इस्रायलने त्यांना या विमानाजवळ जाऊ दिलं नाही.

अमेरिकेने प्रथम सोव्हिएत विमानभेदी क्षेपणास्त्र सॅम-2 चं तंत्रज्ञान त्याच्यासोबत शेअर करावं, अशी त्यांची अट होती. नंतर अमेरिकेनं हे मान्य केलं.

अमेरिकन पायलट इस्रायलला पोहोचले. त्यांनी मिग-21 चं निरीक्षण केलं आणि उड्डाणही केलं.

मिग-21 चं रहस्य जाणून घेतल्यानं इस्रायली हवाई दलाला खूप फायदा झाला. त्यांना अरब देशांसोबतच्या सहा दिवसांच्या युद्धाची तयारी करण्यास याची मदत झाली.

त्या मिग-21 च्या रहस्यानं इस्रायलच्या विजयात मोठी भूमिका बजावली आणि काही तासांतच इस्रायलनं संपूर्ण अरब हवाई दल उद्ध्वस्त केलं होतं.

रेदफा यांनी इस्रायल सोडलं

मुनीर रेदफा आणि त्यांच्या कुटुंबाला याची मोठी किंमत मोजावी लागली.

मायकलबार झोहर आणि निसिम मिसहाल लिहितात, "मुनीरला इस्रायलमध्ये कठोर, एकाकी आणि दुःखी जीवन जगावं लागलं. आपल्या देशाबाहेर नवीन जीवन जगणं त्याच्यासाठी अशक्य काम बनलं. मुनीर आणि त्याचं कुटुंब नैराश्यात गेलं आणि शेवटी त्याचं कुटुंब त्यांच्यापासून वेगळं झालं."

ते लिहितात, "तीन वर्षे मुनीरने इस्रायलला आपलं घर बनवण्याचा प्रयत्न केला आणि इस्त्रायली तेल कंपन्यांची डकोटा विमानंही उडवली, पण पण तिथं त्यांचं मन रमलं नाही."

इस्रायलमध्ये त्यांना इराणी निर्वासित अशी ओळख देण्यात आली होती, पण ते इस्रायलमधील जीवनाशी जुळवून घेऊ शकले नाहीत. काही दिवसांनंतर, त्यांनी इस्रायल सोडला आणि बनावट ओळखीसह पाश्चात्य देशात स्थायिक झाले.

तिथंही सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या गराड्यात असूनही ते त्यांना एकटं वाटू लागलं. एक दिवस इराकचा कुप्रसिद्ध 'मुखबरात'( गुप्तचर विभाग) आपल्याला आपले लक्ष्य बनवेल, अशी भीती त्यांना नेहमी वाटत राहिली.

इस्त्रायलींनी मुनीरसाठी अश्रू ढाळले

मिग-21 विमान उडवून इस्रायलला गेल्याच्या 22 वर्षांनी, ऑगस्ट 1988 मध्ये मुनीर रेदफा यांचं त्यांच्या घरी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.

मोसादने मुनीर रेदफा यांच्या स्मरणार्थ मेमोरियल सर्विसचं आयोजन केलं होतं. हे एक अविस्मरणीय दृश्य होतं.

इराकी पायलटच्या मृत्यूबद्दल इस्रायलची गुप्तचर संस्था शोक व्यक्त करत होती.

नंतर रेदफा यांच्या जीवनावर 'स्टील द स्काय' आणि 'गेट मी मिग-21' असे दोन बहुचर्चित चित्रपट बनवले गेले.

रेदफा यांनी आणलेलं मिग-21 हे इस्रायलमधील हातेझरिन एअर फोर्स म्युझियममध्ये नेण्यात आलं होतं, तिथं ते अजूनही ठेवलेलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)