You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोसादच्या हेराला आलेला फोन, ‘केमिकल’ हा एकच शब्द आणि इस्रायलवरचा हल्ला
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
5 ऑक्टोबर 1973 च्या रात्री एक वाजता मोसादच्या लंडनमधील दुबी नामक गुप्तहेराला पॅरिसहून फोन आला.
फोनवरील आवाज ऐकून दुबीला जबर धक्का बसला. कारण फोन करणारा मोसादचा सर्वात मोठा गुप्तहेर होता. या गुप्तहेराबद्दल फार कमी जणांना माहिती होती. या गुप्तहेराचं कोडनेम होतं – ‘एंजल’
एंजलनं फोनवर काही शब्द उच्चारले. त्यातल्या एका शब्दांनं दुबीचा अक्षरश: थरकाप उडाला. तो शब्द होता – ‘केमिकल’
‘केमिकल’ शब्दाचा मोसादच्या गुप्तहेरांच्या शब्दकोशातील अर्थ होता - ‘इस्रायलवर लवकरच हल्ला होणार आहे’.
या फोनच्या काही दिवस आधीच जॉर्डनचा राजा हुसैन यांनी इस्रायलचा एक गुप्त दौरा करून, तत्कालीन पंतप्रधान गोल्डा मेयर यांना इशारा दिला होता की, इजिप्त आणि सीरिया लवकरच हल्ल्याचा कट रचत आहेत.
युद्धाचे ढग
इस्रायलची गुप्तचर यंत्रण असलेल्या मोसादनंही या घटनांच्या आठवड्याभरापूर्वीच इजिप्तच्या कॅम्पमधील हालचाली टिपल्या होत्या.
4 ऑक्टोबरला सोव्हिएत युनियनने आपले सर्व लष्करी सल्लागार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना इजिप्तमधून बाहेर काढण्यास सुरुवात केली. तरीही इस्त्रायली नेतृत्त्व हे मानण्यासच तयार नव्हतं की, आपल्यावर हल्ला होणार आहे.
‘द एंजल – द इजिप्शियन स्पाय हू सेव्ह्ड इस्रायल’ या पुस्तकाचे लेखक युरी बार जोजेफ सांगतात, “अशरफ मारवान असं गुप्तहेराचनं नावं होतं. तो केमेस्ट्रीचा विद्यार्थी होता. त्यामुळे युद्धाची माहिती देण्यासाठी कोडवर्ड ‘केमिकल’ असं ठरवण्यात आलं होतं. 4 ऑक्टोबरला जेव्हा त्यानं त्याच्या हँडलरला म्हणजे दुबीला फोन केला, तेव्हा त्यानं ‘केमिकल’ शब्दाचा उच्चार केलाच, त्याचसोबत याचीही मागणी केली की, लंडनमध्ये मोसादच्या प्रमुखाशी माझी बैठक निश्चित करावी. ही बातमी दोन तासांनंतर इस्रायलला पोहोचली.”
युद्धाची वेळ बदलली आणि...
“मोसादचे तत्कालीन प्रमुख मेजर जनरल जमीर यांनी लंडनला जाण्यासाठी सकाळचं विमान पकडलं. रात्री 11 वाजता त्यांच्या सेफ हाऊसची बेल वाजली. त्यांच्यासमोर अशरफ मारवान उभा होता. तो त्याच्यासोबत कुठलेच कागद घेऊन आला नव्हता. मात्र, इजिप्तच्या युद्ध रणनितीचा प्रत्येक गोष्ट त्याला तोंडपाठ होती. ही बैठक दोन तास चालली. पहाटे तीन वाजता जमीर यांनी तेलअवीवला फोन केला.”
“साडेचार वाजेपर्यंत इस्रायलच्या तत्कालीन पंतप्रधान गोल्डा मेयर यांच्यासह इस्रायलचं संपूर्ण मंत्रिमंडळ जागं झालं होतं. सकाळी 9 वाजेपर्यंत हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आणि 10 वाजेपर्यंत योम किप्पूरच्या सुट्टीवर गेलेल्या इस्रायली सैनिकांच्या घरातले फोन वाजू लागले. त्यांना सांगण्यात आलं की, सुट्टी अर्ध्यात सोडून तातडीनं आपापल्या जागी परत या.”
पहिल्या टप्प्यात इजिप्ताच्या 32 हजार सैनिकांनी 720 बोटींमधून सुएझ कालवा पार केला आणि कोणताही अडथळ्याशिवाय इस्रायलच्या हद्दीत पोहोचले.
एवढी माहिती देऊनही मारवान हल्ल्याची नेमकी वेळ का देऊ शकला नाही, असे मी जोजेफ यांना विचारलं. कारण मारवान यांनी संध्याकाळी 6 वाजता हल्ला सुरू होईल असं सांगितलं होतं. प्रत्यक्षात हल्ला दुपारी दोन वाजताचा सुरू झाला.
त्यावर जोजेफ यांचं उत्तर होतं की, “तो अचूक वेळ सांगू शकला नाही, कारण मंगळवारीच त्यानं इजिप्त सोडलं होतं आणि इजिप्तचे युद्ध मंत्री सीरियाच्या राष्ट्रपतींना भेटण्यासाठी दामास्कसला गेले, तेव्हा म्हणजे बुधवारी हल्ल्याचा दिवस बदलण्यात आला. सीरियन सकाळी सहा वाजता युद्ध सुरू करू इच्छित होते, तर इजिप्त संध्याकाळी युद्ध सुरू करू इच्छित होते. मग मधला मार्ग काढण्यात आला की, दुपारी दोन वाजता युद्ध सुरू करावं. त्यामुळे मारवानला या गोष्टीची माहिती मिळाली नाही.”
मोसादनं युद्धाची चुकीची माहिती दिली होती?
इजिप्तचे सर्वोच्च सुरक्षा तज्ज्ञ अब्दुल मोनेम सईद म्हणतात की, मारवानने जाणूनबुजून इस्रायलींना चुकीची माहिती दिली.
“मारवान इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची सुरक्षा यंत्रणा या दोघांसाठी काम करत होता. अशी माहिती देऊन तो इस्रायलींची दिशाभूल करील, असे पूर्वनियोजित होते,” असं सईद म्हणतात.
जेव्हा सईद यांना सांगितलं की, इस्त्रायली तर म्हणतायेत की मारवानने त्यांना अशी माहिती दिली, जी त्यांना यापूर्वी कोणाकडूनही मिळाली नव्हती. यावर सईद म्हणाले की, “जगातील सर्वोत्तम गुप्तचर संस्था अशा बातम्या देऊन विश्वास निर्माण करतात. तुम्ही त्यांना सर्वोत्तम माहिती देता, तेव्हाच तुमचा उद्देश पूर्ण होतो.”
सईद जे काही म्हणत असतील, मात्र मोसादच्या 1968 ते 1974 पर्यंतचे युरोप ऑपरेशन्सचे प्रमुक शुमेल गोरेन म्हणतात की, या प्रकारच्या स्रोतांकडून या पद्धतीची माहिती एक हजार वर्षांतून एकदाच मिळते.
मारवानने पहिल्यांदा 1970 साली लंडनमध्ये मोसादशी संपर्क साधला आणि त्यांच्यासाठी हेरगिरी करण्याची इच्छा व्यक्त केली. जोसेफ सांगतात की, “आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की, मारवान हा काही इजिप्तचा एखादा सर्वसामान्य नागरिक नव्हता, तर तो इजिप्तचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष नासेर यांचा जावई होता. नेहरूंना भारतात जो मान होता, तसाच मान नासेर यांना इजिप्तमध्ये होता. लंडनच्या प्रत्येक कोपऱ्यातील लाल टेलिफोन बूथवरून इस्रायली दूतावासाला फोन केला होता. त्याने स्वत:चा दूरध्वनी क्रमांक देखील दिला नव्हता, त्यानं एवढंच सांगितलं की, मी पुन्हा फोन करेन.”
लंडनमधील 'ती' मिटिंग
“जेव्हा दूतावासातील अधिकाऱ्यांनी मोसादच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, एक व्यक्ती सारखं फोन करून मोसादसाठी हेरगिरी करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. तेव्हा त्या व्यक्तीचं नाव विचारलं गेलं. जेव्हा त्यांनी त्याचं नाव ‘अशरफ मारवान’ असं सांगितलं, तेव्हा त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. कारण हे नाव त्यांना चांगलंच ठाऊक होतं.”
“मोसाद आणि मारवानची पहिली भेट सेंट्रल लंडनमधील एका हॉटेलमध्ये झाली. हातात ब्रीफकेस घेऊन ठरलेल्या वेळी मारवान हॉटेलच्या लॉबीमध्ये दाखल झाला. त्याचा हँडलर दुबी पुढे येऊन मरावानला हस्तांदोलन केलं आणि अरबीमध्ये म्हणाला, ‘तुम्हाला भेटून खूप आनंद झाला, मारवानसाहेब’. त्याचं अरबी भाषेतलं बोलणं ऐकून मारवानला समजलं की, इजिप्तच्या गुप्तचर यंत्रणेनं त्याच्यासाठी सापळा रचला आहे.”
“त्याने लगेच इंग्रजीत विचारलं, ‘तुम्ही इस्रायली आहात का?’ दुबीनेही इंग्रजीत उत्तर दिलं, ‘होय, मी इस्रायली आहे’. मारवानने त्याच्या ब्रीफकेसमधून अरबी कागदपत्रे काढली आणि मोठ्याने वाचू लागला. दुबीला लष्करी कागदपत्रांची कल्पना होती. मारवान त्याला इजिप्शियन सैन्याच्या युद्धाचा सर्वोच्च गुप्त आदेश वाचून दाखवत होता.”
गंमत म्हणजे इस्त्रायली हेरांना भेटताना मारवान फारसा सावध नव्हता. जोजेफ सांगतात, “अशा प्रकारच्या वागणुकीचे कोणत्याही प्रकारे स्पष्टीकरण देता येणार नाही. पण मारवानला स्वतःवर खूप विश्वास होता. एकदा तर त्यानं हद्दच पार केली. तो इजिप्शियन दूतावासाच्या कारमध्ये दुबीला भेटायला आला, जी दूतावासातीलच एक ड्रायव्हर चालवत होता.”
मारवानच्या पत्नीसाठी मोसादनं दिली अंगठी
“दुसऱ्या एका प्रसंगी दुबी आणि मोसादचा आणकी एक अधिकारी मेयर यांनी मारवानला लंडनच्या मेफेअरमधील त्याच्या घरी भेटले. संपूर्ण वेळ ते लिव्हिंग रूममध्ये बोलत असताना शेजारच्या बेडरूममध्ये एक सेक्स वर्कर मारवानची वाट पाहत होती. तिला प्रत्येक गोष्ट ऐकू येत होती. पण मारवानला त्याबाबत अजिताबत पर्वा नसल्याचं दिसत होतं.”
“मोसादने एकदा वायरलेस गॅझेटच्या प्रशिक्षणासाठी मारवानाकडे एका तज्ज्ञाला पाठवले होते. पण मारवान कधीही कोणतेही गॅझेट चालवायला शिकला नाही. इस्रायलच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या गुप्तहेराने मोसादसाठी काम करत असताना, कधीही वायरलेस पद्धतीने कोणतीही माहिती मिळवली नाही. मोसादमध्ये त्याचे हँडलर मारवानबद्दल विनोद करत असत की, त्याचे म्हणजे मारवानचे दोन दोन डावे हात आहेत.”
मोसाद आणि मारवानचं नातं इतकं घट्ट होतं की, एकदा मारवानाची पत्नी नाराज होती, तेव्हा मोसादने एक हिऱ्याची अंगठी विकत घेतली आणि मारवानाला तिचे मन वळवण्यासाठी दिली. याचा अर्थ मारवानच्या पत्नीसाठी हिऱ्याची अंगठी इस्रायली करदात्यांच्या पैशातून आली होती.
प्रश्न असा उभा राहतो की, मारवानने आपल्या देशाशी विश्वासघात करण्याचा निर्णय घेण्याचे कोणते कारण होते?
जोजेफ म्हणतात की, “मोसाद असं मानत होतं की, पैसा आणि इतिहासात आपलं नाव कोरलं जावं, या दोन गोष्टींमुळे मारवान हेरगिरीसाठी पुढे आला. काही लोकांमध्ये जोखीम घेण्याची जन्मजात प्रवृत्ती असते. त्यामुळेच काही लोक रॉक क्लायंबिंग, स्काय डायव्हिंग आणि बंजीसारखे छंद निवडतात. पण मारवानला खेळात रस नव्हता.”
लंडनमध्ये रहस्यमयरित्या मृत्यू
“खेळापेक्षा मारवानला जुगार खेळण्यात, अनैतिक व्यावसायिक व्यवहारात आणि इस्रायलशी संबंधांमध्ये अनावश्यक जोखीम घेण्यात प्रचंड समाधान मिळत होतं. त्याचा वाढलेला अहंकार, नासेर यांच्याशी त्याचे ताणलेले संबंध आणि विश्वासघात... या सगळ्यामुळे मारवानला एक वेगळ्याच प्रकारची किक मिळत असे.”
2007 मध्ये अशरफ मारवानचा लंडनमध्ये रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. लंडनमधील फ्लॅटच्या पाचव्या मजल्यावरून तो खाली पडला. स्कॉटलंड यार्डने त्याची चौकशी केली. पण ठोस काहीच हाती लागलं नाही. मारवानचा मुलगा गमाल मारवान नंतर म्हणाला, “काय झाले ते मला माहीत नाही? पण मला यात शंका नाही की, त्यांची हत्या झालीय. शंभर टक्के.”
गमालच्या म्हणण्यानुसार, माझे वडील रेलिंगवर चढून खाली उडी मारू शकलेच नसते, इतके अशक्त होते.
प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार, घटनास्थळाजवळ दोन व्यक्ती फिरताना दिसत होते.
जोजेफ म्हणतात की, “स्कॉटलंड यार्डने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली होती आणि ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले की, ही आत्महत्या नाही किंवा हा अपघात नाही. याचा अर्थ त्यांची हत्या झालीय. मेफेअरमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी फ्लॅटच्या रेलिंगवरून उडी मारली. मात्र, आम्ही असं मानतो की, त्या दिवशी मारवानच्या बाल्कनीला लागून असलेल्या बेडरूममध्ये काही लोक उपस्थित होते, ज्यांनी त्याला एक पर्याय दिला, त्यास तो नकार देऊ शकत नव्हता.”
इजिप्तमध्ये अंत्यसंस्कार
“कदाचित त्यांनी त्याला सांगितलं असावं की, आम्ही तुला ढकलण्यापेक्षा स्वत:च उडी मार. मला खात्री आहे की, हे इजिप्शियन गुप्तचर संस्थेनं केलंय. कारण त्यांचा भूतकाळ मुबारक यांच्या प्रशासनासाठी खूप लाजिरवाणा होता.”
मृत्यूनंतर अशरफ मारवानचा मृतदेह इजिप्तला नेण्यात आला. राष्ट्राध्यक्ष मुबारक यांचा मुलगा आणि इजिप्तच्या गुप्तचर संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हजारो लोक त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित होते.
राष्ट्राध्यक्ष मुबारक यांनीही एक निवेदन जारी करून मारवान आपल्या देशाशी एकनिष्ठ होते, असं म्हटलं.
मी जोजेफला विचारलं की, जर मारवान देशद्रोही होता, तर त्याला इतक्या सन्मानाने दफन कसे केले गेले?
जोजेफ यांनी उत्तर दिलं, “अशा गोष्टी अशाच प्रकारे केल्या जातात. मारवान हा इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष नासेर यांचा जावई होता. तो राष्ट्राध्यक्ष सआदत यांचाही अत्यंत जवळचा सल्लागारही होता. जेव्हा किम फिल्बी सोव्हिएत युनियनसाठी हेरगिरी करताना पकडला गेला होता, तेव्हा ब्रिटिशांना वाटत होतं की, खटल्याला सामोरं जाण्यापेक्षा त्यानं सोव्हिएत युनियनमध्ये परत जावं.”
“तसंच, इजिप्तमध्ये खटला चालवून सरकारला अवघडल्यासारखं होण्यापेक्षा मारवानचा लंडनमध्ये मृत्यू व्हावा, अशी इजिप्तला वाटतं होतं. त्यामुळे त्याला लंडनमध्ये मारून त्याचं सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याचं नाटक करणं त्यांच्यासाठी सोयींचं होतं.”
मारवानचा हँडलर दुबी अजूनही इस्रायलमध्ये राहतो. सुरक्षेच्या कारणास्तव त्याची ओळख अद्याप जगासमोर आलेली नाही.