गाझामध्ये मुलांच्या मृत्यूच्या बातम्यांमधे, 'होलोकॉस्ट'मधून वाचलेल्या ज्यू मुलाची कहाणी

    • Author, डॅमियन मॅकगिनेस
    • Role, बीबीसी न्यूज, बर्लिन

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईमुळे गाझामध्ये आतापर्यंत 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये चार हजारांहून अधिक मुलांचा समावेश आहे. याचा अर्थ अंदाजे दर 10 मिनिटांनी एका मुलाची हत्या होतेय. मोठ्या संख्येने मुलांच्या शाळा आणि घरं उद्ध्वस्त झालेत. सोशल मीडियावर अशा छायाचित्रांचा खच पडलाय.

या बातम्यांच्या गर्दीत, इस्रायलमधील एक मूल 86 वर्षांनंतर जर्मनीला परतलंय आणि हिटलरच्या नरसंहारापासून वाचण्यासाठी त्याने वयाच्या सहाव्या वर्षी सुरू केलेला प्रवास तो पुन्हा एकदा सुरू करतोय.

इस्रायल-हमास युद्धामध्ये काही आशेचे किरण आहेत आणि ही गोष्ट हेच दर्शवते की युद्धाचा लोकांवर, विशेषत: मुलांवर कसा परिणाम होतो.

एक दुकानदार जेव्हा फुटपाथवरून ज्यू-विरोधी भित्तिचित्र हटवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा 50-60 लोकांच्या जमावाने त्या ज्यू दुकानदाराची थट्टा केली.

ज्यूंच्या मालकीच्या एका टोपीच्या दुकानासमोर संपूर्ण रस्त्यावर टोप्या आणि तुटलेले चष्मे पसरलेले आहेत.

नोव्हेंबर 1938 मध्ये नाझींनी केलेल्या नरसंहारानंतर सहा वर्षांच्या जॉर्ज शेफीने बर्लिनमधील त्याच्या घराबाहेर हे दृष्य पाहिलेले.

जॉर्ज आता 92 वर्षांचे आहेत. ते इस्रायलमध्ये राहतात. ते म्हणतात, “ते दृष्य अजूनही माझ्या मनात आहे,". मी सर्व टोप्या आणि चष्म्यांकडे पाहतो, जणू काही हे सर्व कालच घडलंय.

बालपणी ते त्यांच्या पालकांविना नाझी जर्मनीतून पळून गेलेले. या हल्ल्यांनंतर ब्रिटनमध्ये नेण्यात आलेल्या अंदाजे 10,000 ज्यू मुलांपैकी ते एक होते. ब्रिटिशतर्फे याला ‘किंडरट्रान्सपोर्ट प्रोग्राम’ म्हणून ओळखलं जातं.

नाझी नरसंहाराचा 85 वा वर्धापन दिन

नाझी जर्मनीतून पळून गेल्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जॉर्ज आता होलोकॉस्टच्या 85 व्या वर्धापन दिनानिमित्त बर्लिनला परतलेत.

शॉनबर्गच्या बर्लिन जिल्ह्यातील हौप्टस्ट्रास येथे त्याच्या घराबाहेरील उद्धस्त केलेली दुकानं त्यांना आठवतात. हत्याकांडानंतर त्यांना काही दिवस घराबाहेर न पडण्यास सांगण्यात आलेलं. जेव्हा त्यांना कळलं की ज्यू प्रार्थनास्थळ सिनेगॉगला लागून असलेली त्यांची शाळादेखील जळून खाक झालेय तेव्हा त्यांना प्रचंड धक्का बसला.

परंतु हे सगळं संपूर्ण जर्मनीत घडतंय हे त्यांना माहीत नव्हतं. त्यांचं आयुष्य कायमचं बदलणार आहे याची त्यांना त्या वयात फारशी जाणीव झाली नव्हती.

9 नोव्हेंबर 1938 च्या रात्री नाझींच्या जमावाने देशभर हाहाकार माजवला. ज्यूंची दुकानं आणि घरं उद्ध्वस्त केली गेली. जर्मनीतील जवळपास सर्व सिनेगॉग (प्रार्थनास्थळं) जाळण्यात आली. 91 ज्यूंची हत्या करण्यात आली आणि 30 हजार ज्यू लोकांना छळछावणीत पाठवण्यात आलं.

जॉर्जची आई मेरीला काय घडतंय याची पूर्ण कल्पना होती. त्याच क्षणी त्यांनी एकट्या जॉर्जला ब्रिटनला सुखरूप पाठवण्याचा निर्णय घेतला.

ज्यूंची भीती

नोव्हेंबर नरसंहार – ज्याला कधीकधी क्रिस्टालनाच्ट (तुटलेल्या स्वप्नांची रात्र) देखील म्हटलं जातं.

हिटलरने ज्यूंच्या केलेल्या छळाच्या बाबतीत ही घटना एक महत्त्वपूर्ण वळण देणारी ठरली. ज्यूं-विरोधी हिंसाचारानंतर जर्मनीमध्ये राहणाऱ्या ज्यूंना अचानक याची जाणीव झाली की ते सुरक्षित नाहीत.

ज्या लोकांना देश सोडणं शक्य होतं, ते देश सोडून गेले. ज्यांना तसं करता आलं नाही त्यांनी आपल्या मुलांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न केला.

जुलै 1939 पर्यंत मेरी ‘किंडरट्रान्सपोर्ट’मध्ये जॉर्जसाठी जागा तयार करण्यात यशस्वी झाल्या.

आईपासून वेगळं होणं

जॉर्ज म्हणतात, "माझी आई संध्याकाळी म्हणाली, 'तुझी खेळणी उचल, तू उद्या ट्रेनने जाणार आहेस, तू विमानाने जाणार आहेस, तू दुसरा देश पाहणार आहेस आणि दुसरी भाषा शिकणार आहेस. हे अद्भुत आहे!'"

जॉर्ज सांगतात की, त्यांच्या आईने हा प्रवास मजेशीर करण्याचा प्रयत्न केला.

पण शेवटी त्यांना एकही खेळणं सोबत घेता आलं नाही. मुलांना फक्त आवश्यक वस्तू सीलबंद सुटकेसमध्ये ठेवण्याची परवानगी होती. काही मुलं तर फक्त कागदावर त्यांचं नाव लिहून घेऊन निघून गेली.

मेरीने जॉर्जला बर्लिनच्या फ्रेडरिकस्टॅड स्टेशनवर नेलं, जिथे तो जर्मनी सोडून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलांनी भरलेल्या ट्रेनमध्ये चढला.

त्यांनी मला सांगितलं, "हे भयानक होतं कारण या सर्व लोकांना त्यांच्या मुलांपासून वेगळं केलं जात होतं. मला कळत नव्हतं की काय होतंय."

जॉर्ज म्हणतात, "प्लॅटफॉर्मवर धावत धावत आई माझा निरोप घेण्याचा प्रयत्न करताना मला दिसली. मी तिला पाहिलं, पण ट्रेनमध्ये इतकी गर्दी होती की आई मला पाहू शकली नाही."

जॉर्जला माहित नव्हतं की तो त्याच्या आईला शेवटचा भेटतोय. मेरी स्पीगेलग्लासला 1943 मध्ये ऑशविट्झ छळछावणीत नेण्यात आलं. तिथे नेल्यानंतर अवघ्या काही तासांतच तिची हत्या करण्यात आली.

ज्यू मुलांना ब्रिटनमध्ये कुणी दत्तक घेतलं

‘किंडरट्रान्सपोर्ट’ योजनेला ब्रिटिश सरकारचा पाठिंबा होता. पण ते देणग्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांवर अवलंबून होतं.

ब्रिटिश सरकारने मुलांचा व्हिसा माफ केला. पण त्यांच्या पालकांसाठी नाही. यापैकी बहुतेक लोक होलोकॉस्टमध्ये मरण पावली.

जॉर्ज म्हणतात की, ज्या मुलांनी पलायन केलं त्यांच्यासाठी इंग्लंडमध्ये पोहोचणं आणि आपण कधीही न भेटलेल्या, ज्यांची भाषा आपल्याला समजत नाही अशा कुटुंबांद्वारे दत्तक घेतलं जाणं खूप दुःखदायक होतं.

ते म्हणाले, "हे गुरांच्या बाजारासारखं होतं. जर एखाद्या मुलीचं वय पाच वर्षांच्या आत असेल आणि तिच्या केसांचा रंग सोनेरी व डोळ्यांचा रंग निळा असेल तर तिला सहजपणे चांगलं कुटुंब मिळे. जर एखादी मुलगी 17 वर्षांची असेल आणि तिचं नाक थोडंसं वाकडं असेल तर तिला घरगुती कामासाठी नोकर म्हणून स्वीकारलं जाई.

ज्या कुटुंबांनी ही मुलं दत्तक घेतली, त्यांच्यावर कोणतीच पाळत ठेवण्यात आली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दत्तक घेतलेल्या काही मुलांनी नंतर सांगितले की त्यांना मानसिक किंवा शारीरिक शोषणाचा सामना करावा लागला.

जॉर्ज बर्लिनला का आलेत?

बर्लिनमधील जॉर्जच्या स्वतःच्या शाळेच्या जागेवर होलोकॉस्टमध्ये मरण पावलेल्या मेरीसह स्थानिक ज्यू लोकांच्या स्मरणार्थ खेळाच्या मैदानावर स्मारक उभारण्यात आलंय. 11 वर्षांच्या शाळकरी मुलांशी त्याच्या आयुष्याबद्दल संवाद साधण्यासाठी जॉर्ज तिथे आलेत.

तुआना नावाची विद्यार्थिनी म्हणते, "आईसाठी हे खरोखरंच कठीण असलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलाला ट्रेनमध्ये बसवता आणि तुम्ही त्यांना पुन्हा कधीही पाहू शकत नाही."

मुलं जॉर्जला भेटवस्तू देतात. हा एक छोटा बॉक्स आहे, ज्यामध्ये टाइलचा तुकडा आहे. हत्याकांडात जाळलेल्या त्यांच्या शाळेच्या इमारतीचे हे अवशेष आहेत.

जॉर्ज आणि इतर दोन वाचलेली मुलं या प्रवासाचा भाग आहेत. जर्मनीतील त्यांच्या लहानपणीच्या घरापासून लंडनच्या लिव्हरपूल स्ट्रीट रेल्वे स्थानकापर्यंत बोट आणि ट्रेनने ते हा प्रवास करतायत. लंडनच्या लिव्हरपूल स्ट्रीट रेल्वे स्थानकावरच ‘किंडरट्रान्सपोर्ट’द्वारे आलेली मुलं त्यांना दत्तक घेतलेल्या कुटुंबियांना किंवा नातेवाईकांना पहिल्यांदा भेटलेली.

जॉर्जच्या भेटीचा उद्देश काय?

इस्त्रायल-गाझा युद्धासोबतच मध्य पूर्वेमध्ये जे काही घडतंय ते पाहता यासारख्या घटना पूर्वीपेक्षा आता अधिक महत्त्वाच्या आहेत, असं सहलीचे आयोजक असलेल्या स्कॉट सॉन्डर्ससारख्या लोकांना वाटतं.

सॉन्डर्स होलोकॉस्टसंबंधी काम करणा-या ‘मार्च ऑफ द लिव्हिंग यूके’ संस्थेसाठी काम करतात

ते म्हणतात, "जेव्हा तुम्ही आजच्या जगाकडे बघता आणि तुम्ही ज्यूंचा विरोध आणि सगळीकडे वाढणारा द्वेष पाहता, मग तो इस्लामोफोबिया असो किंवा समलैंगिक लोकांचा द्वेष असो, तेव्हा अशा वेळी ठामपणे उभं राहण्याची आणि म्हणण्याची आपली जबाबदारी असते की - नाही, पुन्हा नाही, हे पुन्हा कधीही होता कामा नये.”

वयाच्या 13 व्या वर्षी जॉर्जने स्वतःहून एक प्रवास केला. यावेळी बोटीने अमेरिकेला गेले. 18 वर्षांचे असताना ते इस्रायलला गेले. तिथे त्यांनी नौदलात भरती होऊन स्वत:चं कुटुंब तयार केलं.

मी जॉर्जला विचारलं की ते विभक्त होण्याच्या धक्क्यातून कसे बाहेर पडले.

माझ्या प्रश्नावर ते हसले आणि म्हणाले, "मी आयुष्यात नशिबवान होतो." ‘किंडरट्रान्सपोर्ट’मध्ये असणं आणि जर्मनीतून निर्वासित होणे हे नशीब नाही.

ते म्हणतात, “त्याचवेळी, मला मदत करणारे अनेक लोक भेटले. मला चांगलं कुटुंब मिळालं आणि मी 92 वर्ष जगू शकलो. "मला त्या माणसाबद्दल खरोखर तक्रार करायची नाहीए."

इतिहास कधीही विसरला जाणार नाही आणि त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करण्यासाठी जॉर्ज आणि त्यांचं कुटुंब बर्लिनमध्ये लोकांशी संवाद साधण्यासाठी अनेकदा आलंय.

प्रत्येक प्रवासात त्यांनी एक परंपरा जपली आहे: जॉर्ज त्यांचा फोटो त्याच ठिकाणी काढतात, जिथे जवळपास 90 वर्षांपूर्वी पुढे काय होणार आहे, याची यत्किंचितही कल्पना नसलेला त्यांचा बालवयातील हसतानाचा त्यांचा फोटो काढलेला.

त्याच ठिकाणची त्यांची नंतरची छायाचित्रे त्याच्या वाढत्या कुटुंबासह त्यांचा निडरपणा दर्शवतात. जॉर्ज शेफीची मुलं, नातवंडं आणि पतवंड हा हिटलरवर त्यांनी मिळवलेला सर्वात मोठा विजय आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)