छगन भुजबळ म्हणतात, ‘मी सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही,’ जरांगेंचं प्रत्युत्तर ‘भुजबळांचं वय झालं’

भुजबळ आणि जरांगे

छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात जालन्यातल्या अंबडमध्ये शुक्रवारी ओबीसी एल्गार महासभेचं आयोजन करण्यात आलं.

यावेळी भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.

छगन भुजबळ यांनी 2 वर्षं तुरुंगात झुणका भाकरी खाल्ली अशी टीका जरांगे पाटील यांनी केली होती.

त्यावर प्रत्युत्तर देताना भुजबळ यांनी जरांगे पाटली यांना म्हटलंय, “हो मी तुरुंगात झुणका भाकरी खाल्ली, आज दिवाळीतही खातो. मी कष्टाची भाकरी खातो. मी सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही.”

तसंच दगडाला शेंदूर लावून कुठला देव झाला तुझा, अशी टिकासुद्धा भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर केली आहे.

तू माझ्या शेपटीवर परत पाय देण्याचा प्रयत्न करू नकोस, असा इशारासुद्धा भुजबळ यांनी दिला. तसंच त्यांनी ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केली आहे. ती तातडीनं करा, असंही ते म्हणालेत.

यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असंही ते म्हणाले.

हा ओबीसांचा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही, तालुक्या तालुक्यात मेळावे घ्या, असंसुद्धा ते म्हणालेत.

पोलिसांनी नेत्यांच्या गावबंदीचे फलक हटवावेत, असंसुद्धा भुजबळ यावेळी म्हणाले आहेत. तसंच कुणी काही केलं तर त्याला शांतपणे उत्तर द्या, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

पुढचा ओबीसी मेळावा 26 नोब्हेंबरला हिंगोलीमध्ये होणार आहे.

भुजबळांचं आता वय झालं - जरांगे पाटील

“आम्ही तुमचासुद्धा बायोडेटा गोळा केला आहे. इथं सासरा आणि जावयाचा प्रश्न नाही. तुम्हीच आमच्या पायावर पाय देऊ नका, तुम्ही वयानं मोठे आहात. भान ठेवून बोला. यांना राज्यात शांतता ठेवायची नाही,” असा पलटवार मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर केला आहे.

भुजबळांचं आता वय झालं आहे. आता आम्ही भुजबळांना महत्त्व देणार नाही, असंसुद्धा जरांगे पुढे बोलले आहेत.

मराठा आणि ओबीसींमध्ये कुठलाही वाद नसल्याचं जरांगे यांनी म्हटलंय.

जरांगे

सकल मराठा समाजाच्या वतीने सांगलीमध्ये मनोज जरांगे यांची सभा आयोजित केली होती.

यावेळी जरांगे आपल्या भाषणात म्हणाले, "याआधी आपण वेगवेगळे बसलो होतो त्यामुळे आपली शक्ती दिसत नव्हती पण आपण एकत्र आलोय. आपण जर आराम केला आपण जर आरामात बसलो तर आपल्या लेकरा बाळांचे वाटोळ झालंच म्हणून समजा."

आता इथून पुढच्या काळात आपल्या लेकरा बाळांचे वाटोळ होऊ द्यायचं नाही. आपल्याला जे शक्य आहे ते आपण यावेळी करायचं पण आपल्या लेकरा बाळाला त्रास होता कामा नये. एकजुटीची आपल्याला अत्यंत गरज आहे. एकजुटी शिवाय पर्याय नसल्याचं त्यांनी या सभेत सांगितलं.

हा वेढा तोडा

“मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी चारही बाजूने वेढा टाकण्यात आला आहे. आपल्याला त्यांचं षडयंत्र तोडून काढायचं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहे. मराठा सामजाचा राग राग सुरु आहे. मराठा समाजातील काही जण मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. काहींनी त्यासाठी चंग बांधला आहे,” असा आरोप जरांगे यांनी केला. मराठा समाजाने हा वेढा तोडावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

सत्तर वर्षांपासून मराठ्यांना आरक्षण होतं

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जरांगे पुढे म्हणाले, "सत्तर वर्षांपासून मराठ्यांना आरक्षण होतं हे सिद्ध झालं. मला महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांना या सांगली शहरातून आवाहन करायचं आता एकजूट दाखवण्याची गरज आहे, एकत्र या. ज्या मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्यांनी सुद्धा जातीसाठी एकत्र या. कारण आता बिगर कामाचे कळप एकत्र यायला लागलेत."

"पण कितीही कळप एकत्र येऊ द्या कुठल्याच मराठ्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जात वाचवणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या आरक्षण मिळालेल्या आणि आरक्षण नसलेल्या मराठा बांधवांनी आरक्षण मिळेपर्यंत एकजूट दाखवा. आपल्याला हे आव्हान पेलायचय. आपली जात उध्वस्त होता कामा नये. आपली पोरं संपली तर आपली जात संपेल."

मराठा समाजाला 70 वर्षांपूर्वी आरक्षण दिले असते तर मराठा जात प्रगत झाली असती. मराठ्यांचे पुरावे असतानाही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही आणि पुरावे ही सापडू दिले नाहीत. आज तेच पुरावे बाहेर निघालेत फक्त मराठ्यांच्या ताकतीवर आणि एकजुटीवर. माळी समाजाला आरक्षण आहे कारण त्यांचा व्यवसाय शेती आहे. मग मराठ्यांचा व्यवसाय देखील शेतीच आहे त्यांना आरक्षण देण्यास हरकत काय? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

छगन भुजबळ

फोटो स्रोत, ChhaganCBhujbal

"महाराष्ट्र काय तुमच्या सात बाऱ्यावर लिहून दिला का रे? जशाचं तसंच उत्तर द्यायला पाहिजे, आमच्या आरक्षणाचा बट्ट्याबोळ होणार असेल तर हे साठ टक्के काय करतील," असं सवाल करत ओबीसी नेते छगन भूजबळ यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केलीय.

छगन भुजबळ यांनी जालन्यातील सभेत ओबीसी समाजाच्या संबोधित करताना मनोज जरांगे यांचं नाव न घेता वारंवार त्यांचा एकेरी उल्लेख केला.

मी सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही अशी व्यक्तीगत टीका यावेळी भुजबळ यांनी जरांगे यांचं नाव न घेता केली.

" देव सुद्धा यांच्या सात-बाऱ्यावर लिहिले आहेत, पंढपूरची पूजा अजित दादांनी करायची नाही म्हणजे काय? पंढरपूरचा राजा सगळ्यांचा आहे , विठ्ठल हा कृष्णाचा अवतार, कृष्ण यादव म्हणजे ओबीसी, देवाला जात लावायची झाली तर मग तो ओबीसी," असं भुजबळ म्हणाले.

जालन्यामध्ये ओबीसी समाजाच्या या सभेला छगन भुजबळ यांनी संबोधित केलं आणि मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या न्याय हक्का मागणी त्यांनी मांडली. आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी कित्येकदा मनोज जरांगे यांचा नाव न घेता एकेरी उल्लेख करत टीका केली.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींना आरक्षण हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमुळे मिळालं आहे.

“केंद्र आणि राज्यसरकारचे आरक्षण देण्याचे अधिकार हे 16 नोव्हेंबरला 1992 ला सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानं अधिकार काढले गेले आणि आरक्षण देण्यासाठी मागासवर्गीय आयोगा नेमण्यात यावा असं सांगितलं. तेव्हापासून आयोगाकडे हा अधिकार आहे.

आम्हाला आरक्षण आंबेडकरांच्या घटनेनं दिलं आहे कोर्टाने शिक्कामोर्तब केलं आहे.”

आरक्षण हा गरीबी हाटव कार्यक्रम नाही- भुजबळ

छगन भुजबळ यावेळी जरांगे याचं नाव न घेता म्हणाले,

"आरक्षण म्हणजे काय ते आधी समजून घे, आम्हाला पण पाहिजे आम्हाला पण पाहिजे म्हणजे काय? हा काही गरिबी हटावं कार्यक्रम नाही. आरक्षण मिळून दलित समाजातले लोक कलेक्टर झाले, अधिकारी झाले. पण आजही दलित समाज मोठ्या प्रमाणात गरिब आहे. ओबीसी समाजही गरीब आहे."

“आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण इतरांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, फडणवीस यांच्या काळात जेव्हा विधानसभेत मुद्दा आला तेव्हा मी म्हणालो मराठ्यांना आरक्षण द्या. आरक्षणाचं प्रकरण कोर्टात अडकलं तर त्यावर अभ्यास करा. कुणाची घरं किवा दुकानं आम्ही जाळली नाहीत," असं भुजबळ म्हणाले.

‘दगडाला शेंदूर लावून कुठला देव झाला तुझा’

छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात वारंवार नाव न घेता मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला.

" दगडाला शेंदूर लावून कुठला देव झाला तुझा, तुम्ही दादागिरी निर्माण करतात का?," असा सवाल करत भुजबळ यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले.

भुजबळ म्हणतात ओबीसींसाठी वसतिगृह नाहीत, यांच्यासाठी (मराठा) मात्र इमारती खाली केल्या आहेत. मराठा समजाला सारथी आणि इतर गोष्टीसाठी भरघोस निधी दिला. ओबीसी महामंडळाला हजार कोटीसुद्धा नाहीत वाटले यांनी असं ते म्हणाले

" करेंगे या मरेंगे... हा गांधींचा मंत्र आहे ...हा (जरांगे) म्हणतो लडेंगे और जितेंगे, येवल्यात कसा निवडूण येतो ते बघतो, अरे (जरांगे) तू काय बघतो,” अशा शब्दात भुजबळ यांनी टीका केली.

ते पुढे म्हणाले “भडकावू भाषण मी कधी केलं, समाजात वितुष्ट लावू नका मी कधी केलं. भडकावू भाषण त्यांनी केलं तर चालतं. वो कत्ल करते हे तो चर्चा नही होती .

"कोणाचं खाताहेत तुझं (जरांगे) खाताहेत कारे, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही," असं भुजबळ पुढे म्हणाले.

पक्षपात करत असला तर चालणार नाही - भुजबळ

आंदोलनावेळी सरकार भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरुन आपल्याचं सरकारला घेरलं.

“गावात फलक लावतात नेत्यांनी यायचं नाही ,राज्यात कायदा आहे की नाही, सरकार आहे की नाही. पोलिसांना मी सांगतो गावागावात लावलेले फलक तत्काळ हटवले पाहिजेत. तुम्ही पक्षपात करत असला तर चालणार नाही ,ओबीसी गप्प बसणार नाही."

भुजबळ यांनी आपल्या भाषणात आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचारावर भाष्य केलं. ते म्हणाले, “आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटलं दोन तीन टक्के लोकांचा फायदा होतो आरक्षणा मुळे तर त्याचं घर जाळलं. घराचा दरवाजा तोडला. हल्ला केला. पेट्रोल बॉम्ब त्यांच्याजवळ होते. प्रत्येक नेत्यांच्या घरांचे कोड नंबर त्यांना दिले होते.”

"जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी गेले होते. संदीप क्षीरसागर तिथेच राहतात. सगळ्यांची मुलंबाळं तिथच राहतात. त्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकले. मुस्लीम बांधवांनी क्षीरसागर यांच्या मुलाबाळांना वाचवलं. आई बहिणी पेटवायला सांगितलं का तुम्हाला, आमच्या मनात यांचं दुख आहे, या प्रकरणाची चौकशी झाले आहेत."

'जनगणना करा आम्ही किती आहेत कळेल'

“जातीनिहाय जनगणना झाली आणि बिहारमध्ये 63 टक्के आरक्षण मिळेल. त्यामुळे राज्यातही जनगणना ताबडतोब झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. राज्यातील सर्व नेते तेच म्हणताहेत, जनगणना करा आम्ही किती आहेत कळेल.

प्रत्येक जिल्ह्यात मेळावे झाले पाहिजेत. ही ज्योत तालुक्या तालुक्यात पेटली पाहिजे,” असं आवाहन त्यांनी केलं आहे.

भुजबळांनी मराठा समाजावर काही आरोप सुद्धा केले आहेत. ते म्हणातात,

"आदिवासी आणि दलित समाजाला 50 वर्षांचे दाखले मागतात. पण आता पेनानं लिहतात मराठा समाजपुढे कुणबी म्हणून. हे मुख्याध्यापक आणि कलेक्टर ऑफिसमध्येही लिहतात ओबीसी आहे. घे बाबा कटकट नको म्हणे. इथं चुकीच्या पद्धतीने आरक्षणात शिरकाव होतोय."

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)