विराट कोहली : एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 शतकांचा विक्रम आता कुणी मोडू शकेल का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शारदा मियापुरम
- Role, बीबीसी तेलगू
विराट कोहली हा सार्वकालीन महान क्रिकेटपटू आहे का?
काळानुसार क्रिकेटमध्ये झालेले बदल, बदललेले नियम, भारतीय संघाची परिस्थिती या सगळ्या गोष्टी पहिल्या तरीही विराटला सार्वकालीन महान खेळाडूचं बिरुद देता येऊ शकेल.
कारण काहीही असलं तरी एकदिवसीय सामन्यांमध्ये पन्नास शतकं झळकावण्याचा बहुमान मिळवणारा विराट कोहली हा क्रिकेटच्या इतिहासातला एकमेव खेळाडू बनला आहे.
सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांच्या विश्वविक्रमाला मागे टाकून विराटने क्रिकेटच्या इतिहासात एका नवीन विश्वविक्रमाची नोंद केलीय.
सध्या सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनल मध्ये विराटने त्याचं पन्नासावं शतक झळकावून एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतकं करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.
बुधवारी (15 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विराटने 106 बॉलमध्ये 8 चौकार आणि 1 षटकार लगावत शतकाला गवसणी घातली.

फोटो स्रोत, Getty Images
शतक पूर्ण केल्यानंतर मैदानात उपस्थित असलेल्या सचिनकडे पाहून विराटने अभिवादन केलं. सचिन तेंडुलकरनेदेखील विराटच्या शतकाबाबत अभिनंदन केलं.
एवढंच काय तर अनुष्का शर्माने देखील विराटच्या शतकानंतर एकच जल्लोष केला.
विराट कोहलीच्या त्याच्या वाढदिवसादिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावून सचिनच्या 49 शतकांची बरोबरी केली होती.
त्यानंतर दहाच दिवसांमध्ये विराटने सेमी फायनलमध्ये शतक करून एकदिवसीय सामन्यात पन्नास शतकांचा आकडा गाठला आहे.
कोहलीनंतर कोण?
एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या पहिल्या दहा फलंदाजांच्या यादीत विराट आता पहिल्या क्रमांकावर गेलाय आणि एवढी वर्षं या यादीत पहिल्या नंबरवर असणाऱ्या सचिन तेंडुलकरचं नाव आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर दिसेल.
विराट आणि सचिननंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याच्या नावावर 31 शतकांची नोंद आहे. या यादीमध्ये चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे रिकी पॉन्टिंग (30) आणि सनथ जयसूर्या (28) हे आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला (27), एबी डिव्हिलियर्स (25), वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल(25), श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा(25) आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (22) हे त्यानंतरच्या पाच क्रमांकावर आहेत.
सर्वाधिक शतकं करणाऱ्या टॉप-10 फलंदाजांच्या यादीतले केवळ रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर हे दोनच खेळाडू सध्या क्रिकेट खेळत आहेत. इतर सगळेजण आधीच क्रिकेटमधून निवृत्त झालेत.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यामध्ये सध्या 19 शतकांचं अंतर आहे तर 37 वर्षीय डेव्हिड वॉर्नरला विराटच्या शतकांची बरोबरी करण्यासाठी अजून 28 शतकं करावी लागतील.
विराट आणि रोहित व्यतिरिक्त सध्याच्या भारतीय संघात खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये के. एल. राहुलच्या नावावर 7 शतकं आहेत तर शुबमन गिलने त्याच्या छोट्याशा कारकिर्दीत 6 शतकं झळकावली आहेत.
वर्ल्डकपमध्ये सलग दोन शतकं केलेल्या श्रेयस अय्यरने आजवर एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण पाचवेळा 100 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
ही सगळी यादी बघितली तरी नजीकच्या काळात विराट कोहलीचा विक्रम मोडणं ही अशक्यप्राय गोष्ट वाटत आहे.
विराटने कसं केलं 50वं शतकं?
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने आक्रमक सुरुवात केल्यानंतर तो 47 रन करून बाद झाला आणि विराट कोहली मैदानावर उतरला.
दुसऱ्याच बॉलवर न्यूझीलंडने विराटविरुद्ध पायचीतचं अपील केलं आणि भारतीय क्रीडा रसिकांच्या काळजाचा ठोका चुकला. न्यूझीलंडने विराट कोहलीच्या विकेटचं महत्त्व ओळखून डीआरएसची मागणी केली.
विराटच्या पॅडला लागून चेंडू सीमारेषेला धडकल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होतं. पंचानी विराटला आउट दिलं नाही आणि मैदानात उपस्थित असलेल्या विराटच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
यावेळी अनेकांना 2011च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये सचिन आणि सेहवाग ज्यापद्धतीने आउट झाले होते तो प्रसंग आठवला, पण विराटने चौकार खेचून त्याच्या डावाची सुरुवात केली.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईच्या दमट आणि उष्ण वातावरणात विराटपेक्षा 11 वर्षांनी लहान असणाऱ्या शुबमन गिलच्या पायात गोळे आल्यामुळे मैदान सोडावं लागलं आणि विराट मात्र त्याच वेगाने धावा करत होता. अधूनमधून चौकार फटकावत विराटने भारताचा स्कोअरबोर्ड हलता ठेवला.
59 बॉलमध्ये 4 चौकारांच्या मदतीने विराटने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं आणि आणखीन एका विश्वविक्रमाची नोंद केली. एकाच वर्ल्डकपमध्ये 8 पेक्षा जास्त वेळा पन्नाशी ओलांडलेला विराट कोहली हा एकमेव खेळाडू ठरला.
याआधी सचिन तेंडुलकर आणि बांगलादेशच्या शाकिब अल हसन या दोघांनी एकाच वर्ल्डकपमध्ये सातवेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला होता.
अर्धशतकानंतर विराटने त्याच्या धावांची गती वाढवण्याच्या प्रयत्नात न्यूझीलंडच्या टीम साऊदीला एक खणखणीत षटकार खेचला.
80 धावांवर असताना विराटने आणखीन एक विक्रम त्याच्या पोतडीत टाकला आणि तो होता एकाच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा (674) करण्याचा विक्रम. 90 धावांवर असताना विराटच्याही पायात गोळे आले.
लॉकी फर्ग्युसनने टाकलेल्या 42व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर विराटने फ्लिककरून दोन धावा काढल्या आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये शतकांचं अर्धशतक मोठ्या दिमाखात साजरं केलं.
अर्धशतकानंतरच्या पन्नास धावा करायला विराटने 53 बॉल घेतले.
सचिनचे दोन विक्रम मोडीत काढले
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराटने सचिन तेंडुलकरचे दोन रेकॉर्ड मोडले. एकदिवसीय सामन्यांमध्ये पन्नास शतकं करणारा तो पहिला खेळाडू तर ठरलाच पण एकाच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्डही त्याने आता त्याच्या नावे केलाय.
सचिन तेंडुलकरने 451 एकदिवसीय सामन्यात 49 शतकं केली तर विराटला शतकांच्या अर्धशतकासाठी 279 सामने खेळावे लागले.
2003 च्या वर्ल्डकपमध्ये सचिन तेंडुलकरने 673 धावा केल्या होत्या. विराटने त्याचा हाच विक्रम मोडला. विराट कोहलीने सध्या सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये 10 डावात 711 धावा केल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
या स्पर्धेतील विराटच्या धावांची सरासरी 101.57 इतकी आहे तर या धावा करताना त्याचा स्ट्राईक रेटही कमी झालेला नाहीये. 90.68 च्या स्ट्राईक रेटने त्याने या वर्ल्डकपमध्ये धावा केल्या आहेत.
वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीची शतकं
सेमीफायनलमध्ये शतक करून विराटने या वर्ल्डकपमध्ये तीन शतकांचा आकडा गाठलाय. याआधी त्याने बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकं केली आहेत.
पुण्यात झालेल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध नाबाद 103 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात त्याने नाबाद 101 धावा केल्या होत्या.याबाबत मात्र दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक विराटच्या पुढे आहे त्याने 4 शतकं केली आहेत.
वर्ल्डकप स्पर्धांमध्ये विराट कोहलीने एकूण पाच शतकं झळकावली आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
2011 च्या वर्ल्डकपमध्ये मीरपूरमध्ये झालेल्या भारताच्या पहिल्या सामन्यात विराटने बांगलादेशविरुद्ध त्याचं पहिलं शतक केलं होतं. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध अॅडलेडमध्ये त्याने त्याच्या वर्ल्डकपमधल्या दुसऱ्या शतकाची नोंद केली होती.
वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम रोहित शर्मा (7)च्या नावावर आहे तर त्याखालोखाल सचिन तेंडुलकर आणि डेव्हिड वॉर्नर यांनी 6 शतकं केली आहेत.
या यादीत विराट कोहली ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा यांच्याबरोबर चौथ्या क्रमांकावर आहे.
शतकांच्या अर्धशतकांचा हा ऐतिहासिक प्रवास कुठे सुरु झाला?
18 ऑगस्ट 2008 रोजी कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या कारकिर्दीची सुरुवातच एकदिवसीय सामन्यांपासून झाली होती.
मात्र योगायोग असा की विराटने श्रीलंकेविरुद्धच डिसेंबर 2009 त्याच्या वयाच्या 21व्या वर्षी पहिलं शतक केलं होतं. भारताकडून खेळायला सुरुवात केल्यानंतर पहिलं शतक करायला विराट कोहलीला पंधरा सामने थांबावं लागलं होतं.
श्रीलंकेने ठेवलेल्या 316 धावांचा पाठलाग करताना विराटने त्याचं पहिलं शतक केलं होतं आणि आता पन्नास शतकानंतर विराटला 'चेज मास्टर' म्हणून अनेक क्रिकेटरसिकांनी मान्यता दिलेली आहे. त्याच सामन्यात गौतम गंभीरनेही शतक केलं होतं.
माझ्यासाठी हे स्वप्नवत - विराट
शतकांच्या अर्धशतकांचा ऐतिहासिक विक्रम त्याच्या नावे केल्यानंतर प्रतिक्रिया देताना विराट म्हणाला की त्याच्या भावना शब्दात व्यक्त करणं त्याच्यासाठी कठीण आहे.
विराट म्हणाला की, "हे सगळं माझ्यासाठी स्वप्नवत आहे. सचिन पाजी स्वतः स्टॅन्डमध्ये बसलेले होते, अनुष्कादेखील उपस्थित होती. वानखेडेच्या क्रिकेट रसिकांसमोर माझ्या पन्नासाव्या शतकापर्यंत पोहोचणं खरोखर मोठी गोष्ट आहे.
सचिन तेंडुलकरला खेळताना बघून मी मोठा झालो. त्यामुळे तो मैदानात असताना केलेलं हे शतक खास आहे. मी कोलकत्यामध्येसुद्धा हेच म्हणालो होतो."
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








