IND vs NZ Live Score : शमीच्या सात विकेट, विराटची 50 वी सेंच्युरी आणि भारताची फायनल मध्ये धडक

- Author, ओंकार डंके
- Role, बीबीसी मराठीसाठी
भारतानं मँचेस्टरमध्ये 4 वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा वचपा मुंबईत काढला आहे. टीम इंडियानं न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय.
भारतानं दिलेल्या 398 धावांचा न्यूझीलंडनं निकारानं प्रतिकार केला. पण, त्यांचे प्रयत्न अखेर अपुरे ठरले. न्यूझीलंडची संपूर्ण इनिंग 48.5 ओव्हर्समध्ये 327 धावांवर संपुष्टात आली.
मोहम्मद शमीच्या 7 विकेट्स हे भारतीय गोलंदाजीचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं.
भारतानं यापूर्वी 2011 साली विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मागील दोन विश्वचषक स्पर्धेत सेमी फायनलमध्येच टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं होतं.
यावेळी साखळी फेरीतील सर्व 9 सामने जिंकणाऱ्या रोहित शर्माच्या टीमनं न्यूझीलंड आणि सेमी फायनल हा अडथळा पार केलाय. आता भारतीय टीम विश्वविजेतेपदापासून फक्त 1 विजय दूर आहे.
भारतीय गोलंदाजी नेतृत्त्व करणाऱ्या मोहम्मद शमीनं सेमी फायनलमध्येही त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला. त्यानं प्रत्येक वेळी गरज असताना विकेट घेत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
शमीनं सुरूवातील डेव्हॉन कॉनवे आणि राचिन रविंद्र या सलामीवीरांना बाद केलं. त्यानंतर केन विल्यमसन आणि डॅरिल मिचेल ही जमलेली जोडी फोडली.
विल्यमसन (69) आणि टॉम लॅथम (0) यांना एकाच ओव्हरमध्ये बाद करत न्यूझीलंडल बॅक फुटवर ढकललं. त्यानंतर डॅरिल मिचेलला 134 धावांवर बाद करत न्यूझीलंडची शेवटची आशा संपुष्टात आणली.
शमीनं टीम साऊदीला बाद करत सहावी तर लॉकी फर्ग्युसनला बाद करत सातवी विकेट घेतली. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात एकाच सामन्यात 7 विकेट्स घेणारा शमी पहिलाच भारतीय गोलंदाज ठरलाय.
एकाच सामन्यात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम शमीनं या विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्यांदा केलाय. विशेष म्हणजे न्यूझीलंडविरुद्धच त्यानं दोन वेळा ही कामगिरी केलीय.
वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात 50 विकेट्स घेणारा शमी पहिला भारतीय गोलंदाज ठरला. त्यानं 17 सामन्यातच हा टप्पा पूर्ण केला.
दरम्यान विश्वचषक स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांची परस्परांसोबत येथील हवामानाशीही स्पर्धा सुरू होती.

तत्पूर्वी विराट कोहलीचं ऐतिहासिक 50 वं शतक आणि श्रेयस अय्यरची धमाकेदार धावांची खेळी याच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 398 धावांचं आव्हान दिलं होतं.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात टॉस जिंकून फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी 4 बाद 397 असा विशाल स्कोअर उभा केला.
विराट कोहलीच्या वन-डे क्रिकेटमधील ऐतिहासिक 50 व्या शतकासाठी हा सामना नेहमी लक्षात राहणार आहे. विराटनं यावेळी सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मागे टाकला.
विराटनं यापूर्वीच्या 3 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये मिळून फक्त 11 धावा केल्या होत्या. त्याला यापूर्वीच्या सामन्यांमध्ये एकही चौकार लगावता आला नव्हता. त्यानं मुंबईतील सामन्यात या सर्व अपयशाची भरपाई केली.
विराटनं सचिन तेंडुलकरच्या होम ग्राऊंडवर सचिनच्या उपस्थितीमध्ये वर्ल्ड कप सेमी फायनलसारख्या महत्त्वाच्या सामन्यात 50 शतकांचा ऐतिहासिक टप्पा गाठला. त्यानं 113 बॉलमध्ये 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 117 धावा केल्या.
लाईव्ह स्कोअर इथे पहा :
श्रेयसची वादळी खेळी
मुंबईकर श्रेयस अय्यरनं त्याचा जबरदस्त फॉर्म कायम राखत शतक झळकावलं. नेदरलँड्सविरुद्ध रविवारी (12 नोव्हेंबर) रोजी झालेल्या सामन्यात श्रेयसनं नाबाद 128 धावा केल्या होत्या.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात सलग दोन सामन्यात शतक झळकावणारा श्रेयस हा दुसरा भारतीय फलंदाज आहे. यापूर्वी राहुल द्रविड आणि रोहित शर्मानं ही कामगिरी केली होती.
श्रेयसनं 70 बॉलमध्ये 4 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीनं 105 धावा केल्या.
रोहितचा रेकॉर्ड
विराट- श्रेयसच्या मोठ्या इनिंगपूर्वी कर्णधार रोहित शर्मानं आक्रमक खेळी केली. रोहितनं पहिल्याच ओव्हरमध्ये भारतीय फलंदाजीची दिशा स्पष्ट केली होती. त्यानं 29 बॉलमध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 47 धावा केल्या.
रोहित बाद होण्यापर्वी विश्वचषक स्पर्धेत 50 षटकार लगावणारा पहिला फलंदाज बनला. त्यानं वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलचा 49 षटकारांचा विक्रम मोडलाय.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुबमन गिलनं सामन्याची सूत्र हाती घेतली. त्यानं धावगती कमी होणार नाही, याची काळजी घेत 79 धावा केल्या. त्यानंतर पायात गोळे आल्यानं तो ‘रिटायर हर्ट’ होऊन मैदानाच्या बाहेर गेला.
गिल शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा फलंदाजीसाठी आला. तो अखेर 80 धावांवर नाबाद राहिला. के.एल. राहुलनं 20 बॉलमध्ये नाबाद 39 धावा केल्या.
न्यूझीलंडकड़ून टीम साऊदीनं 3 विकेट्स घेतल्या. पण, त्यासाठी त्याला 10 ओव्हर्समध्ये 100 धावा मोजाव्या लागल्या. ट्रेंट बोल्टला 1 विकेट मिळाली.
मुंबईत फलंदांजाची परीक्षा!
विश्वचषक स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांची परस्परांसोबत येथील हवामानाशीही स्पर्धा सुरू आहे.
वाढत्या उष्णतेमुळे पायात गोळे आल्यानं शुबमन गिलनं 79 धावा केल्यानंतर ‘रिटायर हर्ट’ होत मैदान सोडलं होतं.
वानखेडे स्टेडियममध्ये जिथं हा सामना सुरूय तिथं सध्या साधारण 34 अंश सेल्सियस तापमान आहे. पण, वातावरणात उष्णता बरीच आहे. त्यामुळे खेळाडूंना उष्माघात आणि पायात गोळे येण्याचा त्रास होऊ शकतो.
उष्णतेपासून स्वत:ची सुटका करण्यासाठी फलंदाजांना बरंच पाणी प्यावं लागतंय. तसंच त्यांना या उष्णतेमध्ये सर्व गियर घालून प्रत्येक रन काढण्यासाठी पळावं लागतं. त्याचा त्रास खेळाडूंना होतोय.
यापूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात मुंबईत झालेल्या सामन्यातही ग्लेन मॅक्सवेला उष्णतेचा त्रास झाला होता. मॅक्सवेल सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात मैदानात कोसळला होता. तसंच त्याला रन काढण्यासाठी धावणंही अशक्य झालं होतं.
विराटनं पॉन्टिंगला मागं टाकलं
तत्पूर्वी वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आता तिसऱ्या नंबरवर पोहोचलाय. न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये त्यानं हा टप्पा गाठला.
एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या सचिन तेंडुलकरचा विक्रमही विराट कोहलीनं मोडलाय.
यापूर्वी सचिन तेंडुलकरनं 2003 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत 673 धावा केल्या होत्या. गेल्या 20 वर्षांपासून अबाधित असलेला हा विक्रम विराटनं यंदा मोडलाय

फोटो स्रोत, Getty Images
सचिननं 11 सामन्यात 673 धावा केल्या होत्या. विराटनं सचिनपेक्षा एक सामना कमी खेळत हा ऐतिहास टप्पा गाठलाय.
विराटनं यावेळी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला मागं टाकलंय. पॉन्टिंगनं 375 एकदिवसीय सामन्यांमध्ये 13704 धावा केल्या होत्या. विराटनं 291 सामन्यांमध्येच पॉन्टिंगला मागं टाकलंय.
आता कुमार संगकारा (14234) आणि सचिन तेंडुलकर (18426) हे दोनच फलंदाज या यादीमध्ये विराटच्या पुढं आहेत.
‘रिटायर हर्ट’ चा नियम काय सांगतो?
मुंबईतील वाढत्या तापमानामुळे या सामन्यापूर्वी खेळाडूंना त्रास सहन करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात होती.
वानखेडेवर झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तानच्या सामन्यातही पायात गोळे आल्यामुळे ग्लेन मॅक्सवेलला त्रास झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
मेरिलबोर्न क्रिकेट क्लब (MCC) च्या नियमानुसार ‘रिटायर हर्ट’ झालेल्या फलंदाजाला इनिंग संपण्यापूर्वी बरं वाटल्यास तो पुन्हा मैदानात येऊ शकतो. पण त्यासाठी मैदानात खेळत असलेल्या दोन फलंदाजांपैकी एकानं बाद किंवा रिटायर हर्ट होणं गरजेचं आहे.
त्यामुळे विराट किंवा श्रेयस यापैकी कुणी आउट झाल्याशिवाय शुबमन मैदानात परत येऊ शकणार नाही.
'हा' वर्ल्ड रेकॉर्ड मोडून रोहित शर्मा आउट
टीम साऊदीनं भारताला पहिला धक्का दिला. त्यानं रोहित शर्माला 47 धावांवर बाद केलं. रोहितनं 29 बॉलमध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं या धावा केल्या.

फोटो स्रोत, Getty Images
आउट होण्यापूर्वी रोहित शर्माने वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात 50 षटकार लागवण्याचा विक्रम त्याच्या नावे केला. त्यानं ख्रिस गेलचा 49 षटकार लगावण्याचा विक्रम मोडला.
सेमीफायनलला डेव्हिड बेकहॅमसह तारेतारकांची हजेरी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या सेमीफायनलसाठी इंग्लंडचा फुटबॉलस्टार डेव्हिड बेकहॅम देखील उपस्थित आहे.
सामन्यापूर्वी बेकहॅम भारतीय खेळाडूंशी बोलताना दिसला. टॉस होण्याआधी सचिन तेंडुलकर आणि डेव्हिड बेकहॅम एकत्र मैदानावर फेरफटका मारताना दिसले.

फोटो स्रोत, Getty Images
डेव्हिड बेकहॅम युनिसेफचा सदिच्छा दूत म्हणून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आला आहे.
युनिसेफ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) हे लिंग समानता आणि क्रिकेटच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र आले आहेत.
सेमीफायनल बघण्यासाठी रणबीर कपूर, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, जॉन अब्राहम, अनुष्का शर्मा हे बॉलिवूडचे कलाकरही आले आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








