You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘ते’ 60 दिवस आणि माजी पंतप्रधान देवेगौडांच्या मुला-नातवंडांचा राजकारणातील उतरता काळ
- Author, इमरान कुरेशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Reporting from, बंगळुरू
गेल्या 60 दिवसांमध्ये परिस्थिती इतकी बदललीय की, रेवन्ना कुटुंब विचित्र परिस्थितीत अडकलंय. या कुटुंबातील दोन मुलांवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप आहेत.
प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाल्यानंतर, आता त्यांचा भाऊ सुरज रेवन्ना हा देखील अनैसर्गिक संबंधांच्या आरोपांमुळे गोत्यात आला आहे.
याहीपेक्षा वाईट म्हणजे त्यांच्या आई-वडिलांवर एका महिलेचे अपहरण केल्याचा आरोप आहे. या महिलेने दोन मुलांपैकी एकावर बलात्काराचा आरोप केला आहे.
कर्नाटक राज्य अस्तित्वात आल्यानंतरच्या 50 वर्षात अनेक नेत्यांवर लैंगिक शोषणाचे, गैरवर्तनाचे आरोप झाले. मात्र, एका संपूर्ण कुटुंबावरच असे आरोप करण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे.
अगदी अलीकडेपर्यंत रेवन्ना कुटुंबातील प्रत्येक सदस्याने निवडून येत काही ना काही पद भूषवलं आहे.
एचडी रेवन्ना यांचा धाकटा मुलगा प्रज्वल रेवन्ना हासनचे खासदार होते. मात्र, या लोकसभा निवडणुकीत त्याचा पराभव झाला.
जनता दल (सेक्युलर) चे नेते आणि माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक शोषण आणि महिलांवरील बलात्काराचा आरोप आहे. सध्या ते बंगळुरूमध्ये एसआयटीच्या ताब्यात आहेत.
त्यांचे मोठे बंधू सुरज रेवन्ना यांना रविवारी (23 जून 2024) अनैसर्गिक संबंध आणि लोकांना ओलीस ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आली. पक्षाच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. सुरज हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
त्यांचे वडील एचडी रेवन्ना हे नरसीपुरा येथून आमदार आहेत. कर्नाटक सराकरमध्ये ते यापूर्वी मंत्री होते.
एचडी रेवन्ना आणि त्यांची पत्नी भवानी रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप आहे. भवानी रेवन्ना या जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा आहेत.
प्रज्वल रेवन्नावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचे अपहरण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एचडी रेवन्ना आणि त्यांची पत्नी भवानी रेवन्ना हे दोघेही सध्या जामिनावर आहेत.
असा आहे 'रेवन्ना राज'चा शेवट
राजकीयदृष्ट्या एच. डी. रेवन्ना यांचा हा शेवट असावा, असं त्यांचे समर्थक आणि विरोधक दोघेही मानतात.
हासनमध्ये 'रेवन्ना राज' किंवा 'रिपब्लिक ऑफ रेवन्ना'सारखी वाक्य वापरली जातात. कारण या कुटुंबाने हासन जिल्ह्यावर राजकीयदृष्ट्या पूर्णपणे नियंत्रण ठेवलं आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बाब या कुटुंबातील सदस्याला माहिती असते.
जनता दल (सेक्युलर) च्या सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर बीबीसी हिंदीला सांगितलं की, "एच. डी. रेवन्ना यांच्या संमतीशिवाय जिल्हा प्रशासनात काहीही घडत नाही."
राजकीय विश्लेषक संदीप शास्त्री म्हणतात, "असं दिसतंय की जणू सर्व प्रसंग एकत्रच आले आणि एकाच कुटुंबावर कोसळले, तेही अनैतिक मार्गाने."
देवेगौडा घराण्यातील सत्तेचा समतोल
जनता पक्ष आणि क्रांती-रंगा यांनी युती केल्यानंतर कर्नाटकच्या राजकारणात हासन जिल्ह्याला महत्त्व मिळालं. कर्नाटकमध्ये 1983 च्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी काँग्रेसची मक्तेदारी मोडून काढली होती. या निवडणुकांनंतर दोघांचेही प्रशासनावर वर्चस्व वाढलं.
एच. डी. रेवन्ना यांचे वडील माजी पंतप्रधान एच.डी देवेगौडा सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे मंत्री झाले. त्यांनी हासन जिल्ह्यात आपला दबदबा किती सहज प्रस्थापित केला, याची जाणीव राज्यातील राजकीय वर्गाला पहिल्यांदाच झाली. दक्षिण कर्नाटकातील प्रभावशाली वोक्कलिगा जातीचे ते निर्विवाद नेते बनले.
2019 मध्ये देवेगौडा यांनी त्यांची हासन लोकसभा जागा प्रज्वल रेवन्ना यांना दिली. त्यांनी प्रज्वल यांना त्यांचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून पुढे आणलं.
दुसरीकडे, त्यांनी आपला दुसरा नातू, माजी मुख्यमंत्री आणि सध्या केंद्रातील अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल गौडा याला मंड्या मतदारसंघातून उतरवलं.
कुटुंबात सत्तेचा समतोल राखणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. कारण जर असं झालं नाही तर रेवन्ना आणि त्यांची पत्नी भवानी आणि कुमारस्वामी आणि त्यांची पत्नी अनिता यांच्यात राजकीय युद्ध सुरू होऊ शकतं अशी भीती त्यांना वाटत होती.
अनिता कुमारस्वामी या आमदार होत्या आणि भवानी यांनी त्यांचे पती रेवन्ना यांची जिल्हा पंचायतीतली जागा घेतली होती.
पण 2023 मध्ये भवानी यांना हासन विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळणार नाही, यासाठी कुमारस्वामी यांनी प्रयत्न केले होते.
21 एप्रिल रोजी मात्र या कुटुंबातील सत्तेच्या समतोलाला नवं वळण मिळालं. प्रज्वल यांच्याशी संबंधित कथित अश्लील व्हीडिओचे पेन ड्राइव्ह बस स्टँड, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी टाकले जाऊ लागले.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या काही दिवस आधी हा सर्व प्रकार घडला. पण प्रज्वल यांनी 27 एप्रिल रोजी सकाळी मतदान संपल्यानंतर लगेचच देश सोडला.
एच. डी. कुमारस्वामी यांची भूमिका
या प्रकरणानंतर, सरकारने या प्रज्वल रेवन्नाची भूमिका आणि सार्वजनिक ठिकाणी पेन ड्राइव्ह डंप करण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली.
मात्र, यावेळी त्यांचे काका आणि जनता दल (एस) अध्यक्ष एचडी कुमारस्वामी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी प्रज्वल रेवन्ना किंवा त्यांचे वडील एचडी रेवन्ना यांचा बचाव केला नाही.
ते असंच म्हणत राहिले की, "कायदा आपलं काम करेल आणि ही प्रज्वल रेवन्नाची वैयक्तिक बाब आहे. ही लाजीरवाणी घटना आहे. मी कोणालाही वाचवणार नाही."
एवढंच नव्हे, तर त्यांनी म्हटलं की, "प्रज्वल रेवन्ना जिथे असेल, त्यांनी देशात परतावे आणि कायद्याला सामोरे जावे. यात स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांची स्वतःची आहे."
मात्र, या प्रकरणाचा एकमेव उद्देश आपल्या कुटुंबाची बदनामी करणे आणि जनता दल संपवणे आहे हे स्पष्ट केलं. थोडक्यात त्यांनी प्रज्वल रेवन्ना वादातून पक्षाला वाचवण्याचा प्रयत्न केला.
रविवारी (23 जून) पत्रकारांनी या प्रकरणात सुरज रेवन्ना यांच्या कथित सहभागाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "हा प्रश्न विचारण्यासारखा आहे का?"
त्यामुळे कुमारस्वामी जे काही करत आहेत ते विचारपूर्वक करत आहेत. याचा अर्थ ते आपल्या भावापासून अंतर ठेवत आहे. शिवाय वडिलांचा वारसा आपल्या हाती असल्याचेही ते सांगत आहेत.
सहानुभूती कोणाला?
मात्र, या प्रकरणी जनता दल (सेक्युलर)चे वर्चस्व असलेल्या दक्षिण कर्नाटकातील जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
पक्षाची हासन जिल्ह्यातील महिला कार्यकर्ता म्हणाली, "काय सांगू सर. आमच्यावर कोणी हल्ला केला हे आम्हाला कळलंच नाही."
हासन जिल्ह्यातील पक्षाचे कार्यकर्ता असलेले अकमल अहमद यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, "रेवन्ना कुटुंबावर जे आरोप केले जात आहेत ते अजूनही आरोप आहेत. सिद्ध झालेले नाहीत. या आरोपांवर आमचा विश्वास नाही. हे षडयंत्र असल्याचं दिसतं. पण देवेगौडा यांच्याबद्दल लोकांच्या मनात खूप सहानुभूती आहे हेही तितकंच खरं आहे."
हासन जिल्ह्यातील मदिगा डंडोरा संघाचे अध्यक्ष विजय कुमार अकमल अहमद यांच्या मताशी सहमत आहेत. लोकांची सहानुभूती देवेगौडा यांच्यासोबत असल्याचे तेही म्हणतात.
विजय कुमार यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं की, "प्रामाणिकपणे सांगायचे तर मी देवेगौडा आणि रेवन्ना यांना एकदाच मत दिलं आहे. मात्र या घटनेनंतर देवेगौडा यांच्याबद्दल लोकांमध्ये खूप सहानुभूती आहे. इथून पंतप्रधान झालेल्या व्यक्तीला या अवस्थेत पाहून खूप वाईट वाटतं."
विजय म्हणाले, "लोकांमध्ये रेवन्ना कुटुंबाविरोधात प्रचंड राग आहे. लोक आता या विषयावर बोलायलाही घाबरतात. कारण मीडियासमोर काही बोललं तर काही कारवाई होणार नाही ना, अशी भीती त्यांना वाटते. मात्र, वोक्कालिगा समाज त्यांचा आदर कमी होऊ देणार नाही. भविष्यात काय होईल ते पुढे कळेलच."
या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी.एल.शंकर यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, "आता कुणाला तरी पुढे जाऊन हासन जिल्ह्याचे नेतृत्व हाती घ्यावं लागेल. या भूमिकेसाठी कोण योग्य असेल हे सांगणं सध्या कठीण आहे. पण असं किती दिवस चालणार? श्रेयस पटेल आता इथून काँग्रेसचे खासदार आहेत. विधानसभा निवडणुकीत ते 1800 मतांनी पराभूत झाले होते. आता ते खासदार आहेत. दुसरी पिढी राजकारणात येते आहे."