You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रज्वल रेवण्णांबाबत इंटरपोलनं काढलेली 'ब्लू कॉर्नर नोटीस' नेमकी काय आहे?
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी
कर्नाटकचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत आणि त्यांच्याविरोधात आता इंटरपोलची 'ब्लू कॉर्नर नोटीस' बजावण्यात आलेली आहे.
प्रज्वल रेवण्णा खासदार असल्याने त्यांच्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहे आणि याचाच वापर करत ते जर्मनीला गेल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय.
हे इंटरपोल काय आहे? आणि ब्लू नोटीस काय असते?
प्रज्वल रेवण्णा खासदार असल्याने त्यांच्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहे आणि याचाच वापर करत ते जर्मनीला गेल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय.
प्रज्वल रेवण्णांविषयी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं, "या खासदारांच्या जर्मनीला जाण्यासाठीच्या प्रवासासाठी कोणतीही राजनैतिक परवानगी मागण्यात आली नव्हती किंवा परराष्ट्र मंत्रालयाने अशी कोणतीही परवानगी दिलेली नाही. कोणतीही व्हिसा नोटही इश्यू करण्यात आली नव्हती. डिप्लोमॅटिक पासपोर्टधारकांना जर्मनीला जाण्यासाठी व्हिसा लागत नाही. या खासदारासाठी परराष्ट्र मंत्रालयाने इतर कोणत्या देशांच्या व्हिसासाठीचं पत्रही दिलेलं नाही."
डिप्लोमॅटिक पासपोर्ट हा मरून रंगाचा असतो. आणि भारत सरकारने अधिकृत केलेल्या सदस्यांना देण्यात येतो. खासदार, काही ठराविक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, डिप्लोमॅट्स आणि काऊन्सुलर ऑफिसर्सना हा पासपोर्ट दिला जातो.
रेवण्णांकडे असाच डिप्लोमॅटिक पासपोर्ट असल्याने त्यांना जर्मनीला जाण्यासाठी वेगळ्याने व्हिसा घ्यावा लागला नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं.
प्रज्वल रेवण्णा यांच्याबाबत आता इंटरपोलची मदत घेण्यात येत असून 'ब्लू कॉर्नर नोटीस' काढण्यात आल्याची माहिती कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी दिली.
इंटरपोल काय आहे?
इंटरपोल म्हणजे International Criminal Police Organization. फ्रान्सच्या लिआँमध्ये (Lyon) मध्ये इंटरपोलचं मुख्यालय आहे.
इंटरपोल ही अशी संस्था आहे जी जगभरातल्या पोलीस खात्यांना एकमेकांशी तंत्रज्ञानाने आणि प्रत्यक्षरीतीने जोडते. जगातली ही एकमेव अशी संस्था आहे ज्यांना जगभरातल्या पोलीस यंत्रणांकडे असलेली माहिती शेअर करण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्याकडे तसं तंत्रज्ञान आहे.
1923 मध्ये इंटरपोलची स्थापना झाली त्यावेळी 20 देश याचे सदस्य होते. आता 196 देश या इंटरपोलचे सदस्य आहेत.
जगभरातल्या देशांसोबतच इंटरपोल विविध जागतिक संघटनांसोबतही काम करतं. युनायटेड नेशन्ससोबत इंटरपोलचे गेल्या अनेक दशकांचे संबंध असून युनायटेड नेशन्सच्या न्यूयॉर्कमधल्या मुख्यालयात इंटरपोलचंही ऑफिस आहे. याशिवाय युरोपोल, युरोपियन युनियन, आफ्रिकन युनियनसोबतही इंटरपोल काम करतं.
सदस्य देशांकडून दरवर्षी दिला जाणारा ठराविक निधी आणि विविधं काम आणि प्रकल्पांसाठी मिळणारं दान - Funding यातून इंटरपोलला पैसा मिळतो. 2023 सालचा इंटरपोलचा एकूण महसूल होता 17.6 कोटी युरो.
I-24/7 नावाच्या एका सुरक्षित संवाद यंत्रणेद्वारे (Secure Communication System) जगभरातले 196 देश एकमेकांसोबत आणि जनरल सेक्रेटेरिएटसोबत इंटरपोलने जोडले आहेत. यामुळे त्यांना इंटरपोलचा डेटाबेस आणि सेवा Real Time म्हणजे क्षणाक्षणाला उपलब्ध होतात. इंटरपोलकडे असे एकूण 19 विविध डेटाबेस आहेत. यात कागदपत्रं, फॉरेन्सिक्स, डीएनए, हाताच्या बोटांचे ठसे, फेशियल रेकग्निशनचे डेटाबेस आहेत.
विविध गुन्ह्यांच्या बाबतीत इंटरपोल पोलिस आणि तज्ज्ञांच्या नेटवर्कला एकमेकांशी जोडून देतं.
इंटरपोलचं एक आंतरराष्ट्रीय रेडिओ नेटवर्कही आहे. 1935 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या रेडिओ नेटवर्कवरून दररोज लाखो संदेश पाठवले जातात, जे 196 देशांमधून अॅक्सेस केले जाऊ शकतात.
फरार झालेल्यांना जगभरातून शोधून काढण्यासाठीची मदत इंटरपोल पुरवतं. आणि याचसाठी इंटरपोल वेगवेगळ्या प्रकारच्या नोटीस जारी करतं. जेणेकरून सगळ्याच देशांना एखाद्या प्रकरणाचं गांभीर्यं, नेमका काय शोध घ्यायचाय हे कळू शकतं.
इंटरपोल कधी नोटीस बजावतं?
1947 मध्ये एका रशियन व्यक्तीने एका पोलीसाचा खून केला. त्याचा शोध घेण्यासाठी पहिल्यांदा इंटरपोलने पहिल्यांदा 'रेड नोटीस' (Red Notice) प्रसिद्ध केली. त्यानंतर आजवर इंटरपोलने विविध रंगांच्या नावावरून नोटीसचे विविध प्रकार आखले आहेत.
सदस्य देशाच्या इंटरपोल नॅशनल सेंट्रल ब्युरोच्या विनंतीवर इंटरपोलचं जनरल सेक्रेटेरिएट - सचिवालय अशा नोटीस काढतं. सगळ्या सदस्य देशांना या नोटीसा मिळत असतात. युनायटेड नेशन्स, इंटरनॅशनल क्रिमिनल ट्रायब्युनल वा इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टच्या विनंतीवरूनही अशा नोटीस जारी केल्या जातात.
यातल्या बहुतेक नोटीस या जगभरातल्या देशांच्या पोलिसांकरता असतात आणि त्याचे तपशील सामान्यांना उपलब्ध नसतात.
ब्लू कॉर्नर नोटीस काय आहे?
प्रज्वल रेवण्णा यांच्याबाबत इंटरपोलने ब्लू कॉर्नर नोटीस प्रसिद्ध केली आहे. एखाद्या गुन्ह्याच्या तपासामध्ये महत्त्वाच्या व्यक्तीबद्दलची माहिती, तिची ओळख पटवणं आणि ती कुठे आहे - लोकेशन शोधणं यासाठी ही नोटीस काढली जाते.
प्रज्वल रेवण्णा भारताबाहेर गेले असले तरी आता इंटरपोलच्या मार्फत भारतीय तपास यंत्रणांना रेवण्णांचा शोध घेता येईल. इंटरपोलने अशी नोटीस काढल्यानंतर सगळ्या देशांच्या पोलीस आणि तपास यंत्रणांना याबद्दलची माहिती जाते. त्यामुळे या यंत्रणा एखाद्या व्यक्तीला शोधून काढण्यासाठी वा तिच्या हालचालींबद्दलची माहिती मिळवून देण्यासाठी मदत करतात.
इंटरपोल नोटीसचे इतर प्रकार
- रेड नोटीस - खटला चालवण्यासाठी वा शिक्षा भोगण्यासाठी 'वाँटेड' असणाऱ्या व्यक्तीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आणि अटक करण्यासाठी. पण रेड नोटीस म्हणजे इंटरनॅशनल अरेस्ट वॉरंट नाही. सदस्य देश त्या व्यक्तीवर त्यांच्या कायद्यानुसार कारवाई करतात आणि अटक करायची का, याचा निर्णय घेतात.
- यलो नोटीस - हरवलेल्या व्यक्तींचा शोध, बहुतेकदा 18 वर्षांखालील मुलं, किंवा मग अशा व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी जे स्वतःची ओळख सांगू शकत नाहीत.
- ब्लॅक नोटीस - ओळख न पटलेल्या मृतदेहांबद्दलची माहिती मिळवण्यासाठी
- ग्रीन नोटीस - एखादी व्यक्ती सार्वजनिक सुरक्षेसाठी धोका ठरण्याची शक्यता असल्यास तिच्या गुन्हेगारी कारवायांबद्दलचा इशारा देण्यासाठी
- ऑरेंज नोटीस - सार्वजनिक सुरक्षिततेसाठी गंभीर आणि अगदी स्पष्टपणे धोका ठरू शकेल अशा घटना, व्यक्ती, वस्तू वा प्रक्रियेबद्दलचा इशारा देण्यासाठी
- पर्पल नोटीस - गुन्हेगारांद्वारे वापरण्यात येणाऱ्या कार्यपद्धती - Modus Operandi, वस्तू,उपकरणं आणि लपण्याच्या पद्धतींबद्दलची माहिती देण्यासाठी वा मिळवण्यासाठी.
- इंटरपोल - युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काऊन्सिल स्पेशल नोटीस - संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीचं (Sanctions Committee) लक्ष्य असणाऱ्या व्यक्ती वा संघटनांबाबत ही नोटीस काढली जाते.