BCCIची क्रिकेटपटूंवर खैरात, वाचा 7 कोटी रुपये पगार कुणाकुणाला?

फोटो स्रोत, Getty Images
बीसीसीआयनं 2022-23 या मोसमासाठी करारबद्ध पुरुष खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
त्यात रविंद्र जाडेजाला बढती मिळाली असून त्याचा A+ ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे.
हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलला ग्रेड A मध्ये बढती मिळाली असून के एल राहुलची ग्रेड A मधून ग्रेड Bमध्ये घसरण झाली आहे.
सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिलचा ग्रेड सीऐवजी ग्रेड B मध्ये तर शार्दूल ठाकूरचा ग्रेड B ऐवजी ग्रेड C मध्ये समावेश करण्यात आला आहे.
कुलदीप यादव, ईशान किसन, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग आणि केएस भारत यांना बीसीसीआयनं पहिल्यांदाच करारबद्ध केलं असून त्यांचा ग्रेड C मध्ये समावेश करण्यात आला आहे.
तर अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्माचा यावेळी करारबद्ध खेळाडूंमध्ये समावेश नाही.
सर्व करारबद्ध खेळाडूंची यादी तुम्ही पुढे वाचू शकता. पण आधी समजून घेऊयात की बीसीसीआयचं सेंट्रल काँट्रॅक्ट काय आहे?
दर वर्षी भारताच्या साधारण पंचवीस खेळाडूंशी बीसीसीआय करार करतं आणि प्रामुख्यानं यातूनच आंतरराष्ट्रीय टीमची निवड केली जाते.
या खेळाडूंना बीसीसीआय वार्षिक पगारासारखी एक निश्चित रक्कम देऊ करतं. ही रक्कम मॅच फी आणि प्राईझमनीपेक्षा वेगळी असते.
खेळाडूंना किती रक्कम मिळणार हे त्यांचा अनुभव आणि मागच्या वर्षभरातील कामगिरीच्या आधारे निश्चित केलं जातं. त्यासाठी खेळाडूंची चार गटांत विभागणी केली जाते – ग्रेड A+, A, B आणि C.
ज्या खेळाडूंचा करारबद्ध खेळाडूंच्या यादीत समावेश नाही, त्यांची संघात निवड झाली, तर त्यांचा आपोआप थेट ग्रेड C मध्ये समावेश केला जातो.
यंदा भारताच्या पुरुष क्रिकेटर्सपैकी ग्रेड A+ मधील खेळाडूंना सात कोटी रुपये, ग्रेड A मधील खेळाडूंना पाच कोटी रुपये, ग्रेड B मधील खेळाडूंना तीन कोटी रुपये आणि ग्रेड C मधील खेळाडूंना एक कोटी रुपये दिले जाणार आहेत.







ग्रेड A+ : रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा, रविंद्र जाडेजा
ग्रेड A : हार्दिक पंड्या, आर अश्विन, मोहम्मद शमी, रिषभ पंत, अक्षर पटेल
ग्रेड B : चेतेश्वर पुजारा, के एल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल
ग्रेड C : उमेश यादव, शिखर धवन, शार्दूल ठाकूर, इशान किशन, दीपक हूडा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, के एस भारत
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








