'मी ड्रग्स घ्यायला लागलो; तेव्हा ना काही खायचो, ना मला झोप लागायची'- वसीम अक्रम

फोटो स्रोत, SULTAN: A MEMOIR, WASIM AKRAM WITH GIDEON HAIGH
“ बराच काळ मला असं वाटायचं की मी हुमासाठी एक चांगला, आदर्श नवरा बनू शकलो नाही. तहमूर आणि अकबर या माझ्या मुलांसाठी मी चांगला बापही नव्हतो. मी अतिशय टिपिकल पंजाबी पुरूष आणि वडील होतो. मुलांना केवळ महागड्या वस्तू आणून देणारा आणि त्यांना घडवण्याची बाकी सगळी जबाबदारी बायकोवर ढकलून देणारा...”
पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने आपल्या ‘सुलतान : ए मेमॉयर’ या आत्मकथेमध्ये पहिल्यांदाच आपल्या खाजगी आयुष्याबद्दल खुलेपणाने लिहिलं आहे. त्यानं आयुष्यातल्या अडचणी, कठीण प्रसंग सांगितले आहेत.
मॅच फिक्सिंगप्रकरणी झालेल्या आरोपांवरही वसीम अक्रमने या पुस्तकात खुलासा केला आहे.
वसीम अक्रमने आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे, “मला पार्टी करायला आवडायचं. दक्षिण आशियात जेव्हा तुम्ही प्रसिद्धीच्या शिखरावर असता, तेव्हा पाऊल वाकडं पडण्याचीही शक्यता असते. तुम्ही एका रात्री दहा पार्ट्यांमध्येही जाऊ शकता. यामुळेच माझं प्रचंड नुकसान झालं.
आपल्याला कोकेनचं व्यसन कसं लागलं, त्यात वाहवत जाऊन पत्नीसोबत खोटं बोलायला कसं लागलो, याचीही कबुली वसीम अक्रमने आपल्या आत्मचरित्रात दिली आहे.
"माझी दिवंगत पत्नी हुमा हिला कराचीला शिफ्ट करायचं होतं. कारण तिला तिच्या आई-वडिलांजवळ राहता आलं असतं. पण मी तिची ही इच्छा पूर्ण करत नव्हतो. कारण मी कामानिमित्त जातोय असं सांगून तिथे एकट्यानं पार्टी करायला जायला आवडायचं.”
जेव्हा ड्रग्सचं व्यसन लागलं होतं...
वसीम अक्रमची पत्नी हुमा हिने त्याच्या पाकिटात कोकेनची पावडर पाहिली होती. तिने त्याला म्हटलं होतं, “तू ड्रग्स घेतोस हे मला माहितीये. तुला मदतीची गरज आहे.”
पाकिस्तानमधील जियो न्यूज आणि जंग न्यूज ग्रुपचे स्पोर्ट्स एडिटर आणि क्रिकेट समीक्षक अब्दुल माजिद भट्टी आणि वसीम अक्रम एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतात. वसीमने जेव्हा कराचीकडून पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून त्यांचे संबंध होते.
त्यांनी वसीमच्या आयुष्यातल्या या कालखंडाबद्दल सांगताना म्हटलं, “हा तो काळ आहे जेव्हा वसीम अक्रमला डायबेटीस झाला होता. स्पॉट फिक्सिंग आणि मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे तो स्ट्रेसमध्ये असायचा. वसीमची अवस्था अशी होती की, हुमाच त्याचे सगळे फोन घ्यायचे आणि तीच आम्हाला कॉलबॅकही करायची.”

फोटो स्रोत, SULTAN: A MEMOIR, WASIM AKRAM WITH GIDEON HAIGH
वसीमने आपल्या पुस्तकात लिहिलं आहे, “मी जेव्हा ड्रग्स घ्यायला लागलो तेव्हा ना काही खायचो किंवा ना मला झोप लागायची. मी जेव्हा लाहोरच्या एका रिहॅबिलिटेशन क्लिनिकमध्ये जाण्यासाठी होकार दिला, तेव्हा हुमाने तिचा भाऊ एहसानला म्हटलं होतं की, हा पळून जाणार नाही ना...मला माझा भाऊ परत हवा आहे.”
याच दरम्यान 2009 वसीमने आपली पहिली पत्नी हुमा हिला तलाक देण्याचाही विचार केला होता. त्यानंतर घरी परतल्यावर त्याने कोलकाता नाइट रायडर्सचा कोच म्हणून जबाबदारी घेतली आणि तो कामात व्यस्त झाला.
वसीमचं करिअर खूप जवळून पाहणारे ज्येष्ठ पत्रकार आणि एआरवाय न्यूजचे स्पोर्ट्स एडिटर शाहिद हाश्मी यांनी म्हटलं, “जेव्हा तुम्ही सेलिब्रिटी होता, तेव्हा त्याची किंमतही मोजावी लागते. वसीमलाही ती मोजावी लागली. पण त्याने आपल्या चुका प्रामाणिकपणे जगासमोर मांडल्या. ही खूप मोठी गोष्ट आहे.”
पत्नी हुमाचा भारतात मृत्यू
रिहॅब क्लिनिकमधून परत आल्यानंतर माझं ड्रग्सचं व्यसन अजिबात सुटलं नव्हतं, असं वसीमने लिहिलं आहे. गिडियन हेग यांनी आपल्या आत्मकथेत लिहिलं आहे, “हुमा अचानक आजारी पडली आणि मी हादरून गेलो. एक दिवस हॉस्पिटलमध्येच असताना तिनं मला विचारलं की, ‘जर मला काही झालं तर माझ्या मुलांचं काय होईल?’ मी म्हटलं की, तुला काही होणार नाही. मी आहे ना! पण ती केवळ हसली. कारण तिला माहीत होतं की, मी या लायकच नाहीये.”

फोटो स्रोत, Getty Images
या घटनेनंतर हुमा अक्रमचं अचानक आजारपणामुळे निधन झालं. तिची तब्येत खालावली, तेव्हा वसीम तिला एअर अँब्युलन्समधून सिंगापूरला घेऊन चालले होते. वाटेत हुमाला ब्रेन स्ट्रोक झाला आणि त्यामुळे आपात्कालिन परिस्थितीत विमान चेन्नईमध्ये उतरवावं लागलं.
आपल्या पुस्तकात वसीमने भारताचे आभार मानले आहेत. त्याने लिहिलंय, “आमच्याकडे भारचीय व्हिसा नव्हता किंवा लँड करण्याची परवानगी. पण भारताने आम्हाला सगळं माफ केलं. त्यानंतर हुमाला चेन्नईतल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथेच तिचा मृत्यू झाला.”
या घटनेनंतर आपण ड्रग्स कधीच घेतले नाहीत असा अक्रमचा दावा आहे.
पाकिस्तानी क्रिकेटर्सना अटक
वसीम अक्रमने पहिल्यांदाच त्याच्याबरोबर असलेल्या तीन खेळाडूंना वेस्ट इंडिज मध्ये अटक केल्याचा उल्लेख केला आहे.
त्याचं झालं असं की, 1993 मध्ये एका दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान टीमच्या चार खेळाडूंना, म्हणजे कर्णधार वसीम अक्रम, उपकर्णधार वकार युनूस, अकिब जावेद आणि मुश्ताक अहमद यांना ग्रेनाडा येथील कोयाबा बीच रिसॉर्ट मध्ये गांजा बाळगल्याबद्दल अटक करण्यात आली होती.

फोटो स्रोत, Getty Images
त्यावेळी वसीम अक्रम फक्त 29 वर्षांचा होता. त्यावर सफाई देताना वसीम म्हणतो, “आमच्याकडे एक स्टिरिओ होता. आम्ही चिकन ऑर्डर केलं होतं. आम्हाला एक रमची बाटली ऑफर करण्यात आली होती.”
“त्यानंतर दोन ब्रिटिश महिला, सूजन रॉस आणि जोआन कफलिन आमच्याबरोबर सामील झाले. तेव्हा एक महिने विचारलं की जाँईटचा (गांजाचा) एक कश घेणार का? तेव्हा आधी आम्ही म्हणालो की, आम्ही कमी स्मोक करतो. मग विचार केला की एका कशने काय नुकसान होईल?”
वेस्ट इंडिज पोलिसांनी आम्हाला घेरलं आणि अक्रमच्या मते, “मुश्ताक रडायला गेला. आकिब आणि वकार धक्क्यात होते. मी उभा राहत असताना घसरलो आणि एका लोखंडाच्या रॉडवर आपटलो. त्यामुळे रक्तही निघालो. मात्र आम्हाला फसवलं गेलं होतं. आमच्याकडे कोणतेही अंमली पदार्थ नव्हते.”
रात्री उशीरा या सगळ्यांना जामीन मिळाला. मात्र आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये या घटनेची खूप चर्चा झाली. AFP या वृत्तवाहिनीचे माजी क्रिकेट संपादक कुलदीप लाल यांच्या मते, “मी 35 वर्षं क्रिकेट कव्हर केलं. वसीम अक्रमसारखा बॉलर मी पाहिला नाही. तो कमालीचा ऑल राऊंडर होता. त्या काळात अनेक घटना झाल्या होत्या हेही तितकंच खरं आहे. वेस्ट इंडिज मधली घटना त्यापैकीच एक.
मॅचफिक्सिंगचे ढग
मॅचफिक्सिंग बदद्ल वसीम अक्रम काय बोलणार याबद्दल क्रिकेटप्रेमींना कायमच उत्सुकता लागून राहिली आहे.
‘सुल्तान:अ मेमॉयर’ या आत्मचरित्रात त्यांनी एक संपूर्ण प्रकरण त्यावर लिहिलं आहे. जेव्हा पाकिस्तानवर स्पॉट फिक्सिंग आणि मॅचफिक्सिंगचे ढग आले आणि त्यामुळे सलीम मलिक आणि अत- उर-रहमान सारख्या खेळाडूंचं करिअर संपलं आणि त्यांच्यावर आयुष्यभर क्रिकेट खेळण्याची बंदी घालण्यात आली.
वसीम अक्रमवर सुद्धा हे आरोप होते. जस्टिस कय्यूम कमिशनने या आरोपांची चौकशी केली होती.
1990 च्या दशकात एक मॅच फिक्स करण्यासाठी अत-उर-रहमान ला 3-4 लाख रुपये ऑफर केल्याचा आरोप झाला होता.
1996 च्या वर्ल्ड कप मध्ये भारत- पाकिस्तान यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात खेळावं लागू नये म्हणून जायबंदी झाल्याचं नाटक केलं होतं असाही आरोप त्याच्यावर होता.

फोटो स्रोत, SULTAN: A MEMOIR, WASIM AKRAM WITH GIDEON HAIGH
AFP चे कुलदीप लाल ती मॅच कव्हर करत होते.
ते म्हणतात, “या सामन्याच्या आधी पाकिस्तानच्या गोटातून अशी बातमी होती की वसीम अक्रम जायबंदी आहे. सामन्याच्या दिवशी सकाळी बातमी आली की तो खेळणार नाही.”
तो खरंच जायबंदी होता का हे आम्हाला कळत नव्हतं. वसीमने आमच्याशी बोलताना अनेकदा सांगितलं की तो जायबंदी होता.
आता पुस्तकात त्याने स्वत:च सांगितलं आहे, “जगातले कितीतरी लोक मला ओळखतात. पण पाकिस्तानमध्ये नेहमी या अफवा असतात की मी मॅच फिक्सर आहे. हे ऐकून मला फार वाईट वाटतं.”
ARY न्यूज चे ज्येष्ठ पत्रकार यांनी या स्पष्टीकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, “वसीम ने आम्हाला अनेकदा सांगितलं आहे की माझ्या दोन मुलांना आणि मुलीसकट माझ्या सगळ्या चाहत्यांना सांगू इच्छितो की मॅच फिक्सिंगचे फक्त आरोप होते. त्यातला एकही आरोप सिद्ध झाला नाही.”

फोटो स्रोत, Getty Images
ही चौकशी झाल्यावर वसीम अक्रमसह अनेक खेळाडूंना दंड ठोठावण्यात आला होता. मात्र कोणताही आरोप सिद्ध झाला नाही.
वसीम त्यांच्या पुस्तकात लिहितात, “माझी एक चूक झाली की मी जफर इक्बाल वर विश्वास ठेवला. हुमा ने अनेकदा सांगूनही मला लक्षात आलं नाह की जुगार आणि सट्टेबाजीत अडकला आहे आणि माझ्या नावाचा चुकीचा वापर करतोय.”
क्रिकेट समीक्षक अब्दुल माजिद भट्टीने या प्रकरणावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली, “नुकतंच आशिया कपच्या वेळी वसीमची भेट झाली आणि त्याने मला सांगितलं की माझं पुस्तक येतंय आणि आता शेवटी मी माझ्या आरोपांवर जगाला उत्तर दिलं आहे आणि सगळे हिशोब चुकते केले आहेत.”
“जगातल्या अनेक देशातील अनेक खेळाडूंची नावं मॅच फिक्सिंगमध्ये येत राहिली. ज्यांच्यावर आरोप सिद्ध झाले ते ठीक आहे. पण म्हणतात ना की आग लागल्याशिवाय धूर निघत नाही. वसीम आता आपली बाजू मांडतोय, हेही चांगलंच आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








