केशव महाराज: 'जय श्रीराम', 'जय माता दी' म्हणणारा आफ्रिकेचा खेळाडू तुम्हाला माहितेय का?

फोटो स्रोत, Gareth Copley
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
भारत दौऱ्यावर आलेल्या विदेशी खेळाडूने 'जय माता दी' म्हणत नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या तर! असं घडलं आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आहे. पहिला ट्वेन्टी-20 सामना आज तिरुवनंतपुरम इथे होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने पारंपरिक धोती वेशात तिरुवनंतपुरम इथल्या पद्मनाभन मंदिराला भेट दिली.
दर्शन झाल्यानंतर केशवने सोशल मीडियावर फोटो शेअर केला. 'जय माता दी' असं लिहून केशवने भारतीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. भारतात साजरा होणाऱ्या सणाच्या शुभेच्छा पाहुण्या संघातील खेळाडूने दिल्याने सोशल मीडियावर केशव महाराजचं नाव चर्चेत आहे.
यंदाच्या वर्षीच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्यातील वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय संघावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवला.
भारतासारख्या बलाढ्य संघाला खणखणीत पद्धतीने हरवणं खूप महत्त्वपूर्ण असल्याची पोस्ट केशवने लिहिली होती. भारताचा संघ तुल्यबळ आहे, त्यांना नमवणं हे दक्षिण आफ्रिका संघासाठी मोठं यश आहे अशी पोस्ट केशवने लिहिली. पोस्टनंतर केशवने 'जय श्रीराम' असं लिहिलं.
दक्षिण आफ्रिका संघाच्या विजयाचं महत्त्व सांगणाऱ्या पोस्टनंतर 'जय श्रीराम' दिसल्याने भारतीय चाहते चक्रावून गेले. केशवने असं का लिहिलं हे समजून घेण्यासाठी थोडा इतिहास लक्षात घेणं आवश्यक आहे.
केशवचं भारताशी जुनं नातं आहे. उत्तर प्रदेशातलं सुलतानपूर हे महाराज कुटुंबांचं मूळ गाव. 1874 मध्ये त्याचे पूर्वज भारतातून दक्षिण आफ्रिकेत रवाना झाले. कारण अर्थातच रोजगार हे होतं. दक्षिण आफ्रिकेतल्या दरबान इथे महाराज कुटुंबीय स्थायिक झाले. ते तिथेच राहिले, पुन्हा भारतात आले नाहीत.
केशवचे वडील आत्मानंद महाराज हेही क्रिकेटपटू होते. दक्षिण आफ्रिकेतल्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ते खेळायचे पण देशासाठी खेळू शकले नाहीत. केशवच्या क्रिकेट आवडीला त्यांनी प्रोत्साहन दिलं.

फोटो स्रोत, Social media
क्वा झुलू नाताल या डोमेस्टिक संघाने दक्षिण आफ्रिकेला असंख्य खेळाडू दिले आहेत. या परंपरेतलं केशव हे नवं नाव.
दक्षिण आफ्रिकेकडे वेगवान गोलंदाजांचा ताफा नेहमीच असतो. प्रतिस्पर्धी फलंदाजांना धडकी भरवतील असे एकापेक्षा एक वेगवान गोलंदाज त्यांच्याकडे असतात. केशवनेही वेगवान गोलंदाज म्हणूनच खेळायला सुरुवात केली होती. हा पर्याय न स्वीकारता फिरकीपटू होण्याकडे लक्ष दिलं.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये केशवने डावखुरा फिरकीपटू म्हणून स्वत:चं स्थान निर्माण केलं. वेगवान गोलंदाजांना अतिशय अनुकूल अशा पर्थच्या खेळपट्टीवर 2016 मध्ये केशवने कसोटी पदार्पण केलं.
तेव्हापासून सातत्यपूर्ण प्रदर्शनाच्या बळावर केशवने दक्षिण आफ्रिकेच्या संघात कायमस्वरुपी स्थान पटकावलं आहे. फिरकीच्या बरोबरीने केशवने संघ अडचणीत असताना उपयुक्त खेळीही केल्या आहेत. 45 टेस्टमध्ये केशवच्या नावावर 84 विकेट्स आहेत आणि 4 अर्धशतकंही आहेत.
24 वनडे आणि 18 ट्वेन्टी20 मध्येही केशवने दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे.
2018 मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी 'इंडियन एक्स्प्रेस'च्या संदीप द्विवेदी यांनी केशवच्या इंडिया कनेक्शनची बातमी दिली होती.
1992 मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. वर्णभेदी धोरणामुळे दक्षिण आफ्रिका संघावरची बंदी उठल्यानंतरचा हा दौरा होता.
त्यावेळी भारताचे विकेटीकीपर बॅट्समन किरण मोरे यांच्याबरोबर एका चिमुरड्याचा फोटो आहे. किरण, आत्मानंद यांच्या घरी गेले होते. त्यावेळी हा फोटो काढण्यात आला होता. किरण यांनी हा मुलगा क्रिकेट खेळेल असं भाकीत वर्तवलं होतं.

फोटो स्रोत, PHILL MAGAKOE
गेल्या वर्षी केशवने टेस्टमध्ये हॅट्ट्रिक घेण्याची किमया केली. दक्षिण आफ्रिकेसाठी टेस्ट क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा केशव केवळ दुसराच खेळाडू आहे.
केशवने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना कायरेन पॉवेल, जेसन होल्डर आणि जोशुआ डिसिल्व्हाला बाद करत विक्रम केला. याआधी 1960 मध्ये जेफ गिफ्रिन यांनी आफ्रिकेसाठी पहिल्यांदा हॅटट्रिक घेतली होती.
गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेचा संघ श्रीलंका आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना कर्णधार तेंबा बावुमा दुखापतग्रस्त झाल्याने केशवकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर असतानाही केशवने कर्णधारपद हाताळलं होतं.

फोटो स्रोत, Social media
केशव हनुमानाचा भक्त आहे. बनासवाडी इथल्या हजार वर्ष पुरातन हनुमान मंदिराला त्याने भेट दिली होती. त्यावेळी तिथे विलक्षण ऊर्जामय वातावरण अनुभवल्याचं केशवने सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








