You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
WPL च्या या सीझनमुळं वर्ल्ड कपसाठी भारताच्या आशा का वाढल्या?
- Author, प्रवीण
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"आमच्यासाठी आणखीन एक सिझन चांगला गेला, पण याही स्पर्धेत आम्ही अंतिम रेषा ओलांडू शकलो नाही."
विमेन्स प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाची कर्णधार मेग लॅनिंग म्हणाली की, त्यांचा संघ या स्पर्धेतही जिंकू शकली नाही.
सलग तिसऱ्या डब्ल्यूपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने पॉईंट्स टेबलवर पहिल्या क्रमांकावर राहून अंतिम सामन्यात जागा मिळवली होती. मात्र याही स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने पहिल्या सीझनमधल्या विजयाची पुनरावृत्ती करण्यात यश मिळवलं.
मुंबई इंडियन्स संघाने मिळवलेल्या जेतेपदाखेरीज इतर बऱ्याच कारणांनी ही स्पर्धा विशेष ठरली. या स्पर्धेचा परिणाम येत्या काही दिवसांमध्ये भारतीय संघाच्या एकूण कामगिरीवर देखील होऊ शकतो.
यावर्षीच्या शेवटी भारतात महिलांचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक (वर्ल्ड कप) आयोजित केला जाणार आहे. विमेन्स प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या दहा फलंदाजांमध्ये चार भारतीय फलंदाज होते. आगामी वर्ल्डकपचा विचार करता ही बाब भारतीय क्रिकेट संघासाठी अत्यंत सकारात्मक ठरू शकते.
भारतीय संघाची आक्रमक फलंदाज शेफाली वर्मा फॉर्ममध्ये परतली आहे. याशिवाय हरमनप्रीत कौरने मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करत उत्तम फलंदाजी देखील केलेली आहे. तसेच ऋचा घोष आणि हरलीन देओलने देखील या स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेली आहे.
तसेच काशवी गौतम आणि प्रिया मिश्रासारख्या उदयोन्मुख खेळाडूंनी देखील त्यांच्या खेळाची चमक दाखवून दिलेली आहे.
हरमनप्रीत कौरने कमाल केली
शनिवारी (15 मार्च) झालेल्या फायनलमध्ये हरमनप्रीत कौर फलंदाजीला उतरली तेव्हा मुंबई इंडियन्सने 6 ओव्हर्समध्ये 20 धावा करून दोन विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी हा संघ मोठ्या अडचणीत सापडला होता.
मात्र, हरमनप्रीत कौरने तिच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर संघावर आलेला दबाव हटवण्याचा प्रयत्न केला. तिने 44 बॉलमध्ये 66 धावा केल्या आणि याच खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा संघ 20 ओव्हर्समध्ये 149 धावा करता आल्या.
कर्णधार हरमनप्रीत कौरने केलेल्या फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यात यशस्वी ठरली. संपूर्ण स्पर्धेत हरमनप्रीतने चांगला फॉर्म कायम ठेवला. तिने 10 सामन्यांमध्ये 33 च्या सरासरीने 155 च्या स्ट्राइक रेटने 302 धावा केल्या.
मॅच संपल्यानंतर हरमनप्रीत कौर संघाच्या कामगिरीवर समाधानी होती आणि ती म्हणाली, "हे विजेतेपद खूप महत्त्वाचं आहे. यंदा आम्ही प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. संघाच्या पातळीवर आम्ही गोष्टी सरळ सोप्या ठेवल्या, आणि यात आम्हाला यश मिळालं."
शेफाली वर्माचा कमबॅक
मागच्या नोव्हेंबर महिन्यात खराब फॉर्ममुळे शेफाली वर्माला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तिने 10 डावांमध्ये एकही अर्धशतक देखील झळकावलं नव्हतं.
संघातून वगळल्यानंतर शेफालीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन केलं. महिलांच्या एकदिवसीय चॅलेंजर ट्रॉफीमध्ये खेळताना तिने 97 च्या सरासरीने तब्बल 388 धावा फटकावल्या. या स्पर्धेत ती सर्वाधिक धाव करणारी फलंदाज देखील ठरली.
देशांतर्गत स्पर्धांमधला तिचा फॉर्म तिने डब्ल्यूपीएलमध्ये देखील कायम राखला. तिने खेळलेल्या 9 सामन्यांमध्ये 153च्या स्ट्राइक रेटने 304 धावा केल्या.
भारतीय संघात शेफाली वर्माच्या जागी निवड झालेल्या प्रतिका रावलने 6 सामन्यांमध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकं झळकावून वेगळी छाप पाडली आहे. मात्र, शेफाली वर्माचं फॉर्ममध्ये परत येणं भारतीय संघासाठी अतिशय चांगली बातमी आहे.
काशवी गौतम आणि प्रिया मिश्रा
भारतीय संघाची अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकर जखमी झाल्यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. याशिवाय आणखीन एक अष्टपैलू खेळाडू असणारी अरुधंती रेड्डी देखील फॉर्ममध्ये दिसत नाहीये.
पण आता भारताला आणखीन एक पर्याय मिळाला आहे आणि त्या खेळाडूचं नाव आहे काशवी गौतम. काशवीने महिलांच्या प्रीमियर लीगमध्ये उत्तम गोलंदाजी तर केली आहेच, पण तिच्या फलंदाजीने देखील अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
काशवीने अत्यंत कंजूस गोलंदाजी करत 9 सामन्यांमध्ये 11 विकेट मिळवल्या. तिने फक्त 6.45 च्या सरासरीने धावा खर्च केल्या. या संपूर्ण स्पर्धेत सगळ्यात कमी धावा दिलेल्या गोलंदाजांच्या यादीत ती दुसऱ्या क्रमांकावर होती.
काशवीला पाचवेळा फलंदाजीची संधी मिळाली आणि त्यात तिने एकदा नाबाद राहून 43 धावा केल्या.
21 वर्षांच्या काशवी व्यतिरिक्त 20 वर्षांची लेगस्पिनर प्रिया मिश्रा देखील यंदा चर्चेत राहिली. तिने 9 सामन्यांमध्ये 6 विकेट मिळवल्या. मात्र खास बाब ही की तिने मिळवल्या सहाच्या सहा विकेट या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंच्या होत्या.
प्रिया मिश्राची गुगली देखील अनेकांना समजली नाही. आगामी काळात भारतीय क्रिकेट संघात खेळण्याची क्षमता असल्याचं तिने सिद्ध केलं आहे.
भारतीय संघासाठी चिंतेच्या गोष्टी
मागच्या काही वर्षांमध्ये भारतीय संघामध्ये हरलीन देओलने महत्त्वाचं स्थान निर्माण केलं आहे. मात्र तिच्या कामगिरीत सातत्य दिसून आलेलं नाही. डब्ल्यूपीएलच्या या सिझनमध्ये हरलीनने 39 च्या सरासरीने 232 धावा केल्या. भारतीय संघासाठी हे अत्यंत दिलासादायक गोष्ट आहे.
तर रिचा घोषने 8 सामन्यांमध्ये 38 च्या सरासरीने आणि 175 च्या स्ट्राईक रेटने 230 धावा केल्या. तिची चमकदार कामगिरी भारतीय महिला क्रिकेट संघासाठी खूप चांगली बाब आहे.
वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीचा विचार केला तर भारतीय खेळाडूंना फारशी कमाल करता आलेली नाही. शिखा पांडेने 9 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या, तर रेणुका ठाकूरने 7 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या.
वेगवान गोलंदाजीच्या बाबतीत भारतीय संघाला अधिक खेळाडूंचा शोध घ्यावा लागेल.
याशिवाय, भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने केवळ कर्णधार म्हणूनच नाही तर फलंदाज म्हणूनही निराशा केली. स्मृतीने 8 सामन्यांमध्ये फक्त 24.62 च्या सरासरीने फक्त 197 धावा केल्या.
भारतीय महिला क्रिकेट संघाची नंबर वन अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा गेल्या वर्षी प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी खेळाडू ठरली होती. याच कारणास्तव, तिला यावर्षी यूपी वॉरियर्सची कर्णधार म्हणूनही नियुक्त करण्यात आलं होतं.
दीप्ती तिच्या कर्णधारपदाचा प्रभाव पाडू शकली नाही आणि तिचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर राहिला.
दीप्तीच्या कामगिरीवर कर्णधारपदाचा दबावही दिसून येत होता. या वर्षी, दीप्तीचे नाव सर्वाधिक धावा करणाऱ्या 15 फलंदाजांमध्ये किंवा सर्वाधिक विकेट घेणाऱ्या 15 गोलंदाजांमध्ये देखील समाविष्ट नव्हते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.