You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अवघ्या 14 वर्षांच्या आयरा जाधवचं त्रिशतक, मुंबईकडून महिलांच्या अंडर-19 क्रिकेटमध्ये नवा विक्रम
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
मुंबईची युवा फलंदाज आयरा जाधवने देशांतर्गत अंडर19 क्रिकेटमध्ये खणखणीत त्रिशतक झळकावलं आणि विक्रमाची नोंद केली. आयराच्या विक्रमाविषयी बीबीसी मराठीनं तिचे वडील आणि प्रशिक्षकांशी बातचीत केली.
14 वर्षीय आयरानं बीसीसीआयने आयोजित केलेल्या महिलांच्या अंडर-19 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाकडून सलामीला खेळताना मेघालयच्या संघाविरुद्ध केवळ 157 चेंडूत नाबाद 346 धावा केल्या.
19 वर्षांखालील वयोगटाच्या क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूनं (पुरुष किंवा महिला) बजावलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. याआधी हा विक्रम महाराष्ट्राच्या स्मृती मंधानाच्या नावावर होता.
आयराने 12 जानेवारीला बंगळुरूत अलूर क्रिकेट मैदानावर खेळताना मेघालयच्या गोलंदाजीवर आक्रमण चढवलं तिने 42 चौकार आणि 16 षटकार लगावले.
तिनं दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार हर्ली गालासोबत 274 धावांची तर तिसऱ्या विकेटसाठी दिक्षा पवारसोबत 186 धावांची भागीदारीही रचली. हर्लीनं 116 तर दिक्षानं 137 धावा केल्या.
आयराच्या खेळीच्या बळावर मुंबई संघाने 50 षटकांत 3 बाद 563 धावा केल्या. भारतात आतापर्यंतच्या सर्व स्पर्धा आणि वयोगटात महिला संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
मेघालयचे सगळे फलंदाज 26 षटकांत केवळ 19 धावांमध्ये गारद झाले आणि मुंबईनं हा सामना तब्बल 544 धावांनी जिंकला.
त्यानंतर आयराचं सगळीकडे कौतुक होऊ लागलं. पण आयराच्या वडिलांना, सचिन जाधव यांना, तोवर तिनं असा काही विक्रम केला असेल याची कल्पनाही नव्हती.
"आयरा चांगली खेळते आहे, चांगल्या रन्स केल्या आहेत हे समजलं होतं कारण आम्ही स्कोर पाहात होतो. पण हा विक्रम असेल अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे रेकॉर्ड झाल्याचं कळलं तेव्हा घरी आम्हाला अतिशय आनंद झाला," असं ते सांगतात.
आयराचा आतापर्यंतचा प्रवास
सचिन डेटा अॅनालिटिक्समध्ये काम करायचे तर त्यांची पत्नी शिल्पा आधी बँकेत नोकरी करत होत्या आणि नंतर कलाक्षेत्रात काम करत होत्या. आयराची मोठी बहीणही नेहा सध्या बारावीत आहे.
जाधव कुटुंब आधी पुण्यात राहायचे. पण आयराची खेळातली प्रगती पाहून सचिन आणि शिल्पा यांनी 2022 साली मुंबईला राहायला जाण्याचा निर्णय घेतला.
8 वर्षांची असताना आयरानं पहिल्यांदा घरीच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती आणि हळूहळू तिला खेळात आणखी रस निर्माण झाला.
आयरा भारतीय क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्सची चाहती आहे आणि महिला टीमची कामगिरी पाहून लहान वयातच तिनं क्रिकेटमध्ये करियर करायचं ठरवलं.
साधारण साडेअकरा-बारा वर्षांची असताना आयराला तिच्या आईवडिलांनी मुंबईत आणलं प्रशिक्षक कल्पना मुरकर आणि त्यांचा मुलगा वैदिक मुरकर यांच्याकडे ते तिला घेऊन गेले आणि दोघांच्या मार्गदर्शनात आयरा शिवाजी पार्कवर सराव करू लागली.
पुढे आयराला शारदाश्रम विद्यामंदिरच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश मिळाला. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे शारदाश्रमचेच माजी विद्यार्थी आहेत. तर कल्पना या सचिन आणि विनोदला प्रशिक्षण देणाऱ्या रमाकांत आचरेकर सरांची कन्या आहेत.
आयराच्या सुरुवातीच्या दिवसांविषयी कल्पना सांगतात, "ती आली तेव्हा छोटी होती. मी तिला आधी इरा म्हणायचे, तर ती मला सांगायची, 'मॅडम मला आयरा बोला. आयफोन, आयपॅड, तसं आयरा.' मला अजूनही आठवतंय, ती तेव्हापासूनच छान खेळायची," असं कल्पना यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
शिवाजी पार्कवर ग्लोरियस क्रिकेट क्लबकडून खेळताना आयराच्या खेळानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. लहान वयोगटात अनेकदा मुला-मुलींचे एकत्र सामने होतात.
कल्पना सांगतात, "आयरा बॅटिंग करायला आली, की बॉल मिळणं मुश्किल होतं. एवढे लांब लांब मारते ती, की बिचारी मुलंपण धावतायत आपली बॉल आणायला."
"आयरा सहज बाद होत नाही. तिचा खेळ अगदी कडक आणि स्ट्राँग आहे. शालेय क्रिकेटमध्येही ती पाय रोवून खेळायची. त्या कामगिरीनं तिला लवकरच मुंबईच्या अंडर-15 संघात स्थान मिळालं."
नोव्हेंबर 2024 मध्ये आयराला मुंबईच्या सीनियर टी20 संघातही स्थान मिळालं. वानखेडे स्टेडियमवर राष्ट्रीय पातळीवरच्या महिलांच्या टी20 स्पर्धेच्या फायनलमध्ये आयरा मुंबईकडून खेळली.
त्याच वर्षी अंडर-19 आशिया कपसाठी भारतीय संघातही आयराला स्थान मिळालं असतं, मात्र आदल्या दिवशीच फिल्डिंग करताना करंगळीला दुखापत झाल्यानं तिची संधी हुकली, अशी माहिती कल्पना देतात.
अभ्यासाशी ताळमेळ आणि मुलींचं क्रिकेट
खेळ सुरू असतानाच आयरा बऱ्यापैकी अभ्यासाकडेही लक्ष देते. तिला गणिताची आवड असल्याचं सचिन सांगतात.
काही महिन्यांपूर्वी आयराच्या खेळावर जास्त लक्ष देता यावं, यासाठी सचिन यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला
"ती सीनियर गटात खेळली, तरी आमच्यासाठी अजून लहानच आहे. त्यामुळे आम्ही तिची शक्य तेवढी काळजी घेतो. शक्य असेल तेव्हा मी आणि माझी पत्नी तिच्यासोबत जातो."
आयरानं सुरुवात केली तेव्हा मुलींचे संघ असे फारसे नसायचे आणि मुलं मुली एकत्र खेळत, पण सहा वर्षांत परिस्थिती बदलू लागली आहे, असं निरीक्षण ते नोंदवतात.
तसंच क्रिकेट खेळणाऱ्या मुलींसाठी वातावरण पोषक होत असल्याचं ते सांगतात.
"आजही मुलींचं क्रिकेटचं जग तसं छोटं आहे, सगळे पालक एकमेकांना ओळखतात, वेळप्रसंगी मदतही करतात. आजही मला अनेकांचे फोन आले, सगळ्यांना आनंद झाला आहे. कुणीही चांगला खेळ केला की ते एकमेकांचं कौतुक करतात, पाठिंबा देतात. हे मला महत्त्वाचं वाटतं."
WPL साठी बोली नाही, पण भारतीय संघात राखीव
डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या विमेन्स प्रीमियर लिगच्या 2025 लिलावात लिलाचा समावेश होता, मात्र तिच्यावर एकही बोली लागली नाही.
या लिलावात समावेश झालेल्या आयरा (14 वर्षे) आअणि अंशू नागर (13 वर्षे) या सर्वात तरुण खेळाडू होत्या.
मात्र काही दिवसांनी ICC अंडर-19 ट्वेन्टी20 विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात आयराला राखीव खेळाडू म्हणून स्थान मिळालं. 18 जानेवारीपासून मलेशियात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.