नवाबाने केलेली पाकिस्तानमध्ये विलिनीकरणाची घोषणा, मग जुनागड संस्थान भारतात विलीन कसं झालं?

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी

भारत स्वतंत्र झाला होता. मात्र तीन संस्थानांनी भारतात विलीनीकरण करण्याच्या दस्तावेजावर सही केली नव्हती. ही तीन संस्थानं म्हणजे हैदराबाद, काश्मीर आणि जुनागड.

जुनागड हे संस्थान आजच्या गुजरात राज्यात होतं. हे संस्थान म्हणजे गिरनारचे डोंगर, जंगलं आणि अरबी समुद्र यामध्ये असणारा प्रदेश होता.

ते जंगलांमधील सिंहांसाठी प्रसिद्ध होतं. तिथले संस्थानिक होते- नवाब मोहम्मद महाबत खाँ. संस्थानिक जरी मुस्लीम असले तरी संस्थानातील 80 टक्के जनता हिंदूच होती.

जुनागड संस्थानच्या तीन बाजूला भारताची सीमा होती. तर चौथ्या बाजूला एक मोठा समुद्रकिनारा होता. वेरावल हे जुनागड संस्थानातील मुख्य बंदर होतं. ते पाकिस्तानची तत्कालीन राजधानी असलेल्या कराची शहरापासून फक्त 325 मैल अंतरावर होतं.

जुनागडचे नवाब कुत्रे पाळण्याच्या छंदासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्याकडे थोडेथोडके नव्हे तर तब्बल दोन हजार कुत्रे होते.

कुत्रे पाळण्याचा आणि त्यांचं लग्न लावण्याचा छंद

डॉमिनिक लॅपिएर आणि लॅरी कॉलिन्स यांनी 'फ्रीडम ॲट मिडनाईट' हे पुस्तक लिहिलं आहे.

या पुस्तकात ते लिहितात, "त्यांच्या कुत्र्यांना विशिष्ट प्रकारच्या घरांमध्ये ठेवलं जात असे. तिथे वीज आणि फोनची सुविधा असायची. त्यांची देखभाल करण्यासाठी नोकर नेमलेले असायचे."

"तिथे कुत्र्यांचं एक कब्रस्तानसुद्धा होतं. त्या कब्रस्तानात संगमरवरानं बनलेल्या कबरींमध्ये कुत्र्यांना दफन केलं जायचं."

इतंकच काय, नवाब साहेब या कुत्र्यांचं लग्नदेखील लावत असतं. असंच एक लग्न रोशनआरा आणि बॉबी या लॅब्राडॉर कुत्र्यांचं झालं होतं.

लॅपिएर आणि कॉलिन्स लिहितात, "या विवाहासाठी भारतातील प्रत्येक मोठा राजा, संस्थानिक आणि मान्यवर व्यक्तींना आमंत्रण देण्यात आलं होतं. आमंत्रण देण्यात आलेल्या लोकांमध्ये भारताचे व्हॉईसरॉय लॉर्ड इरविन यांचाही समावेश होता. मात्र लॉर्ड इरविन या समारंभाला उपस्थित राहिले नव्हते."

"कुत्र्यांच्या मिरवणुकीत नवाबांचे अंगरक्षक पुढे होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ते पाहण्यासाठी जवळपास दीड लाख लोकांची गर्दी जमली होती. या मिरवणुकीनंतर नवाबांनी या लग्नाच्या आनंदात मोठी मेजवानी दिली. तसंच संपूर्ण संस्थानात तीन दिवसांची सुट्टीदेखील जाहीर करण्यात आली होती."

नवाबांनी त्यांच्या संस्थानातील आशियाई सिंह नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी बराच मोठा बंदोबस्त केला होता. त्यांनी इंग्रजांनादेखील या सिंहांची शिकार करण्यास मनाई केली होती. नवाबांनी गिर गाईंचं प्रजनन आणि संवर्धन करण्यातदेखील बराच रस दाखवला होता.

जुनागडच्या नवाबानं पाकिस्तानात विलीनीकरणाची केली घोषणा

जुनागडच्या संस्थानातच सोमनाथचं प्रसिद्ध मंदिर होतं. याच संस्थानात गिरनार देखील होतं. तिथे एका डोंगराच्या शिखरावर संगमरवरी भव्य जैन मंदिरदेखील होतं. संपूर्ण भारतातून हजारो यात्रेकरू सोमनाथ आणि गिरनारच्या मंदिरात दर्शनासाठी येत असत.

भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेस जुनागडबद्दल विचारविनिमय सुरू होता. त्यावेळेस जुनागडचे नवाब महाबत खाँ युरोपात सुट्ट्या घालवण्यासाठी गेलेले होते.

ते देशाबाहेर असतानाच संस्थानचे तत्कालीन दिवाण अब्दुल कादिर मोहम्मद हुसैन यांना पदावरून दूर करून सर शाहनवाज भुट्टो यांना जुनागडचा दिवाण करण्यात आलं होतं.

सर शाहनवाज भुट्टो सिंधमधील मुस्लीम लीगचे मातब्बर नेते होते. तसंच मोहम्मद अली जिना यांच्या अतिशय जवळचे होते.

रंजक गोष्ट म्हणजे जुनागडचे दिवाण शाहनवाज भुट्टो यांचे पुत्र पुढे पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. त्याचं नाव झुल्फिकार अली भुट्टो.

रामचंद्र गुहा यांनी 'इंडिया आफ्टर गांधी' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते लिहितात, "युरोपातून परतल्यावर नवाबांच्या दिवाणांनी त्यांच्यावर भारतात संस्थानचं विलीनीकरण न करण्यासाठी दबाव टाकला. 14 ऑगस्टला सत्तांतराचा दिवस आल्यावर नवाबांनी जाहीर केलं की जुनागडचं पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करण्यात येईल."

"नवाब यांना तसं करण्याचा कायदेशीर अधिकार होता. मात्र भौगोलिकदृष्ट्या याला काही अर्थ नव्हता. कारण जुनागडला संस्थानाला पाकिस्तानची कोणतीही सीमा लागत नव्हती."

"तसंच मोहम्मद अली जिना यांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतानुसार ते नव्हतं. कारण या संस्थानातील 82 टक्के जनता हिंदू होती."

भारतीय नेतृत्वासमोरील समस्या

त्याआधी दिल्लीत नवानगरचे जाम साहेब आणि ध्राँगध्राचे महाराज यांनी सरदार पटेल यांचे सर्वात जवळचे सहकारी व्ही पी मेनन यांना जुनागडच्या नवाबांच्या हेतूंबद्दल सतर्क केलं होतं.

या गोष्टीचा आणखी संकेत मिळाला तो 12 ऑगस्ट 1947 ला. त्यावेळेस जुनागडनं भारतात विलीनीकरण करण्याचे कोणतेही संकेत दिले नाहीत. सर शाहनवाज भुट्टो यांनी फक्त इतकाच संदेश पाठवला की या मुद्द्याबाबत विचारविनिमय केला जातो आहे.

13 ऑगस्टला जुनागडच्या हिंदूंनी नवाबांना एक अर्ज दिला. त्यात म्हटलं होतं की जुनागडचं भारतात विलीनीकरण झालं पाहिजे. तर शाहनवाज भुट्टोंनी नवाबांसमोर युक्तिवाद केला की ऐतिहासिकदृष्ट्या काठियावाड हा सिंध प्रांताचा भाग राहिला आहे. देश स्वतंत्र झाल्यावर सिंध पाकिस्तानात असणार आहे.

नारायणी बसू यांनी व्ही. पी. मेनन, 'द अनसंग आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया' हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात त्या लिहितात, "व्ही पी मेनन यांना जुनागडच्या या हेतूंबद्दलची माहिती पहिल्यांदा वृत्तपत्रांमधून मिळाली. ते ऐकताच ते हादरले. त्यांनी विचार केला की जर जुनागड पाकिस्तानात गेलं, तर त्याचा परिणाम काठियावाडमधील इतर संस्थानांवरदेखील होईल."

"हैदराबादमध्ये आधीच कट्टरतावादी नेते कासिम रिझवी उघडपणे म्हणू लागले होते की सरदार पटेल हैदराबादबद्दल इतकं बोलत आहेत. प्रत्यक्षात जुनागडसारखं छोटंसं संस्थानदेखील त्यांना हाताळता येत नाहीये."

व्ही. पी. मेनन यांचे सचिव सी. जी. देसाई यांचं मत होतं की जुनागडच्या विरोधात भारत सरकारनं कारवाई केली पाहिजे. त्यांचा सल्ला होता की संस्थानचा अन्नधान्याचा पुरवठा रोखण्यात यावा आणि भारतीय सैनिकांची एक तुकडी राजकोटला पाठवण्यात यावी. म्हणजे जुनागडवर दबाव टाकता येईल.

नारायणी बसू लिहितात, "देसाई यांची पुढील योजना होती की संस्थानातील छोटे जिल्हे आणि तालुके यांना भारतात विलीनीकरण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे जुनागडच्या दरबारापासून तिथल्या लोकांच्या सुरक्षेसाठी त्या भागात जाण्याचं निमित्त भारताला मिळेल."

जुनागडच्या विलीनीकरणासाठी पाकिस्तान तयार

व्ही. पी. मेनन ही योजना घेऊन सरदार पटेलांकडे गेले. सरदार पटेल त्यासाठी लगेच राजी झाले. सशस्त्र पोलिसांची एक कंपनी राजकोटला पाठवण्यात आली. संरक्षण विभागाला सांगण्यात आलं की या मोहिमेसाठी त्यांनी तात्काळ काही सैनिक पाठवावेत.

रेल्वे बोर्डाला आदेश देण्यात आला की त्यांनी जुनागडला कोळसा आणि पेट्रोलचा पुरवठा करणं थांबवावं. दूरसंचार विभागानं जुनागड आणि पाकिस्तानमधील संभाषण ऐकण्यास आणि रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली.

नेहरूंनी पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खाँ यांना तार पाठवली. त्यात नेहरूंनी म्हटलं, "भारत किंवा पाकिस्तान, या दोघांपैकी एकाची निवड करण्यास जुनागड स्वतंत्र आहे. मात्र लोकांची इच्छा लक्षात घेतली जाईल, संस्थानिकांची नाही."

तिकडे जुनागडचे दिवाण शाहनवाज भुट्टो वारंवार जिनांना तार पाठवून अपील करत होते की त्यांनी त्यांना कथितरीत्या 'लांडग्यांनी खाण्यापासून वाचवावं.' (जिना पेपर्स, पान क्रं. 264-266)

जुनागडच्या दिवाणांनी केलेल्या या आवाहनाबाबत, पाकिस्तान काही आठवडे गप्प होता. मात्र 13 सप्टेंबरला पाकिस्ताननं जुनागडच्या पाकिस्तानातील विलीनीकरणाला मंजुरी दिली.

रामचंद्र गुहा लिहितात, "असं वाटतं की जुनागडचा वापर करून जम्मू-काश्मीरबाबत सौदेबाजी करता यावी म्हणून पाकिस्ताननं हे केलं असेल. 15 ऑगस्टपर्यंत काश्मीरचं देखील कोणत्याही देशात विलीनीकरण झालेलं नव्हतं."

"तिथे संस्थानिक हिंदू होते आणि संस्थानातील बहुतांश जनता मुस्लीम होती. जुनागडमधील परिस्थिती काश्मीरच्या बरोबर उलटी होती."

नवाबांनी मेनन यांची भेट घेण्यास दिला नकार

जुनागडचं पाकिस्तानात विलीनीकरण होण्याच्या मुद्द्यावर भारतीय नेते खूप नाराज झाले.

नारायणी बसू लिहितात, "केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर सर्वात आधी केंद्रीय सुरक्षा पोलिसांना जुनागडच्या दक्षिणेला बाबरियावाद आणि बिल्खामध्ये पाठवण्यात आलं. वेरावल आणि केशोद या दोन्ही ठिकाणांवर नियंत्रण मिळवण्याचीही योजना तयार करण्यात आली."

"पाकिस्तानचं नौदल आणि हवाई दलाच्या हस्तक्षेपाची शक्यता संपवण्यासाठी हे करणं आवश्यक होतं."

त्यांनी पुढे लिहिलं आहे, "केशोद इथं हवाईतळ होता आणि वेरावल इथं बंदर होतं. त्यावर नियंत्रण मिळवण्यात यावं. जुनागडची लष्करी घेराबंदी करण्याच्या व्यूहरचनेचा परिणाम लगेचच दिसू लागला."

"सैनिकांना तैनात केल्यामुळे भुट्टो इतके त्रस्त झाले की त्यांनी लियाकत अली यांना नाईलाजानं लिहिलं की जर या महत्त्वाच्या क्षणी पाकिस्ताननं आमची मदत केली नाही, तर आमचं संपणं निश्चित आहे."

18 सप्टेंबरला व्ही पी मेनन जुनागडला गेले. व्ही. पी. मेनन यांनी 'इंटिग्रेशन ऑफ इंडिया' हे पुस्तक लिहिलं आहे.

या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे, "नवाबांनी आजारी असल्याचा बहाणा करून मला भेटण्यास नकार दिला. इतकंच काय, त्यांचे पुत्र आणि युवराज देखील क्रिकेट सामन्यात इतके व्यस्त होते की मला भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता."

"मला नाईलाजानं तिथले दिवाण शाहनवाज भुट्टो यांची भेट घ्यावी लागली. त्यांनी माझ्याकडे तक्रार केली की गुजराती वृत्तपत्रांमधील विखारी लेखनानं जुनागडच्या लोकांच्या भावना चिथावण्यात आल्या आहेत."

मुंबईत झाली 'समांतर सरकार'ची स्थापना

काही दिवसांनी परिस्थिती आणखी चिघळली. कारण नवाबांनी शेजारच्या संस्थानांवर कब्जा करण्यासाठी त्यांचे सैनिक पाठवले.

हिंडोल सेनगुप्ता यांनी सरदार पटेल यांचं चरित्र लिहिलं आहे. त्याचं नाव आहे, 'द मॅन हू सेव्ह्ड इंडिया'.

त्यात सेनगुप्ता यांनी लिहिलं आहे, "सरदार पटेलांना वाटत होतं की बाबरियावादमध्ये जुनागडचे सैनिक पाठवले जाणं आणि तिथून त्यांना माघारी बोलावण्यास नकार देणं ही एक आक्रमक कारवाई आहे. याला ताकदीचा वापर करूनच प्रत्युत्तर दिलं पाहिजे."

दरम्यान, नवाबांनी त्यांच्या जनतेचा पाठिंबा गमावला आहे, असं म्हणत मुंबईत महात्मा गांधीजींचे पुतणे सामलदास गांधी यांच्या नेतृत्वाखाली जुनागडच्या एका समांतर सरकारची म्हणजे 'आरजी सरकार'ची स्थापना करण्यात आली.

तिकडे दिल्लीत परतल्यावर व्ही. पी. मेनन यांनी 25 सप्टेंबर 1947 ला दिल्लीत ब्रिटनचे उप-उच्चायुक्त ॲलेक्झांडर सायमन यांची भेट घेतली.

मेनन त्यांना म्हणाले, "भारत सरकार जुनागडला कधीही भारतापासून वेगळं होऊ देणार नाही. या मुद्द्यावर जुनागडच्या लोकांची जनमत चाचणी घेण्यात यावी, याची खातरजमा भारत सरकार करेल."

सायमन यांनी त्यांच्या सरकारशी बोलून ही माहिती देताना सांगितलं की मेनन यांच्या देहबोलीतून असं वाटत नव्हतं की ते फक्त बतावणी करत हेत. भारताचे लष्करप्रमुख जनरल रॉब लॉकहार्ट यांना वाटत होतं की पाकिस्तानच्या सैन्यात जुनागडमध्ये लष्करी कारवाई करण्याची क्षमता नाही.

व्ही पी मेनन त्यांचं वैयक्तिक मत देताना म्हणाले की जुनागडच्या शेजारची संस्थानं त्यांच्याविरोधात शस्त्रं हाती घेण्यास तयार आहेत. त्यांना यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे.

सरदार पटेलांनी देखील निर्णय घेतला की जुनागडविरोधात लष्करी कारवाई करण्यासाठी भारतीय सैन्याला सज्ज ठेवलं पाहिजे.

सरदार पटेलांना वाटत होतं की जर जुनागडला पाकिस्तानकडून मदत मिळण्याची सूट देण्यात आली तर लवकरच हैदराबाद संस्थानदेखील त्यांचं अनुकरण करेल.

हैदराबादच्या निजामानं आधीच मागणी केली होती की त्यांना भारतात विलीनीकरणाचा करार करण्याऐवजी 'सहकार्याचा करार' करण्याची परवानगी देण्यात यावी.

अद्याप लष्करी व्यूहरचनेवर चर्चा सुरू होती की तेवढ्यात व्ही पी मेनन यांनी सरदारगड आणि बंटवा या जुनागडच्या शेजारी असणाऱ्या दोन संस्थानांचं भारतात विलीनीकरण केल्याचं जाहीर केलं.

नवाबाचं कराचीला पलायन

भारत आणि पाकिस्तानसंदर्भात जनमत चाचणी करवून घेण्याबाबत संघर्ष सुरूच होता की जुनागडचे नवाब महाबत खाँ यांनी पाकिस्तानला जायचं ठरवलं.

नारायणी बसू लिहितात, शेवटच्या दिवसांमध्ये निर्णय न घेण्याबद्दल बदनाम झालेल्या नवाबांनी पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेताना मात्र कोणताही विलंब केला नाही. घाईघाईनं त्यांच्यासाठी एका विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली.

"त्या विमानात संस्थानाच्या खजिन्यातील सर्व रोकड, दागदागिने, नवाबांचे लाडके कुत्रे आणि त्यांच्या बेगम यांना बसवण्यात आलं. विमानानं उड्डाण करण्याआधी त्यांची एक बेगम त्यांना म्हणाली की ती चुकून तिच्या मुलाला राजवाड्यातच विसरून आली आहे."

"मग नवाबांनी त्या बेगमला खाली उतरवलं आणि ते कराचीला निघून गेले."

नवाबांचं विमान जेव्हा कराचीत उतरलं, तेव्हा त्यांचं गार्ड ऑफ ऑनरनं परंपरागत पद्धतीनं स्वागत करण्याची तयारी करण्यात आलेली होती.

पाकिस्तानातील भारताचे माजी उच्यायुक्त टीसीए राघवन यांनी 'द पीपल नेक्स्ड डोअर' हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात ते लिहितात, "त्या समारंभाला उपस्थित असलेल्या लोकांनी नंतर सांगितलं की विमानाचा दरवाजा उघडताच नवाबांच्या आधी त्यांच्या कुत्र्यांनी खाली उडी मारली आणि विमानाच्या चाकांवर आणि पायऱ्यांवर धारा सोडल्या."

दरम्यान सामलदास गांधी यांच्या 'आरजी सरकार'नं जुनागडच्या काही भागांवर नियंत्रण मिळवण्यास सुरूवात केली होती.

शाहनवाज भुट्टो यांनी लाचार होत भारत सरकारला पत्र लिहून कळवलं की, "रक्तपात रोखण्यासाठी आणि जीवितहानी टाळण्यासाठी मी जुनागडचं प्रशासन भारत सरकारच्या ताब्यात देण्यासाठी तयार आहे."

एन एम बुच यांच्या हाती जुनागडच्या प्रशासनाची जबाबदारी

त्यावेळेस राजकोटचे प्रादेशिक आयुक्त होते एन एम बुच. त्यांनी भुट्टो यांचं पत्र मिळताच व्ही पी मेनन यांना फोन केला. त्यावेळेस मध्यरात्र झालेली होती.

नारायणी बसू लिहितात, "व्ही पी मेनन त्यावेळेस जागे होते आणि नेहरूंच्या निवासस्थानी बसलेले होते. बुच यांनी त्यांना भुट्टो यांचं पत्र वाचून दाखवलं आणि असंही म्हणाले की त्यांनी सामलदास गांधी यांना आधीच फोन केला आहे आणि ते भुट्टोंचा प्रस्ताव स्वीकारण्यास तयार झाले आहेत."

"हे ऐकताच नेहरू अतिशय आनंदी झाले. ते आणि मेनन यांनी जुनागडमध्ये जनमत चाचणी करण्याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली यांना लिहिण्यात येणाऱ्या पत्राचा मसुदा तयार केला."

त्यांनी लिहिलं, "भारत सरकार भुट्टो यांची विनंती मान्य करत आहे, मात्र ते जुनागडचं भारतात विलीनीकरण करण्याआधी जनमत चाचणीद्वारे तिथल्या लोकांच्या भावनादेखील जाणून घेऊ इच्छितात."

व्ही. पी. मेनन तसेच सरदार पटेल यांच्या घरी गेले आणि त्यांना उठवलं. मग त्यांनी लियाकत अली यांना लिहिल्या जाणाऱ्या पत्राचा मसुदा पटेलांना दाखवला. त्यावर सरदार पटेलांनी जनमत चाचणी करण्याच्या प्रस्तावावर आक्षेप घेतला.

पटेल म्हणाले की जुनागडमध्ये प्रशासन नावाची कोणतीही गोष्ट राहिलेली नाही. नवाब आधीच पळून गेले आहेत. जुनागडचे बहुतांश लोक हिंदू आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याची दिवाणांची क्षमता नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी स्वत:च उघडपणे भारत सरकारला हस्तक्षेप करण्यास सांगितलं आहे.

मात्र व्ही पी मेनन यांनी जनमत चाचणीसाठी पटेलांचं मन वळवलं.

9 नोव्हेंबरच्या दुपारी बुच आणि भारतीय सैन्याचे ब्रिगेडियर गुरदयाल सिंह जुनागडला गेले.

जुनागडच्या सैनिकांची शस्त्रं ताब्यात घेण्यात आली. संध्याकाळी सहा वाजता बुच यांनी भारत सरकारकडून जुनागडचं प्रशासन ताब्यात घेतलं. एक दिवस आधीच शाहनवाज भुट्टो देखील जुनागड सोडून कराचीला पळून गेले होते.

चार दिवसांनी सरदार पटेल जुनागडला गेले. तिथे त्यांनी बहाउद्दीन कॉलेजच्या मैदानावर स्थानिक लोकांसमोर भाषण केलं.

जुनागडमध्ये जनमत चाचणी

जुनागडचं प्रशासन ताब्यात घेण्याबाबत सल्ला घेण्यात आला नाही, म्हणून दिल्लीमध्ये माऊंटबॅटन नाराज होते.

रामचंद्र गुहा लिहितात, "माऊंटबॅटन यांचं समाधान करण्यासाठी आणि या कारवाईला वैध ठरवण्यासाठी भारतानं जुनागडमध्ये एक जनमत चाचणी घेतली. 20 फेब्रुवारी 1948 ला झालेल्या जनमत चाचणीत जवळपास दोन लाख लोकांनी भाग घेतला. त्यापैक फक्त 91 लोकांनी पाकिस्तानच्या बाजूनं मतदान केलं."

डेली टेलीग्राफ आणि संडे टाइम्स या लंडनमधील वृत्तपत्रांनी लिहिलं की जनमत चाचणी पूर्णपणे पारदर्शकरित्या पार पडली. मंगरोल, माणावदर, बाबरियावाद, सरदारगड आणि बांटवामध्ये देखील जनमत चाचणी घेण्यात आली.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रश्न उपस्थित झाला की जुनागडचा समावेश कोणत्या राज्यात करण्यात यावा. व्ही पी मेनन यांनी सल्ला दिला की याला सौराष्ट्रशी जोडण्यात यावं. मग जवळपास एक वर्षानंतर 20 फेब्रुवारी 1949 ला जुनागडचा समावेश सौराष्ट्रमध्ये करण्यात आला.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.