धनंजय मुंडे यांना पोटगी म्हणून करुणा शर्मा-मुंडेंना द्यावी लागणार एवढी रक्कम, काय आहे प्रकरण?

करुणा धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे

फोटो स्रोत, Facebook/Dhananjay Munde & Karuna Dhananjay Munde

फोटो कॅप्शन, करुणा धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे

राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांचा पोटगी प्रकरणावरील निकाल आज (6 फेब्रुवारी) न्यायालयाने दिला आहे. धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंना देखभालीसाठी महिन्याला एकूण 2 लाख रुपये द्यावेत, असे या आदेशात म्हटले आहे.

आजचा आदेश फक्त अंतिम देखभालीसाठी रक्कम देणे बाबत इतकाच आहे जो केवळ आर्थिक निकष लक्षात घेऊन पारित केलेला आहे, असे धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.

करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात 'घरगुती हिंसाचार कायद्या'अंतर्गत 2022 मध्ये गुन्हा दाखल केला होता आणि मासिक पोटगीची मागणी केली होती. धनंजय मुंडेंच्या वकिलांनी हे आरोप फेटाळले आहेत.

वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणात पोटगीसंदर्भात निर्णय दिला आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी दिली आहे.

हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, हा फक्त पोटगी संदर्भातील अंतरिम निकाल आहे, असे धनंजय मुंडेंच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.

करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया

न्यायालयाच्या आदेशानंतर प्रतिक्रिया देताना करुणा मुंडे म्हणाल्या, "न्यायालयाचे मी आभार मानते. घरगुती हिंसाचाराबाबत पुढच्या तारखेला सुनावणी होणार आहे. त्याबाबतचे पुरावे मी सादर करणार आहे. बायको म्हणून मला पोटगी मिळाली पाहिजे असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे. घरगुती हिंसाचार, माझ्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराबाबत यानंतर सुनावणी होणार आहे."

"बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी वाल्मिक कराडने मला मारहाण केली होती. बीडच्या तत्कालीन अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यादेखील त्यावेळी उपस्थित होत्या. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असल्यापासून त्यांचा धनंजय मुंडे यांच्यावर वरदहस्त आहे."

"मला मारहाण केल्याप्रकरणी वाल्मिक कराड यांची चौकशी व्हावी. मी जिल्हाधिकाऱ्यांना त्यादिवशीचं सीसीटीव्ही फुटेज मागितलं. मात्र ते मला दिलं नाही. माझ्या मुलांसोबत माझ्या पतीचे संबंध अतिशय चांगले आहेत."

करुणा मुंडे यांनी माध्यमांना सांगितलं की, मी मुंबईत राहायचे तेव्हा पोलीस कधीही येऊन मला पोलीस स्टेशनला घेऊन जायचे. मी एवढंच सांगेन की लढलं पाहिजे. धनंजय मुंडे यांच्यावर माझं खूप प्रेम होतं. आजही त्यांनी माझ्याकडे माझा जीव मागितला तर मी देईन. मी भुकेली राहून त्यांच्याविरोधात लढले.

धनंजय मुंडे यांच्या वकिलांची प्रतिक्रिया

धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी यासंदर्भात एक निवेदन जारी करत सविस्तर माहिती दिली आहे.

त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे की, न्यायालयाने सध्या अंतरिम निर्णय हा पोटगीसंदर्भात आहे. मात्र, धनंजय मुंडेंविरोधात घरगुती हिंसाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत, असं कोणतंही भाष्य न्यायालयाने केलेलं नाही अथवा त्यासंदर्भात निर्णयही दिलेला नाही. हा निर्णय फक्त पोटगी देण्यासंदर्भात असून आर्थिक बाबींसंदर्भातला आहे. घरगुती हिंसाचाराबाबत न्यायालयाने कोणतंही विधान केलेलं नाही.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

धनंजय मुंडेंचे वकील शार्दूल सिंग यांनी या निर्णयानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले, "आज कोर्टाने कोणताही आदेश पारित केलेला नाही. करुणा शर्मा यांनी माझे अशील धनंजय मुंडे यांच्याविरोधात बांद्रा दंडाधिकारी न्यायालयात एक याचिका दाखल केलेली होती. त्यांनी पाच ते पंचवीस लाख रुपयांपर्यंत पोटगी मला मिळाली पाहिजे अशी मागणी केली होती. घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देणाऱ्या कायद्यानुसार त्यांनी हा अर्ज केला होता. या नियमानुसार कोणत्याही महिलेला जी विवाहित आहे, लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये आहे तिला पोटगी मागण्याचा अधिकार आहे.

धनंजय मुंडेंचे वकील शार्दूल सिंग
फोटो कॅप्शन, धनंजय मुंडेंचे वकील शार्दूल सिंग

शार्दूल सिंग म्हणाले, "2022साली त्यांनी हा अर्ज दाखल केला होता. त्यावरच आता न्यायालयाने निकाल दिलेला आहे. कोर्टाने असं म्हटलं आहे की करुणा शर्मा यांच्यासोबत संबंध असल्याची कबुली स्वतः धनंजय मुंडे यांनी दिली होती. त्यामुळे त्यांना महिन्याला एक ते सव्वालाख रुपये देखभालीचा खर्च म्हणून देण्यात यावे. याशिवाय या आदेशात मारहाण किंवा हिंसाचाराबाबत काहीही भाष्य केलेलं नाही. तसेच या खर्चाला पोटगी म्हणणं देखील चुकीचं आहे. हा देखभालीचा खर्च म्हणून बघायला पाहिजे."

'माझे वडील सर्वोत्तम नव्हते, पण हानिकारकही नव्हते'

करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा मुलगा सिशिव मुंडे याने इंस्टाग्रामवर पोस्ट करून धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्याबाबत म्हटलं, "माझी आई करुणा मुंडेने माझ्या वडिलांच्या विरोधात खोटे आरोप केले आहेत. सध्या ज्या घरगुती हिंसाचाराची चर्चा सुरू आहे तो हिंसाचार खरं तर माझ्यासोबत, माझ्या बहिणीसोबत आणि वडिलांसोबत झालेला आहे."

"माझ्या आईने तो केला आहे. माझ्या वडिलांना शारीरिक मारहाण झाल्यानंतर त्यांनी माझ्या आईला सोडलं. त्यानंतर तिने आम्हालाही निघून जायला सांगितलं."

"2020 पासून आमचा आणि तिचा काहीच संबंध नाही. तेव्हापासून आमचे वडीलच आमचा सांभाळ करत आहेत. माझे वडील सर्वोत्तम नसले, तरी ते हानिकारक नाहीत. माझ्या आईला कसलीही आर्थिक अडचण नाही."

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Instagram पोस्ट समाप्त

सिशिव मुंडेच्या या पोस्टनंतर करुणा मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, "धनंजय मुंडे आणि माझ्या मुलांचे खूप चांगले संबंध आहेत. माझ्या मुलांवर आणि माझ्यावर काय बोलायचं, काय नाही याबाबत दबाव आहे. माझ्या मुलांना, त्यांच्या वडिलांना हेच वाटतं की मी शांत बसावं. मी लिव्ह इन पार्टनर म्हणून राहत असल्याचं जरी मान्य केलं तरी त्यांना योग्य वाटतं. हे करून त्यांना मला बेदखल करायचं आहे, पण मी हे कधीच मान्य करणार नाही. माझ्या मुलांना मीडिया ट्रायल नको आहे.

माझा नवरा आणि मी मिळून आमच्या मुलांचा छळ करत आहे हे मी मान्य करते. माझी दोन्ही मुले माझ्यासोबत आहेत. दोन्ही मुलं खूप लहान आहेत. त्यांची मानसिक स्थिती समजून घेतली पाहिजे. धनंजय मुंडेंच्या डोळ्यांवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. माझ्या मुलांना हा वाद नको आहे. माझ्या आर्थिक परिस्थितीबाबत मी पुरावे द्यायला तयार आहे. गृहकर्जाचे हफ्ते अडकले आहेत."

किती रक्कम द्यावी लागणार?

धनंजय मुंडेंच्या वकिलांनी आपल्या निवेदनामध्ये न्यायालयाच्या निर्णयातील महत्त्वाचा भागही उद्धृत केला आहे. "अर्जदार 1 आणि अर्जदार 3 च्या मुलभूत गरजांचा विचार करता, त्यांचं उत्पन्न, त्यांची जीवनशैली आणि त्यांचं राहणीमान पाहता, माझं असं मत आहे की, घरगुती हिंसाचार कायद्याच्या कलम 20 नुसार, ते पोटगीस पात्र आहेत. त्यामुळे, अर्जदार क्रमांक 1 ला महिन्याला 1 लाख 25 हजार रुपये तर अर्जदार क्रमांक 2 ला महिन्याला 75 हजार रुपये दिले गेले पाहिजेत."

धनंजय मुंडेंच्या वकिलांनी जाहीर केलेलं निवेदन
फोटो कॅप्शन, धनंजय मुंडेंच्या वकिलांनी जाहीर केलेलं निवेदन

पुढे या निवेदनात वकिलांनी म्हटलं आहे की, माझ्या अशीलाविरोधात बाकी काहीही निर्णय देण्यात आलेला नाही. हा निर्णय फक्त आणि फक्त तक्रारदारांच्या आर्थिक स्थितीचा विचार करुन देण्यात आलेला आहे. धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच हा जाहीर खुलासा केला आहे की, ते करुणा धनंजय मुंडे यांच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होते. त्यामुळेच हा निर्णय देण्यात आलेला आहे.

नेमकं काय आहे हे प्रकरण?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांना 5 सप्टेंबर 2021 रोजी बीड जिल्ह्यातील परळीत अटक करण्यात आली होती.

करुणा शर्मा यांनी अटकेनंतर "धनंजय मुंडेंनी जबरदस्तीने माझ्यावर गुन्हा दाखल केला," असा आरोप केला होता.

"करुणा शर्मा यांच्यासोबत माझे 2003 पासून परस्पर सहमतीने संबंध आहेत," अशी जाहीर कबुली धनंजय मुंडे यांनी 12 जानेवारी 2021 रोजी दिली होती. त्यांच्यावर बलात्काराचे आरोप केल्यानंतर त्यांनी ही कबुली दिली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे

फोटो स्रोत, Facebook/DhananjayMunde

फोटो कॅप्शन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे

'करुणा शर्मा' नाव केव्हा चर्चेत आलं होतं?

करुणा शर्मा (आता करुणा मुंडे) हे नाव महाराष्ट्रात सर्वांत पहिल्यांदा चर्चेत आलं जानेवारी 2021 मध्ये. त्याआधी केवळ राजकीय वर्तुळांमध्ये आणि दबक्या आवाजात त्यांच्या नावाची चर्चा होती.

मुंबईतील एका महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल माहिती उघड केली होती.

धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लिहिलं होतं की, 'करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो.

फोटो स्रोत, Facebook/Karuna Dhananjay Munde

फोटो कॅप्शन, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लिहिलं होतं की, 'करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो.

धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमधून काय म्हटलं होतं?

धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लिहिलं होतं की, 'करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी झाली. दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलंय. शाळेच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.'

पुढे धनंजय मुंडेंनी लिहिलं होतं, 'सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका (घर) घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सदभावनेने केलेल्या आहेत.'

कोण आहेत करुणा शर्मा?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

करुणा शर्मा यांच्याबद्दल सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीनुसार, त्या मूळच्या मध्यप्रदेशातील इंदूरच्या आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून कामाच्या निमित्ताने मुंबईत रहात असल्याची माहिती आहे.

त्यांनी फेसबुकवर लिहिलं आहे की त्या मुंबईतील 'जीवनज्योत' या सामाजिक सेवा संस्थेशी संबंधित आहेत. काही ठिकाणी त्यांनी सामाजिक कामांची माहिती दिली आहे.

करुणा शर्मा फेसबुक अकाऊंटवर त्यांचं नाव 'करुणा धनंजय मुंडे' असं लिहिण्यात आलं आहे.

धनंजय मुंडेंची राजकीय कारकीर्द बीडमधील परळीतून सुरू झाली. धनंजय मुंडेंचं राजकारण जवळून पहाणारे बीडमधील पत्रकार उद्धव मोरे सांगतात, "करुणा शर्मा यांचं नाव परळीत धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचे लोक सोडून कोणालाच फारसं माहीत नव्हतं. बलात्काराच्या आरोपानंतर मुंडेंनी स्वत:च करुणा शर्मांबाबत नात्याचा खुलासा केला. तेव्हा परळी आणि बीडमधील लोकांना करुणा शर्मा हे नाव माहीत झालं."

परळीतील धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय करूणा शर्मा आणि धनंजय मुंडें यांच्या नात्याबद्दल काहीच सांगण्यास तयार नाहीत. नाव न घेण्याच्या अटीवर एका निकटवर्तीयाने सांगितलं की, "राजकारणात सक्रिय नसल्यापासून धनंजय मुंडेंची करुणा शर्मांसोबत ओळख होती."

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी मिळाली. धनंजय मुंडे यांच्या शपथविधीला करूणा शर्मा आणि त्यांची दोन मुलं उपस्थित असल्याचा फोटो त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

काही काळानंतर धनंयज मुंडे आणि करुणा शर्मा यांचे काही खासगी फोटोही व्हॉट्सअपवर व्हायरल झाले होते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीतून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरला होता. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज बाद केला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)