करुणा शर्मा कोण आहेत? त्यांचा धनंजय मुंडेंशी नेमका काय संबंध?

फोटो स्रोत, Facebook/Karuna Dhananjay Munde
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या करुणा शर्मा यांना रविवारी (5 सप्टेंबर) बीड जिल्ह्यातील परळीत अटक करण्यात आली.
करुणा शर्मा यांनी अटकेनंतर "धनंजय मुंडेंनी जबरदस्तीने माझ्यावर गुन्हा दाखल केला," असा आरोप केला.
"करुणा शर्मा यांच्यासोबत माझे 2003 पासून परस्पर सहमतीने संबंध आहेत," अशी जाहीर कबुली धनंजय मुंडे यांनी 12 जानेवारी 2021 रोजी दिली होती. त्यांच्यावर बलात्काराचे आरोप केल्यानंतर त्यांनी ही कबुली दिली होती.
याप्रकरणावर पहिल्यांदाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
त्या म्हणाल्या, "अन्याय केवळ चुकीच्या लोकांमुळे होतो असं नाही तर चांगले लोक हात बांधून बसतात म्हणूनही होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणीही आपल्या दारात बांधू शकत नाही हा विश्वास हरवू नये. wrong president should not be set! ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे. राज्याची मान खाली गेली आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पण या करुणा शर्मा आहेत कोण? धनंजय मुंडे यांच्याशी त्यांचा संबंध काय?
करुणा शर्मा नाव केव्हा चर्चेत आलं?
करुणा शर्मा हे नाव महाराष्ट्रात सर्वांत पहिल्यांदा चर्चेत आलं जानेवारी 2021 मध्ये. त्याआधी केवळ राजकीय वर्तुळांमध्ये आणि दबक्या आवाजात त्यांच्या नावाची चर्चा होती.
मुंबईतील एका महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल माहिती उघड केली.
धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमधून काय म्हटलं होतं?
धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लिहिलं होतं की, 'करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी झाली. दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलंय. शाळेच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.'
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 1
पुढे धनंजय मुंडेंनी लिहिलं होतं, 'सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका (घर) घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सदभावनेने केलेल्या आहेत.'
कोण आहेत करुणा शर्मा?
करुणा शर्मा यांच्याबद्दल सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीनुसार, त्या मूळच्या मध्यप्रदेशातील इंदूरच्या आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून कामाच्या निमित्ताने मुंबईत रहात असल्याची माहिती आहे.
त्यांनी फेसबुकवर लिहिलं आहे की त्या मुंबईतील 'जीवनज्योत' या सामाजिक सेवा संस्थेशी संबंधित आहेत. काही ठिकाणी त्यांनी सामाजिक कामांची माहिती दिली आहे. अलीकडेच त्यांनी कॅन्सर रुग्णांसाठी फळांचं वाटप केल्याचा फोटो शेअर केला.
करुणा शर्मा फेसबुक अकाऊंटवर त्यांचं नाव 'करुणा धनंजय मुंडे' असं लिहिण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेकवेळा फेसबुक लाईव्ह केल्याचंही दिसून येतं.
धनंजय मुंडेंची राजकीय कारकीर्द बीडमधील परळीतून सुरू झाली. धनंजय मुंडेंचं राजकारण जवळून पहाणारे बीडमधील पत्रकार उद्धव मोरे सांगतात, "करुणा शर्मा यांचं नाव परळीत धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचे लोक सोडून कोणालाच फारसं माहीत नव्हतं. बलात्काराच्या आरोपानंतर मुंडेंनी स्वत:च करुणा शर्मांबाबत नात्याचा खुलासा केला. तेव्हा परळी आणि बीडमधील लोकांना करुणा शर्मा हे नाव माहीत झालं."
परळीतील धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय करूणा शर्मा आणि धनंजय मुंडें यांच्या नात्याबद्दल काहीच सांगण्यास तयार नाहीत. नाव न घेण्याच्या अटीवर एका निकटवर्तीयाने सांगितलं की, "राजकारणात सक्रिय नसल्यापासून धनंजय मुंडेंची करुणा शर्मांसोबत ओळख होती."

फोटो स्रोत, Facebook/Karuna Dhananjay Munde
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी मिळाली. धनंजय मुंडे यांच्या शपथविधीला करूणा शर्मा आणि त्यांची दोन मुलं उपस्थित असल्याचा फोटो त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
काही काळानंतर धनंयज मुंडे आणि करुणा शर्मा यांचे काही खासगी फोटोही व्हॉट्सअपवर व्हायरल झाले होते.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
ज्यावेळी हे प्रकरण बाहेर आलं, तेव्हा धनंजय मुंडे यांच्या चुलत बहीण आणि राजकीय प्रतिस्पर्धी यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं होतं, "मी व्यथित होते. पण याचा राजकारण म्हणून फायदा करून घ्यावा, असं वाटलं नाही. याचा मी अस्त्र वापर करून मी माझी राजकीय पोळी भाजणार नाही. पण जे चूक आहे ते चूक आहे. सैद्धांतिकदृष्ट्या मी या गोष्टीचं समर्थन कधीच करू शकणार नाही."
त्यांना जेव्हा विचारलं की या गोष्टीबद्दल त्यांच्या घरात कधी चर्चा झाली का, तेव्हा त्या म्हणाल्या, "या गोष्टीची चर्चा आमच्या घरात कधी झाली नाही. आता त्यावर चर्चा करण्याचं काही कारण नाही." तुम्ही धनंजय मुंडेंना काही सल्ला द्याल का, असं जेव्हा पत्रकाराने विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, "मी त्यांना काही सल्ला देणार. आता विषय खूप पुढे गेला आणि आम्ही वेगळ्या विचारधारांसाठी काम करतो."

फोटो स्रोत, Facebook/Dhananjay Munde
हा वाद सुरू असताना भाजपच्या काही नेत्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती, पण देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी नव्हती केली. त्यामुळे सावध भूमिका घेत फडणवीस म्हणाले होते, "धनंजय मुंडे यांनी कबुली दिली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. चौकशी झाल्यावरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षानं मुंडेंच्या कबुलीसंदर्भात विचार करायला हवा. यातली कायदेशीर बाब धनंजय मुंडे, तक्रारदार तरुणी या दोघांनीही मांडली आहे. पोलिसांनी याबद्दलचे सत्य बाहेर आणावे. सत्य बाहेर आल्यानंतर आम्ही आमची मागणी करू."
धनंजय मुंडे भाजपमध्ये होते, तेव्हापासून त्यांचे फडणवीसांशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजकीय मदत केली, अशा स्वरूपाच्या बातम्या त्यावेळी छापून आल्या होत्या.
धनंजय मुंडेंवर वारंवार आरोप
करुणा शर्मा यांनी वारंवार फेसबुकवर लिहिलं आहे की त्यांच्यावर अन्याय होत आहे. आपणच धनंजय मुंडेंची पत्नी आहोत, असं त्या सांगतात. पैसा आणि सत्तेच्या बळावर माझ्यावर अन्याय झाला, अशी त्या तक्रार वारंवार व्यक्त करतात.
त्यांनी 4 सप्टेंबर 2021 रोजी लिहिलं: 'बीडमधील जनतेचा आशीर्वाद आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद करून.. रविवारी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टींचा खुलासा करणार आहेत.
तरी सर्व पत्रकार बांधवांनी रविवारी 12 वाजता परळी वैजनाथ मंदिरमध्ये उपस्थित राहावे.'
मुंडेंविरुद्ध पुरावे देणार असल्याचे सांगत करुणा शर्मा परळीत दाखल झाल्या, तेव्हा काही महिलांनी त्यांना घेराव. या गोंधळातच शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तुल सापडलं. करुणा यांचं म्हणणं आहे की 'हे पिस्तुल माझे नसून, मला अडचणीत आणण्यासाठी जाणीवपूर्वक हे पिस्तुल गाडीत टाकलं आहे.' त्यानंतर करुणा शर्मांना अटक करण्यात आली. याबद्दल आम्ही धनंजय मुंडेंची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








