वाल्मिक कराडवर मकोका, समर्थक आक्रमक; परळीत वातावरण चिघळलं

वाल्मिक कराड
फोटो कॅप्शन, वाल्मिक कराड
    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

बीड जिल्ह्यातील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली आहे.

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर बीड जिल्ह्यात तीव्र निदर्शनं झाली होती.

खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला आज, (14 जानेवारी) केज कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं कराडची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

यावरुन कराड समर्थक आक्रमक झाले, संतप्त समर्थकांनी निदर्शनं करत परळीत बंदची हाक दिली. यामुळे, परळीत तणावापूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

परिस्थिती पाहता बीडमध्ये प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

वाल्मिक कराडच्या समर्थकांनी सकाळपासूनच आक्रमक भूमिका घेत निदर्शनं करण्यास सुरुवात केल्याचं चित्र होतं.

संतप्त समर्थकांनी टायर पेटवत जाळपोळ केली, तर काही अज्ञातांकडून बसवर दगडफेक करण्यात आली. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी समर्थकांकडून केली जात होती.

परळीची बाजारपेठ

दरम्यान, वाल्मिक कराडला आज केज कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली तसेच त्याच्यावर मकोकाही लावण्यात आला.

यानंतर कराड समर्थकांनी टायर जाळून रोष व्यक्त केला. तर, वाल्मिक कराडच्या आईने परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केल्याची माहिती आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

मनोज जरांगेंनी काय प्रतिक्रिया दिली?

वाल्मिक कराड यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाईवर प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई झाली असेल तर सरकारचं आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहे.

जो खंडणीतला आरोपी आहे, तोच खुनातील आरोपी आहे असं म्हणत सगळ्यांवर 302 दाखल होणं गरजेचं असल्याचं जरांगे म्हणालेत.

कराड समर्थकांनी राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून जोरदार घोषणाबाजी केली.
फोटो कॅप्शन, कराड समर्थकांनी राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून जोरदार घोषणाबाजी केली.

"ही खूप मोठी टोळी आहे, या टोळीचा सफाया होणं गरजेचं असल्याचं मतं मनोज जरांगे यांनी व्यक्त केलंय. राज्याला कलंकित होऊ द्यायचं नसेल तर या टोळीचा सफाया होणं गरजेचं आहे," असं म्हणत बीड प्रकरणाची केस अंडर ट्रायल चालवून सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी जरांगेंनी केली.

या टोळीची नार्को टेस्ट करून त्यांना जेल मध्ये सडू द्यायला पाहिजे असं देखील जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे
फोटो कॅप्शन, मनोज जरांगे

यांच्यातला एक खंडणीतला माणूस सरकार चालवत नाही, याला जेलमध्ये टाकायचं, म्हणजे राज्य कलंकापासून वाचेल असं जरांगे यांनी म्हटलंय. ही जनता न्यायासाठी टाहो फोडत आहे, फडणवीसांनी सगळ्या आरोपींना जन्मठेप द्यायला पाहिजे असंही जरांगे मागणी करताना म्हणाले.

खंडणी आणि खुनातील आरोपींना साथ देणारे सहआरोपी शंभर ते दीडशे जण असू शकतात, मुख्यमंत्र्यांनी त्यांना सगळ्यांना जेल मध्ये टाकावं अशी अपेक्षा जरांगे यांनी व्यक्त केली.

मूठभर समाजकंटकांचे हे काम - बजरंग सोनवणे

बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली. तपासात दोषी आढळल्याने वाल्मिक कराडवर मकोका लागला आहे. हत्येचा कट रचण्यामध्ये सहभागी असल्याचं एसआयटीनं कोर्टात सांगितलं आहे, असं सोनवणे म्हणाले.

परळीतील बंदबाबात बोलताना सोनवणे यांनी, हा बंद उस्त्फूर्त लोकांचा नाही, हे मूठभर समाजकंटकाचे काम असल्याचं म्हटलंय. पाच-पन्नास पोरं मोटार सायकलवर फिरुन दाब देऊन दुकान बंद करत होते, पण दडपशाहीने असं कोणी बंद करू शकत नाही. पोलीस अधीक्षक जागृतीने काम करत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

काही भागांत बसवर दगडफेक करण्यात आली.
फोटो कॅप्शन, काही भागांत बसवर दगडफेक करण्यात आली.

सोनवणे पुढे बोलताना म्हणाले, संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, मास्टरमाइंड सापडला पाहिजे. तसेच आरोपींना पळून जायला कोणी-कोणी साथ दिली, कोणी कट रचला हे सगळं बाहेर आलं पाहिजे. लोकांच्या मनात आधी हिंमत नव्हती. आता हिम्मत आली आहे, एक-एक प्रकरण बाहेर येतील, असंही खासदार सोनवणे म्हणाले.

धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया

वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. यानंतर तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन धनंजय देशमुख यांनी सध्या होत असलेल्या तपासाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच भाऊ संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराला कठोर अशी फाशीची शिक्षा व्हावी अशी भावना त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

धनंजय देशमुख
फोटो कॅप्शन, धनंजय देशमुख

याआधी, सोमवारी (13 जानेवारी) मस्साजोग गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं. माझ्या भावाला न्याय मिळवून द्यावा, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. मागण्या पूर्ण होईपर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता.

वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं.

धनंजय देशमुख यांनी सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं.
फोटो कॅप्शन, धनंजय देशमुख यांनी सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं.

धनंजय देशमुख यांच्या आंदोलनाबाबत कळताच गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीकडे धाव घेत घेराव टाकला. मनोज जरांगे पाटील हेदेखील तेथे पोहोचले.

पोलिसांसह मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरुन संवाद साधत समजूत घातली आणि पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरण्याचं आवाहन केलं. यानंतर धनंजय देशमुख यांनी खाली उतरत आपलं आंदोलन मागे घेतलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.