प्राजक्ता माळी : 'समाजपुरूषाची मान खाली घालायला लावणारं हे वक्तव्य' - विशेष ब्लॉग

प्राजक्ता माळी

फोटो स्रोत, Instagram/Prajakta Mali

    • Author, अपर्णा पाडगावकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी

आठवतो 2016चा तो क्रिकेट मोसम - जेव्हा विराट कोहली अजीबात फॉर्ममध्ये नव्हता. त्यावेळी त्याचं सगळं खापर त्याच्या तेव्हा प्रेयसी असलेल्या अनुष्का शर्मावर फुटत होतं. ती कशी त्याच्यासाठी बॅडलक आहे; ती त्याला वेळ देत नाहीये किंवा तिने केलेलं फोटोशूट वा स्वीकारलेले चित्रपट त्याला आवडत नाहीयेत, म्हणून तो दुःखी आहे.

त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स बरा होत नाहीये.. किती बाजारगप्पा.. विराट - अनुष्का तेव्हा काही काळापुरते वेगळेही झाले, मग त्यांनी लग्नही केलं आणि सात वर्षं सुखी संसारही करतायत…

कारणं आणि निमित्त काहीही असू देत, पुरुषाच्या बऱ्या-वाईट कामगिरीवर ताशेरे ओढताना एखाद्या बाईला मध्ये ओढणं ही भारतीय समाजाची मानसिकता आहेच.

'प्राजक्ता माळी एपिसोड'च्या वेळी, म्हणूनच, मला पहिल्यांदा अनुष्का शर्मा आठवली.

व्यावसायिक आणि सार्वजनिक आयुष्यात असणाऱ्या स्त्रियांना या प्रकारच्या मानहानीला सामोरं जावं लागण्याची ही पहिलीच वेळ अर्थातच नाही.

राजकारण आणि मनोरंजन या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना तर ही बदनामी पावलोपावली भेटत राहते.

एखादी बाई घराबाहेर पडली, म्हणजे तिच्यावर टीप्पणी करण्याचा हक्क आपल्याला आपोआपच मिळतो आणि तिच्याप्रती आपलं बाकी काहीच कर्तव्य नाही, हे मानणाऱ्या आपल्या समाजात सुरक्षित आणि स्वाभिमान आयुष्य जगण्यासाठी स्त्रियांना अजून खूप काळ झुंजावं लागणार आहे, हे निश्चित.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

बीडमधल्या प्रकरणानंतर राजकीय साठमारी सुरू झाली आहे. तिथल्या पुरूष राजकारण्यांचे आपापसात जे काही वैर वा मैत्र असेल, ते असो.

त्या निमित्ताने, आपल्या प्रतिस्पर्ध्यावर टीका करताना स्त्रियांची जी काही नावं घेतली गेली, त्यात त्या स्त्रियांचा अपमान होतो आहे, हे कळण्याचं भान सुटणं हे समाजपुरूषाची मान खाली घालायला लावणारं आहे.

हा केवळ एका स्त्रीच्या मानअपमानाचा प्रश्न नाही. ज्या पद्धतीने खिदळत या स्रियांची नावं घेतली गेली, ती कुचाळकी करणारी पद्धत आपण समाज म्हणून स्त्रियांकडे काय नजरेने बघतो, हे दाखवणारी आहे.

यात केवळ बोलणारी एक व्यक्ती नव्हती, तर समोर असलेले पत्रकार आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीने व्यक्त्याला 'प्रॉम्प्ट' करत होते, ते पाहता एक स्त्री म्हणून अपमान आणि लज्जेने माझी मान खाली गेली.

ज्या खूनप्रकरणाबद्दल आपण मुलाखत देतो आहोत, त्या विषयाचं गांभीर्य आपण या अशा टीप्पण्या करून घालवतो आहोत, हे भानदेखील गेली अनेक वर्षं राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधीला राहू नये, हे दुर्दैवी आहे.

आमदार सुरेश धस

फोटो स्रोत, SureshDhas/Facebook

फोटो कॅप्शन, बीड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांची नावं घेतली.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

स्त्रीला देवीचा दर्जा देणाऱ्यांना तिची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी आपली आहे, असं वाटत नाही? एका द्रौपदीच्या अपमानाने महाभारताचं युद्ध छेडलं गेलं, म्हणतात.

स्वतःला गेल्या पाच हजार वर्षांच्या संस्कृती व परंपरेचे अभिमानी पाईक म्हणवणाऱ्यांनी त्यापासून काहीच बोध घेतलेला नाही, एवढंच इथे खेदाने नमूद करावंसं वाटतं.

प्राजक्ताने याबद्दल जी पत्रकार परिषद घेतली, त्यावरून तर अधिकच गोंधळ उडून गेला. आमदारांच्या निंदाव्यंजक बोलण्यामुळे जे समाजमन खवळून उठलं नव्हतं, ते प्राजक्ताने काही प्रश्न विचारल्यामुळे बेताल होऊन गेलं.

प्राजक्ताला किंवा तिची बाजू घेणाऱ्या काही विचारी जीवांना ज्या भयानक पद्धतीने ट्रोल केलं गेलं, त्यावरून एकच गोष्ट स्पष्ट दिसते - आपल्या समाजाला आजही प्रश्न किंवा प्रतिप्रश्न - जबाबदारी विचारणाऱ्या स्त्रिया झेपत नाहीत.

महिलांनी नटावं, मुरडावं, आमचं मनोरंजन करावं, आम्हाला हवी ती सेवा करावी, त्याचं आम्ही देऊ ते मोल घेऊन समाधानी राहावं; फक्त प्रश्न विचारू नयेत, जाब तर आजिबातच नाही.

ही मानसिकता या प्रकरणाने इतक्या ठसठशीतपणे सामोरी आली आहे की आपल्या स्त्रीवादाच्या (आणि मानवतावादीसुद्धा) चळवळीला थोडं थांबून विचार करायला लागावा.

प्राजक्ताच्या विरोधात मग स्त्री पुरुष सगळेच उभे ठाकले. स्वतःला स्त्रीवादी म्हणवणारे प्राजक्ताच्या राजकीय विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उमटवू लागले.

ते सगळेच एकाच पक्षाचे किंवा विचारधारेचे आहेत, त्यामुळे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे किंवा भोग आपल्या कर्माची फळं… अशा पद्धतीच्या टीप्पण्या इतक्या सर्रास झाल्या की अवाक् व्हायला झालं.

कोणतीही स्त्री कोणत्या (राजकीय) विचारांची आहे, यावर आपण ठरवणार की तिचे वाभाडे निघणं योग्य की अयोग्य? यामुळे शत्रूच्या बायकांवर बलात्कार करणाऱ्याची मानसिकता आपण योग्य ठरवतो, हे देखील कळू नये ?

महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

या संदर्भातल्या राजकीय टीप्पणींबद्दल बोलण्याची ही जागा नव्हे. तरीही वाटतं की होणाऱ्या राजकीय चर्चेचा रोख बदलण्यासाठी मुद्दामच ही पत्रकार परिषद घेतली गेली, असा आरोप करण्यामागे काय तर्क असेल? म्हणजे, आधी खोचक टीका करणाऱ्यांनी हे गृहित धरलं होतं की एक 'फुलवंती' आपलं काहीच वाकडं करू शकत नाही.

"मग रोजरोज फोटो टाकत जाऊ नका गाड्यांचे, कुत्र्यांचे, मित्रांचे…" या अर्थाचीही एक कॉमेंट वाचली मी. या विधानात आणि 'बायांवर बलात्कार होतात, कारण त्या छोटे कपडे घालतात', या विधानात काय मूलभूत फरक आहे, तो मला कळला नाही. समाजमाध्यमांवर किती फॉलोअर्स आहेत, हा तुमच्या मोठेपणाचा निर्देशांक आपणच बनवला आहे ना? सगळेच कलाकार त्याचे बळी आहेत.

शोषक आणि शोषितांच्या राजकारणाचा मुद्दा उपस्थित करत काहींनी या प्रकरणाला एक तात्त्विक वळण देण्याचाही प्रयत्न केला, ज्यात प्राजक्ताला शोषकांच्या बाजूने उभी राहिलीस ना आधी.. असा जाब विचारला गेला.

मुळात, हे समजून घेतलं पाहिजे की विशेषतः मनोरंजन (आणि राजकारण -क्रीडादेखील) क्षेत्र हे अत्यंत बेभरवशाचं आहे, इथली परिस्थिती इथे काम करणाऱ्यांच्या हातात नसते, कलाकारांच्या (यात स्त्री पुरूष दोन्ही आले) तर अजीबातच नाही.

इथे प्रत्येक क्षणी एक नवी परिस्थिती उद्भवत असते, दर दिवसाला एका नव्या व्यक्तीला, नव्या व्यवस्थेला तोंड द्यावं लागतं असतं. त्यानुसार , स्वतःमध्ये बदल घडवत जावे लागतात.

ही सगळी प्रक्रिया अत्यंत थकवणारी आहे - मानसिक आणि आर्थिकदृष्ट्याही. त्यातही पाय रोवून जो उभा राहतो, आपल्यासाठी पायाखाली काहीएक जमीन स्थिर करतो, त्याचं कौतुकच करायला हवं. पण एखादी स्त्री यशस्वी किंवा लोकप्रिय झाली की तिच्यावर अश्लाघ्य टीप्पणी करत, स्वतःचं मनोरंजन करण्याचा हक्क लोक सर्रास बजावू लागतात.

तापसी पन्नू, स्वरा भास्कर किंवा रिचा चढ्ढा यांना त्यांच्या राजकीय-सामाजिक मतांबद्दल ट्रोल केलं गेलं. कुस्तीगीर महिलांचं आंदोलनाला समाज काय पद्धतीने प्रत्युत्तर देत होता, तेही पाहिलं आपण. त्यातलं राजकारण वैयक्तिक आयुष्यापर्यंत पोहोचतं आहे.

आलिया भट-रणबीर कपूर यांचं लग्न आणि त्यांच्या पहिल्या अपत्याचा जन्म याची किती खमंग चर्चा केली आपण. लग्न किंवा अपत्यजन्म हा कुणाचाही वैयक्तिक व खाजगी अधिकार आहे, याचं भान आपण केव्हाच सोडलंय. ऐश्वर्या रायसारखी अभिनेत्रीतर किती कारणांनी किती वेळा ट्रोल होते, याला गणतीच नाहीये.

आलिया भट-रणबीर कपूर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आलिया भट-रणबीर कपूर

तिच्या मातृत्त्वावर बोटं ठेवण्याचा आपल्याला काय हक्क? तिने मुलीला कितव्या वर्षी लिपस्टीक लावू दिली यासाठी तिला वाईट आई ठरवणारे आयटम सॉंग्ज लाळ गाळत बघत असतील - सिनेमातही आणि निवासी सोसायट्यांच्या वार्षिक कार्यक्रमातही.

अर्थात केवळ भारतीयांना दोष देण्यात अर्थ नाही. पुरूषी वर्चस्वाची ही मानसिकता सार्वत्रिक आहे. फ्लॉरेन्स प्यू या मॉडेल -अभिनेत्रीने एक फोटोशूट केलं एका गुलाबी शिअर नेट (shear ne) ड्रेसमध्ये.

हे उदाहरण मुद्दाम देते आहे कारण ही अभिनेत्री तिच्या शरीराच्या (कमी) गोलाईबद्दल अनेकदा खिजवली गेली आहे. त्याला जणू प्रत्युत्तर म्हणून तिने हे फोटोशूट केलं आणि त्यात तिचे स्तन स्पष्ट दिसत आहेत. तू काम मागायला ईमेल करतेस, तेव्हाही हे असेच फोटो पाठवत असशील नं? अशा अर्थाचा टारगट प्रश्न विचारत तिला ट्रोल केलं गेलं.

ही मानसिकता आजचीच आहे, असं नाही. पूर्वी हे गॉसिप शिळोप्याच्या गप्पा म्हणून आपल्या खाजगी चकाट्यांमध्ये व्हायचं. मग ते फिल्मी मासिकांमधून होऊ लागलं आणि आता समाजमाध्यमांमधून ते सार्वत्रिक झालं आहे. व्हायरल म्हणतो ना आपण ! व्हायरस - विषाणू कधीच चांगल्या गोष्टींसाठी ओळखला जात नाही.

प्राजक्ता माळी आणि फ्लॉरेन्स प्यू

फोटो स्रोत, Getty Images and Prajakta Mali/Facebook

समाजमाध्यमांच्या या व्हायरसने आपलं मन आणि विचारशक्ती दूषित केली आहे. त्यावर उपाय शोधण्याची तातडीने गरज आहे. राजकीय विचारसरणी, जात-धर्म, राष्ट्रीयत्व यांच्या पलीकडे जात स्त्रीकडे माणूस म्हणून बघण्याची गरज कधी नव्हे ती आज निर्माण झाली आहे. 'प्राजक्ता माळी - बीड एपिसोड' प्रकरणाने मला हा एवढाच धडा दिला आहे.

फ्लॉरेन्स प्यूने तिच्या ट्रोलरला दिलेलं उत्तर इथे मुद्दाम नमूद करते -

"Why are you so scared of breasts? Small? Large? Left? Right? Only one? Maybe none? What. Is. So. Terrifying... Grow up. Respect people. Respect bodies. Respect all women. Respect humans. Life will get a whole lot easier, I promise. And all because of two cute little nipples..."

हे मराठीत सांगायचं झालं तर काहीसं असं होईल-

"तुम्हाला स्तनांची एवढी भीती का वाटते? लहान? मोठे? डावे? उजवे? एकच स्तन? कदाचित एकही नाही? नेमकं. कशाची. भीती. वाटते... प्रगल्भ व्हा. लोकांचा आदर ठेवा. शरीराचा आदर करा. सर्व महिलांचा मान राखा. मानवतेचा मान राखा. खरंच सांगते, मग तुमचं आयुष्य बरंच सोपं होईल. केवळ दोन लहान लोभस स्तनाग्रांमुळे..."

यावरुन तिनं दिलेल्या उत्तराची ताकद लक्षात येते.

(अपर्णा पाडगावकर या लेखिका आणि चित्रपट निर्मात्या आहेत. लेखिकेने मांडलेली मते वैयक्तिक आहेत.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.