संतोष देशमुख हत्या : बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चात कोणते नेते काय म्हणाले?

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर पडताना दिसत आहेत. या प्रकरणी बीडमध्ये शनिवारी (28 डिसेंबर) सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
हा सर्वपक्षीय मोर्चा सकाळी 11 वाजता बीडच्या डॉ. आंबेडकर चौकातून निघाला. माळीवेस, अण्णा भाऊ साठे चौक, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचला.
मोर्चामध्ये बजरंग सोनवणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, संभाजीराजे छत्रपती, अभिमन्यू पवार आणि मनोज जरांगेंसह अनेक नेत्यांचा सहभाग होता.
लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये शुक्रवारी (27 डिसेंबर) आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं. यानंतर आज (28 डिसेंबर) बीडमध्ये आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि बीडमधील गुन्हेगारीला आळा घालावा, या मागणीसाठी मूक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी उपस्थित नेत्यांनी तातडीने या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली.
कोण काय म्हणाले?
संतोष देशमुख यांच्या मुलीनं माझ्या वडिलांनी दुसऱ्या समाजातील व्यक्तीला मदत करताना बलिदान दिलं. ते बलिदान वाया जाऊ देऊ नका असं आव्हान केलं.
या मंचावर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अशा सगळ्या पक्षाचे लोक आहेत. त्यामुळं हा राजकीय विषय नसल्याचं संदीप क्षीरसागर म्हणाले. अजूनही 302 अंतर्गत तपास होत नसल्याचंही त म्हणाले. वाल्मिक कराडांना धनंजय मुंडेंचं संरक्षण असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला.
प्रकाश सोळुंके यांनी यावेळी धनंजय मुंडेंवर आरोप केले. पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर पालकमंत्रीपद भाड्यानं दिल्याचं म्हटलं होतं. ते वाल्मिक कराडला दिले होते का, असा सवाल त्यांनी केला.
सुरेश धस यांनी यावेळी पंकजा मुंडेंना प्रश्न उपस्थित केला. मुंडे साहेबांच्या जयंतीला तुम्ही त्या भागात गेला त्यावेळी वाकडी वाट करुन देशमुख यांच्या घरी का गेल्या नाही, असं धस म्हणाले. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या लोकांनी 1400 एकर जमीन हडपल्याचा आरोपही त्यांनी केला. दहा वर्षांमध्ये हे पालकमंत्री असताना 70% निधी परळी मतदारसंघाला गेला, असा आरोपही त्यांनी केला.

फोटो स्रोत, facebook/MLASandeepKshirsagar
जितेंद्र आव्हाड यांनी आकाचा बाप कोण आहे असा प्रश्न विचारत एवढी जनता सांगते तरी त्याला मंत्री मंडळात कशाला ठेवलंय असं म्हटलं. तसंच सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूवरूनही त्यांनी सरकारवर टीका केली.
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नसल्याची टीका केली. धनंजय मुंडे खरंच सत्यवादी असतील तर त्यांनी राजीनामा फेकून चौकशीला सामोरं जावं, असं आव्हानही त्यांनी केलं.
मनोज जरांगे यांनीही यावेळी जोरदार टीका केली. मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला अधिकार मिळाल्यानंतरही मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीयवादी मंत्री पोसणार असाल तर आम्हाला दंडूके हातात घ्यावे लागणार आहेत. आता सरकारवर जबाबदारी आहे. कारवाई झाली नाही, तर आपणही मागे सरकायचं नाही, असं जरांगे म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती यांनी धनंजय मुंडे यांना इथलं पालकमंत्री पद मिळणार आसेल तर मी स्वतः या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकरणार असल्याचं म्हटलं. पंकजा मुंडे म्हणतात की, कराडशिवाय धनजय मुंडेचं पान हालत नाही. मग हे मंत्री आता आरोपीला अटक करायची जबाबदारी का घेत नाही, असा सवाल त्यांनी केला.
या सर्वांच्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी उत्तर दिल्यावर त्यांची बाजूही येथे अपडेट करण्यात येईल.
लातूरमधील रेणापुरात शेकडोंचा मोर्चा
बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन शुक्रवारी (27 डिसेंबर) लातूर जिल्ह्यातील रेणापुरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं. या आक्रोश मोर्चात रेणापूर तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील लोक सहभागी झाले.
संतोष देशमुख यांची मुलगीही या मोर्चामध्ये सहभागी झाली होती. यावेळी ती उपस्थितांसमोर बोलताना भावनिक झाली.


संतोष देशमुख यांची मुलगी काय म्हणाली?
संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख म्हणाली, "तुम्हा सर्वांना माहिती आहे की, माझ्या वडिलांसोबत काय झालं आहे. त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाला आहात. हे बघून काही सूचत नाही. तुम्ही असेच खंबीरपणे आमच्या मागे उभे राहा."

"आमच्यावरील वडिलांचं छत्र हिरावण्यात आलं आहे. असं इतर कुणाहीसोबत घडू नये," अशी अपेक्षाही वैभवीने व्यक्त केली.
मनोज जरांगे काय म्हणाले?
मराठा आरक्षण मागणीचे आंदोलक मनोज जरांगे म्हणाले, "हा मोर्चा बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने आहे. संतोष देशमुख यांच्या मुलीने ही मोर्चाची हाक दिली आहे. एकानेही घरी थांबू नये, मोर्चात सहभागी व्हावं, अशी मी बीड जिल्ह्यातील सर्व बांधवांना आणि सगळ्या मराठ्यांना विनंती करतो."
"सरकारला या मोर्चामुळे जाग येईल. नाही आली तर आम्ही त्यांना जाग आणणार आहे. कुणाच्याही बापाला येऊ द्या, मी हे हत्या प्रकरण दडपू देणार नाही. संतोष देशमुख यांचा खून झाला आहे. याचं कुणीही राजकारण करू नये. मोर्चात सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही सहभागी व्हावं," असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं.
"मुख्यमंत्री आरोपीला पाठीशी घालत आहेत. ते आरोपीला सांभाळायचं काम करत आहेत," असाही आरोप जरांगेंनी केला.
ते म्हणाले, "आरोपीला पाठीशी घातल्यानं मुख्यमंत्री तोंडघशी पडणार आहेत. मराठे यांच्या विरोधात जातील. जर सरकारनं आरोपींना धरलं नाही, तर मराठे तपास हातात घेतील."
"आज बीडचा मोर्चा शांततेत होणार आहे. आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठ्यांनी मोर्चे काढावेत. मोर्चाची तारीख एकच होणार नाही याची काळजी घ्या," असं आवाहनही जरांगेंनी यावेळी केलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरण काय आहे?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या झाली, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, यावर त्यांच्या कुटुंबीयांनी भाष्य केलं आहे.
संतोष देशमुख यांचं अपहरण झालं, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे देखील होते. टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना शिवराज देशमुख यांनी त्या दिवशीचा सगळा घटनाक्रम सांगितला.

फोटो स्रोत, FACEBOOK/SANDEEP KSHIRSAGAR
शिवराज देशमुख यांनी सांगितल्यानुसार, "घटना घडली त्या दिवशी दुपारी 2.30 च्या दरम्यान शिवराज देशमुख हे संतोष देशमुख यांना केजमधे भेटले. त्यानंतर ते दोघे केजमधून त्यांच्या गावाकडे परत येत होते. शिवराज देशमुख गाडी चालवत होते, तर संतोष देशमुख त्यांच्याशेजारी बसले होते.
"दरम्यान डोणगावच्या टोलनाक्यावर अचानक एका चारचाकी गाडीकडून त्यांच्या गाडीला अडवण्यात आलं. त्या गाडीतून 5-6 तरुण खाली उतरले आणि संतोष देशमुखांच्या गाडीवर दगडफेक करू लागले. नंतर त्यांनी संतोष देशमुखांना गाडीतून खाली ओढून काठ्या, लोखंडी रॉड तसंच कोयत्यानं मारहाण करायला सुरुवात केली आणि लगेचच त्यांच्या गाडीत टाकून घेऊन गेले."
पुढे त्यांनी सांगितलं की, "या दगडफेकीत एक मोठा दगड गाडी चालणाऱ्या शिवराज देशमुखांच्या सीटजवळ आलेला, तो काढून गाडी बाहेर येईपर्यंत अपहरणकर्ते सरपंच संतोष देशमुखांना घेऊन गेले होते."
या मारहाण करणाऱ्या तरुणांमध्ये सुदर्शन घुले, सांगळे, महेश केदार, प्रतिक घुले हे ओळखीचे चेहरे देखील शिवराज देशमुख यांना दिसून आले. त्यांनी लगेच हा सर्व प्रकार संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना फोन करून सांगितला.
शिवराज देशमुख पुढे सांगतात की, "या घटनेची माहिती मिळताच धनंजय देशमुख यांनी त्यांना लवकरात लवकर केज पोलीस स्टेशनला पोहोचायला सांगितलं. त्यानंतर साधारणतः 10 ते 15 मिनिटांत शिवराज देशमुख पोलीस स्टेशनला पोहोचले. दरम्यान, अपहरणाच्या जवळपास तीन तासांनंतर संतोष देशमुख यांच्या मृत्यूची बातमी त्यांना पोलिसांकडूनच मिळाली."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











