You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेनं 2 तास 20 मिनिटांत मादुरोंना कसं पकडलं? अमेरिकेच्या ऑपरेशनची संपूर्ण कहाणी
- Author, गॅरेथ इवान्स
- Reporting from, वॉशिंग्टन
अमेरिकेचे गुप्तहेर अनेक महिन्यांपासून व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवून होते.
गुप्तहेरांची ही एक छोटी टीम होती. त्यात व्हेनेझुएलाच्या सरकारमधील एका सूत्राचादेखील समावेश होता. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, 63 वर्षांचे मादुरो कुठे झोपतात, काय खातात, कोणते कपडे घालतात, इतकंच काय 'त्यांच्या पाळीव प्राण्यांवर'देखील या टीमनं लक्ष ठेवलं होतं.
त्यानंतर, डिसेंबरच्या सुरुवातीला 'ऑपरेशन ॲब्सल्यूट रिझॉल्व्ह' या मोहिमेला अंतिम रूप देण्यात आले. ही अनेक महिन्यांच्या बारकाईने केलेल्या नियोजन आणि सरावाची परिणित होती.
अमेरिकेच्या एलीट म्हणजे अतिशय प्रशिक्षित अशा विशेष पथकांनी ही मोहीम पार पाडली. यासाठी मादुरो यांच्या काराकासमधील सुरक्षित ठिकाणाची डुप्लीकेट म्हणजे हुबेहुब प्रतिकृती बनवण्यात आली होती. सैनिकांनी मादुरो यांच्या या घरात शिरण्याचा सराव केला होता.
ही योजना पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली होती. अमेरिकेतील काँग्रेसला आधीपासून याची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तसंच त्यांचा सल्लादेखील घेण्यात आला नव्हता.
सर्व तपशील अतिशय अचूकपणे आणि बारकाईनं तयार झाल्यानंतर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून फक्त योग्य वेळेची, संधीची वाट पाहिली जात होती.
शीत युद्धाच्या काळानंतर लॅटिन अमेरिकेतील हे ऑपरेशन अमेरिकेचा एक असामान्य हस्तक्षेप होता.
अधिकाऱ्यांनी शनिवारी (3 जानेवारी) सांगितलं की, त्यांना अचानक हल्ला करायचा होता. 4 दिवस आधी ट्रम्प यांनी या ऑपरेशनला मंजूरी दिली. त्यानंतर हे ऑपरेशन करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. मात्र त्यानंतर चांगलं हवामान आणि कमी ढगाळ वातावरणाची वाट पाहण्याचा निर्णय घेण्यात आला.
अमेरिकेचे सर्वोच्च लष्करी अधिकारी डॅन केन शनिवारी (3 जानेवारी) सकाळी एका पत्रकार परिषदेत म्हणाले, "ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दरम्यान अमेरिकेचे महिला आणि पुरुष सैनिक अनेक आठवड्यांपासून पूर्ण तयारीनिशी सज्ज होते. ते संयमानं योग्य संकेत आणि राष्ट्राध्यक्षांच्या आदेशाची वाट पाहत होते."
'शुभेच्छा, यशस्वी व्हा'
शेवटी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी शुक्रवारी (2 जानेवारी) स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजून 46 मिनिटांनी ऑपरेशन सुरू करण्याचा आदेश दिला.
शनिवारी (3 जानेवारी) रात्री झालेल्या कारवाईच्या काही तासांनी ट्रम्प 'फॉक्स अँड फ्रेंड्स'ला म्हणाले, "आम्हाला ही कारवाई 4 दिवस आधी, 3 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी करायची होती. मग अचानक परिस्थिती अनुकूल झाली आणि आम्ही सांगितलं, जा कारवाई करा."
जनरल केन म्हणाले, "ते आम्हाला म्हणाले आणि आम्ही याचं कौतुक करतो. शुभेच्छा, तुम्हाला यश मिळो."
ट्रम्प यांचा आदेश काराकासमध्ये मध्यरात्र होण्याच्या काही वेळ आधी आला. यामुळे लष्कराला अंधारात काम करण्यासाठी जवळपास पूर्ण रात्रभरचा वेळ मिळाला.
यानंतर जे झालं, त्यामुळे अमेरिका आणि जगभरातील अनेकजण आश्चर्यचकीत झाले. हे ऑपरेशन आकाश, जमीन आणि समुद्रात चाललं. ते 2 तास 20 मिनिटांत पूर्ण झालं. व्याप्ती आणि अचूकतेच्या दृष्टीकोनातून हे ऑपरेशन जवळपास अभूतपूर्व होतं.
यानंतर लगेचच अनेक देशांनी याचा निषेध केला. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लूला डा सिल्व्हा म्हणाले की, व्हेनेझुएलाच्या नेत्यांना हिंसक पद्धतीनं पकडणं "संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायासाठी आणखी एक अत्यंत धोकादायक उदाहरण" आहे.
ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या सिच्युएशन रूममधून या ऑपरेशनवर लक्ष ठेवलं नाही. त्याऐवजी ते फ्लोरिडाच्या पाम बीचवरील त्यांच्या मार-ए-लागो क्लबमध्ये त्यांच्या सल्लागारांसह उपस्थित होते. तिथे त्यांनी सीआयएचे संचालक जॉन रॅटक्लिफ आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यासह या मोहिमेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं.
ट्रम्प शनिवारी (3 जानेवारी) म्हणाले, "हे पाहणं अविश्वसनीय होतं. काय झालं हे तुम्ही पाहिलं असतं, म्हणजे मला म्हणायचंय की मी याला खरोखरंच एखाद्या टीव्ही शोसारखा पाहत होतो. जर तुम्ही त्यांचा वेग, हिंसा पाहिली असती... ते खरोखरंच थक्क करणारं होतं. या लोकांनी कमाल केली."
व्हेनेझुएलाजवळ अमेरिकेची लष्करी जमवाजमव
गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेचे हजारो सैनिक या भागात तैनात करण्यात आले होते. एक विमानवाहू युद्धनौका आणि अनेक युद्धनौका तैनात करण्यात आल्या होत्या. गेल्या काही दशकांमधील ही सर्वात मोठी लष्करी जमवाजमव होती.
कारण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मादुरोंवर अमली पदार्थांच्या तस्करी आणि 'नार्को-टेररिझम'चे आरोप केले होते. तसंच या प्रदेशातील कथित अमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या अनेक बोटींना उद्ध्वस्त करण्यात आलं होतं.
मात्र, 'ऑपरेशन ॲब्सल्यूट रिझॉल्व्ह'चे सुरुवातीचे संकेत आकाशात दिसले होते. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनुसार, बॉम्बफेक करणारे लढाऊ विमानं आणि टेहळणी करणाऱ्या विमानांसह 150 हून अधिक विमानं रात्रभर तैनात करण्यात आली होती.
ट्रम्प फॉक्स न्यूजला म्हणाले, "ही खूप गुंतागुंतीची कारवाईची होती, अतिशय गुंतागुंतीची. संपूर्ण युद्धसराव, लँडिंग, विमानांची संख्या. प्रत्येक संभाव्य परिस्थितीसाठी आमच्याकडे एक लढाऊ विमान सज्ज होतं."
स्थानिक वेळेनुसार, जवळपास 02:00 वाजता काराकासमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. त्यानंतर शहरावर धुराचे लोट उठताना दिसले.
रिपोर्टर आना वेनेसा हरेरो यांनी बीबीसीला सांगितलं, "मी एक अतिशय मोठा आवाज ऐकला, मोठा स्फोट. यामुळे सर्व खिडक्या हादरल्या. त्यानंतर लगेचच मी धुराचा एक खूप मोठा ढग पाहिला. त्यामुळे जवळपास सर्व दृश्य झाकलं गेलं."
त्या म्हणाल्या, "संपूर्ण शहरात विमान आणि हेलिकॉप्टर उडत होते."
काराकासचा वीजपुरवठा खंडित करून हल्ला
लवकरच सोशल मीडियावर वेगानं अनेक व्हीडिओ शेअर होऊ लागले. त्यात आकाशात अनेक विमानं आणि स्फोटांनंतरची परिस्थिती दाखवण्यात आली होती. एका व्हीडिओमध्ये हेलिकॉप्टरचा ताफा काराकासवरून कमी उंचीवरून उडताना दिसला. तर खाली स्फोटांमधून निघणारा धूर दिसत होता.
डॅनिएला या एका प्रत्यक्षदर्शीनं बीबीसीला सांगितलं, "आम्ही जवळपास 01:55 वाजता स्फोटांचा आवाज आणि काराकासवरून उडणाऱ्या विमानांच्या आवाजानं जागे झालो. सर्वत्र पूर्ण अंधार होता. फक्त जवळ होत असलेल्या स्फोटांचा प्रकाश दिसत होता."
त्या म्हणाल्या, "शेजारी राहणारे लोक एकमेकांना ग्रुप चॅटमध्ये संदेश पाठवत होते. सर्वजण गोंधळात पडले होते. काय होतं आहे हे कोणालाच समजत नव्हतं. स्फोटांमुळे सर्वजण घाबरलेले होते."
बीबीसी व्हेरिफायनं काराकासच्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्फोट, आग आणि धूर दाखवणाऱ्या अनेक व्हीडिओंची पडताळणी केली आहे. तसंच अमेरिकेच्या ऑपरेशनमध्ये कोणत्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
आतापर्यंत बीबीसी व्हेरिफायनं 5 ठिकाणांची पुष्टी केली आहे. यात जनरलिसिमो फ्रान्सिस्को दे मिरांडा एअर बेस, ला कार्लोटा नावाचं हवाई क्षेत्र आणि काराकासला कॅरेबियन समुद्राशी जोडणाऱ्या पोर्ट ला गुआइरा यांचा समावेश आहे.
अधिकाऱ्यांनुसार, काही हवाई हल्ल्यांमध्ये एअर डिफेन्स सिस्टम्स आणि इतर लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. ट्रम्प यांनी असेही संकेत दिले की, मिशन सुरू होण्याआधी अमेरिकेनं काराकासचा वीज पुरवठा खंडित केला होता. अर्थात त्यांनी हे सांगितलं नाही की हे कसं करण्यात आलं.
ते म्हणाले, "आमच्या एका खास निपुणतेमुळे काराकासचा वीज पुरवठा मोठ्या प्रमाणात बंद झाला होता. तिथे अंधार होता आणि तो प्राणघातक होता."
'त्यांना माहीत होतं की, आम्ही येत आहोत'
जेव्हा काराकासमध्ये सर्वत्र हल्ल्यांचे आवाज ऐकू येत होते. त्यावेळेस अमेरिकेचे सैनिक शहरात प्रवेश करत होते. बीबीसीचे अमेरिकेतील सहकारी असलेल्या सीबीएसशी जोडलेल्या सूत्रांनुसार, यामध्ये एलीट डेल्टा फोर्सचे सैनिकदेखील होते. ते अमेरिकेच्या सैन्यातील टॉप स्पेशल मिशन युनिट आहे.
ते मोठ्या प्रमाणात शस्त्रसज्ज होते आणि त्यांनी सोबत एक ब्लो-टॉर्च देखील आणला होता. त्यामुळे आवश्यकता भासल्यास मादुरोंच्या सेफ हाऊसचे धातूचे दरवाजे कापता येणार होते.
जनरल केन यांच्यानुसार, स्थानिक वेळेनुसार, 02:01 वाजता हल्ला सुरू झाल्यानंतर काही वेळातच सैनिक मादुरोच्या ठिकाणावर पोहोचले. ट्रम्प यांनी त्या सुरक्षित ठिकाणाला काराकासच्या मधोमध असलेला एक अतिशय सुरक्षा असणारा लष्करी 'किल्ला' म्हटलं.
ते म्हणाले, "त्यांनी पूर्ण तयारी केली होती. ते आमची वाट पाहत होते. त्यांना माहीत होतं की, आम्ही येत आहोत."
सैनिक तिथे पोहोचताच त्यांच्यावर गोळीबार सुरू झाला. अमेरिकेच्या एका हेलिकॉप्टरलादेखील लक्ष्य करण्यात आलं. मात्र ते हेलिकॉप्टर त्यातून बचावण्यात यशस्वी झालं.
जनलर केन म्हणाले, "मादुरो यांना पकडणारी टीम त्यांच्या परिसरात उतरली आणि वेगानं, अचूकतेनं आणि शिस्तबद्धपणे पुढे सरसावली."
ट्रम्प म्हणाले, "ते थेट आत शिरले. ते अशा जागीही शिरले, जिथे शिरणं सोपं नव्हतं. उदाहरणार्थ, पोलादी दरवाजे, जे विशेषकरून याच कारणामुळे बसवण्यात आले होते."
या ऑपरेशनमध्ये मादुरो यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांनाही पकडण्यात आलं.
'ऑपरेशनची माहिती गुप्त राहावी म्हणून काँग्रेसला कल्पना दिली नाही'
ऑपरेशनदरम्यान, परराष्ट्र मंत्री रुबिओ यांनी खासदारांना या कारवाईची माहिती देण्यास सुरुवात केली. या निर्णयाबद्दल नंतर काँग्रेसच्या काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
सीनेटमधील डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते चक शूमर म्हणाले, "मला हे स्पष्ट करायचं आहे की, निकोलस मादुरो एक बेकायदेशीर हुकुमशहा आहेत. मात्र काँग्रेसच्या मंजुरीशिवाय आणि पुढे काय होईल, याची कोणतीही विश्वासार्ह योजना बनवल्याशिवाय लष्करी कारवाई करणं बेजबाबदारपणा आहे."
शनिवारी (3 जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत रुबिओ म्हणाले की, जर काँग्रेसला आधी कल्पना देण्यात आली असती, तर ऑपरेशन संकटात सापडलं असतं. ट्रम्प म्हणाले, "काँग्रेसमधून माहिती लीक होण्याची शक्यता असते. ते चांगलं झालं नसतं."
निकोलस मादुरो यांनी अलीकडेच कथितरित्या क्युबाच्या अंगरक्षकांवरील अवलंबित्व वाढवलं होतं.
ट्रम्प यांच्या मते, जेव्हा अमेरिकेच्या विशेष पथकातील सैनिक मादुरोंच्या परिसरात दाखल होत होते. तेव्हा व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष एका सुरक्षित खोलीकडे पळण्याचा प्रयत्न करत होते.
ते म्हणाले, "ते एका सुरक्षित जागेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ती सुरक्षित राहिली नसती. कारण आम्ही जवळपास 47 सेकंदांमध्ये तो दरवाजा उडवला असता."
ते म्हणाले, "ते दरवाजापर्यंत पोहोचले असते. मात्र ते दरवाजा बंद करू शकले नाहीत. त्यांना इतक्या वेगानं घेरण्यात आलं की, ते त्या खोलीत जाऊच शकले नाहीत."
जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, जर अटकेला विरोध झाला असता, तर अमेरिकेनं मादुरो यांना मारलं असतं का? यावर ट्रम्प म्हणाले, "असं घडू शकलं असतं."
ते म्हणाले की, अमेरिकेच्या तुकडीतील 'एक-दोन जण जखमी झाले' आहेत. मात्र कोणत्याही सैनिकाचा मृत्यू झालेला नाही. तर दुसऱ्या बाजूला व्हेनेझुएलाच्या अधिकाऱ्यांनी कोणाच्याही मृत्यूची पुष्टी केलेली नाही.
याआधी अमेरिकेनं मादुरो यांच्या अटकेसाठी मदत करणाऱ्याला किंवा माहिती देणाऱ्याला 5 कोटी डॉलरचं (जवळपास 450 कोटी रुपये) बक्षीस जाहीर केलं होतं.
मात्र, शनिवारी (3 जानेवारी) पहाटे स्थानिक वेळेनुसार 04:20 वाजेपर्यंत मादुरो आणि त्यांची पत्नी, अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाच्या ताब्यात होते. त्यांना घेऊन हेलिकॉप्टर व्हेनेझुएलाच्या सीमेतून बाहेर पडत होते. मादुरो आणि त्यांच्या पत्नीला न्यूयॉर्कला नेलं जात होतं. तिथे त्यांच्यावर गुन्हेगारी खटले चालवण्यात येण्याची अपेक्षा आहे.
जवळपास 1 तासानंतर ट्रम्प यांनी जगाला मादुरो यांना पकडल्याची माहिती दिली. ते म्हणाले, "मादुरो आणि त्यांच्या पत्नीला लवकरच अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेच्या पूर्ण ताकदीला तोंड द्यावं लागेल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)