You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बस चालक ते राष्ट्राध्यक्ष आणि मग पदच्युत; वाचा निकोलस मादुरो यांचा आत्तापर्यंतचा प्रवास
- Author, डॅनियल गार्सिया मार्को, अँजेल बर्म्युडेझ आणि जोस कार्लोस क्युटो
- Role, बीबीसी न्यूज मुंडो
2013 साली निकोलस मादुरो यांनी ह्युगो चावेझ यांच्यानंतर व्हेनेझुएलाचे अध्यक्षपद स्वीकारलं, तेव्हा व्हेनेझुएलाचे नागरिक त्यासाठी आधीच तयार होते.
कारण त्यांना कल्पना होती की, निकोलास मादुरोच पुढचे राजकीय वारसदार होते. ह्युगो चावेझ या करिष्माई पूर्वसुरीने सत्तेची सूत्रे हातात घेण्यासाठी निवडलेला वारसदार.
2012 च्या उत्तरार्धात कर्करोगाच्या उपचारांसाठी चावेझ यांचा व्हेनेझुएलाची राजधानी कराकास आणि क्युबाची राजधानी हवाना यांदरम्यानचा प्रवास अधिकच वाढला होता.
हा आजार पुढे जाऊन चावेझ यांच्या मृत्यूचं कारण ठरणार होता. परंतु, त्याआधीच त्यांनी व्हेनेझुएलाच्या सरकारी टीव्हीवर येऊन आपल्या राजकीय वारसदाराचे नाव जाहीर केले.
कॅमेऱ्यासमोर चावेझ यांनी स्पष्ट केलं की, जर आपण पदावर काम करण्यास असमर्थ ठरलो, तर तत्कालीन उपाध्यक्ष मादुरो यांनी केवळ घटनात्मक कार्यकाळ पूर्ण करावा असेच नव्हे, तर नव्या निवडणुकांत अध्यक्ष म्हणून निवडून यावे.
चावेझ यांना वाटत होते की, मादुरो यांनीच त्यांचा 'बोलिव्हेरियन क्रांती' हा राजकीय प्रकल्प पुढे नेला पाहिजे. ते कट्टरतेपेक्षा अधिक व्यावहारिक व्यक्तिमत्त्वाचे होते; साध्या कपड्यांत रस्त्यावरील सभांमध्ये ते जितके सहज असत, तितकेच सूट-टाय घालून औपचारिक बैठकींमध्येही.
औपचारिक शिक्षण कमी असलेल्या, मात्र राकट स्वभावाचा माणूस म्हणून कमी लेखला गेलेल्या मादुरोंसाठी ह्युगोंनी दाखवलेला विश्वास मोठी गोष्ट होती.
शिवाय, प्रत्यक्षात आपल्या अध्यक्षपदाच्या काळातही ते या प्रतिमेवरच झुलताना, फुलताना दिसले.
मार्च 2013 मध्ये चावेझ यांच्या मृत्यूची घोषणा मादुरो यांनीच केली आणि त्याच वेळी जवळजवळ पूर्णपणे तेलाच्या उत्पन्नावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था धोकादायकरीत्या डळमळू लागली होती.
ह्युगो चावेझ यांच्या निधानंतरच्या 10 वर्षात व्हेनेझुएलामध्ये राजकीय आणि सामाजिक उलथापालथी होत राहिल्या.
अनेकदा संकटं आली. मादुरो यांच्या एकाधिकारशाही राजवटीबद्दल देशात आणि परदेशातून टीका होत राहिली. याच दरम्यान मादुरो यांची सत्तेवरील पकड अधिक कमकुवत होत गेली.
मादुरोंसमोरची आव्हानं अशी वाढत गेली
मादुरोंसमोरील आव्हान सुरुवातीपासूनच अत्यंत मोठं होतं. केवळ करिष्माई चावेझ यांच्यानंतर नेतृत्व करणं आणि त्यांनी निर्माण केलेली निष्ठा राखणं एवढंच नव्हे, तर ढासळत चाललेल्या आर्थिक परिस्थितीला सामोरे जाणेही त्यांना भाग होते.
चावेझ यांच्या अखेरच्या वर्षांत, तेलाच्या किमती मंदावू लागल्याने व्यापक आर्थिक सुधारणांवर चर्चा सुरू झाली होती.
चावेझ यांच्या निधनानंतर, विनिमय दर प्रणालीतील (Exchange-rate System) बदलांसारख्या सुधारणांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मादुरो यांच्यावर आली.
मात्र, ठाम नेतृत्वाबाबत चावेझ यांच्या तुलनेत काहीसं कमी ठरल्यानं आणि परस्पर स्पर्धात्मक गटांमध्ये अडकून पडल्यामुळे मादुरो यांच्या सुधारणांना गती मिळाली नाही.
2014 मध्ये जागतिक तेलाच्या किमती कोसळल्या आणि त्यामुळे तीव्र आर्थिक संकट उद्भवलं, ज्याचे दुष्परिणाम आजही व्हेनेझुएलाच्या जनतेला भोगावे लागत आहेत.
त्या काळातील विश्लेषकांनी वेगाने वाढत चाललेल्या संकटाला तोंड देण्यात अपयशी ठरल्याबद्दल सरकारवर टीका केली.
मादुरो यांनी महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांकडे सोपवल्या, अन्नधान्य आणि मूलभूत वस्तूंच्या आयातीपासून ते देशाची मुख्य महसूल स्रोत असलेल्या राज्य तेल कंपनी PDVSA चालवण्यापर्यंतची जबाबदारी त्यांच्यावर दिली, यामुळे अनेकजण निराश झाले.
लष्कराचा प्रभाव वाढत असतानाही, छावण्यांमधील असंतोष कायम राहिला. कटकारस्थानं, अंतर्गत तणाव आणि अटकसत्रे सुरूच होती. त्या सुरुवातीच्या वर्षांपासूनच मादुरो यांचं सरकार सातत्याने अस्थिर असल्याचे दिसून येत होते.
व्हेनेझुएलात उसळला होता जनक्षोभ
वाढत चाललेल्या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर, 1999 नंतर 2015 मध्ये प्रथमच व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षांनी नॅशनल असेंब्लीमध्ये मोठे बहुमत मिळवले.
याचा अर्थ असा होता की सत्ताधारी पक्षाच्या पाठिंब्याशिवायही ते कायदे मंजूर करू शकत होते आणि अधिकाऱ्यांची नेमणूक करू शकत होते.
हे आधीच ओळखून, नव्या असेंब्लीने कामकाज सुरू करण्यापूर्वी मादुरो यांनी आपले निष्ठावंत असलेल्या व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त केलं.
या न्यायाधीशांनी नंतर असेंब्लीचे अधिकार रोखले, पात्र बहुमत होऊ नये म्हणून तीन विरोधी आमदारांचे सदस्यत्व निलंबित केले आणि पुढे जाऊन असेंब्लीला न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत तिचे निर्णय अमान्य ठरवले.
या कारवायांचा लॅटिन अमेरिकेतील अनेक सरकारांनी निषेध केला, मात्र, 2016 च्या अखेरीस न्यायालयाने मादुरो यांच्याविरोधातील जनमत-संग्रह (रिकॉल रेफरेंडम) आणि राजकीय खटला चालवण्याचे प्रयत्न असे दोन्ही रोखले.
मार्च 2017 मध्ये विरोधकांनी सरकारवर 'सत्तापलट' केल्याचा आरोप केला.
सर्वोच्च न्यायालयाने 72 तासांच्या आत निर्णय मागे घेतला, तरी तोपर्यंत नुकसान झाले होते. व्यापक जनक्षोभ उसळला आणि चार महिने चाललेल्या आंदोलनांत सुमारे 120 लोकांचा मृत्यू झाला.
सरकारने दडपशाहीने प्रत्युत्तर दिले, पण त्याचवेळी स्वतःच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर समर्थक निदर्शनांचे आयोजनही केले.
सरकारची सर्वात प्रभावी रणनीती म्हणजे प्रादेशिक निवडणुकांची घोषणा करणे; यामुळे या निवडणुकांत सहभागी व्हायचे की नाही, यावरून विरोधकांत फूट पडली.
तसेच सरकारने घटनात्मक असेंब्ली (कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली) स्थापन केली, जी नॅशनल असेंब्लीपेक्षा वरचढ विधिमंडळ होती आणि सरकारच्या बाजूने उभी होती. या दोन्ही निवडणुकांवर फसवणुकीचे आरोप झाले.
अखेरीस दडपशाही, लांबलेल्या आंदोलनांमुळे थकलेले आंदोलक आणि सरकारची हट्टाग्रही भूमिका यांमुळे मादुरो या अशांत कालखंडातून तग धरून बाहेर पडू शकले.
मादुरो विरुद्ध ग्वाइदो
मे 2018 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये विजय मिळवल्यानंतर मादुरो यांनी जानेवारी 2019 मध्ये दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली.
मात्र, या निवडणुका बहुतेक विरोधी पक्षांच्या सहभागाशिवाय झाल्या होत्या आणि अमेरिका, युरोपियन युनियन तसेच डझनभर लॅटिन अमेरिकन देशांनी या निवडणुकांना 'फसवणुकीच्या निवडणुका' अशी टीका केली.
यावर विरोधकांनी दावा केला की, अध्यक्षपद रिक्त आहे आणि घटनेनुसार नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष हुआन ग्वाइदो यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून 30 दिवसांच्या आत निवडणुका जाहीर कराव्यात.
ग्वाइदो यांना ट्रम्प प्रशासनासह युरोप आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांनी मान्यता दिली. यानंतर ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या तेल उद्योगावर निर्बंध लादले, हा देशाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे.
यामुळे व्हेनेझुएलाचे तेल उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले, तसेच परदेशात असलेल्या आणि कोट्यवधी डॉलर्स किमतीच्या मालमत्तांवरील मादुरो सरकारचा ताबा गेला.
30 एप्रिलच्या पहाटे, व्हेनेझुएलाचे काही सैनिक आणि विरोधी नेते लिओपोल्डो लोपेझ यांच्यासोबत ग्वाइदो यांनी एक संदेश प्रसारित केला, ज्यात त्यांनी नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन केले.
मात्र, मादुरो सरकारला लष्कराकडून मिळणाऱ्या पाठिंब्यात कोणतीही मोठी फूट पडली नाही. स्वतःही सातत्याने अटकेच्या धोक्यात असलेल्या ग्वाइदो यांची ही धमकी अखेर निष्फळ ठरली.
अखेरीस मादुरोंना अमेरिकेनं पदच्युत केलं
मागील 18 महिन्यांत दोन घटनांमुळे मादुरो यांची सत्तेवरील पकड लक्षणीयरीत्या कमकुवत झाली. त्यात भरीस भर म्हणजे, जुलै 2024 मध्ये व्हेनेझुएलात झालेली अध्यक्षीय निवडणूक आणि मागील वर्षी जानेवारीत ट्रम्प यांचे पुन्हा व्हाइट हाऊसमध्ये पुनरागमन.
अध्यक्षीय निवडणुकीत मादुरो यांना विजयी घोषित करण्यात आले, मात्र कोणतेही खातरजमा केलेले निकाल जाहीर झाले नाहीत.
याउलट, विरोधकांनी 80 टक्क्यांहून अधिक मतमोजणी पत्रके (टॅली शीट्स) प्रसिद्ध केली, ज्यातून त्यांचा उमेदवार एडमुँडो गोंझालेझ उरुतिया स्पष्ट विजेता असल्याचे दिसून आले.
लवकरच मादुरो यांच्या समर्थक गटात फूटीचे चिन्ह दिसू लागले. पारंपरिक सरकारसमर्थक मानल्या जाणाऱ्या परिसरांतील लोकांसह हजारो व्हेनेझुएलियन नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले.
अधिकृत आकडेवारीनुसार, सरकारने प्रत्युत्तरादाखल दोन हजारांहून अधिक लोकांना तुरुंगात डांबले.
गोंझालेझ उरुतिया स्पेनमध्ये निर्वासित झाले, तर निवडणूक लढवण्यास बंदी घातलेली विरोधी नेत्या मारिया कोरीना माचाडो भूमिगत झाल्या.
डिसेंबर 2025 मध्ये ओस्लो येथे नोबेल शांतता पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या पुन्हा सार्वजनिकपणे समोर आल्या.
ट्रम्प यांच्या व्हाइट हाऊसमधील पुनरागमनासोबतच लॅटिन अमेरिकेतील अंमली पदार्थ तस्करीविरोधात अधिक कठोर धोरण राबवण्यात आले आणि दबावही वाढला.
ट्रम्प यांनी लवकरच मादुरो यांच्यावर व्हेनेझुएलाच्या सशस्त्र दलांतील एका प्रमुख ड्रग कार्टेलचे नेतृत्व केल्याचा आरोप केला, जो मादुरो यांनी फेटाळून लावला.
"दक्षिण अमेरिकेच्या इतिहासातील आतापर्यंत जमवलेला सर्वात मोठा नौदल ताफा" असं ट्रम्प यांनी संबोधलेला अमेरिकेचा ताफा सुमारे 15 हजार सैनिकांसह व्हेनेझुएलाच्या आसपास तैनात होता.
सप्टेंबरपासून या दलांनी कथितपणे अंमली पदार्थांनी भरलेल्या नौकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली, ज्यात किमान 110 जणांचा मृत्यू झाला. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या कारवायांना "न्यायालयाबाह्य हत्या" असे संबोधले आहे.
मादुरो यांच्या अटकेच्या काही दिवस आधी, कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सच्या राष्ट्रीय सुरक्षा संशोधक रॉक्साना विजिल यांनी बीबीसीला सांगितले की, कॅरेबियनमधील अमेरिकन लष्करी उपस्थितीमुळे या संकटावर तोडगा काढण्यासाठी मादुरो यांच्याकडे वाटाघाटींचे पर्याय मोठ्या प्रमाणात कमी झाले.
आणि अखेरीस मादुरो यांना पकडून अमेरिकेनं न्यूयॉर्क गाठलं.
चावेझ यांनी अगदी जातीनं व्हेनेझुएलातील क्रांती पुढे नेण्यासाठी निवडलेला हा माणूस आता न्यूयॉर्कमधील न्यायालयात आपल्या कारकीर्दीतल्या निर्णयांची, घटनांची बाजू मांडण्यासाठी उभा केला जाईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)