You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्वारगेट प्रकरणातील आरोपीला 12 दिवसांची पोलीस कोठडी, कंडक्टर असल्याचं भासवून ओढलं होतं जाळ्यात
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका 26 वर्षीय तरुणीवर डेपोमध्येच असलेल्या 'शिवशाही' बसमध्ये 25 फेब्रुवारीच्या पहाटे बलात्काराची घटना घडली होती.
अखेर आज 28 फेब्रुवारी रोजी पहाटे दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलं. शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयानं आरोपीला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुण्यामधून फलटणच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या तरुणीवर बलात्कार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली होती. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर या प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलीस शोध घेत होते. गेले तीन दिवस या घटनेनंतर राज्यात खळबळ माजली होती.
आरोपी शिरूर तालुक्यातील त्याच्या गावातील एका ऊसाच्या शेतात लपून बसला होता, तसेच त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांना माहिती देताना वर्तवली.
कंडक्टर असल्याचं भासवून ओढलं जाळ्यात
आरोपी दत्तात्रय गाडेला 12 दिवसांची म्हणजेच 12 मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तपास अधिकारी युवराज नांद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी स्वत:ला कंडक्टर भासवून पीडित महिलेला ताई म्हणून तिचा विश्वास संपादन करत होता. आरोपीनेच ती बस दाखवली होती तसेच बसमध्ये अनेक लोक असल्याचं त्यानं भासवलं होतं. मात्र, बस पूर्णपणे रिकामी होती."
पुढे त्यांनी सांगितलं की, "फिर्यादी महिलेने बसमधून बाहेर येण्याचा प्रयत्न केला होता. मला बाहेर सोडा, अशीही विनंती तिने केली होती. मात्र, आरोपीने तिला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर दोनवेळा लैंगिक अत्याचार केला आहे. यानंतर तो पळून गेला. पीडितेने नंतर मित्राच्या सांगण्यावरून फिर्याद दिली आणि गुन्हा दाखल केला."
"हा आरोपी अत्यंत सराईत आहे. तो मोबाईल बंद करून फिरत होता. आजवर त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत," असंही तपास अधिकारी युवराज नांद्रे यांनी सांगितलं आहे.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद
पीडितेच्या बाजूने असलेल्या सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की, या आरोपीवर दाखल असलेल्या 6 गुन्ह्यांपैकी 5 गुन्ह्यांत तक्रारदार महिला आहेत.
त्यामुळं, त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, ते स्पष्ट होतं. या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपचा आहे.
आरोपी सराईत असल्याने त्याने यापूर्वी आणखी काही महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत गैरकृत्य केलेलं आहे का, हे तपासणं गरजेचं आहे.
त्याचबरोबर आरोपीला मदत करणारे आणखी काहीजण त्याच्यासोबत आहेत का, हे तपासायचं आहे. त्याच्या सखोल तपासासाठी 14 दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे.
सरकारी वकिलांनीही आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती दिली. आतापर्यंत या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्याच्या वेळी वापरलेले कपडे तसेच आणखी काही मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत.
आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद?
आरोपीच्या वकिलांकडून फक्त 2 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.
आरोप सिद्ध होण्यापूर्वीच आरोपीचा चेहरा टीव्हीवर दाखवला गेला. तसेच, पोलिसांनी सोशल मीडिया ट्रायल केलं, असा दावाही त्याच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.
हा एवढा गंभीर स्वरुपाचा गुन्हा नाही, असंही आरोपीच्या वकिलांनी म्हटलं आहे.
त्यांनी पुढे असं म्हटलं आहे की, "ही मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली होती. तिच्यावर कोणताही अत्याचार झालेला नाही. या दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध झाले आहेत."
असा पकडला आरोपी
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी माहिती देताना सांगितले की, "गेले तीन दिवस तपास सुरू होता, शिरुर तालुक्यात गुनाट या गावात पोलिसांनी आरोपीला पकडले आहे. त्याला पकडण्यासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य मिळाले. तसेच ड्रोन आणि डॉगस्कॉडची मदत घेण्यात आली. त्याच्या अटकेची प्रक्रिया केली असून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. आरोपीला पकडण्यासाठी मदत करणाऱ्या नागरिकांचे मी स्वतः जाऊन आभार मानणार आहे. हा खटला आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल."
डार्क स्पॉट्सवर स्ट्रिटलाईटची सुविधा वाढवणार तसेच महिला सुरक्षेसाठी टेकड्या, डार्क स्पॉटसचे सेफ्टी ऑडिट सुरू आहे, अशी माहितीही अमितेश कुमार यांनी दिली.
माहिती देणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस
अमितेश कुमार यांनी आरोपीची शेवटची माहिती देणाऱ्या व्यक्तीला एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. ग्रामस्थांनी पोलिसांना मदत केली. आरोपीला समजू नये यासाठी आधी डिस्क्रीट पद्धतीने तपास सुरु होता.
जेव्हा आरोपीला तपासाबद्दल कळाले आहे, असं आम्हांला समजलं तेव्हा आम्ही ॲापरेशन ओपन केलं. या आरोपीवर 2024 मध्ये 1 तसेच 2019मध्ये पुणे ग्रामीण आणि अहिल्यानगरला 5 ते 6 गुन्हे दाखल आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
आरोपीबद्दल बोलताना ते म्हणाले, हा आरोपी आमच्या रडारवर नव्हता. पण एक मॅालेस्टेशन किंवा रेप चे गुन्हे दाखल आहेत अशां विरोधात कारवाई केली जाणार आहे. बस स्टॅण्ड साठी डिसिप्लिनींग मेथड वापरली जाणार आहे. सध्या प्राथमिक पातळीवर तपास सुरू आहे. या आरोपीच्या गळ्यावर Ligature (पट्टीने बांधल्याची, आवळल्याची खूण) आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं सांगितलं, त्याची शहानिशा करण्यात येत आहे."
गृहराज्यमंत्री काय म्हणाले होते?
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बसस्थानकातील घटनेबद्दल पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "एसटी महामंडळामार्फत खासगी सुरक्षा व्यवस्था घेतलेली आहे, त्याचा आढावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक घेतीलच. रात्री दीड वाजता पोलीस निरीक्षक स्वतः तिथे होते. पोलिसांकडून कोणतेही दुर्लक्ष झालेले नाही. घटना घडताना कोणालाही त्याचा आवाज आलेला नाही. तसेच बसस्थानकाच्या आवारात पोलीस चौकीमध्ये खासगी सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हते. त्यांनी नक्कीच चुका केल्या आहेत. त्यामुळेच ही घटना करायला आरोपीला सोपं गेलं."
बसस्थानकाच्या डेपो मॅनेजरच्या अधिकार कक्षेत खासगी सुरक्षा रक्षक काम करत आहेत. ते पोलीस चौकीत नसल्यास त्यांनी संबंधित संस्थेला सांगायला हवं होतं. असंही योगेश कदम म्हणाले.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणातील आरोपीची ओळख पटवण्यात आली होती.
पोलिसांनी आरोपीला पकडल्याची रुपाली चाकणकर यांनी एक्स(ट्विटर) या समाज माध्यमावरुन दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटलंय, "स्वारगेट बस स्थानकात झालेल्या अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला अखेर शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून रात्री 1.30 वा.पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपीचा जलद गतीनं शोध घेण्यासाठी सलग 3 दिवस पुणे पोलिसांच्या 13 पथकांसह संयुक्त कारवाईत शोध घेण्यासाठी ड्रोन आणि श्वानपथक तैनात केलं होते."
दरम्यान या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगानं एक सुरक्षा व्यवस्थापन आढावा बैठक आयोजित केली आहे.
याबद्दल त्यांनी म्हटलं आहे की, "याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करतच आहे. पण असे गुन्हे घडूच नयेत यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतच असतो.
या अनुषंगानं आज राज्य महिला आयोगानं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 1.30 वाजता मा.जिल्हाधिकारी पुणे, डीसीपी झोन-2 पुणे शहर पोलीस, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक पुणे, पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, स्वारगेट डेपो मॅनेजर यांच्या उपस्थितीत सुरक्षा व्यवस्थापन आढावा बैठक आयोजित केली आहे."
नेमकं काय घडलं होतं?
पुणे शहर पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पीडिता पुण्यामध्ये नोकरी करते. ती गावी जाण्यासाठी पहाटे साडेपाच-सहा वाजता स्वारगेट बस स्टँडवर आली होती. त्यावेळी हा आरोपी तिच्याजवळ आला आणि त्याने तिची ओळख करुन घेतली.
त्यानं तिच्याशी गोड बोलून तिला विश्वासात घेतलं. तू कुठं जात आहेस असं विचारलं असता तिनं आपण फलटणला जात असल्याचं सांगितलं.
तेव्हा आरोपीनं तिला फलटणची बस इथं लागत नसून दुसरीकडं लागत असल्याचं सांगितलं. आणि त्यानं तिला बस दाखवून देण्याच्या बहाण्यानं दुसरीकडं नेलं." असंही पुढं त्या म्हणाल्या.
पुढे पोलिसांनी माहिती दिली की, "सीसीटीव्ही फुटेजमध्येही ते दोघे बोलत असल्याचं दिसत आहे. दुसऱ्या बसजवळ नेल्यानंतर पीडितेनं त्याला विचारलं की, बसमध्ये अंधार आहे. तर त्यावर आरोपीनं तिला उत्तर दिलं की बस उशीरा आली आहे त्यामुळे सगळे प्रवासी झोपले आहेत.
तू टॉर्च लावून स्वत: बघ, असं म्हणून त्याने तिचा विश्वास प्राप्त केला. ती बसमध्ये गेली आणि त्यानंतर मग आरोपीने बसचा दरवाजा बंद करुन तिच्यावर बलात्कार केला."
"त्यानंतर हा आरोपी फरार झाला. त्यानंतर पीडिताही घरी जात होती. जाताना तिनं आपल्या मित्राला फोन केला आणि झालेली हकिकत सांगितली. तेव्हा त्यानं पोलिसांमध्ये तक्रार करण्यास सांगितल्यावर या पीडितेनं तक्रार केली."
अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये - रुपाली चाकणकर
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली होती.
त्यांनी म्हटलं होतं की, "ती मुलगी काही वेळ त्याच्याशी बोलताना सीसीटीव्हीत दिसत आहे. मुलींनी अनोळखी व्यक्तींशी बोलताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
शासकीय यंत्रणा, चौकशी कक्ष हे मदतीला असतातच तर त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता. मात्र दुर्दैवाने या मुलीने अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि पुढे हा गंभीर आणि वेदनादायी प्रसंग घडला."
पुढे त्यांनी म्हटलं होतं की, "पोलिसांनी 8 तपास पथक तयार केली आहेत. ही आठ तपास पथकं या सगळ्याचा कालपासून तपास करत आहेत. आरोपीला लवकरच अटक होईल. मात्र, माझं आवाहन आहे की तरुण मुलींनी, महिलांनी सार्वजनिक जीवनात वावरताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. यंत्रणांची मदत घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी. आता या प्रकरणात या पीडित मुलीच समुपदेशन व तसेच जलद तपासासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत."
विरोधक आक्रमक
या प्रकरणावरुन आता सर्वत्र संताप व्यक्त होताना दिसतोय. विरोधकांनीही सत्ताधारी पक्षाला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत ही घटना अतिशय संतापजनक असल्याचं म्हटलं आहे.
"स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बसस्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे.
शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शविणारी आहे," असं त्या म्हणाल्या.
पुढे त्यांनी म्हटलं की, "या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यावर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेले नाही.
ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली याचे प्रत्यंतर देणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे . यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी आमची मागणी आहे."
माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणी ट्वीट करत म्हटलं आहे की, "स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बस मध्ये बलात्कार झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक आहे.
"स्वारगेट बस स्थानक प्रशासन व स्वारगेट पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ही घटना गांभीर्याने घेतली पाहिजे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून स्वारगेट बस स्थानकावर मोठ्या संख्येने महिला प्रवासी येतात.
परंतु स्वारगेट बस स्थानक मध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत.
रात्रीच्या वेळेस या बस स्थानकामध्ये प्रचंड अंधाराचे साम्राज्य असते. यावेळी अनेक महिला भगिनींची कुचंबणा होते बस स्थानक परिसरात अनेक वेळेस माथेफिरू, दारुडे हे बसलेले असतात."
पुढं रवींद्र धंगेकर यांनी असंही म्हटलंय की, "पेट्रोलिंग वर असणाऱ्या पोलिसांनी अशा लोकांना बसस्थानक परिसराच्या बाहेर काढून दिले पाहिजे. गेल्या पावसाळ्यात देखील बस स्थानकाला तळ्याचे स्वरूप आले होते अजूनही येथे मूलभूत पायाभूत सुविधांचे काम झालेले नाही."
"काल घडलेली घटना ही त्या आरोपीच्या गलिच्छ मानसिकतेतून घडलेली घटना असली तरी ही घटना घडण्यास पोषक असे वातावरण करणारे बस स्थानक प्रशासन व पेट्रोलिंग वरील पोलीस अधिकारी हे देखील या घटनेला तितकेच जबाबदार आहेत," असंही त्यांनी म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)