राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याचा आरोप, मालवणध्ये भंगार विक्रेत्याचं घर बुलडोझरनं पाडलं; नेमकं प्रकरण काय?

    • Author, मुश्ताक खान
    • Role, बीबीसी मराठीसाठी

सिंधुदुर्गच्या मालवण शहरातील आडवण परिसरामध्ये एका भंगार व्यावसायिक असलेल्या कुटुंबावर 'देशविरोधी' घोषणा दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

एका स्थानिक व्यक्तीच्या तक्रारीनंतर मालवण पोलिसांनी भंगार व्यावसायिक व्यक्ती, त्यांची पत्नी आणि 15 वर्षीय मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीतील 23 फेब्रुवारीला झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये भारताचा विजय झाला. या विजयानंतर सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला.

या सामन्यानंतर एकीकडे सर्वत्र आनंद साजरा केला जात असताना दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे मात्र राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपांमुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली.

मालवणमध्ये भंगार विक्रेत्यानं राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याचा दावा करण्यात आला. अशा प्रकारच्या दाव्याननंतर ही परिस्थिती आणखीनच तणावपूर्ण बनली.

त्यानंतर स्थानिकांनी रोष व्यक्त करत या भंगार विक्रेत्यावर कारवाईची मागणी केली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी या प्रकरणामध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रविरोधी घोषणा देण्यात आल्याचा आरोप करत त्यांनीही कारवाईची मागणी केली.

त्यानंतर मालवण नगरपरिषदेनं कारवाई करत या कुटुंबाचं कच्च्या स्वरुपात असलेलं घर बुलडोझरनं उद्ध्वस्त केलं आहे.

दुसरीकडे, मालवण पोलिसांनी या कुटुंबाला अटक केली होती. मात्र, आता जामीन मिळाला असल्याची माहिती आहे.

हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेऊया.

नेमकं काय घडलं?

चॅम्पियन्स ट्रॉफीचा भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना रविवारी (23 फेब्रुवारी) दुबईमध्ये खेळला गेला. भारतानं हा सामना जिंकल्यानंतर देशभरात आनंद साजरा करण्यात आला.

दरम्यान, मालवणमधील आडवण भागात एका भंगार विक्रेत्यानं राष्ट्रविरोधी घोषणा दिल्या, असा आरोप करण्यात आला.

सचिन संदीप वराडकर हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत.

या कथित घोषणांनंतर सदर व्यक्तीला तक्रारदार सचिन वराडकर यांच्यासहित काहींनी जाब विचारला असता, अरेरावी करत उलट उत्तरं मिळाली, असाही दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

त्यानंतर संतप्त नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या कुटुंबातील तिघांना ताब्यात घेतलं.

दुसऱ्या दिवशी सोमवारीही (24 फेब्रुवारी) या घटनेचे मालवणात तीव्र पडसाद उमटले.

मालवणातील सकल हिंदू समाजातर्फे मोटारसायकलद्वारे निषेध मोर्चा काढून संबंधित कुटुंबावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

त्यानंतर, मालवण पोलिसांनी या प्रकरणी भंगार व्यावसायिक कुटुंबीयांवर तीन कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला.

भारतीय न्याय संहिता 2023 नुसार 196 (कोणी धर्म, वंश, जन्मस्थान, निवास, भाषा, इत्यादी कारणांवरून निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि एकोपा टिकवण्यास बाधक अशी कृत्ये करणे), 197 (राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचेल असं कृत्य करणं) आणि 3(5) (जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्तींनी, त्या सर्वांच्या समान उद्देशाच्या पुरःसरणार्थ गुन्हेगारी कृती केली असते तेव्हा) या कलमांनुसार मालवण पोलिसांनी भंगार व्यावसायिक कुटुंबावर गुन्हे दाखल केले.

ताज्या माहितीनुसार, या कुटुंबाला जामीन मिळाला आहे.

बुलडोझरनं उद्ध्वस्त केलं आरोपीचं घर

ज्या कुटुंबावर अशाप्रकारच्या राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याचा आरोप करण्यात येत आहे, ते कुटुंब बेकायदा पद्धतीनं वास्तव्य करत होतं, असा दावा आमदार निलेश राणे यांनी केला. तसं पत्रही निलेश राणे यांनी मालवण नगरपरिषदेला दिला.

यानंतर, मालवण नगर परिषद प्रशासनानं "या भंगार विक्रेत्या कुटुंबाचं घर अनधिकृत होतं" असं म्हणत त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवला. ही कारवाई स्थानिक आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाला पत्र लिहिल्यानंतर केल्याचंही मालवण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी संतोष झिरगेंनी सांगितलं.

या घटनांनंतर मालवणमधील वातावरण अधिकच चिघळलं आहे. या घटनेवर सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

या घटनेबाबत आमदार निलेश राणे यांनी एक्स या सोशल प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केलीय. या पोस्टला नगरपरिषदेनं केलेल्या कारवाईचे फोटोही जोडले आहेत.

या पोस्टमध्ये निलेश राणे म्हणाले आहेत की, "मालवणात एक मुसलमान परप्रांतीय भंगार व्यवसायिक यांनी काल भारत पाकिस्तान मॅच नंतर भारत विरोधी घोषणा दिल्या. कारवाई म्हणून आम्ही या परप्रांतीयला (इथे निलेश राणे यांनी शिवी दिली आहे.) जिल्ह्यातून हाकलून देणारच, पण त्या अगोदर तात्काळ त्याचा भंगार व्यवसाय उध्वस्त करून टाकला."

तसंच, निलेश राणेंनी पोलीस आणि नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानत म्हटलंय की, "मालवण नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी ताबडतोब कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार."

दरम्यान, ही भंगार विक्रेता व्यक्ती, त्याची पत्नी आणि त्याच्या अल्पवयीन मुलाविरोधात पोलिसांनी तातडीनं कारवाई करत न्यायलयात हजर केलं होतं.

न्यायलयाने व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती, तर मुलाची रवानगी रिमांड होम करण्यात आली होती.

मात्र, आज या प्रकरणी संशयित आरोपींच्यावतीने न्यायलयात जामीन अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यांच्या सुटकेच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे.

निलेश राणे काय म्हणाले?

आमदार निलेश राणे यांनी त्यांच्या 'एक्स' अकाउंटवरून पोस्ट करत या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती.

'भारतीय नागरिक म्हणून आपल्याला काही गोष्टी कळाव्यात म्हणून मालवणची घटना आणि मालवणचा मुसलमान भंगार व्यवसाय करणारा याबद्दल काही माहिती' असं म्हणत त्यांनी एक व्हीडिओही पोस्ट केला आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यानंतर एका मुसलमान भंगार व्यावसायिकाने भारतविरोधी घोषणा दिल्या असून त्यानंतर संतप्त नागरिकांनी सदर व्यावसायिकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केल्याचं निलेश राणे यांनी या व्हिडिओतून सांगितलंय.

राणे या व्हीडिओत म्हणाले की, "ते तीन भाऊ आहेत, कुठून आले, कसे आले? 10-12 वर्षांपूर्वी मालवणात कसे आले, याचं काही उत्तर अद्याप सापडत नाहीये. चौकशीतून काय ते बाहेर येईलच. पण तुम्हाला आधार कार्ड कोणी दिले, कोणत्या पत्त्याच्या जीवावर मिळाले, कोणत्या कागदपत्रांच्या आधारे तुम्ही इथे राहत आहात?" असे प्रश्न देखील त्यांनी व्हीडिओच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.

राणे पुढे म्हणाले, "अशा व्यक्ती आपल्या आजुबाजूला असतात पण आपल्याला कळत नाही. त्यांचा खरा रंग, हेतू हा आपल्याला अशा घटना घटेपर्यंत कळत नाही. अशावेळी जागरूक राहावं आणि जर अशा व्यक्ती आपल्या आसपास असतील तर त्याबाबत प्रशासनाला कळवावं", असं आवाहन त्यांनी सदर व्हीडिओच्या माध्यमातून केलं आहे.

पोलीस काय म्हणाले?

सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "या प्रकरणी चौकशी सुरू आहे. देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी कोणताही व्हीडिओ उपलब्ध नाहीये. एका व्यक्तीच्या तक्रारीवरून आम्ही ही कारवाई केली आहे. या प्रकरणाशी संबंधित गोष्टी आम्ही पडताळून पाहत आहोत.

"ज्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे, ते मूळचे उत्तर प्रदेश येथील आहेत. परंतु, गेल्या 20-25 वर्षांपासून ते सिंधुदुर्गात वास्तव्यास आहेत. त्यांचे आधारकार्ड, मतदान कार्ड आणि पॅन कार्ड देखील सिंधुदुर्गमधील आहेत. ही सर्व कागदपत्रे मिळवण्यामध्ये काही चुकीचे प्रकार झाले आहेत का? याचा तपास आम्ही करत आहोत."

या प्रकरणातील आरोपींचं वकीलपत्र मालवणमधील वकील घेणार नाहीत, अशी माहिती सोशल मीडियावर फिरत होती. या प्रकारचं ट्विट निलेश राणे यांनीही केलं होतं. त्यांनी म्हटलं आहे की, "मी मनापासून मालवण लॉयर्स बार असोसिएशन यांचे अभिनंदन करतो. मालवण मधील वकिलांनी भारताच्या विरोधात घोषणा देणाऱ्या आरोपी मुसलमानासाठी वकीलपत्र न देण्याचा निर्णय घेतला. देशभरात हे उदाहरण गाजलं पाहिजे, परत एकदा मनापासून आभार."

या प्रकरणी बीबीसी मराठीने मालवण तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कुमार धामापूरकर यांच्याकडून माहिती घेतली.

ते म्हणाले की, "ही चुकीची माहीती आहे. आम्ही बहिष्काराचा किंवा वकीलपत्र न घेण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. मी सध्या बाहेर आहे पण मालवणमध्ये परत आल्यानंतर संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल आम्ही माहिती देणार आहे. आम्ही वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेतला आहे ही चुकीची माहिती सोशल मीडियावरून पसरवण्यात आली आहे."

घर उद्ध्वस्त करण्याची कारवाई कशी झाली?

कथित देशविरोधी घोषणा दिल्याचा दावा झाल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी भंगारवाल्याच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम हटवण्यासंदर्भातील पत्र मालवण नगरपालिकेला दिलं.

त्यानंतर काही वेळातच या बांधकामावर बुलडोझर फिरवण्यात आला, अशी माहिती आहे.

मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष झिरगे यांनी ही कारवाई नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

"संबंधित भंगार व्यासायिकाने याठिकाणी अनधिकृत बांधकाम केलं होतं. शिवाय, या भंगार व्यवसायामुळे शहरातील वाहतुकीला देखील अडथळा होत होता. त्याचं सगळं सामान हे रस्त्यावर आलं होतं. आमदार निलेश राणे यांनीदेखील याबाबत आम्हाला पत्र दिलं होतं. त्यामुळे बुलडोझरच्या सहाय्याने आम्ही ही कारवाई केली आहे," अशी माहिती झिरगे यांनी बीबीसीला दिली आहे.

ज्यांच्यावर हा गुन्हा दाखल आहे त्यांच्याशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी बीबीसीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप तरी त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाहीये. हा संपर्क झाल्यानंतर त्यांचीही बाजू आम्ही इथे देऊ.

भंगार व्यावसायिकाने काय बाजू मांडली?

भंगार व्यावसायिकाला मंगळवारी (25 फेब्रुवारी) जमीन मंजूर झाला. बुधवारी त्यांची जेलमधून सुटका करण्यात आली आहे. कोर्टाने अटी शर्तीच्या आधी राहून त्यांना जामीन दिला आहे.

भंगार व्यवसायिक पती-पत्नीची बाजू मांडण्यासाठी कोर्टानेच ॲड. अक्षय सामंत यांची नियुक्ती केली. ॲड. अक्षय सामंत यांनी त्यांची बाजू मांडली आणि भंगार व्यवसायिक पती-पत्नीला प्रत्येकी 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर मंगळवारी जामीन मंजूर झाला.

त्यांची सुटका करताना कोर्टाने काही अटी-शर्थी ठेवल्या आहेत. या प्रकरणाची कोर्टामध्ये चार्जशीट दाखल होईपर्यंत दर शनिवारी संशयी आरोपींना मालवण पोलिस स्टेशनमध्ये सकाळी 10 ते 12 च्या दरम्यान हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर तपासकामी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं सांगण्यात आलं आहे. शिवाय, त्यांना कोर्टाच्या परवानगीशिवाय महाराष्ट्राबाहेर जाता येणार नाही आहे. तसंच या संदर्भातील तक्रारदार, साक्षीदार किंवा पंचांना कोणत्याही प्रकारचं अमीष दाखवता कामा नये, अशीही अट घालण्यात आली आहे. या अटी शर्थींचा भंग होऊ नये याची खबरदारी संशयित आरोपींनी घ्यायची आहे, असंही कोर्टानं जामीन देताना म्हटलं आहे.

मालवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी यासंदर्भात माहिती देताना असं सांगितलं आहे की, "आम्ही संशयित आरोपींना 25 तारखेला कोर्टात हजर केलं होतं. तेव्हा कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. आरोपींनी नंतर जामीनासाठी अर्ज केला तेव्हा कोर्टाने काही अटींसह जामीन मंजूर केला आहे."

जामीनानंतर आरोपींशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही. त्यांचे वकील ॲड. अक्षय सामंत यांच्याशी आम्ही या विषयावर बोललो. त्यांनी असं सांगितलं की सध्या माझा त्यांच्याशी संपर्क नाहीये. ते कुठे आहेत याबद्दल मला माहिती नाहीये. पण त्यांचा संपर्क झाल्यावर मी तुम्हाला नक्की कळवेन."

दरम्यान, पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केलेल्या रिमांड नोटमध्ये पंधरा वर्षांचा मुलगा 'अफगाणिस्तान जिंदाबाद पाकिस्तान मॅच हार जायेगा' अशा घोषणा देत होता. त्यानंतर या सगळ्या वादाला सुरुवात झाली, असं म्हटलं आहे. नंतर त्या मुलाच्या आई वडिलांनीही देशविरोधी घोषणा दिल्याचे आरोप करण्यात आले.

तक्रारदाराचं म्हणणं काय आहे?

तक्रारदार सचिन संदीप वराडकर यांनी पोलिसांना दिलेला जबाब न्यायलयात दाखल करण्यात आला.

त्यात पंधरा वर्षांचा मुलगा 'अफगाणिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मॅच हार जायेगा' अशा घोषणा देत होता, त्यानंतर या सगळ्या वादाला सुरुवात झाली, असं म्हटलं आहे. वराडकर यांनी केलेल्या दाव्यानुसार वादादरम्यान मुलाच्या पालकांनी भारताविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. अशी पोलिसांकडे नोंद आहे.

सिंधुदुर्गात राणे पितापुत्रांचा दबदबा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे कुटुंबाचा राजकीय प्रभाव अनेक दशकांपासून कायम आहे. नारायण राणे हे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत, तर त्यांचे पुत्र नितेश राणे हे कणकवलीचे आमदार असून राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री आहेत.

नारायण राणे यांचे दुसरे पुत्र निलेश राणे हे सध्या मालवण-कुडाळचे आमदार आहेत. राणे कुटुंबाची पकड सिंधुदुर्गमध्ये मजबूत आहे.

नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. नारायण राणे आणि नितेश राणे हे सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. तर निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आहेत. नारायण राणे हे यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत.

नितेश राणेंच्या प्रमाणेच आता निलेश राणेदेखील हिंदुत्ववादी भूमिका घेताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ झाराप येथे एका हॉटेलमध्ये चहाच्या कपात माशी पडल्याच्या वादावरून हॉटेल चालकाने पर्यटकांना मारहाण केली होती. या घटनेनंतर कुडाळ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हॉटेल मालक तन्वीर करामत शेख, शराफत अब्बास शेख, अब्बास उर्फ साहिल शराफत शेख, परवीन शराफत शेख, साजमीन शराफत शेख आणि तलाह करामत शेख यांना अटक केली आहे.

या मारहाणीच्या वादाला हिंदू-मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे, असाही दावा केला जातोय. झारप येथील ते हॉटेल अनधिकृत असल्याचं कारण देत प्रशासनानं पाडून टाकलं आहे.

त्यापूर्वी 19 जानेवारी 2024 रोजी आसिफ शेख या तरुणावर 'जय श्री राम' बोलायला दबाव आणला गेला होता. त्याबाबत कणकवली पोलिस स्थानकांमध्ये तो जबाबासाठी गेला असता त्याला मारहाण करण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे प्रकार वारंवार घडत आहेत.

'बुलडोझर न्याय' अत्यंच चुकीचा - कायदेतज्ज्ञ असीम सरोदे

देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असणाऱ्या भंगार विक्रेत्याच्या घरावर बुलडोझरनं केलेल्या कारवाईच्या कायदेशीर बाजूबाबत बीबीसी मराठीनं कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांच्याशी बातचीत केली.

कायदेतज्ज्ञ असीम सरोदे या प्रकरणासंदर्भात म्हणाले की, "निवासस्थान अनधिकृत असलं तरीही कोणतीही नोटीस न देता अशाप्रकारची कारवाई करणं एकतर बेकायदा आहे. दुसरी गोष्ट अशी की ही गोष्ट नगरपालिकेला आधीच का लक्षात आली नव्हती? नोटीस देणं, त्यानंतर त्यांची बाजू समजून घेणं या सगळ्या प्रक्रिया कायद्यात लिहिलेल्या आहेत. कुणीतरी नेता सांगतो म्हणून अशी एकतर्फी कारवाई करणं अत्यंत चुकीचं आहे. यामुळे कायदाबाह्य सत्ताकेंद्र सुरु होण्याचा धोका वाढतो आहे."

पुढे ते म्हणाले की, "एकूणच ज्यांचा बौद्धिक-वैचारिक दर्जा सुमार आहे आणि राजकारण तसेच मंत्रिपद हे समाजाच्या भल्यासाठी आणि विकासकामे करण्यासाठी असतं, याचं भान नसलेली लोकं पदावर बसलेली आहेत. त्यामुळे, विद्वेषपूर्ण पद्धतीने या घटना सुरू आहेत. उत्तर प्रदेशमध्येही असाच 'बुलडोझर न्याय' सुरू झाल्यावर शेवटी सर्वोच्च न्यायालयाला सांगावं लागलं की कुणीही कोणत्याही गुन्ह्यामध्ये आरोपी असेल याचा अर्थ त्याचं निवासस्थान उद्ध्वस्त करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. आम्हीच न्याय करणार असं हे 'सेल्फ पोलिसींग' ते अत्यंत चुकीचं आहे. समाजातील सौहार्द नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे."

महाराष्ट्राचा गृहविभाग काय करतोय? - विनायक राऊत

सध्या या प्रकरणावरुन राजकीय पडसादही उमटत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, "मालवणसारख्या छोट्या शहरात पाकिस्तानी लोक येतात आणि तिथे बसून व्यवसाय करतात हे निषेधार्ह आहे. मालवणमध्ये राहून 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देणारी कीड ठेचून काढली पाहिजे. या पाकिस्तानी लोकांना तिथे आधार कोणी दिला? त्यांना व्यवसायाला प्रोत्साहन कोणी दिलं? जरं पाकिस्तानी लोक मालवणसारख्या छोट्या शहतात येत असतील तर महाराष्ट्राचा गृहविभाग काय करतोय?"

तसेच, पोलिसांनी याचा तपास करावा, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)