सावरकर की भागोजीशेठ कीर; पतित पावन मंदिर कुणी बांधलं? वादाबाबत ऐतिहासिक तथ्य काय सांगतात?

    • Author, प्रविण सिंधू
    • Role, बीबीसी मराठी

रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) निर्मित इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकावर आक्षेप घेतला आहे. पतित पावन मंदिराच्या निर्मितीबाबतचा खोटा इतिहास पुस्तकातून सांगितला जात आहे, असा आरोप भंडारी समाज संघाने केला आहे.

भंडारी समाज संघाने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी या सर्वांकडे लेखी निवेदनाद्वारे आक्षेप घेत दुरुस्तीची मागणी केली आहे.

हा चुकीचा इतिहास दुरुस्त केला नाही तर 26 जानेवारीला लाक्षणिक उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे भंडारी समाज संघाने म्हणणं मांडताना पतित पावन मंदिरावरील शिलालेख आणि इतर ऐतिहासिक दस्तावेजांचा संदर्भही दिला आहे.

या पार्श्वभूमीवर पतित पावन मंदिराच्या इतिहासाबाबत इयत्ता आठवीच्या पुस्तकात नेमकं काय सांगितलं आहे? त्यावरून निर्माण झालेला नेमका वाद आणि त्याबाबत सर्व बाजुंची मते काय आहे, हे आपण जाणून घेऊयात.

काय आहे पुस्तकातील उल्लेख?

बालभारतीच्या इयत्ता 8 वीच्या इतिहासाच्या पुस्तकात सामाजिक व धार्मिक प्रबोधन नावाचा एक धडा आहे. त्यात हिंदू समाजातील चळवळ या शीर्षकाखाली हिंदू महासभा, मदन मोहन मालवीय, डॉ. केशव बळीराम हेडगेवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि पतित पावन मंदिर यावर भाष्य करण्यात आलं आहे.

"स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची निर्मिती केली," असं पुस्तकात म्हटलं आहे.

'खरा इतिहास मिटवण्याचे षडयंत्र'

या प्रकरणात रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने आपली भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी या सर्वांना लेखी निवेदनाद्वारे कळवली आहे.

या निवेदनात भंडारी समाजाने म्हटलं की, "महाराष्ट्र शासनानं इंग्रजी व मराठी माध्यमाच्या इयत्ता 8 वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पान क्र. 24 वर वि. दा. सावरकर यांनी पतित पावन मंदिर बांधले अशा स्वरूपाचा खोटा इतिहास समाविष्ट केला आहे."

"वास्तविक देशातील पहिले प्रतित पावन मंदिर दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वखर्चाने बांधले आहे. तसा शिलालेख 1931 मध्ये पतित पावन मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर आहे. त्याची छायांकीत प्रत सोबत जोडली आहे."

"दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वा. वीर सावरकर यांच्या विनंतीवरुन रत्नागिरीत स्वतः जागा खरेदी केली. त्यावर स्वखर्चानं पतितपावन मंदिर बांधलं आणि स्पृश्य अस्पृश्यांना एकत्र आणून सहभोजन घडवलं. त्याळी भारतातील मोठ मोठी संस्थानं देखील अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देऊ शकली नव्हती," असे निवेदनात म्हटले आहे.

"1931 मध्ये पतित पावन मंदिराच्या उभारणीपासून दरवर्षी दिवाबत्ती व देखभालीसाठी भागोजीशेठ स्वतः 1500 रुपये देत असत. पतित पावन मंदिर व मंदिरा शेजारील चाळ बांधण्यासाठी भागोजीशेठ कीर यांनी खासगीतून केलेला खर्च 1933 च्या भागोजी बाळोजी कीर चॅरीटेबल ट्रस्टच्या ऑडिट रिपोर्टमध्ये दाखवलेला आहे."

"असं असताना पतित पावन मंदिर सावरकर यांनी बांधल्याचा चुकीचा इतिहास पाठ्यपुस्तक मंडळ महाराष्ट्र सरकारचे शिक्षण मंत्रालय विद्यार्थ्यांना शिकवत आहे. सरकारच्या माध्यमातून खरा इतिहास मिटवण्याचे षडयंत्र केले जात आहे," असा आरोप रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने केला.

या पुस्तकाचे प्रकाशक विवेक उत्तम गोसावी असल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. भंडारी समाजाने 30 नोव्हेंबर 2023 रोजी याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन दिल्याचंही नमूद केलं. तसेच अद्यापपर्यंत कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. यावर तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी भंडारी समाजाने केली.

मागणी पूर्ण न झाल्यास 26 जानेवारी 2025 ला रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ आणि इतर समविचारी संस्था लाक्षणिक उपोषण करणार आहेत. मात्र, सरकारने कार्यवाहीचे लेखी आश्वासन दिल्यास उपोषण स्थगित करू, असंही नमूद केलं आहे.

भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर, उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर , परिट समाजाचे प्रभाकर कासेकर, कटबु समाजाचे अध्यक्ष बी टी मोरे, राजेंद्र विलणकर, सुरेंद्र घुडे, काका तोडणकर, अण्णा लिमये, सदानंद मयेकर, दिलीप भाटकर इत्यादींनी पतित पावन मंदिराच्या इतिहासाबाबत रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांना निवेदन दिले होते.

मंदिराच्या शिलालेखातील उल्लेख

रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने पतित पावन मंदिराच्या प्रवेशद्वारावरील 1931च्या शिलालेखाचा फोटोही निवेदनासोबत जोडला आहे. यात पतित पावन मंदिराच्या निर्मितीवर भाष्य करण्यात आलं आहे.

"रत्नागिरी हिंदु सभेचे वतीने देशवीर विनायकराव सावरकर यांच्या विनंतीवरून भक्तिभूषण श्रीयुत भागुजी बाळूजी कीर यांनी श्री पतित पावनाचे मंदीर अखिल हिंदु प्रित्यर्थ स्वकीय व्ययाने श्री भागेश्वराच्या कृपेने बांधून लोक सेवेस अर्पण केले आहे. (मिति फाल्गुन शुद्ध उरोज मंगळवार शके 1852. तारीख 24 फेब्रुआरी 1931)"

कीर लिखित सावरकरांच्या चरित्रातील उल्लेख

"सावरकरांच्या इच्छेला मान देऊन भागोजींनी फेब्रुवारी 1931 मध्ये रत्नागिरीत पतित पावन मंदिर अशी ओळख असलेलं एक भव्य मंदिर बांधलं," असा त्याठिकाणी उल्लेख आहे.

याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रावसाहेब कसबे म्हणाले की, "पतित पावन मंदिराची कल्पना सावरकरांची होती. मात्र, त्या मंदिराला लागणारे पैसे भागोजीशेठ यांनी दिले होते."

भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर यांचं म्हणणं काय?

यावर बीबीसी मराठीशी बोलताना रत्नागिरी तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर म्हणाले की, "ज्यांनी जागा खरेदी केली, हे मंदिर बांधलं त्यांच्याविषयी 1931 ला मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शिलालेखात माहिती दिली आहे.

त्या शिलालेखात म्हटलं आहे की, वि. दा. सावरकर यांच्या विनंतीवरून दानशूर श्रीमान भागुजी बाळूजी कीर यांनी पतित पावनाचे मंदीर स्वकीय व्ययाने म्हणजे स्वखर्चाने बांधून भागेश्वराच्या चरणी अर्पण केले."

"भागोजी कीर जीवंत असताना पतित पावन मंदिराच्या प्रांगणात त्यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला होता. सावरकरांनी त्यांच्या मनातील अस्पृश्यता मिटवण्याचं काम केलं. भागोजी कीर नसते, तर ते काम करणं अशक्य असतं."

"हे मंदिर बांधण्याआधी भागोजीशेठ कीर यांनी रत्नागिरी, वाई, पंढरपूर, आळंदी, देहू, पुणे, मुंबई, बिकानेर, गोकर्ण, महाबळेश्वर या ठिकाणी अशी अनेक मंदिरं, देवळं, धर्मशाळा, गोशाळा, अनाथ आश्रम, प्रवाशांसाठी विहिरी निर्माण केल्या. त्याचं हे कार्य आत्ताच्या सरकारने सावरकरांच्या नावावर खपवलं आहे."

"30 वर्षांपूर्वी आम्ही पतित पावन मंदिराच्या समोरील शाळेत शिकलो. त्यावेळी इतिहासाच्या पुस्तकात असा धडा होता की, पतित पावन मंदिर हे सावरकरांच्या विनंतीवरून दानशूर भागोजीशेठ कीर यांनी बांधलं. मात्र, 2014-15 मध्ये हा उल्लेख काढण्यात आला. आता त्याच शाळेत आमची मुलं शिकतात. त्यांना चुकीचा इतिहास शिकवला जात आहे. पुढील पीढिला खरा इतिहासच शिकवला पाहिजे."

पुस्तकातून हा उल्लेख काढल्यानंतर जवळपास नऊ वर्षांनी म्हणजे 2023 मध्ये हा मुद्दा लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी सरकार दरबारी याबाबत पाठपुरावा सुरू केला.

"आता इतिहासातून भागोजी कीर यांचं नावच काढून टाकलं आहे आणि हे मंदिर सावरकरांनी बांधलं आहे, असा चुकीचा इतिहास लोकांना सांगितला जातो. आम्ही सावरकरांवर नितांत प्रेम करणारी माणसं आहेत. त्यांचा आदर बाळगणारी माणसं आहोत. मात्र, भागोजीशेठ कीर यांचा इतिहास बदलून तो सावरकरांच्या नावावर खपवू नये," असं मत राजीव कीर यांनी व्यक्त केलं.

वादाचे कारण नाही-सदानंद मोरे

इतिहासाचं आत्ता अभ्यासक्रमात असलेलं हे पुस्तक 2018 मध्ये प्रकाशित झालं. तसेच सप्टेंबर 2021 मध्ये या पुस्तकाचे पुनर्मुद्रण झाले. त्यावेळी इतिहास विषय समितीचे अध्यक्ष राहिलेल्या ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना यावर आपलं मत व्यक्त केलं.

सदानंद मोरे म्हणाले, "पुस्तकात भागोजी कीर यांचा उल्लेख असायला हवा. हा रास्त मुद्दा आहे. अशी मागणी करण्यात काहीही गैर नाही. सावरकरांच्या सगळ्या चरित्रात याचा उल्लेख आलेला आहे. मंडळ तसा उल्लेख करेल. त्यात फार मोठा मुद्दा नाही. याला कुणीही विरोध करणार नाही. यावरून वाद होण्याचं कारण नाही."

"मी सध्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचा पदाधिकारी नाही. पूर्वी पदाधिकारी होतो, आत्ता नाही," असंही सदानंद मोरे यांनी नमूद केलं.

यंदाच्या पुस्तकात होणार बदल

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या संयोजक आणि इतिहास व नागरिकशास्त्राच्या विशेषाधिकारी वर्षा सरोदे यांनी बीबीसी मराठीला याबाबत मंडळाची बाजू सांगितली.

वर्षा सरोदे म्हणाल्या, "इतिहासाच्या पुस्तकातील भागोजी कीर यांच्या उल्लेखाबाबत वैभव तारी यांनी मंत्री महोदयांशी पत्रव्यवहार केला होता. ते पत्र मंत्र्यांकडून शिक्षण सचिवांमार्फत आमच्याकडं आलं होतं. त्यानुसार या वर्षीच्या अधिप्रमाणन प्रक्रियेत हा बदल केला आहे. तसेच या बदलाची माहिती देणारं पत्र वैभव तारी यांना पाठवण्यात आलं आहे."

"इतिहासाच्या पुस्तकातील हा बदल करण्यात आला आहे. आता 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठीची जी पुस्तके तयार होतील त्यात हा बदल दिसेल," असंही वर्षा सरोदे यांनी नमूद केलं.

बीबीसी मराठीने अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे सचिव वैभव तारी यांच्याशी संपर्क करून याबाबत विचारणा केली.

यावेळी त्यांनी इतिहासाच्या पुस्तकात पतित पावन मंदिराच्या निर्मितीची माहिती देताना भागोजी कीर यांच्या नावाचा उल्लेख करण्याची मागणी केल्याचं नमूद केलं. मात्र, मंडळाकडून बदल केल्याबाबत काहीही पत्र व्यवहार झालेला नसल्याचं सांगितलं.

भागोजी कीर समितीचे सचिव प्रकाश कांबळी यांनीही बीबीसी मराठीशी बोलताना तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचं सांगितलं.

ते म्हणाले, "मंत्री दीपक केसरकर यांनी आमच्या पत्रावर शेरा मारून हा बदल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, तसे बदल झाल्याचं अद्याप आम्हाला कळवण्यात आलेलं नाही. तसा कोणताही पत्रव्यवहार आमच्याशी झालेला नाही."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)