सीताराम येचुरी : माकपच्या ज्येष्ठ नेत्यानं घेतला अखेरचा श्वास, डाव्या चळवळीचा शिलेदार हरपला

फोटो स्रोत, Getty Images
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं गुरुवारी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
येचुरी यांना उपचारांसाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचं वय 72 वर्षे होतं.
माकपच्या ज्येष्ठ नेत्या पुण्यवती यांनी बीबीसी तेलुगूचे संपादक जीएस राममोहन यांच्याशी बोलताना, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात आज दुपारी त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं.
येचुरी यांच्या श्वसनमार्गामध्ये गंभीर संसर्ग झाला असल्याची माहिती 10 सप्टेंबर रोजी माकपकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका निवेदनामधून देण्यात आली होती.



फोटो स्रोत, Getty Images
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, येचुरी यांना 19 ऑगस्ट रोजी दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आधी आपत्कालीन विभागात आणि नंतर अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आलं.
माकपचे नेते हन्नान मोल्ला यांनी एएनआयशी बोलताना, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी कालवश झाले आहेत, अशी माहिती दिली.
सीताराम येचुरी भारतीय राजकारणातील दिग्गज नेते होते. विशेषत: डाव्या चळवळीमधील राष्ट्रीय स्तरावरील मोठं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जायचं. 32 वर्षांपासून ते माकपच्या पॉलिट ब्युरोचे (राष्ट्रीय कार्यकारिणी) सदस्य होते.
ते 2015 पासून पक्षाचे सरचिटणीस होते. सीताराम येचुरी 2005 पासून 2017 पर्यंत राज्यसभेचे खासदार राहिले.
येचुरी यांच्या निधनानंतर दिल्लीमधील माकपच्या मुख्य कार्यालयामध्ये लावण्यात आलेला पक्षाचा झेंडाही अर्ध्यावर घेण्यात आला आहे.

फोटो स्रोत, AIIMS
'एम्स'कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे की, 72 वर्षीय सीताराम येचुरी यांना 19 ऑगस्ट 2024 रोजी निमोनिया झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांनी आज 12 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या महिन्यात 22 ऑगस्ट रोजी त्यांना 'एम्स'मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यावेली येचुरी यांनी एका व्हीडिओ संदेशाद्वारे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांना श्रद्धांजली वाहिली होती.
त्यांनी संदेशामध्ये म्हटलं होतं की, "मला 'एम्स'मधून बुद्धो दा यांना आदरांजली अर्पण करावी लागत आहे आणि लाल सलाम म्हणावं लागत आहे, ही बाब फारच दुर्दैवी आहे."
मित्र गमावला - राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स' या सोशल मीडियावर लिहिलं की, "सीताराम येचुरीजी यांच्या निधनामुळं दु:खं झालं. ते डाव्यांचे आघाडीचे नेते होते आणि राजकीय मर्यादा ओलांडून सर्वांशी जोडून घेण्यात वाकबगार होते. त्यांनी खासदार म्हणूनही अत्यंत चमकदार कामगिरी केली. या कठीण समयी त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत."
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. एक मित्र गमावल्याची भावना व्यक्त करत त्यांनी लिहिलं की, "सीताराम येचुरी चांगले मित्र होते. त्यांना देशाची सखोल माहिती होती आणि ते 'आयडिया ऑफ इंडिया'चे संरक्षक होते.
आमच्यात होणाऱ्या चर्चा आता होणार नाहीत, त्याची पोकळी सतत जाणवेल. त्यांचे कुटुंबिय, मित्र आणि त्यांचे सहकारी यांच्याबाबत मी सहवेदना व्यक्त करतो," असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत म्हटलं की, "सीताराम येचुरी यांच्या निधनाचं वृत्त ऐकून फारच दु:ख झालं. राष्ट्रीय राजकारणाचा विचार करता, त्यांच्या जाण्यामुळे मोठी हानी झाली आहे. त्यांचे कुटुंबिय, मित्र आणि सहकाऱ्यांप्रती मी संवेदना व्यक्त करते."
येचुरी यांच्या निधनानंतर राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनी म्हटलं आहे की, "या बातमीवर विश्वास बसत नाहीये. काही काळापूर्वीच त्यांची भेट झाली होती. गेल्या काही दिवसांपासून मी सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो. लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर त्यांचे संबंध दीर्घ काळापासून राहिले आहेत. त्यांचं हे जाण्याचं वय नव्हतं. अद्याप बरंच काही बाकी होतं. त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला सावरण्यासाठी ईश्वर त्यांना बळ देवो."

फोटो स्रोत, ANI
लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) नेते चिराग पासवान यांनी लिहिलं की, "माकपचे सरचिटणीस आणि राज्यसभेचे माजी खासदार श्रद्धेय सीताराम येचुरी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्यांच्या कुटुंबीयाप्रती माझ्या संवेदना आहेत. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि ईश्वराला अशी प्रार्थना करतो की, या दिवंगत पुण्यात्म्याला श्रीचरणी उच्च स्थान प्रदान व्हावं."
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटलं की, "कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) चे सरचिटणीस आणि ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांच्या निधनाचं वृत्त ऐकून फारच दु:ख झालं. त्यांच्या जाण्याने भारतीय राजकारणाचं अपरिमित नुकसान झालं आहे. ते एक कुशल राजकारणी, विचारवंत आणि जनतेच्या हितासाठी काम करणारे नेते होते. त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त होवो."
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, "देशातील वरिष्ठ नेते आणि माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचं निधन अत्यंत दु:खद आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. शोकाकूल कुटुंबियांना हे असीम दु:ख सहन करण्याची शक्ती प्राप्त होवो. भावपूर्ण श्रद्धांजली!"
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटलं की, "सीताराम येचुरी यांचं जाणं आपल्या सर्वांसाठी मोठी हानी आहे. त्यांनी या देशाची केलेली सेवा आणि त्याग वाखाणण्याजोगा आहे. या सर्व बाबींच्याही उपर ते एक चांगला माणूस होते, ज्यांनी कटू राजकीय जगामध्ये संतुलन आणि सभ्यता आणली. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या प्रियजनांना सावरण्यासाठीचे बळ देवो."
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लिहिलं आहे की, "माकपचे सरचिटणीस आणि राज्यसभेचे माजी खासदार सीताराम येचुरी यांच्या निधनाचं वृत्त ऐकून खूपच दु:खं झालं. सार्वजनिक जीवनातील इतक्या वर्षांच्या प्रवासामध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांना त्यांच्या ज्ञान आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखलं जात होतं. ते माझे असे मित्र होते, ज्यांच्याबरोबर माझ्या अनेक चर्चा व्हायच्या. त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चा नेहमी स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना!"
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











