You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युक्रेननं अमेरिकेनं दिलेली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं डागली, रशियाचा दावा
अमेरिकेने दिलेली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं युक्रेनने रशियाच्या भूमीवर डागल्याचा दावा रशियानं केला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी युक्रेनने ब्रियांस्क प्रांतात ही लांबपल्ल्याची आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टिमची क्षेपणास्त्रं डागली. यातली पाच क्षेपणास्त्रं निकामी करण्यात आली तर एक फुटण्यास अपयशी ठरलं.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं की, या एका क्षेपणास्त्राचे काही भाग पडल्यामुळे लष्कराच्या काही तळांवर आग लागली.
अमेरिकी क्षेपणास्त्रांचा वापर केल्याची बातमी युक्रेनी माध्यमांतही प्रसारित झाली आहे मात्र युक्रेन सरकारने यावर अधिकृतरीत्या भाष्य केलेलं नाही.
जो बायडन प्रशासनाने युक्रेनला काल सोमवारी रशियाच्या अंतर्गत भागात मर्यादित हल्ले करण्यासाठी या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास मंजुरी दिली होती.
या क्षेपणास्त्राची निर्मिती अमेरिकन डिफेन्स कंपनी करते. यापूर्वी अशा क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास अमेरिकेने परवानगी दिलेली नव्हती. कारण त्यांचा वापर झाल्यास रशिया युक्रेन युद्ध चिघळेल असं अमेरिकेला वाटत होतं.
अमेरिकेने युक्रेनला दिलेले एटीएसीएमएस क्षेपणास्त्रे 300 किलोमीटरपर्यंत हल्ला करू शकतात.
एका अमेरिकेच्या अधिकाऱ्याने न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्टला सांगितले आहे की, बायडन सरकारने युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी देण्याचा निर्णय हा उत्तर कोरियाच्या सैनिकांना युक्रेनमध्ये लढण्याची परवानगी देण्याच्या रशियाच्या निर्णयाला दिलेली प्रतिक्रिया आहे.
क्षेपणास्त्रं वापरण्याची परवानगी दिली तेव्हा
मागील अनेक महिन्यांपासून युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की एटीएसीएमएस (ATACMS) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांवरील निर्बंध हटवण्याचा आग्रह करत होते. युक्रेनला या क्षेपणास्त्रांचा वापर रशियावर हल्ला करण्यासाठी करायचा आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाश्चिमात्य देशांना असा निर्णय घेण्याबाबत इशारा दिला होता. असं काही झालं तर हा नाटो सैन्याचा युक्रेन युद्धात थेट सहभाग मानला जाईल असं पुतिन यांनी म्हटलं होतं.
अमेरिकेने युक्रेनला क्षेपणास्त्रांच्या वापराला परवागनी दिल्याच्या वृत्तांवर पुतिन यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र रशियाच्या इतर नेत्यांनी या निर्णयाला गंभीर म्हटलं आहे.
असं असलं तरी अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी केवळ कुर्स्क प्रदेशासाठी दिली आहे. याच भागात रशियाने ऑगस्टमध्ये घुसखोरी केली होती. त्यामुळे या भागात युक्रेनच्या सैन्याला ही क्षेपणास्त्रे वापरता येतील.
भविष्यात रशिया आणि युक्रेनमध्ये होणाऱ्या संभाव्य वाटाघाटीत उपयोग व्हावा म्हणून बायडन सरकारने युक्रेनला रशियाच्या काही भागावरील ताबा कायम ठेवण्यासाठी मदत करण्याचंही आश्वासन दिलंय.
बायडन यांनी युक्रेनसाठी खूप महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया कीवमधील युक्रेनियन सेक्युरिटी अँड कोऑपरेशन सेंटरचे प्रमुख सेर्ही कुझान यांनी बीबीसीला दिली.
"यामुळे युद्धाची दिशाच बदलेल असं नाही. मात्र, यामुळे युक्रेनचे सैन्य रशियाच्या बरोबरीचे होईल," असं सेर्ही कुझान यांनी म्हटलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)