युक्रेनमध्ये अपघातग्रस्त झालेल्या रशियाच्या गोपनीय शस्त्राबाबतचे रहस्य कायम

    • Author, अब्दुजलील अब्दुरासुलोव
    • Role, बीबीसी न्यूज, कीव

पूर्व युक्रेनच्या सीमेवरील लष्करी चौक्यांजवळ आकाशात दिसणाऱ्या दोन पांढऱ्या धुरांच्या रेषांमुळे स्पष्ट झालं की, रशियाची लढाऊ विमानं युक्रेनवर हल्ला करणार आहेत.

मात्र कोस्तियातिन्विका शहराजवळ जे घडलं ते अभूतपूर्व होतं. कारण या दोन रेषांपैकी खालची रेष दोन भागात विभागली गेली होती. आणि त्यातल्या एका रेषेतून एक वस्तू वेगाने दुसऱ्या रेषेकडे जाताना दिसत होती.

त्यानंतर या दोन्ही रेषांनी एकमेकांना छेद दिला आणि आभाळात केशरी रंगाच्या उजेडाचं साम्राज्य तयार झालं.

अनेकांना असं वाटत होतं रशियाच्या दोन विमानांनी एकमेकांना पाडलं आहे, आणि अनेकांना असं वाटत होतं की युक्रेनच्या विमानाने रशियाचं एक विमान पाडलं आहे.

ज्या ठिकाणी हा अपघात घडला ते ठिकाण युक्रेनच्या लष्करी चौकीपासून 20 किलोमीटर अंतरावर होतं.

युक्रेनच्या नागरिकांमध्ये घडलेल्या या प्रकाराबद्दल मोठं औत्सुक्य होतं. मात्र थोड्याच वेळात त्यांना जमिनीवर पडलेला ढिगारा दिसला.

रशियाचं नवीन शस्त्र म्हणजेच एस-70 ओखोनिक (S-70 Okhotnik) लढाऊ ड्रोन नष्ट करण्यात आल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं.

आश्चर्यकित करणारं हत्यार

युक्रेनच्या जमिनीवर कोसळलेला हा ड्रोन सामान्य ड्रोन नव्हता. एखाद्या लढाऊ विमानाच्या आकाराचा हा ड्रोन होता. फरक एवढाच की यामध्ये वैमानिकांना बसायला जागा (कॉकपीट) नाही. हा ड्रोन मानवरहित आहे.

या ड्रोनचा माग काढणं खूप अवघड आहे. आणि हा ड्रोन बनवणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की, आजपर्यंत इतिहासात अशा प्रकारचा ड्रोन कधीच बनवला गेला नाही.

हे खरं असू शकतं, पण हे स्पष्ट आहे की या ड्रोनचा मार्ग भटकला होता. या व्हीडिओत दिसणारी दुसरी रेषा ही रशियाच्या एसयू-57 लढाऊ विमानातून उत्सर्जित झालेल्या धुराची असण्याची शक्यता आहे.

या व्हीडिओत स्पष्ट दिसतं आहे की, रशियाचं लढाऊ विमान या ड्रोनला पाडण्यासाठीच पाठलाग करत इथपर्यंत आलं होतं. रस्ता चुकलेल्या ड्रोनशी संपर्क साधायचा प्रयत्नही या लढाऊ विमानाकडून केला जात असेल,अशीही शक्यता आहे.

मात्र, रशियाचा हा ड्रोन आणि लढाऊ विमानाने युक्रेनच्या हवाई हद्दीत प्रवेश केलेला होता. यासोबतच S-70 ओखोनिक ड्रोन युक्रेनच्या हाती लागू नये म्हणून देखील हे ड्रोन नष्ट केलं असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

युक्रेनच्या कोस्तियातिन्विका शहराजवळ घडलेल्या या अपघाताबाबत युक्रेन किंवा रशियापैकी कुणीही आतापर्यंत काहीही विधान केलेलं नाही.

विश्लेषकांना असं वाटतं की, या रशियन सैन्याचं या ड्रोनवरील नियंत्रण सुटलं होतं. युक्रेनने त्यांच्या संरक्षण दलात तैनात केलेल्या जॅमरमुळे सुद्धा असं घडलं असण्याची शक्यता नाही.

रशियाला एस-70 ड्रोन बनवण्यात यश आलं का?

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या लढाईत वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रोन्सचा वापर आजपर्यंत करण्यात आला आहे. पण कधीही एस-70 ड्रोन्स वापरले गेले नव्हते.

हा ड्रोन तब्बल 20 टन वजनाचा असतो. 6000 किलोमीटपर्यंत मारा करण्याची क्षमता या ड्रोनमध्ये असते. एखाद्या बाणासारखा तो हल्ला करतो.

एस-70 ड्रोन अमेरिकेच्या एक्स-47बी ड्रोन सारखा दिसतो आणि अमेरिकेने सुमारे एका दशकापूर्वी याची निर्मिती केली होती. असं म्हटलं जातं की, ओखोनिक ड्रोन हे बॉम्ब आणि रॉकेट वाहून नेऊ शकतात. यासोबतच जमीन आणि हवाई मार्गाने लक्ष्यांचा अचूकपणे वेध घेऊ शकतं. यासोबतच एखाद्या टेहळणी विमानासारखाही याचा वापर होऊ शकतो.

रशियाच्या हवाई दलात असलेल्या पाचव्या पिढीतील एसयू-57 या विमानसोबत ताळमेळ साधून काम करू शकेल अशा पद्धतीने या ड्रोनची रचना करण्यात आली आहे.

2012 पासून हा ड्रोन विकसित करण्यात येत होता. या ड्रोनने 2019 मध्ये पहिलं उड्डाण केलं होतं. मात्र गेल्या आठवड्यात रशिया आणि युक्रेनमधील अडीच वर्षे जुन्या युद्धात याचा वापर होत असल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही.

या वर्षाच्या सुरुवातीला या ड्रोनला दक्षिण रशियाच्या अख्तुबिन्सक एयरफील्डमध्ये बघितलं गेलं होतं, अशाही बातम्या आहेत. रशिया युक्रेनवर हल्ला करण्यासाठी ज्या तळांचा वापर करतं, त्यामध्ये हे ठिकाणही आहे.

त्यामुळं असं म्हटलं जात आहे की, कोस्तियातिन्विकामध्ये जो ड्रोन पडला आहे, तो रशियाच्या एका चाचणीचा भागही असू शकतो.

इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

हे नवीन शस्त्र रशियाच्या रणनीतीबद्दल काय सांगतं?

रशियाचा लांब पल्ल्याचा ग्लायड बॉम्ब डी-30 देखील या अपघात स्थळाजवळ सापडल्याचे बोललं जात आहे. सॅटेलाईट नेव्हिगेशनच्या वापरामुळं हे बॉम्ब अधिक धोकादायक बनतात.

आता आणखी एक प्रश्न निर्माण होतो की, ओखोनिक ड्रोनसोबत रशियाचं आणखी एक लढाऊ विमान का उडत होतं?

यावर प्रतिक्रिया देताना युक्रेनचे हवाई वाहतूक तज्ज्ञ अनातोली ख्रापचिन्स्की यांनी सांगितलं की, या लढाऊ विमानाने जमिनीच्या तळावरून ड्रोनला सिग्नल पाठवला असावा जेणेकरून त्यांच्या ऑपरेशनची व्याप्ती वाढवता येईल.

या लढाऊ ड्रोनचे अपयश रशियन सैन्यासाठी निश्चितच मोठा धक्का आहे. या वर्षी त्याचे उत्पादन सुरू होणार होते परंतु आता हे मानवरहित ड्रोन अद्याप पूर्णपणे तयार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

एस-70 ड्रोनचे एकूण चार प्रकार बनवले गेल्याचं ऐकिवात आहे. युक्रेनच्या हवाई हद्दीत जो ड्रोन पडला तो या चार प्रकारांपैकी सर्वात सुसज्ज आणि आधुनिक असण्याची शक्यता आहे.

हा ड्रोन उध्वस्त झाला असला तरी त्याच्या ढिगाऱ्यातून बरीच महत्त्वाची माहिती मिळाली आहे. ओखोनिक मानवरहित ड्रोनबद्दल बरीच नवीन माहिती समोर आली आहे.

अनातोली खारापचिन्स्की यांनी सांगितलं की, "या ड्रोनमध्ये त्याचे लक्ष्य शोधण्यासाठी रडार प्रणाली होती की नाही याची माहिती आम्हाला यावरून मिळू शकते. हा ड्रोन प्री-प्रोग्राम केलेला असेल तर त्यावरून त्याला नेमका कुठे हल्ला करायचा होता हे कळू शकेल."

ज्या ठिकाणी या रशियन ड्रोनचा अपघात झाला, त्या ठिकाणच्या फोटोवरून ते म्हणाले की त्याची मारक क्षमता थोडी मर्यादित असल्याचे स्पष्ट होते. त्याचे इंजिन नोझल गोल असल्याने रडार ते शोधू शकते. हीच गोष्ट विमानात वापरल्या जाणाऱ्या आणि बहुतांश वेळा ॲल्युमिनियमपासून बनवण्यात आलेल्या अनेक रिवेट्सना देखील लागू होते.

युक्रेनचे अभियंते या ड्रोनच्या विमानाच्या अवशेषाची पूर्ण तपासणी करतील यात शंका नाही. त्यानंतर यातून मिळालेली माहिती युक्रेनच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांसोबत शेअर केली जाईल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.