You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॅनडामध्ये 'नाझी' कसे आले आणि युक्रेनने हिटलरला कशी मदत केली होती?
- Author, नदीन यूसिफ
- Role, बीबीसी न्यूज, टोरंटो
कॅनडाच्या संसदेने नाझी जर्मनीच्या बाजूने लढलेल्या माजी युक्रेनियन सैनिकांची प्रशंसा केल्यानंतर युक्रेनच्या इतिहासातील एक वादग्रस्त भाग आणि कॅनडातील त्याच्याशी संबंधित स्मारके पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.
नाझी जर्मनीच्या लष्करी तुकडीमध्ये काम केलेले युक्रेनियन माजी सैनिक यारोस्लाव हुन्का यांची याच आठवड्यात कॅनडाच्या संसदेत प्रशंसा केली गेली.
1943 मध्ये नाझी जर्मनीच्या निमलष्करी संघटनेच्या Schutzstaffel (SS) अंतर्गत स्थापन झालेल्या या तुकडीचे नाव '14th Waffen Grenadier Division' असे होते. त्याला ‘गॅलेशिया विभाग’ असेही म्हणतात.
यारोस्लाव हुन्कांच्या संसदेतील उपस्थितीचा ज्यू गट आणि इतर खासदारांनी एकमताने विरोध केला होता. त्यानंतर यारोस्लाव यांना आमंत्रित करणारे खासदार अँथनी रोटा यांनी आपल्या चुकीबद्दल पश्चाताप होत असल्याचे सांगत हाऊस ऑफ कॉमन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
पण ही काही पहिलीच वेळ नाही की, युक्रेनियन स्थलांतरितांची सर्वाधिक संख्या असलेल्या कॅनडामध्ये दुसऱ्या महायुद्धात युक्रेनची भूमिका काय होती यावर चर्चा झाली आहे.
दुसऱ्या महायुद्धात गॅलिसिया विभागात सेवा केलेल्या अनेक माजी युक्रेनियन सैनिकांच्या सन्मानार्थ कॅनडाच्या अनेक भागात स्मारके उभारण्यात आली आहेत.
ज्यू गटांनी या स्मारकांना बराच काळ विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या विभागात काम करणाऱ्या लोकांनी अडॉल्फ हिटलरशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती आणि ते नाझी जर्मनीच्या गुन्ह्यांमध्ये सामील झाले होते किंवा त्यांनी स्वतःच गुन्हे केले होते.
परंतु हे माज़ी सैनिक काही युक्रेनियन लोकांसाठी स्वातंत्र्यसैनिक आहेत ज्यांनी युक्रेनला स्वतंत्र करण्यासाठी सोव्हिएत संघाच्या विरोधात नाझी जर्मनीला पाठिंबा दिला होता.
वादग्रस्त इतिहास
वॅफन-एसएसचा गॅलिसिया विभाग ही अशी लष्करी तुकडी होती जी ज्यू नागरिकांच्या हत्याकांडासह अनेक अत्याचारांमध्ये सामील असल्याचे आढळून आले आहे.
युक्रेनमध्ये युद्धात दहा लाखांहून अधिक ज्यू मारले गेले. त्यापैकी बहुतेकांना नाझी जर्मनी आणि त्यांच्या सहका-यांनी त्यांच्या घराजवळच गोळ्या घातल्या होत्या.
गॅलिसिया विभागावर युद्ध गुन्ह्यांचा आरोप आहे, परंतु त्यांचे सदस्य कधीही कोणत्याही न्यायालयात दोषी आढळले नाहीत. ज्यू गटांनी कॅनडामध्ये वॅफेन-एसएसमध्ये सेवा केलेल्या युक्रेनच्या माजी सैनिकांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्याचा निषेध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हे नरसंहारामध्ये सहभागी झालेल्यांचा उदोउदो करण्यासारखे आहे.
ओंटारियोच्या ओकविलमधील खाजगी युक्रेनियन स्मशानभूमीत असेच एक स्मारक आहे. तिथे गॅलिसिया विभागाचे बोधचिन्हही लावण्यात आले आहे. दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतलेल्या माजी युक्रेनियन सैनिकांनी अलबर्टाच्या एडमंटन येथे आणखी एक स्मारक बांधले आहे.
एडमंटनमध्ये आणखी एक स्मारक आहे जिथे युक्रेनियन राष्ट्रवादी नेता आणि नाझी सहानुभूती असलेला रोमन शुखेविच यांचा पुतळा आहे. त्याच्या तुकडीवर ज्यू आणि पोलिश लोकांच्या नरसंहाराचा आरोप आहे.
काही स्मारके 1970 आणि 1980 च्या दशकात बांधली गेली आणि अलिकडिल काळात त्यांची तोडफोड देखील झाली आहे. काहींवर लाल रंगात ‘नाझी’ असे लिहिले होते.
मागच्या वर्षी या आयोगाने जाहीर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की नाझींच्या बाजूने लढणाऱ्या युक्रेनियन लोकांनी कोणतेही युद्ध गुन्हे केले असल्याचा कोणताही पुरावा नाही.
अहवालात म्हटले आहे की केवळ गॅलिसिया विभागाचे सदस्य असणे हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही की त्याने कोणतेही अत्याचार केले आहेत.
ज्यू गट आणि काही इतिहासकार तेव्हापासून अहवालाच्या निष्कर्षांचा निषेध करत आहेत.
प्रोफेसर मार्पल्स म्हणतात की हा अहवाल तयार झाला तेव्हा युक्रेन आणि रशियामध्ये संग्राह्य असलेल्या दुसऱ्या महायुद्धाची कागदपत्रे मिळू शकली नाहीत. पण जेव्हापासून ती कागदपत्रे सार्वजनिक झाली, तेव्हापासून या विषयावरील संशोधनाला वेग आला आहे.
ते म्हणाले, "नंतर काही संशोधनातून असे दिसून आले की गॅलिसिया विभागात सेवा करणारे लोक, जरी ते कधीही दोषी आढळले नसले तरी ते युद्ध गुन्ह्यांमध्ये सामील होते,"
स्मारकांवरून मतमतांतरं का आहेत?
अल्बर्टा विद्यापीठातील पूर्व युरोप इतिहासाचे प्राध्यापक डेव्हिड मार्पल्स म्हणतात की, हे समजून घेण्यासाठी युक्रेनचा युद्धकाळातील इतिहास आणि कॅनडात स्थलांतरीत झालेल्या युक्रेनियन प्रवाशांचे स्वरूप समजून घेतले पाहिजे.
प्रोफेसर मार्पल्स सांगतात, "दुसऱ्या महायुद्धा दरम्यान लाखो युक्रेनियन लोकांनी सोव्हिएत संघाच्या रेड आर्मीमध्ये काम केले होते, परंतु इतर हजारो लोकांनी जर्मनीची बाजू घेतली आणि त्यांच्या गॅलिसिया विभागाला सेवा दिल्या होत्या."
जर्मनीला पाठिंबा देणाऱ्यांचा असा विश्वास होता की यामुळे त्यांना सोव्हिएत संघापासून वेगळं एक स्वतंत्र राष्ट्र मिळेल.
1932-33 मध्ये युक्रेनमध्ये भीषण दुष्काळ पडला होता ज्याला होलोडोमोर म्हणतात. यामध्ये 50 लाख युक्रेनियन नागरिकांचा जीव गेला. सोव्हिएत संघाच्या भूमिकेबद्दल युक्रेनियन लोकांमध्ये याबद्दल प्रचंड संताप होता.
प्रोफेसर मार्पल्स स्पष्ट करतात की, 1930 च्या दशकात ब्रिटनसह बहुतेक युरोपियन देशांमध्ये अतिउजव्या विचारसरणीचा उदय होत होता आणि युक्रेन देखील त्याला अपवाद नव्हता.
युद्धात जर्मनीनंतर गॅलिसिया विभागातील सैनिकांनी मित्र राष्ट्रांच्या सैन्यापुढे शरणागती पत्करल्यानंतर त्यांना कॅनडामध्ये येण्याची परवानगी देण्यात आली. त्यावेळीही ज्यू गटांनी या भूमिकेवर टीका केली होती.
युक्रेनियन वंशाचे काही कॅनेडियन नागरिक या सैनिकांना आणि गॅलिसिया विभागाला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले 'राष्ट्रीय नायक' मानतात.
त्यांचे असेही म्हणणे आहे की, स्वतंत्र युक्रेनसाठी सोव्हिएत आणि जर्मनी या दोन्ही देशांशी लढत असतानाही या लोकांनी काही काळासाठी नाझी जर्मनीला पाठिंबा दिला होता. पण ज्यू समाज याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो.
'बनी ब्रिथ' (B'nai B'rith) कॅनडाचे नेते मायकेल मोस्टिन यांनी 'बीबीसी'ला सांगितले की, "महत्त्वाची गोष्ट ही आहे की, 14वे एसएस तुकडी, नाझी होती."
या संदर्भात कॅनडामध्ये एक आयोगही स्थापन करण्यात आला होता. 1985 मध्ये स्थापन झालेल्या या आयोगाला कॅनडा हे नाझी युद्ध गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनल्याच्या आरोपांच्या चौकशीची जबाबदारी देण्यात आली होती.
मागच्या वर्षी या आयोगाने प्रकाशित केलेल्या अहवालात असे म्हटले होते की, नाझींच्या बाजूने लढणाऱ्या युक्रेनियन लोकांनी कोणतेही युद्ध गुन्हे केले असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.
अहवालात म्हटले आहे की, केवळ गॅलिसिया विभागाचे सदस्य असणे म्हणजे त्यांनी अत्याचार केले आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही. ज्यू गट आणि काही इतिहासकार तेव्हापासून अहवालाच्या निष्कर्षांचा सातत्याने निषेध करत आहेत.
प्रोफेसर मार्पल्स म्हणतात की हा अहवाल तयार झाला तेव्हा युक्रेन आणि रशियामध्ये संग्राह्य दुसऱ्या महायुद्धाची कागदपत्रे मिळवता येणं शक्य नव्हतं. पण जेव्हापासून ती कागदपत्रे सार्वजनिक झाली, तेव्हापासून या विषयावरील संशोधनाला वेग आला आहे.
पुढे ते म्हणाले, "नंतरच्या काही संशोधनातून असे दिसून आले की ज्या लोकांनी गॅलिसिया विभागात काम केले होते ते जरी कधीही दोषी आढळले नसले तरी ते युद्ध गुन्ह्यांमध्ये सामील होते,"
रशियन प्रचाराच्या निशाण्यावर युक्रेनचा इतिहास
एकविसाव्या शतकात ही ऐतिहासिक चर्चा दाखल होत असताना, रशियाद्वारे केल्या जाणाऱ्या दुष्प्रचारामुळे गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या झाल्या. युक्रेनवरील हल्ल्याचे समर्थन करण्यासाठी रशियाने युक्रेन सरकारवर 'नाझी' असल्याचा खोटा आरोप केला आहे.
प्रोफेसर मार्पल्स म्हणतात की, युक्रेनमध्ये जरी अजूनही अतिउजव्या विचारसरणीचे अतिरेकी अस्तित्वात असले तरी रशिया लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तितका तो टोकाचा नाही. तसेच, युक्रेनमध्ये निवडून आलेले लोक कोणत्याही अतिउजव्या गटाशी संबंधित नाहीत.
"रशियाने ही गोष्ट अतिशय सोप्या स्वरूपात मांडली आहे.", असंही ते म्हणतात.
कॅनडात उपस्थित असलेल्या युक्रेनियन गटांचे म्हणणे आहे की स्मारकांवरून सुरू असलेला वाद आणि यारोस्लाव हुन्का यांच्या संसद प्रवेशाला होणारा विरोध या दुष्प्रचाराचा परिणाम आहे.
2017 साली जेव्हा युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला होता, तेव्हा कॅनडातील रशियन दूतावासाने युक्रेनियन स्मारकांवर टीका केली आणि म्हटले की कॅनडा नाझींच्या साथीदारांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.
एडमंटनमधील युक्रेनियन युथ युनिटी कॉम्प्लेक्समध्ये युक्रेनियन माजी सैनिक शुखेविचचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. या कॉम्प्लेक्सचे प्रवक्ते तारस पॉडिलस्की म्हणतात की, कॅनडाच्या राजकारण्यांद्वारे हुन्काचा विरोध हा रशियन दुष्प्रचाराचा परिणाम आहे.
ते म्हणतात की, हुन्का कोणत्याही युद्ध गुन्ह्यात सामील असल्याचा कोणताही पुरावा नाही.
पॉडिलस्की म्हणतात, "ही व्यक्ती रशियाद्वारे केल्या जाणा-या दुष्प्रचाराचा बळी ठरली आहे."
त्याच वेळी, 'बनी ब्रिथ' (B'nai B'rith) नेते मोस्तिन यांचे म्हणणे आहे की, याबाबतीत इतिहास खूप गुंतागुंतीचा आहे.
पण ते म्हणाले की, नाझींशी संबंध असणे ही अशी गोष्ट नाही जी आपण आपल्या भावी पिढ्यांना साजरी करू द्यावी किंवा कुरवाळत बसू द्यावे.
दुसर्या महायुद्धात ज्यूंच्या नरसंहाराबाबत पूर्व युरोपीय देशांनी घेतलेल्या बोटचेप्या भूमिकेवर अलिकडच्या काळात नरसंहाराचा अभ्यास करणार्या विद्वानांकडून जोरदार टीका झाली आहे.
कॅनडामध्ये उपस्थित असलेले ज्यू गट आणि ही स्मारके बांधणारे युक्रेनियन वंशाचे कॅनेडियन नागरिक म्हणतात की या विषयावर त्यांच्यामध्ये अनेकदा चर्चा झाली आहे.
मात्र, दोघांचे म्हणजे आहे की ते त्यातून काही मार्ग काढू शकलेले नाहीत.
पॉडिलस्की म्हणतात, “हे स्मारक सार्वजनिक मालमत्तेवर नसून आमच्या स्वतःच्या मालमत्तेवर आहे. आणि आमच्यासाठी ते युक्रेनियन स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. आम्हाला माहित आहे की त्यांनी काहीही चुकीचे केलेले नव्हते. ,
मोस्टिन म्हणतात की कॅनडाच्या संसदेत नुकतीच घडलेली घटना हेच दर्शवते की नाझी इतिहासाबद्दल कॅनेडियन लोकांना गोष्टींची अर्धवट माहिती आहे.
ते म्हणतात, "कॅनडामध्ये अशी परिस्थिती अशी आहे की इथे येणा-या नाझी गुन्हेगारांबद्दल आम्हाला स्वतःच्या इतिहासाची माहिती नाही."
कॅनडातील ज्यू समुदायातील मोस्टिन आणि इतरांनी हा इतिहास पुन्हा तपासण्याची मागणी केली आहे.
ते म्हणतात, “आमच्या पंतप्रधानांनी या विषयाबद्दल ठोस भूमिका घेणे महत्त्वाचे आहे कारण गेल्या अनेक दशकांपासून ज्यू समुदाय याची मागणी करत आहे.”
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)