You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युक्रेनला स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास अमेरिका परवानगी का देत नाही? कशी आहेत ही क्षेपणास्त्रे?
- Author, फ्रँक गार्डनर
- Role, बीबीसी संरक्षण प्रतिनिधी
अमेरिका आणि ब्रिटन येत्या काही दिवसांत लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे रशियावर डागण्यासाठीचे युक्रेनवरील निर्बंध उठवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
युक्रेनला आधीच ही क्षेपणास्त्रं पुरवण्यात आलेली आहेत, परंतु त्यांना फक्त त्यांच्या स्वतःच्या सीमांतर्गत त्यांचा वापर करण्याची अट घालण्यात आलेली आहे. युक्रेन गेल्या काही आठवड्यांपासून हे निर्बंध हटविण्यासाठी विनंती करत आहेत.
या क्षेपणांस्त्रांचा वापर करून त्यांना रशियातील युद्धतळांवर हल्ले करता येईल, अशी युक्रेनची भूमिका आहे.
पण मग अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांचा युक्रेनला हे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी न देण्यामागे काय उद्देश आहे? या क्षेपणास्त्रांमुळे युद्धात काय फरक पडू शकतो? जाणून घेऊया...
स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे एवढी चर्चेत का?
स्टॉर्म शॅडो हे एक अँग्लो-फ्रेंच क्रूझ क्षेपणास्त्र आहे. यांची कमाल मारक क्षमता सुमारे 250 किलोमीटर एवढी आहे. फ्रेंच भाषेत त्याला स्काल्प असं संबोधलं जातं.
ब्रिटन आणि फ्रान्सने आधीच या क्षेपणास्त्रांचा पुरवठा युक्रेनला केला आहे, पण ते वापरण्यासाठी अटही घालून ठेवली आहे.
युक्रेनला केवळ त्यांच्या सीमेच्या आतच या क्षेपणास्त्राचा वापर करता येऊ शकतो.
हे क्षेपणास्त्र विमानातून प्रक्षेपित केले जाते. हे क्षेपणास्त्र जमिनीवरीन ध्वनीच्या वेगानं उड्डाण करत उच्च स्फोटक वॉरहेडद्वारे स्फोट घडवून आणतं. शत्रूंचे मजबूत बंकर आणि दारूगोळ्याचे आगार उद्ध्वस्त करण्यासाठी हे एक प्रभावी अस्त्र आहे. रशियाने युक्रेनविरोधात ही क्षेपणास्त्रे वापरली आहेत.
अत्यंत प्रभावी असलेली ही क्षेपणास्त्रे तेवढीच महागदेखील आहेत. या एका क्षेपणास्त्राची किंमत तब्बल 1 दशलक्ष डॉलर इतकी आहे. त्यामुळं यांचा वापर फार काळजीपूर्वक करावा लागतो.
ही क्षेपणास्त्रे डागण्यापूर्वी शत्रूच्या रडारला चकमा देण्यासाठी स्वस्त ड्रोनचा एक ताफा वापरण्यात येतो. रशियाने याच पद्धतीने त्यांचा वापर केलेला आहे.
तर युक्रेननेही ब्लॅक सीमधील सेवस्तोपोल येथील रशियाच्या नौदलाचं तळ उद्ध्वस्त करून संपूर्ण क्रिमियात रशियन नौदलासाठी असुरक्षिततेची परिस्थिती निर्माण केली आहे.
लष्कर अभ्यासक, माजी ब्रिटिश लष्करी अधिकारी तसेच सिबिलाईन कन्सल्टन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जस्टिन क्रम्प सांगतात की, "स्टॉर्म शॅडो ही क्षेपणास्त्रे युक्रेनसाठी प्रभावी ठरली आहेत. या क्षेपणास्त्रांद्वारे शत्रूच्या तळांवर अचूक मारा करता येतो.
युक्रेनने ही क्षेपणास्त्रे रशियाच्या हवाई तळांवर डागण्याची परवानगी द्यावी, असा तगादा लावलेला आहे, ते आश्चर्यकारक नाही. कारण या हवाई तळांवरून युक्रेनमध्ये बॉम्बहल्ले केले जात आहेत. ज्यामुळं युक्रेनला पिछाडीवर जावं लागतं."
क्षेपणास्त्रांसाठी का आग्रही आहे युक्रेन?
युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये आणि सीमाभागात रशियाकडून दररोज बॉम्बवर्षाव सुरू आहे.
रशियन विमानं युक्रेनच्या लष्करी तळांवर, नागरी वस्त्यांवर आणि रुग्णालयांवर घातक क्षेपणास्त्र आणि ग्लाईड बॉम्बचा मारा करत आहेत.
ज्या तळांवरून रशिया हे हल्ले करत आहे, त्या तळांवर प्रतिहल्ला करण्याची परवानगी नसणं म्हणजे एक प्रकारे हात बांधून युद्ध लढण्यासारखं असल्याची युक्रेनाचे पंतप्रधान कीव यांची तक्रार आहे.
त्यांनी प्रागमध्ये झालेल्या ग्लोबसेक सुरक्षा परिषदेतही याबाबत मुद्दा उपस्थित केला. 'युक्रेनच्या नागरिकांपेक्षा रशियन सैन्याचा तळ अधिक सुरक्षित आहे, कारण युक्रेनला तेथे हल्ला करण्याची परवानगीच नाही,' अशा शब्दांत युक्रेनने खंत व्यक्त केली.
अर्थात युक्रेनकडंही स्वत:ची आधुनिक आणि लांब पल्ल्याची मारक क्षमता असलेली शस्त्रं आहेत. त्याआधारे युक्रेनने रशियात 100 किलोमीटरपर्यंत आत घुसून हल्ले करत रशियाला अनेकदा चांगलाच धक्का दिला आहे. पण ही प्रणाली फारच कमी वजनाचे बॉम्ब वाहून नेत असल्यानं त्यापासून शत्रूला अपेक्षित हानी पोहोचवता येत नाही.
तसंच हे ड्रोन बऱ्याचदा हवेतच शोधून नष्ट केले जात असल्यानं पुरेसे प्रभावी ठरत नाहीत, असं युक्रेन सरकारचं म्हणणं आहे.
रशियाच्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी आणि त्यांना शह देण्यासाठी आम्हालाही स्टॉर्म शॅडोसारखी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि American Atacms सारखी 300 किलोमीटरपर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली वापरण्याची परवानगी हवी असल्याची युक्रेनची मागणी आहे.
पण, अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांकडून हे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी देण्यास टाळाटाळ का होत आहे?
खरंतर या प्रश्नाचं एकाच शब्दाद उत्तर दिलं जाऊ शकतं. ते म्हणजे युद्धसंकट. आतापर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिलेल्या युद्धाच्या धमक्या नुसत्याच वल्गना ठरलेल्या आहेत. पण तसं असलं तरीही युक्रेनला देण्यात आलेली क्षेपणास्त्रे डागण्याची परवानगी देणं म्हणजे रशियाला चिथवणी देण्यासारखं होईल, अशी भीती अमेेरिका आणि ब्रिटनला वाटते.
यामुळे रशियातील कट्टरतावादी संघटना युक्रेनला क्षेपणास्त्र पुरवठा करणाऱ्या ठिकाणावर हल्ले करण्याचा आग्रह धरू शकतात. यामध्ये पोलंडमधील हवाई तळ त्यांचे मुख्य लक्ष्य असेल. तसं झाल्यास नाटोचं कलम 5 लागू होईल. कलम 5 लागू होणं म्हणजे संपूर्ण पाश्चिमात्य आघाडी रशियाविरोधात यद्धात उतरल्याचा त्याचा अर्थ होईल.
युक्रेन-रशिया संघर्षात अमेरिकेचा युक्रेनला पाठिंबा असला तरी रशियासोबत थेट भिडणं अमेरिकेने टाळलं आहे. कारण यामुळे अमेरिका विनाकारण युद्धात ओढली जाऊ शकते. हे युद्ध प्रचंड विनाशकारी ठरू शकतं.
अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला पुरवलेली ही क्षेपणास्त्रे क्रिमिया आणि रशियाने युक्रेनची 2022 नंतर बेकायदेशीरित्या ताब्यात घेतलेली भूमी म्हणजे 4 प्रदेशात डागण्याची परवानगी आहे.
अर्थात रशिया हा भूभाग त्यांचाच असल्याचा दावा करतो. मात्र, अमेरिका किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणतीही समिती रशियाचा हा दावा मान्य करत नाही.
स्टॉर्म शॅडोमुळे युक्रेनला फायदा होईल का ?
युक्रेनला स्टॉर्म शॅडो वापरण्याची परवानगी मिळाल्यास युद्धावर थोडाबहुत फरक पडेल. पण तोपर्यंत फार उशीर झाला असेल.
कारण युक्रेन गेल्या अनेक महिन्यांपासून रशियावर लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागण्याची परवानगी मागत आहे. त्यामुळं कधीतरी युक्रेनवरील हे निर्बंध उठवले जातील याची रशियाला कल्पना आहे.
त्या दृष्टीने रशियाने त्यांचा दारूगोळा आणि क्षेपणास्त्र प्रणाली नियंत्रित करणारी यंत्रणा युक्रेनच्या सीमेपासून दूर नेत सुरक्षित जागी हलवली आहे. स्टॉर्म शॅडो तेवढ्या दूरपर्यंत मारा करू शकत नाही.
असं असलं तरी मॉस्कोच्या विस्तिर्ण प्रदेशाला या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यापासून सुरक्षित ठेवणं रशियासाठी सोपं नाही, असं सिबिलाईनचे जस्टीन क्रम्प यांना वाटतं.
ते म्हणतात, "यामुळं लष्कराचं नियोजन, नियंत्रण आणि हवाई दलाचं समर्थन घेणं रशियाला अवघड होईल. या क्षेपणास्त्रापासून बचावासाठी रशियन विमानं स्टॉर्म शॅडोच्या रडारपासून दूर गेल्यास त्यांना परत युद्धभूमीवर परतण्यास वेळ आणि खर्च दुप्पट प्रमाणात लागेल."
रशियन लष्कर विज्ञानप्रमुख आणि सल्लागार मॅथ्यू साविल यांच्या मते, हे निर्बंध उठवल्यास युक्रेनला दोन फायदे होतील.
पहिला म्हणजे, अटॅक्म्स सारखी युद्धप्रणाली सक्रिय होईल. आणि दुसरं म्हणजे, या क्षेपणास्त्राच्या रडारवरून दूर गेल्यानं रशियन हवाई संरक्षण यंत्रणा गोंधळून जाईल. त्याचा फायदा घेत युक्रेनचे ड्रोन सहज रशियात प्रवेश करून हल्ले करू शकतील.
पण, असं असलं तरी या क्षेपणास्त्रांमुळे युद्धाचं पारडं फिरेल, अशी शक्यता फार कमी आहे, असं त्यांना वाटतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.