You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युक्रेनला वीज संकटाने घेरलं; टॉर्चच्या उजेडात डॉक्टर करतायत सर्जरी
- Author, विटाली शेव्हचेंको
- Role, बीबीसी मॉनिटरिंग
युद्धामुळे युक्रेनमध्ये वीज नसल्याचा सर्वात मोठा फटका हा हॉस्पिटलमधील कामकाजावर होत आहे.
युक्रेनच्या नागरिक टेटियाना यांच्या अपंग मुलासाठी वीज पुरवठा हा जीवन-मरणाचा खेळ झाला आहे. श्वास घेण्यासाठी, खाण्यासाठी आणि औषध घेण्यासाठीही त्याला विद्युत उपकरणांवर अवलंबून राहावं लागत आहे.
बीबीसी न्यूजसोबत बातचित करताना टेटियाना म्हणाल्या, “विजेवर आमच्या अनेक गोष्टी अवलंबून आहेत. आज हे युद्ध झालं नसतं, तर दुसऱ्या गोष्टींचा आम्ही बऱ्यापैकी सामना केला असता.”
युक्रेनच्या वीज निर्मिती प्रकल्पांवर रशिया सतत हल्ले करत आहे. त्यामुळे युक्रेनी लोकांना दीर्घकाळ विजेशिवाय कसं जगायचं हेच शिकावं लागत आहे.
विजेशिवाय युक्रेनी लोक कसं जगतायत?
रशियाच्या वारंवार हवाई हल्ल्यांमुळे संपूर्ण युक्रेनला अधिककाळ विजेशिवाय राहावं लागत आहे.
टेटियाना यांच्याकडे पेट्रोलवर चालणारे एक जनरेटर आहे. त्याचा सतत वापर करावा लागतो. पण दर सहा तासांनी त्याची उष्णता कमी करण्यासाठी ते बंदही ठेवावं लागतं.
वीज नसल्याने या देशातल्या मोबाईल फोन कव्हरेजवर देखील परिणाम होतोय. त्यामुळे टेटियाना यांना त्यांच्या मुलासाठी अँब्युलन्सला बोलावणंही कठीण जातंय.
"कधीकधी रुग्णवाहिका यायला अर्धा तास लागतो. कधी कधी एक तास लागतो. या काळात माझ्या मुलाला खूप त्रास होतो आणि त्याचे शरीर निळे पडू लागते," असं त्या सांगतात
"माझ्या मुलाला ऑक्सिजन न मिळाल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो. माझं दुख: मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.
कधीकाळी युक्रेनमधून वीज निर्यात व्हायची, पण…
विजेचा प्रश्न गंभीर झाल्याने लाखो युक्रेनियन लोकांना उंच इमारतीच्या लिफ्ट वापरणं किंवा जीवरक्षक उपकरणे वापरणं शक्य होत नाहीय.
युक्रेन नॅशनल एनर्जी कंपनी युक्रेनर्गोने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने गेल्या तीन महिन्यांत नऊ गिगावॅट वीज निर्मिती क्षमता गमावली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियन हल्ल्याच्याआधी युक्रेनमध्ये मुबलक प्रमाणात वीज निर्मिती व्हायची.
युक्रेनमध्ये एवढी वीजनिर्मिती व्हायची की या देशातून नेदरलँड्स, स्लोव्हाकिया, लाटविया, लिथुआनिया आणि एस्टोनियाला वीजनिर्मिती केली जायची.
"सध्या सरकारच्या मालकीचे सर्व थर्मल पॉवर प्लांट नष्ट झाले आहेत. आमच्या देशातील सर्व हायड्रो-पॉवर प्लांट्सना रशियन क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ल्यामुळे नुकसान झाले आहे," असं युक्रेनर्गोच्या प्रवक्त्या मारिया त्स्तुरियन यांनी बीबीसीला सांगितलं.
शेवटी लाखो युक्रेनियन लोकांना पेट्रोल आणि डिझेलवर किंवा मोठ्या पॉवर बँकांवर चालणाऱ्या जनरेटरवर अधिकाधिक अवलंबून राहावं लागतंय
युक्रेनची राजधानीच अंधारात
युक्रेनची राजधानी किव्हमध्येही बराच काळ वीजपुरवठा खंडित होतोय.
रोकसोलाना किव्हमधील 24 मजली अपार्टमेंटमध्ये राहतात. अपार्टमेंटच्या सुविधा चालवण्यासाठी लोकांनी एकत्र येऊन रोकसोलानाला निवडून दिले आहे.
त्या सांगतात, “अपार्टमेंटमध्ये राहाणं आता सोपं राहिलेलं नाही. सतत लाईट जात असल्याने वरच्या मजल्यावर पाणी पोहोचत नाही. लिफ्टही काम करत नाहीत. लहान मुले, वृद्ध आणि अपंगांना खाली उतरण्यासाठी किंवा वर चढण्यासाठी वीज येण्याची वाट पाहावी लागते.”
वरच्या मजल्यावरील लोकांना सहा ते सात तास सलग घरातच बसून राहावं लागतं. गरजेचा किराणा मालही भरता येत नाही.
दुसरीकडे उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांनी रशियन हवाई हल्ल्यांची भीती वाटत असते. कारण बॉम्ब हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी बनवलेल्या बंकरमध्ये पोहोचणं कमी वेळात शक्य होत नाही.
झापोरिझिया येथील व्होलोडिमिर स्टेपनिएव्ह हे दातांचे डॉक्टर आहेत. त्यांना अगदी क्लिष्ट शस्त्रक्रिया करतानाही वीज नसते.
स्टेफनीव्ह म्हणतात की ऑपरेशन दरम्यान वीज गेल्यावर आम्हाला जनरेटरच्या विजेवर काम करावं लागतं. याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, कारण आम्ही पेशंटला उद्या पुन्हा यायला सांगू शकत नाही.
पण सलग आठवडाभर वीज आली नाही तर, अनेक गोष्टी खोळंबून राहतात,असं स्टेफनीव्ह सांगतात.
बॅटरीच्या उजेडात सर्जरी
अगदी अर्जंट सर्जरी करायची असेल तर डॉक्टर स्टेफनीव्ह यांना टॉर्चच्या प्रकाशात काम करणं भाग पडतं.
युद्धाच्या फ्रंट लाईनवर असताना सैनिकांवर उपचार करताना डॉ. स्टेफनीव्ह यांनी ही पद्धत शिकून घेतली आणि आता ते त्यात पारंगत झाले आहेत.
ते युक्रेनियन सैन्याच्या सदस्यांना विनामूल्य किंवा सवलतीच्या दरात उपचार करतात.
डॉ. स्टेफानीव्ह सांगतात की, ते वीज नसतानाही दातदुखी किंवा सूज यावर उपचार करू शकतात. कारण आम्ही विजेशिवाय शस्त्रक्रिया करायला आता ते शिकले आहेत.
काही विश्लेषकांच्या मते, रशियाकडून युक्रेनच्या वीजनिर्मिती प्रकल्पांना लक्ष्य केलं जातंय. त्यामुळे युक्रेनची अर्थव्यवस्था खिळखिळी होऊ शकते आणि त्यांचा पराजय होऊ शकतो, असं रशियाला वाटतंय.