अमेरिकेने चीनवर लादला तब्बल 104 टक्के टॅरिफ, चीन-हाँगकाँगचा शेअर बाजार कोसळला

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 50 टक्के अतिरिक्त टॅरिफ दर लागू केला आहे.
आता चीनवर एकूण 104 टक्क्यांचा टॅरिफ दर लागू झाला आहे. याचा अर्थ असा की, अमेरिकेत येणाऱ्या चिनी सामानावर आता 104 टक्के आयातशुल्क लागू होईल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत कागदपत्रांमधून याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
व्हाईट हाऊसने आपल्या एका वक्तव्यात म्हटलं आहे की, "चीनने अमेरिकेच्या विरोधात प्रत्युत्तरादाखल लागू केलेल्या टॅरिफच्या घोषणेनंतर आम्ही हे पाऊल उचललं आहे."
आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच ट्रम्प यांनी चीनवर 20 टक्के टॅरिफ लावला होता. त्यानंतर, जेव्हा ट्रम्प यांनी संपूर्ण जगावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली तेव्हा चीनवर आणखी 34 टक्के टॅरिफ लागू केला. आता लावण्यात आलेल्या 50 टक्के टॅरिफनंतर एकूण आयातशुल्क 104 टक्के झालं आहे.
ट्रम्प यांनी सोमवारी म्हटलं होतं की, जर चीनने अमेरिकन सामानावर आयात शुल्क लावण्याचा निर्णय परत घेतला नाही तर अमेरिका चीनवर आणखी 50 टक्के टॅरिफ दर लागू करेल.
ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटलं की, ते अमेरिकेच्या 'ब्लॅकमेलला बळी पडणार नाहीत' आणि याविरोधात ते अखेरपर्यंत लढा देतील.
टॅरिफच्या निर्णयानंतर चिनी शेअर बाजारात मोठी पडझड
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर भरभक्कम टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज बुधवारी (9 एप्रिल) चीन आणि हाँगकाँगमधील शेअर बाजार कोसळला आहे.
शांघाय कंपोझिट 1.8% ने तर हँग सेंग 2.8% ने घसरला आहे. हे दोन्हीही चीनच्या शेअर बाजारातील निर्देशांक आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेच्या टॅरिफ कर लादण्याच्या निर्णयाविरुद्ध चीनने प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आहे. चीनचा हा निर्णय पुढील काही तासांत लागू होईल.
व्हॅनगार्ड इन्व्हेस्टमेंट फर्मचे आशिया पॅसिफिकचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ कियान वांग म्हणतात की, "अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव वाढल्याने चीनच्या निर्यातीत मोठी घट होईल यात शंका नाही. याचा परिणाम देशांतर्गत गुंतवणूक, लेबर मार्केट, ग्राहक, आणि एकूणच व्यापारातील विश्वासावर नकारात्मकपणे होईल."

बीबीसीचे चीन प्रतिनिधी स्टीफन मॅकडोनेल यांनी या सगळ्या परिस्थितीबाबत सांगितलंय की, "चीननं म्हटलं आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या ताज्या धमक्यांना न जुमानता चीन या निर्णयाविरोधात ठामपणे उभा आहे, तसेच अमेरिका हा 'गुंडांचा समूह' असल्याचा आरोप चीननं केला आहे."
काही तासांत चीनवर अमेरिकेकडून 104% टॅरिफ कर लागू होण्याची शक्यता आहे. परंतु, या निर्णयामुळे प्रत्युत्तरादाखल लागू करण्यात आलेला टॅरिफ आम्ही मागे घेणार नाही, असं चीननं म्हटलं आहे.
टॅरिफ म्हणजे काय आणि ते कसं काम करतं?
इतर देशांमधून खरेदी केलेल्या वस्तूंवर आकारला जाणारा कर म्हणजे टॅरिफ.
सामान्यतः, ते उत्पादनाचं जे मूल्य असतं त्याच्या टक्केवारीमध्येच मोजले जातात. उदाहरणार्थ, एखाद्या उत्पादनाची किंमत 10 रुपये असेल आणि त्यावर 25% टॅरिफ कर लावला तर त्यानुसार अतिरिक्त 2.50 रुपये शुल्क आकारले जाईल. म्हणजे एकूण शुल्क 12.5 रुपये होईल.
ज्या कंपन्या परदेशी वस्तू देशात आयात करतात त्यांना सरकारला हा कर भरावा लागतो.
जेव्हा कंपन्यांना आयात केलेल्या वस्तूंवर शुल्क (कर) भरावे लागते, तेव्हा या कंपन्या नेहमीच तो खर्च स्वतः उचलत नाहीत. त्याऐवजी, हा अतिरिक्त खर्च भरून काढण्यासाठी त्या ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या उत्पादनाची किंमत वाढवू शकतात.
ट्रम्प का वाढवत आहेत टॅरिफ?
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अर्थशास्त्रीय धोरणाच्या केंद्रस्थानी टॅरिफ आहे. अमेरिकेतल्या आयात आणि निर्यातीतली त्रुटी कमी करून देशात व्यापार संतुलन आणणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे.
2024 मध्ये अमेरिकेत सुमारे 900 अब्ज अमेरिकी डॉलर्स व्यापार तूट (म्हणजे निर्यातीपेक्षा आयात जास्त असणं) दिसून आली.
4 मार्चला अमेरिकन काँग्रेसमध्ये बोलताना ते म्हणाले, "पृथ्वीवरच्या प्रत्येक देश गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला लुटत आहे. आता इथून पुढे आपण असं होऊ द्यायचं नाही,"
टॅरिफमुळे अमेरिकेच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल आणि नोकऱ्या वाचतील. तसेच, कर महसूल आणि आर्थिक वाढही, असं ट्रम्प यांना वाटतं.
त्यांनी म्हटले आहे की, टॅरिफमुळे विदेशी कंपन्या अमेरिकेमध्ये उत्पादन सुरू करतील आणि त्यामुळे अमेरिकन सरकारचं उत्पन्न वाढेल.
'ह्युंदाई' ही दक्षिण कोरियाची चारचाकी वाहन बनवणारी कंपनी अमेरिकेत 21 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी 24 मार्चलाच केली होती.
टॅरिफमुळे ते सगळा लवाजमा अमेरिकेत हलवतील असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











