तामिळनाडूतील व्यावसायिकाने 50 वर्षांपूर्वी चोरलेले 37 रुपये व्याजासह केले परत

- Author, मुरलीधरन काशीविश्वनाथन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील एका व्यावसायिकाने जवळपास 50 वर्षांपूर्वी चोरलेले 37 रुपये नुकतेच परत केले.
तो व्यापारी कोण आहे, त्यांनी चोरी का केली, आता त्यांनी किती रुपये परत केले, नेमकं हे प्रकरण काय आहे, यासंबंधी सविस्तर वृत्तांत :
50 वर्षांपूर्वीची घटना
जवळपास 50 वर्षांपूर्वीची ही घटना आहे. 1970 च्या दशकातला तो काळ होता. श्रीलंकेतील नुवारा एलिया जिल्ह्यातील मास्केलियाजवळील अलाकोला या भागातील चहाच्या मळ्यामध्ये सुब्रमण्यम आणि इलुवाई हे दाम्पत्य काम करायचे.
सुब्रमण्यम आणि इलुवाई यांना त्यांचे राहते घर सोडून दुसऱ्या भागात रहायला जावे लागणार होते. त्यावेळी घर रिकामे करताना त्यांनी रणजित नावाच्या त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या किशोरवयीन मुलाची मदत घेतली.
जुन्या घरातील सामान हलवताना एका उशीखाली रणजितला काही पैसे दिसले. श्रीलंकन चलनानुसार ते 37 रुपये 50 पैसे होते.
रणजित त्यावेळी बेरोजगार होते. त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने ते 37 रुपये 50 पैसे चोरले.

दरम्यान, जुन्या घरातील सर्व सामान नव्या घरात हलवल्यानंतर काही वेळाने इलुवाई यांना आठवले की, त्यांनी उशीखाली काही पैसे ठेवले होते.
मग सुब्रमण्यम आणि इलुवाई यांनी रणजितला त्या पैशांबाबत विचारणा केली. मात्र वारंवार विचारूनही रणजित यांनी पैसे घेतल्याचे मान्य केले नाही.
त्या काळात चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती फार हालाखीची होती. त्यावेळी सुब्रमण्यम आणि इलुवाई यांच्यासाठी 37 रुपये 50 पैसे ही फार मोठी रक्कम होती.


म्हणूनच दुःखी झालेल्या इलुवाईने मंदिरात जाऊन देवाकडे पैसे हरवल्याचं गाऱ्हाणं मांडलं. तेव्हा रणजितही इलुवाईसोबत मंदिरात गेले. इलुवाईसोबत रणजितही देवासमोर रडले.
यावेळी रडतारडता रणजित यांनी देवाकडे प्रार्थना केली की, "देवा ते पैसे मीच चोरले आहेत, पण मला त्याची शिक्षा देऊ नको."
खरंतर रणजित यांच्या घरची परिस्थिती अगदी हालाखीची होती. त्यांची आई मरियमल आणि वडील पलयस्वामी हे दोघेही श्रीलंकेच्या डोंगराळ भागातील चहाच्या मळ्यांमध्ये मजूर म्हणून काम करायचे.
त्यांना तीन भाऊ आणि तीन बहिणी असे मोठे कुटुंब होते. घरच्या गरिबीमुळे रणजित इयत्ता दुसरीच्या पुढे शिक्षण घेऊ शकले नाही.

दरम्यान, या प्रसंगानंतर 17 वर्षांच्या रणजित यांनी कामाच्या शोधात तामिळनाडू गाठले. सोबत घरून येताना काही सोन्याचे दागिनेही आणले.
"तमिळनाडूला आल्यानंतर सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या, परंतु नंतर परिस्थिती सुधारत गेली," असे जुन्या आठवणींबद्दल बोलताना रणजित यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, "मी घरून आणलेलं सोनं विकलं. पण काही कारणामुळे ते पैसेही गेले आणि मी पुन्हा रस्त्यावर आलो. त्यानंतर मी रेस्टॉरंटमध्ये टेबल आणि खोली साफ करण्याची कामं केली. बस स्टँडवर वस्तू विकण्याची कामंही केली. पण मी कोणतंही एक काम फार काळ करू शकलो नाही. नंतर मी एक केटरिंगचा छोटा व्यवसाय सुरू केला. आता या केटरिंगच्या व्यवसायात 125 कर्मचारी काम करतात."
रणजित म्हणाले की, "तब्येत बरी नसताना त्यांनी एकदा बायबल वाचले होते. त्यात एक वाक्य होते, 'दुष्ट लोक त्यांंचं कर्ज फेडत नाहीत, पण नीतिमान लोक त्यांचं कर्ज फेडतात.' त्यानंतर मी कोणाकडूनही उसने पैसे घेतले की, ते ठरलेल्या वेळेत परत करायचो. एकदा मी 1,500 रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, ते परत करण्यासाठी मला खूप दिवस लागले."

रणजित पुढे सांगतात की, "काही वर्षांपूर्वी मी सुब्रमण्यम आणि इलुवाई या दाम्पत्याच्या घरी 37 रुपये 50 पैशांची चोरी केली होती. मी ते पैसे परत केले नव्हते. त्यामुळे हे पैसे परत करण्यासाठी मी चौकशी केली तेव्हा वृद्ध इलुवाई यांचे निधन झाल्याचं मला समजलं. इलुवाई यांना त्यांच्याकडे असलेले पैसे त्यांच्या वारसांना द्यायचे होते. त्यामुळे श्रीलंकेतील माझ्या मित्रांमार्फत मी तिच्या कुटुंबाची माहिती मिळवायला सुरुवात केली."
सुब्रमण्यम आणि इलुवाई यांना सहा मुलं आहेत. तीन मुलगे मुरुगय्या, पलानिंधी आणि कृष्णन आणि तीन मुली वीरम्मल, अजगमम्मल आणि सेल्वामल.

तीन मुलांपैकी मुरुगय्या यांचे निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी व चार मुलं आहेत. पलानिंधी कोलंबो शहराजवळ राहतात, तर कृष्णन नुवारा एलियाजवळ राहतात.
रणजित त्यांच्याशी बोलले आणि त्यांच्या आई-वडिलांचे घेतलेले पैसे परत करणार असल्याचे त्यांना सांगितले.
ऑगस्ट 2024 मध्ये रणजित कोलंबोला गेले आणि एका रेस्टॉरंटमध्ये सुब्रमण्यम कुटुंबातील सदस्यांना भेटले.
रणजित यांनी त्यांना 1970 च्या दशकात घडलेली ती चोरीची घटना सांगितली. या भेटीवेळी रणजित यांनी त्यांच्यासाठी नवीन कपडे देखील घेतले होते. खरंतर रणजित यांनी 37.50 रूपये चोरले होते, परंतु मुरुगय्या, पलानिंधी आणि कृष्णन यांना त्यांनी 70 हजार रुपये परत केले.
सुब्रमण्यम कुटुंबाला आश्चर्याचा धक्का
सुब्रमण्यम यांचे कुटुंबीय अजूनही आश्चर्याच्या धक्क्यामध्ये आहेत. कोलंबोमध्ये राहणारे पलानिंधी म्हणाले, "रणजित आले आणि आमचा पत्ता शोधून आम्हाला पैसे परत केले. आम्हाला याचा खूप आनंद झाला. ते पैसे आता आमच्यासाठी खूप उपयोगी ठरतील. विशेषत: माझा धाकटा भाऊ आणि त्याच्या पत्नीला या पैशांची नितांत गरज आहे."
पलानिंधी म्हणाले, "मी 12-13 वर्षांचा असताना कोलंबोला आलो होतो. तेव्हा काय झाले ते आम्हाला माहीत नाही. रणजित यांनी पैसे घेतले होते की नाही हे कदाचित माझ्या आईलाही माहीत नसावं."
दरम्यान, पैसे परत करताना खूप आनंद झाल्याचे रणजित यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी तिरुचीजवळ राहणाऱ्या सेल्लामल यांच्या कुटुंबालाही काही पैसे पाठवणार असल्याचं नमूद केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











