बंगळुरू चेंगराचेंगरीला नेमकं कोण जबाबदार? सरकार, पोलीस की कर्नाटक क्रिकेट असोसिएशन?

माजी पोलीस अधिकारी सरकार आणि पोलीस दलातील समन्वयावर प्रश्न उपस्थित करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माजी पोलीस अधिकारी सरकार आणि पोलीस दलातील समन्वयावर प्रश्न उपस्थित करत आहेत.
    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बंगळुरूहून बीबीसी हिंदीसाठी

पहिल्यांदाच आरसीबीला आयपीएलचं जेतेपद मिळालं. मात्र, त्याचं सेलिब्रेशन बंगळुरूच्या लोकांना महागात पडलं. प्रचंड गर्दीमुळं झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेमुळे सरकार, पोलीस, क्रिकेट प्रशासन यांच्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कमी वेळेत विजय परेड आयोजित करण्याचे आदेश, सुरक्षा यंत्रणेतील उणिवा, आणि प्रशासनातील सुसंवादाचा अभाव यामुळे ही दुर्घटना घडली.

ही घटना कशी घडली, याला कोण जबाबदार आहे? असे प्रश्न सत्ताधारी आणि इतर लोक उपस्थित करत आहेत. याविषयी जाणून घेऊयात.

सरकार, पोलीस आणि क्रिकेट प्रशासनाशी संबंधित विविध शक्तिकेंद्रांच्या (पॉवर सेंटर्स) अपयशामुळं क्रिकेटच्या विजय सोहळ्यादरम्यान घडलेली ही सर्वात भीषण दुर्घटना. या भयंकर दुर्दैवी घटनेचं बंगळुरू शहर साक्षीदार ठरलं.

या घटनेसंदर्भातील अनेक बाबींनी प्रशासन आणि त्यांच्या निर्णयांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु, या सर्व प्रश्नांची उत्तरं अजूनही काही तथ्यं आणि अंदाजाच्या कक्षेतच आहेत.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत 18 वर्षांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (आरसीबी) विजय मिळवला. या विजयानं भारताची आयटी राजधानी समजल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरात तर आनंदाला उधाण आलं.

मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री फटाके फोडून हा विजयोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. शहराच्या अनेक भागांमध्ये पोलीस पहाटे 3 वाजेपर्यंत बंदोबस्तावर तैनात असल्याचे दिसले होते.

टीमची विधानसौंधपासून (विधानसभा) स्टेडियमपर्यंत विजय मिरवणूक (व्हिक्ट्री परेड) काढण्यात येईल, अशी घोषणा सकाळी 7 वाजून 01 मिनिटांनी आरसीबीच्या अधिकृत एक्स हँडलवरून करण्यात आली.

तसेच यासाठीचा फ्री पास त्यांच्या पोर्टलवरून डाउनलोड करता येईल, हेही जाहीर करण्यात आलं.

कोणते प्रश्न उपस्थित केले जात आहेत?

हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे की, रात्री 1.45 ते सकाळी 7 या वेळेत आरसीबीला विजय मिरवणुकीसाठी परवानगी देणारी अधिकृत संस्था किंवा यंत्रणा नेमकी कोण होती.

कर्नाटकचे माजी डीजीपी एस.टी. रमेश यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, "शेवटच्या षटकापर्यंत ट्रॉफी कोण जिंकेल, हे आपल्याला माहिती नव्हतं. 4 जूनला टीम बंगळुरूच्या दिशेने रवाना झाली."

"अशा परिस्थितीत शहर पोलिसांना बंदोबस्ताची तयारी करण्यासाठी वेळ होता का? हे लक्षात ठेवायला हवं की, हे काम काही सोप्पं नाही."

बंदोबस्ताच्या वेळी हे पाहावं लागतं की, कोण कुठून येणार आणि कोण कुठं जाणार, तसेच त्या दरम्यान गर्दी कशी नियंत्रित केली जाईल.

त्याचबरोबर कोणताही गुन्हा घडणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत जेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होते, तेव्हा अशा घटकांवरही लक्ष ठेवणं आवश्यक आहे, जे महिलांशी गैरवर्तन करू शकतात.

इतक्या कमी वेळेत पोलीस दलाला कसं एकत्रित करता येईल याचा विचार केला गेला होता का, असा प्रश्न विजय मिरवणूक आयोजित करण्यासंदर्भात उपस्थित केला जात आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इतक्या कमी वेळेत पोलीस दलाला कसं एकत्रित करता येईल याचा विचार केला गेला होता का, असा प्रश्न विजय मिरवणूक आयोजित करण्यासंदर्भात उपस्थित केला जात आहे.

किती प्रमाणात सुरक्षा दल तैनात करायचं, याचाही आढावा घेतला जातो आणि त्यानुसार निर्णय घेतला जातो.

रमेश सांगतात, "कायदा आणि सुव्यवस्थेचा पैलूही आहे. त्यामुळे पोलिसांकडे ही योजना बनवण्याइतका वेळ होता का? इतक्या कमी वेळात पोलीस दल जमा करायचं म्हणजे शेजारच्या जिल्ह्यांमधूनही पोलीस बोलवावे लागतात."

"शहर पोलिसांकडे हे सगळं करण्यासाठी वेळ होता का, कोणालाच काही ठाऊक नाही."

अधिकृतरित्या बंगळुरू शहर पोलिसांनी सायंकाळी 5 वाजता स्टेडियममध्ये सन्मान सोहळा होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्याचबरोबर दुपारी 3.28 वाजता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक प्रेस नोट जारी करून वाहतूक निर्बंध लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती.

मात्र, या प्रेस नोटमध्ये हा रोड शो असेल की खुल्या बसमधून मिरवणूक काढली जाईल, हे स्पष्ट करण्यात आलं नव्हतं.

या दरम्यान, आरसीबीला विधानसौंधपासून चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत व्हिक्टरी परेड काढण्याची परवानगी दिली गेलेली नाही, अशा आशयाचा कोणताही संदेश पोलिसांकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देण्यात आला नव्हता.

काय करता आलं असतं?

बुधवार दुपारी गृहमंत्री जी परमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहर पोलिसांना इतक्या कमी वेळेत व्हिक्ट्री परेड आयोजित करता येणार नाही, हे सांगण्यापासून कोणी रोखलं? हा प्रश्न सध्या सरकारी आणि राजकीय वर्तुळात सर्वाधिक विचारला जात आहे.

रमेश म्हणाले, "आदर्श परिस्थितीत पोलिसांनी सत्ताधाऱ्यांना हे सांगायला हवं होतं की हे शक्य नाही. अधिकाऱ्यांनी यामध्ये येणाऱ्या अडचणी समजावत कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) आणि आरसीबीसोबत समन्वय साधायला हवा होता.

बंगळुरू चेंगराचेंगरी

फोटो स्रोत, Getty Images

पूर्वी, म्हणजे सुमारे दोन दशकांपूर्वी, हे शक्य होतं, पण आज संपूर्ण देशात, मी विश्वासानं म्हणू शकतो की, एखादं काम शक्य नाही, हे मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांना स्पष्टपणे सांगणं जवळजवळ अशक्य आहे."

रमेश यांनी म्हटल्याप्रमाणेच एका पोलीस अधिकाऱ्यानं बीबीसी हिंदीला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, "हा एक राजकीय निर्णय होता. हा पोलिसांचा निर्णय नव्हता (समारंभाला परवानगी देण्याचा). हा सोहळा काही दिवसांनी आयोजित करता आला असता."

"तोपर्यंत क्रिकेट चाहत्यांचा विजयाचा उत्साह थोडासा ओसरला असता. तेव्हा गर्दी कमी झाली असती आणि नियंत्रित वातावरणात हे करता आलं असतं. महत्त्वाचं म्हणजे हा जीवघेणा प्रकार घडला नसता."

गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण

गृहमंत्री परमेश्वर यांनी पत्रकारांना सांगितलं की, संपूर्ण कार्यक्रम केएससीए आणि आरसीबी यांनी आयोजित केला होता. "सरकार या समारंभात फक्त सहभागी झालं होतं," असं ते म्हणाले.

एका काँग्रेस नेत्यानं आपलं नाव उघड न करण्याच्या अटीवर प्रश्न उपस्थित करताना म्हटलं, "जर सरकार फक्त समारंभात सहभागी होतं, तर प्रश्न उभा राहतो की उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना एचएएल विमानतळावर जाऊन टीमचं स्वागत करण्याची काय गरज होती?"

आरसीबी टीमचं स्वागत करण्याबाबत उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आरसीबी टीमचं स्वागत करण्याबाबत उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

चेंगराचेंगरीचे साक्षीदार असलेले लोक म्हणाले की, स्टेडियमच्या गेट्सवर गर्दी फक्त आत जाण्यासाठी झाली होती. कारण आरसीबी पोर्टलवरून सर्वांना विनामूल्य पास मिळत होते.

स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांनी कोणालाही आत जाऊ दिलं नाही. कारण लोक स्टेडियममध्ये पोहोचण्यापूर्वीच 32 हजार सीट्स भरल्या होत्या. याच दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10-10 लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)