गुन्हा दाखल ते थेट पोलीस आयुक्त निलंबित; बंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी आतापर्यंत कोणत्या मोठ्या घडामोडी?

गर्दीवर लाठीचार्ज करणारे पोलीस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गर्दीवर लाठीचार्ज करणारे पोलीस

बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी गुरुवारी (5 जून) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरुच्या पोलीस आयुक्तांसह काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.

सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषद घेत अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी बी. दयानंद यांना निलंबित करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर केला. बी. दयानंद हे अलिकडच्या काळातील बंगळुरूचे सर्वात जास्त काळ कार्यरत राहिलेले पोलिस आयुक्त आहेत.

कर्नाटकात याआधी कधीही बेंगळुरुच्या पोलीस आयुक्तांवर निलंबनाची कारवाई झाली नव्हती.

बंगळुरुच्या पोलीस आयुक्तांखेरीज अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास कुमार विकास, डीसीपी सेंट्रल शेखर एच.टी. आणि एसीपी बालकृष्ण यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

मंत्रिमंडळाने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मायकेल कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरसीबी संघाच्या स्वागतासाठी बुधवारी क्रिकेट चाहत्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, आरसीबी संघाच्या स्वागतासाठी बुधवारी क्रिकेट चाहत्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती.

सिद्धरामय्या यांनी म्हटलं, "या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय त्यांच्या बेजबाबदार आणि निष्काळजी वागणुकीमुळे घेण्यात आला आहे. मी आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री झाल्यापासून अशी घटना घडली नाही. ही घटना मनाला चटका लावणारी आहे."

बुधवारी (4 जून) चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू झाला आणि 33 जण जखमी झाले. हे सर्व जण 18 वर्षांनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी आले होते.

या प्रकरणी गुरुवारीच (5 जून) कर्नाटक पोलिसांनी एफआयआर नोंदवली आहे.

एफआयआरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कार्यक्रमाची आयोजक कंपनी डीएनए आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशन यांच्या नावांचा समावेश आहे.

आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनवर गुन्हा दाखल

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी (5 जून) गुन्हा दाखल केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कार्यक्रम आयोजित करणारी डीएनए कंपनी आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कर्नाटक पोलिसांनी या तिन्ही संस्थांवर हेतूपूर्वक न झालेली हत्या (अनियोजित हत्या), जाणीवपूर्वक गंभीर इजा पोहोचविणे यांसारख्या आरोपांखाली भारतीय दंड संहितेच्या (बीएनएस) कलम 105, 118 आणि 120 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

बुधवारी (4 जून) बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू झाला आणि 33 लोक जखमी झाले होते. हे सर्वजण 18 वर्षांनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी आले होते.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितले, "चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटवर चेंगराचेंगरी झाली. जेव्हा ही दुर्घटना घडली, तेव्हा स्टेडियमचं गेट उघडलेलं नव्हतं आणि मोठ्या संख्येने लोक एक छोटं गेट ढकलून आत घुसण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हाच चेंगराचेंगरी झाली."

या प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आदेशानंतर मजिस्ट्रेट चौकशी सुरू करण्यात आली आहे.

बंगळुरू चेंगराचेंगरीची उच्च न्यायालयाकडून दखल

याशिवाय कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत कर्नाटक सरकारला नोटीस बजावत परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी 10 जूनला होणार आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाने चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीची स्वतःहून दखल घेतली आहे. या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू झाला होता.

उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश व्ही. कामेश्वर राव आणि न्यायाधीश सी. एम. जोशी यांच्या खंडपीठाने कर्नाटक सरकारला नोटीस बजावत परिस्थितीचा अहवाल मागवला आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने विचारले की, सरकार भविष्यात अशा परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी निश्चित कार्यपद्धती (एसओपी) तयार करणार आहे का?

बंगळुरूत RCB च्या विजयी जल्लोषावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू, 33 जखमी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बंगळुरूत RCB च्या विजयी जल्लोषावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू, 33 जखमी

महाधिवक्ता शशिकिरण शेट्टी यांनी सांगितले की, सरकार अशी प्रक्रिया तयार करेल. घटनेच्या वेळी स्टेडियम भरल्यानंतरही स्टेडियमच्या आसपासच्या परिसरात अंदाजे 2 लाख लोक उपस्थित असल्याची माहितीही शेट्टी यांनी न्यायालयाला दिली.

या प्रकरणी न्यायालयीन चौकशीसाठी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जून रोजी होणार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)