प्रेयसीची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवले 59 तुकडे, पोलीस मारेकऱ्यापर्यंत पोहोचले पण सापडली 'ती' चिठ्ठी

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, इमरान कुरैशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, बंगळुरूहून

(या बातमीतील काही भाग वाचकांना विचलित करू शकतो.)

बंगळुरूमध्ये महालक्ष्मी नावाच्या महिलेची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या झाली. तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये सापडले होते. या प्रकरणानंतर संपूर्ण भारतात खळबळ उडाली होती.

आता या प्रकरणात पोलिसांसमोर अनेक नवीन गोष्टी उघड झाल्या आहेत.

एकमेकांवर विश्वास कमी असल्यामुळे मुक्तीरंजन रे ने तिची हत्या केल्याचं बंगळुरू पोलिसांचं म्हणणं आहे.

तीस वर्षीय मुक्तीरंजन रे ने बुधवारी (25 सप्टेंबर)ला ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातील गावात आत्महत्या केली होती.

मुक्तीरंजन रे आणि महालक्ष्मी यांचे सहा महिन्यांपासून एकमेकांशी प्रेमसंबंध होते. त्यावरून रंजन कथितरित्या वेडापिसा झाला होता. महालक्ष्मीने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. त्यामुळे तो नाराज झाला होता.

रंजनने त्याच्या लहान भावाला सांगितलं, “बंगळुरूच्या बाहेर जाण्यासाठी त्याला तातडीने पैशाची गरज आहे कारण त्याने रागारागात महालक्ष्मीची हत्या केली आहे.”

त्याने आपल्या भावाला हेही सांगितलं होतं की, “पोलीस तिथे येतील त्यामुळे भाड्याचं घर रिकामं करावं लागेल.” रंजन आपल्या लहान भावाबरोबर बंगळुरूत राहात होता.

(आत्महत्या हा एक गंभीर मानसिक आजार आहे. जर तुम्हालाही नैराश्य आलं असेल तर भारत सरकारची हेल्पलाइन 18002333330 वर मदत मागू शकता. आपल्या मित्रमैत्रिणींशी आणि नातेवाईकांशीही चर्चा करायला हवी.)

ग्राफिक्स
ग्राफिक्स

बंगळुरू पोलिसांचं काय म्हणणं आहे?

बंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महालक्ष्मीची प्रियकर मुक्तीरंजन रे ने हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे 59 तुकडे केले आणि तिच्याच फ्लॅटमधल्या फ्रीजमध्ये ठेवले होते.

पश्चिम बंगळुरूचे अतिरिक्त पोलीस आयुक्त एन.सतीश कुमार यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, “त्याने आपल्या लहान भावाकडे आपणच हत्या केल्याची कबुली दिली होती. आम्ही भारतीय न्याय संहितेच्या कलम 183 च्या अंतर्गत भावाची साक्ष नोंदवून घेतली आहे. रंजनने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतला तपशील आणि भावाने सांगितलेला तपशील सारखाच आहे. ती चिठ्ठी ओडिशा पोलिसांनी त्याच्या घरातून जप्त केली होती.”

महालक्ष्मीच्या हत्येचं प्रकरण गेल्या शनिवारी उघडकीस आलं. तिची आई आणि जुळ्या बहिणीने बिल्डिंगच्या मालकाला फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचं सांगितलं होतं.

हात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

महालक्ष्मी या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहत होती. तिच्या नवऱ्याचं नाव दास हेमंत दास असून ते विभक्त झाले होते. त्यानंतर ती एकटी राहत होती आणि मुलगी तिच्या वडिलांबरोबर राहत होती.

तिची आई आणि बहीण संध्याकाळी बंगळुरूच्या बाहेरच्या भागात असलेल्या नीलमंगलातून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या व्यालिकावल येथे पोहोचल्या आणि महालक्ष्मीच्या मैत्रिणीकडे असलेल्या किल्लीने फ्लॅटचा दरवाजा उघडला.

ते फ्लॅटमध्ये गेल्यावर त्यांना रक्ताचे डाग आणि फ्रीजच्या आसपास खूप किडे दिसले. त्यांनी फ्रीज उघडला तर त्यात महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे दिसले.

त्यानंतर या दोघी किंचाळत घराच्या बाहेर गेल्या. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तपास अधिकारीही तिथे पोहोचले, महालक्ष्मीचे पूर्वाश्रमीचे पती हेमंत दासही तिथे पोहोचले.

त्यांनी टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “अशरफ नावाच्या एका व्यक्तीबरोबर तिचं प्रेमप्रकरण असल्यामुळे सप्टेंबर 2023 मध्ये ते विभक्त झाले होते.”

संशयिताच्या भावाने काय सांगितलं?

बंगळुरू पोलिसांनी हेमंत दास यांच्या वक्तव्याचं खंडण केलं आहे.

नाव ना जाहीर करण्याच्या अटीवर पोलीस अधिकाऱ्यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, “महालक्ष्मी आणि अशरफचे संबंध होते पण काही काळापूर्वी ते वेगळे झाले होते.”

त्यांच्या मते, “अशरफचीही चौकशी सुरू आहे आणि त्याच्या हालचालींची चौकशी तांत्रिकदृष्ट्या आणि अन्य पद्धतीने केली आहे.”

पोलीस या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून मुक्ती रंजन रे चा शोध घेत होते.

महिलेची सावली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

पोलीस उपायुक्त शेखर एच.टी यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, “आम्ही तंत्रज्ञानाच्या मदतीने बंगळुरूला राहणाऱ्या त्याच्या भावाचा शोध घेतला. तेव्हा आम्हाला कळलं की संशयिताने भावासमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे.”

पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “भावाने पोलिसांना सांगितलं की जेव्हा रंजनला कळलं की महालक्ष्मीच्या आयुष्यात आणखी कोणी पुरुष होता तरीही ती लग्नासाठी तगादा लावत होती. तेव्हा त्याला खूप राग आला.”

त्यामुळेच या दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची. यामुळे एकदा त्यांना मल्लेश्वरम पोलीस स्टेशनातही जावं लागलं होतं. पोलिसांनी त्यांची समजूत काढून परत पाठवलं होतं.

2 सप्टेंबरलाही या दोघांचं भांडण झाल्याचं रंजनने आपल्या भावाला सांगितलं होतं अशी माहितीही समोर येत आहे.

न्यायवैद्यक अहवालाची प्रतीक्षा

नाव न सांगण्याच्या अटीवर एक पोलीस अधिकारी म्हणाला, “रंजनने त्याच्या भावाला सांगितलं की तीन ते चार सप्टेंबरच्या दरम्यान रात्री कडाक्याचं भांडण झाल्यावर रागाच्या भरात त्याने महालक्ष्मीची हत्या केली.”

“आमच्याकडे एक व्हीडिओ आहे. त्यात ते दुसऱ्या दिवशी एका दुकानात जाताना आणि मांस विक्रेत्यांकडे असतो तसा चाकू विकत घेताना दिसत आहे.”

आणखी एक पोलीस अधिकारी म्हणाला, “त्याने महालक्ष्मीची हत्या कशी केली हे जाणून घेण्यासाठी आम्ही न्यायवैद्यक अहवालाची प्रतीक्षा करत आहोत.”

या घटनेनंतर रंजन बंगळुरू सोडून फरार झाला होता.

फॉरेन्सिक टेस्ट किट

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर पोलिसांना तो पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या सीमेजवळ असल्याची माहिती मिळाली होती.

बंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री भद्रक जिल्ह्यातील आपल्या गावी तो पोहोचला आणि बुधवारी घरापासून दूर अंतरावर अंतरावर त्याचा मृतदेह सापडला.

त्याने आत्महत्या केली होती आणि घरी त्याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती.

महत्त्वपूर्ण माहिती- तुम्हाला जर आत्महत्येचे विचार येत असतील किंवा तुमच्या ओळखीत कोणाबरोबर असं होत असेल तर तुम्ही भारतात आसरा वेबसाइट किंवा जागतिक पातळीवर बीफ्रेंडर्स वर्ल्डवाइड च्या माध्यमातून मदत मिळवू शकता.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.